आनंदाची गुहा

sunita tarapure
sunita tarapure

सो नेरी किरणांमध्ये न्हाऊन निघालेली रविवारची प्रसन्न सकाळ. काहीशी आळसावलेलीच. चहाचा कप आणि वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्या घेऊन मी गॅलरीत आले ती ‘सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं... गाणं गुणगुणतच. सर्वांगान मोहोरलेल्या आंब्याने केलेलं स्वागत स्वीकारतेय, तोच पानं झाडत उभा गुलमोहर डोळे मिचकावत म्हणाला, ‘बस्स, थोडे दिवस. मग मीही अंगांगातून असा लालबुंद फुलून येईन की नजर ठरणार नाही तुझी.’ चाफा मात्र वैराग्याच्या मूडमध्ये. पायतळी तपकिरी पानांचा गालिचा पसरून वसंताची चाहूल घेत स्पब्ध उभा. एरवी पानांमध्ये दडल्यानं न दिसणाऱ्या त्याच्या फांद्यांची डौलदार वळणं पाहत मी उभी असतानाच, सखी शेजारणीचा करवादलेला आवाज कानावर पडला, ‘श्‍शी, काय बाई ही पानगळ... केवढा कचरा होतो, वैताग आहे नुसता...’ ‘अगं’, नव्याच्या स्वागताची तयारी आहे ही. थोडा वेळ तुझी साफसफाई ठेव बाजूला. इथून तुझी बाग केवढी सुंदर दिसतेय बघ तर खरं...’ पण माझ्या आवाहनाकडं साफ दुर्लक्ष करत ती करवादत राहिली.  तो राजा आठवला, जो त्रैलोक्‍याचा खजिना जवळ असूनही दुःखी होता. न राहवून एके दिवशी राणीनं दुःखाचं कारण विचारलं. तो म्हणाला, ‘आपल्या बागेतल्या माळ्याला पाहिलंस, त्याच्याकडं काहीही नसताना केवढा आनंदी असतो तो. त्याचा आनंद पाहून दुःख होतं मला.’ अल्पमती राणी म्हणाली, ‘अहो, तुम्ही महाराज आहात. त्याला कडक शिक्षा द्या, म्हणजे तो दुःखी होईल.’ मूढ राजाने त्या माळ्याचे डोळे फोडण्याची शिक्षा फर्मावली. पण काही दिवसांनी पाहतो तर तो माळी अधिकच आनंदी दिसला. न राहवून राजानं विचारलं, ‘अरे, तुला एवढा आनंद तरी कशाचा होतो?’ माळी म्हणाला, ‘महाराज याचं श्रेय तुम्हालाच आहे. तुम्ही माझे डोळे फोडले नसते तर हा आनंद मला मिळाला नसता. आधी बागेतल्या फुलांचे रंग, आकार पाहून मी आनंदी व्हायचो. निसर्गसौंदर्य न्याहाळताना आगळीच खुशी मिळायची. पण डोळे गमावल्यानंतर दृष्टीपलीकडंचही दिसायला लागलं. आता मला स्पर्शाची भाषा उमगते. या भाषेतून ही झाडं-पानं-फुलं त्यांचं अंतरंग माझ्यापुढं उकलतात. नद्या पर्वतांचे साद मला ऐकू येतात. पक्ष्यांची मंजुळ गाणी सदोदित मला रिझवतात. ऊन-वारा-पाऊस माझ्या तनालाच नाही तर मनाहाली स्पर्शतात. केवळ तुमच्यामुळं ही आनंदाची गुहा मला गवसली. धन्यवाद महाराज?’
अशी आनंदाची गुहा आहे आपल्याजवळ. आपल्याच अंतरंगात. ‘तिला तिळा दार उघढ’ म्हणण्याचीही गरज नाहीये. त्याचं द्वार उघडच आहे. सदोदित!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com