साकार आकार

sonali navangul
sonali navangul

चित्रकार प्रभाकर बरवेंच्या ‘चित्र वस्तुविचार’ पुस्तकाच्या संपादनाची गोष्ट हेमंत कर्णिक सांगत होते. ते म्हणाले, ‘बरवेंच्या डायऱ्या, त्यांनी लिहिलेलं सगळं वाचून काढण्याचा पहिला प्रवास खूपच आनंद देणारा होता. बरवे सगळं काही पाहत ते आकार, अवकाशात. म्हणजे समोर झाड आहे, तर त्यांना झाडाची स्मृती नसेच, त्यांना आठवे अवकाशाला छेदून जाणारा थेट उभा आकार! त्यादृष्टीनं बघायला लागलो तर मजाच यायला लागली.’ ते म्हणाले, की नुसते आकार बघत राहिले तर लॉजिकची प्रोसेस बदलते! कारण एखादी गोष्ट ‘अमुक’ आहे ठरलं की त्यापलीकडं बघायचं आपण विसरायला लागतो किंवा लक्षात येत नाही. त्यामुळं सर्जनाच्या प्रक्रियेत अडथळे येतात. - अरेच्चा! म्हणजे आपण कलावंत नसू तरी आपलं पाहणं, वाचणं, अर्थ लावणं याच्या पद्धती ठरून गेल्या, तर रोजच्या जगण्यातली गंमत सपाट होऊन जाण्याचा धोका असतो... अतर्क्‍य गोष्टींना भिडण्यात नि तर्काच्या नि अनुमानाच्या पठडीबाज पद्धती झुगारण्यातून बरेच ताण हलके होऊन जाऊ शकतात तर! आकारात सहेतूक अफरातफर केली तर मौज वाढते. गंमत आहे यार...
अशा गमती वाचणं, त्यांची फोड करणं यातला ‘सुकून’ मला साधलाय असं वाटवणाऱ्या भ्रमाचा भोपळा फुटण्याची गोष्ट इथं सांगायलाच हवी. आम्ही मित्र गोव्यात गेलेलो. ठरलं की ज्या किनाऱ्यावर परदेशी पर्यटक जास्ती असतात तिकडं जायचं. वाळूतून व्हीलचेअर खेचणं कठीण, पण अवधूत, वसंत नि साहिल तिघंतिघं असल्यावर मग काय! समुद्र डोळ्यांसमोर चमकायला लागला नि खारं वारं धुंद करायला लागल्यावर मी म्हटलं, ‘आता मोजक्‍या कपड्यातला एखादा मापातला, प्रमाणबद्ध देह दिसूदेत म्हणजे उत्साह वाढेल.’ लगेच साहिल म्हणाला,‘ हा प्रमाणबद्ध आकार काय असतो गं? नि तुझ्यासारख्या विचार करणाऱ्या व्यक्तीनं आकारांच्या योग्यायोग्यतेबद्दल बोलावं? सगळेच आकार आपलं सौंदर्य घेऊन येतात, त्यात काही फरक नाही करता येत हे तुला नव्यानं सांगायला पाहिजे काय?’ - खाडकन जागीच झाले मी. माझ्या नकळत मी काय काय समजुती घट्ट करत होते हे कळलंच नव्हतं. त्यानंतर मात्र जितका वेळ समुद्राजवळ होतो तेच दृश्‍य नव्यानं ओळख पटल्यासारखं दिसायला लागलं. भरउन्हात अत्यल्प कपड्यात समुद्रात खेळत आतबाहेर करणारे सगळे स्त्री-पुरुष सुंदर भासले... उन्हात चमकणारे ते पोट सुटलेले, त्वचा रापलेले, मांड्या थुलथुलित असणारे, गोल, नि कशाकशा आकाराचे सगळे नमकीन देह आपल्या आकाराशी विनित असल्यामुळं देखणे झाले होते. आकारांना अवकाशाशी मन:पूर्वक भिडताना पाहिलं, की लॉजिकची प्रोसेस खरंच बदलतेय कर्णिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com