चिमणीचे दात (परिमळ)

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पक्ष्यांचा थवा जमिनीवर अलगद उतरावा आणि दाणे टिपताटिपता चिवचिवत्या ललकाऱ्यांची मैफल बहरून यावी, तसं दृश्‍य रस्त्याच्या काठांवर सकाळी ठिकठिकाणी दिसत होतं. शालेय गणवेशांतले पंख तिथं एकसारखे फडफडत होते. शाळेची बस यायला किंचित वेळ होता. तिथल्या चिमणपाखरांचा खेळ रस्त्याच्या कोपऱ्यात रंगात आला होता. सगळ्यांच्या दप्तरांचा, डब्यांच्या पिशव्यांचा एका कडेला रंगीबेरंगी डोंगर झाला होता. मुलांचं लक्ष खेळाइतकंच आपापल्या दप्तरांकडंही होतं. दमलेली पाखरं फांदीच्या निवाऱ्याला यावीत, तशी काही मुलं अधूनमधून दप्तरांकडं जाऊन क्षणभर विसावत होती. दप्तरांजवळचे डबे उघडून तोंडात खाऊ टाकीत होती.

पक्ष्यांचा थवा जमिनीवर अलगद उतरावा आणि दाणे टिपताटिपता चिवचिवत्या ललकाऱ्यांची मैफल बहरून यावी, तसं दृश्‍य रस्त्याच्या काठांवर सकाळी ठिकठिकाणी दिसत होतं. शालेय गणवेशांतले पंख तिथं एकसारखे फडफडत होते. शाळेची बस यायला किंचित वेळ होता. तिथल्या चिमणपाखरांचा खेळ रस्त्याच्या कोपऱ्यात रंगात आला होता. सगळ्यांच्या दप्तरांचा, डब्यांच्या पिशव्यांचा एका कडेला रंगीबेरंगी डोंगर झाला होता. मुलांचं लक्ष खेळाइतकंच आपापल्या दप्तरांकडंही होतं. दमलेली पाखरं फांदीच्या निवाऱ्याला यावीत, तशी काही मुलं अधूनमधून दप्तरांकडं जाऊन क्षणभर विसावत होती. दप्तरांजवळचे डबे उघडून तोंडात खाऊ टाकीत होती. वर पाण्याचा घोट घेऊन पुन्हा खेळांच्या आनंदी आवर्तांत मनसोक्त बुडून जात होती. आईनं दिलेल्या डब्यातल्या खाऊचं रहस्य अनेकांना डब्याची गुहा खुली केल्यावरच उलगडत होतं. पुन्हा खेळाच्या झोक्‍यावर येऊन बसताच, शेजारच्या भिडूशी त्या खाऊच्या चवींची वर्णनं सुरू होत. असले एकेक चविष्ट रहस्यं उघड होताच, काही वेळासाठी खेळ थांबविला गेला, डबे उघडले गेले. खाऊचा छोटा भाग मुठीत घेऊन, ती मूठ रुमालात, शर्टाच्या किंवा फ्रॉकच्या एखाद्या कोपऱ्यात लपवली गेली. चिमणीच्या दातांनी त्या खाऊची विभागणी झाली. एकमेकांच्या खाऊच्या चवी इकडून तिकडं फिरत राहिल्या. इतक्‍यात त्यांतल्या कुणाला तरी बसचं दर्शन झालं आणि बघता बघता आनंदपाखरांचा थवा भुर्रकन उडून बसमधून निघून गेला. 

मुलं तिथून गेली, तरीही रस्त्याचा तो कोपरा हर्षगंधानं दरवळतच राहिला. मुलांच्या तिथल्या प्रत्यक्ष नसण्यालाही जणू एक रेंगाळणारं अस्तित्व लाभलेलं होतं. त्यांच्या आवाजांच्या रांगोळ्या अजूनही तिथं हसत असल्याचा भास मनात उमटत होता. मुलांच्या टाळ्यांचे कोवळे पडसाद तिथं ऐकू येत राहिले. परस्परांच्या टोपणनावांच्या हाका उंचावत जाऊ लागल्या. खाऊच्या मुठी तिथं फिरताना दिसू लागल्या. तिथलं निरागस जग मनाच्या अंगणात नंतर दीर्घ काळ वस्तीला राहिलं. 

चिमणीच्या दातांनी मित्र-मैत्रिणींना केलं जाणारं खाऊवाटप हा मोठा संस्कार आहे. एकमेकांशी जुळवून घेण्याचा. आनंद वाटून घेण्याचा आणि दातृत्वाचाही. हा संस्कार म्हणजे माणसाला मिळालेलं जन्मदत्त देणं आहे. तो संस्कार सांगतो ः बरोबरच्याला जाणा. त्याच्या मनात जागा मिळवा. सहकाऱ्यांसाठी मदतीचे हात पुढं करा. आनंदाच्या क्षणांची देवाणघेवाण करा. काळ गतीनं सरकतो आहे. माणसांनी एकत्र येण्याचे क्षणही साऱ्या धावपळीत उडून चालले आहेत. हे निसटते क्षण समरसून जगा. 

चिमणीचे बालपणीचे दात आपल्याकडंही असतात. आठवून पाहा, चिमणवयातले ते क्षण, ती मैत्री. खाऊच्या त्या रंगीबेरंगी चवी. चिमणीचे ते दात वाढत्या वयातही प्रत्येकाबरोबर पुन्हा आले तर! परस्परांच्या मदतीनं हे जग अजून सुंदर-संपन्न करता येईल; मात्र त्यासाठी ते चिमणं मन फिरून मिळवायला हवं!

Web Title: sparrow teeth