मोरपिसं...

सोनाली नवांगुळ
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

तशी मला झोपेबद्दल फार अडचण नाही, पण स्वप्नं फार पडतात नि बरीचशी काही काळ तरी लक्षात राहतात. त्याचे अर्थ काढण्याचा उद्योग मी करत नाही, जसा भविष्य वाचण्याचा करत नाही. झालं काय की थंडी वाढली नि भरपूर सर्दी-खोकला झाला. तो काही कह्यात येईना. सतत तोंड लांब नि डोळे आध्यात्मिक भाव दाखवणारे. नाकानं श्‍वास घेता येईना, तोंडानं घेऊन कोरड पडायला लागली. दोन-तीन दिवस रात्री झोप झाली नाही. चिडचिड. बरं, ती दुसऱ्यांवर करणं योग्य नव्हे, याचं भान ठेवून स्वत:वर करायची असते याचाही भार होतोच. अशी गोष्ट आतूनच व्हावी लागते!

तशी मला झोपेबद्दल फार अडचण नाही, पण स्वप्नं फार पडतात नि बरीचशी काही काळ तरी लक्षात राहतात. त्याचे अर्थ काढण्याचा उद्योग मी करत नाही, जसा भविष्य वाचण्याचा करत नाही. झालं काय की थंडी वाढली नि भरपूर सर्दी-खोकला झाला. तो काही कह्यात येईना. सतत तोंड लांब नि डोळे आध्यात्मिक भाव दाखवणारे. नाकानं श्‍वास घेता येईना, तोंडानं घेऊन कोरड पडायला लागली. दोन-तीन दिवस रात्री झोप झाली नाही. चिडचिड. बरं, ती दुसऱ्यांवर करणं योग्य नव्हे, याचं भान ठेवून स्वत:वर करायची असते याचाही भार होतोच. अशी गोष्ट आतूनच व्हावी लागते! डॉक्‍टरांना फोन केला तर त्यांनी ताबडतोब बरं वाटायला सुरवात व्हावी म्हणून पाच दिवस जी गोळी रात्री झोपताना घ्यायची, ती त्या दिवसापुरती सकाळीही घ्यायला सांगितली. आणखी उतारा म्हणून तर्रीदार मिसळ खाऊन गोळी घेतली. सर्दी सुटू लागली. अतिशय पेंगुळल्यासारखं झालं होतं. गोळीच्या प्रभावामुळं दिवसा चांगले चार तास झोपले. बरं वाटायला लागलं. रात्री पुन्हा डोस होताच. अशी खोल नि गडद झोप लागली की जणू मी कधी या जगात नव्हतेच. सकाळी उठल्यावर मस्त, हलकं नि सैल वाटत होतं. मुख्य म्हणजे स्वप्न पडल्याची जाणीव नव्हती. दहा तास सलग, शांत, अडथळामुक्त झोप. परवापर्यंत किती तऱ्हेचे प्रश्‍न व कितीतरी माणसांच्या विचित्र अनुभवांच्या गोष्टी जाचत होत्या. साचलेल्या कामांचे ढिगारे मान दुखवत होते. रोजच्या व्यायामाचं गणित तब्येतीच्या कुरबुरीमुळं चुकल्याच्या अपराधभावानं जडशीळ झाले होते. - पण एकूणात तेरा-चौदा तासांच्या गाढ झोपेनं काहीतरी असं घडवलं होतं की मी बदलले होते.

गाढ झोपेनं शरीराला व मनाला जे मिळालं, त्यानं माझ्यासमोर वाढून ठेवलेल्या परिस्थितीचा सगळा ताणच जणू संपवला होता. मी नव्या जोमानं, पण म्हणजे नव्या वेगानं नव्हे, तर सुखानं व तजेल्यानं आहे त्याकडे नीट व मोकळेपणानं पाहू लागले होते. माझ्यातला त्वेष व आधीच्या दिवशी वाटणारी सौम्य हिंसा विरघळून गेली होती.
लहान मुलांना वेळ झाली की गाणं म्हणून, थोपटवून, रागावून, भीती दाखवून येनकेन प्रकारे आपण झोपवतो. उठल्यावर ती नवी होऊन खेळ मांडतात. आरोग्याचा गंध त्यांच्या तनामनातून वाहत असतो. - खरंतर कितीतरी तऱ्हेचं हुळहुळेपण कमी करण्याची नामी शक्कल आपल्या अगदी पापणीशी रेंगाळत असते. तिला आत घ्यावं नि शांत झोपेचंही चित्र रंगवून पाहावं... काट्यांची मोरपिसं होतात की नाही पाहावं...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonali navangul write pahatpawal article in editorial