दहावीच्या परीक्षेचे मूल्यमापन

दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शालेय आयुष्यातली पहिलीच सार्वजनिक परीक्षा असल्यामुळे तिचे त्यांच्या, शिक्षकांच्या, त्यांच्या आई-वडिलांच्या, अशा सर्वांच्याच दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असते. मोठ्या प्रमाणावर गाजावाजा होणाऱ्या या परीक्षेचा निकालही असाच बंपर लागतो.
SSC Exam Evaluation Scheme education
SSC Exam Evaluation Scheme educationSakal

- डॉ. वसंत काळपांडे

दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शालेय आयुष्यातली पहिलीच सार्वजनिक परीक्षा असल्यामुळे तिचे त्यांच्या, शिक्षकांच्या, त्यांच्या आई-वडिलांच्या, अशा सर्वांच्याच दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असते. मोठ्या प्रमाणावर गाजावाजा होणाऱ्या या परीक्षेचा निकालही असाच बंपर लागतो. पण एवढा निकाल लागूनही शिक्षणाचा स्तर उंचावला आहे, असे शिक्षकसुद्धा म्हणत नाहीत.

२००७पासून दहावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात २० टक्के अंतर्गत गुण द्यायला सुरुवात झाली. निकाल आणि गुण यांच्यातील फुगवट्याचे कारण अंतर्गत गुण हेच आहे, असा सर्वसाधारण समज आहे आणि त्यात बरेचसे तथ्यही आहे.

बहुतेक शाळांत योग्य रीतीने मूल्यमापन न करताच विद्यार्थ्यांना सरसकट १८ ते २० अंतर्गत गुण दिले जातात. यामुळे लेखी परीक्षेत नापास होऊ शकतील असे अनेक विद्यार्थीसुद्धा दहावी पास होतात. २०११मध्ये बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ७६ टक्के होता.

२०२३मध्ये तो ९३ टक्क्यांवर गेला. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दीडपटीने वाढून ती पाचच्या जवळपास गेली. गेल्या चार-पाच वर्षांतच हा फुगवटा वाढलेला दिसतो. सध्याच्या या वाढलेल्या फुगवट्यामागचे प्रमुख कारण प्रश्नपत्रिकांचे अतिसुलभीकरण हेच आहे.

२०१८पासून एसएससी बोर्डाने ‘कृतिपत्रिका’ या स्वरूपांत प्रश्नपत्रिका तयार करायला सुरुवात केली. या पद्धतीमुळे नेमका कोणता फरक झाला, कृती आणि प्रश्न यांत नेमका काय फरक आहे, यांबद्दल तज्ज्ञांच्या मनांतच स्पष्टता नाही.

चौकटी, तक्ते, आकृत्या अशा विषयाशी संबंध नसलेल्या गोष्टी म्हणजे कृती असाच प्रामुख्याने भाषांच्या कृतिपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांचा समज झालेला दिसतो. विद्यार्थी सहावी-सातवीत आले, तरी त्यांना गोट्या, काड्या, रेघा यांचा उपयोग करून बेरजा, वजाबाक्या करायला सांगावे; तसाच हा प्रकार आहे.

दहावीच्या मराठीच्या आणि इंग्रजीच्या कृतिपत्रिकांतील तीन प्रश्न पुढे दिले आहेत. (१) “ ‘रखवालदार’ या शब्दांतील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. (उत्तर: वाल, खल, दार, वार, खवा, इ.)”, (२) “विरामचिन्हे ओळखा.

(, - उत्तर: स्वल्पविराम) आणि (“ ” – उत्तर: दुहेरी अवतरण चिन्ह)” आणि (३) “रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहून pe_ple, mat_h, hou_e, ad_lt हे शब्द पूर्ण करा.” बहुतेक सर्वच प्रश्न थोड्याफार फरकाने असेच अतिसोपे आणि सुमार पातळीचे असतात.

गणिताच्या कृतिपत्रिकेत एखादे उदाहरण पूर्ण सोडवायला सांगण्याऐवजी त्याच्या सर्वच पायऱ्या कृतिपत्रिकेत दिलेल्या असतात आणि प्रत्येक पायरीत एक जागा रिकामी ठेवलेली असते. विद्यार्थ्यांनी या रिकाम्या जागा भरणे एवढेच अपेक्षित असते; बहुतेकजण त्या अंदाजानेसुद्धा भरू शकतात.

प्रश्नपत्रिकांमधील २० टक्के प्रश्न कठीण असावेत, अशी अपेक्षा असते; पण कृतिपत्रिकांत कठीण प्रश्न अजिबातच नसतात. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच सार्वजनिक परीक्षा नियमितपणे अभ्यास करणारे विद्यार्थी सहजपणे पास होऊ शकतील, इतकी सोपी नक्कीच असावी.

पण त्याचवेळी ती ज्यांना विषयाची विशेष आवड आहे, त्यात विशेष गती आहे, अशा बुद्धिमान विद्यार्थ्यांची वरच्या दर्जाची कौशल्ये तपासता येतील, त्यांना चिकित्सक विचार करावा लागेल, त्यांना आव्हानात्मक वाटेल, अशीसुद्धा असली पाहिजे.

पण कृतिपत्रिकांत आव्हानात्मक प्रश्नच नसतात. त्यामुळे बुद्धिमान आणि सर्वसाधारण असे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांच्या पातळीवर येतात. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाची काठिण्यपातळी आणि भेदभाव-क्षमता यांचे दरवर्षी पद्धतशीर विश्लेषण करून हे दोन्ही निकष योग्य प्रमाणात पाळले जातील, अशा रीतीने बदल करून हे सपाटीकरण थांबवायला हवे.

प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमातील अपेक्षित अध्ययन-निष्पत्ती तपासतात की नाही, या दृष्टीने त्यांची नियमितपणे चिकित्सा झाली पाहिजे. अंतर्गत गुणांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे, या दृष्टीने अंतर्गत गुणदान-पद्धतीचा फेरविचार करायला पाहिजे. अप्रामाणिकपणे अंतर्गत मूल्यमापन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला पाहिजे.

दहावीची सध्याची परीक्षापद्धती विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांत अपेक्षित असलेल्या अपेक्षा कितपत पूर्ण होतात, हे तपासण्याच्या दृष्टीने अयशस्वी ठरत आहे. या संदर्भात शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात केलेल्या शिफारशींनुसार सुधारणा करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलायला हवीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com