सुपरबग पछाडी सर्वां, नाही भेदभाव

माधव गाडगीळ (ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ)
शनिवार, 3 डिसेंबर 2016

औषधनिर्मिती प्रक्रियेतील बेलगाम प्रदूषण हे कोणत्याही अँटिबायोटिकला दाद न देणारे रोगजंतू-सुपरबग उपजण्यामागचे एक मोठे कारण आहे. "स्वच्छ भारत' अभियानाने या सैतानाला काबूत आणण्याचे आव्हान स्वीकारलेच पाहिजे.

औषधनिर्मिती प्रक्रियेतील बेलगाम प्रदूषण हे कोणत्याही अँटिबायोटिकला दाद न देणारे रोगजंतू-सुपरबग उपजण्यामागचे एक मोठे कारण आहे. "स्वच्छ भारत' अभियानाने या सैतानाला काबूत आणण्याचे आव्हान स्वीकारलेच पाहिजे.

नॉर्वेच्या उत्तराखंडात राहतात रेनडिअरांवर जीवन कंठणारी सामी मंडळी. वन्य रेनडिअरांच्या एकेका कळपाचा पाठलाग करत सामींची एकेक टोळी त्यांच्यामागे फिरत राहते. वर्षातून एकदा त्यांना क्रिकेटच्या नेटसारख्या दीड-दीड किलोमीटर लांब जाळ्यात पकडून त्यांच्या अंगावर आपल्या मालकीच्या खुणांचे डाग देतात. वर्षभर एकेकाला पकडून मांस खातात, चामडे, हाडे, शिंगे वापरतात, विकतात. माझ्या एका नॉर्वेवासी प्राणिशास्त्रज्ञ मित्राने विद्यापीठात भाषण द्यायला बोलावले, सुचवले की त्याच दिवसांत सामी रेनडिअरना पकडतात, बघायला जाऊ. खुशीत त्या वृक्षहीन टापूत पोचलो, तिथे वाढत होती केवळ रेनडिअर खातात ती दगडफुले. सामींनी शेकडो रेनडिअरांना जाळ्यात हाकलत आणले होते. आम्ही पोचताच हा कोण काळा-सावळा प्राणी म्हणून कुतूहलाने मला गराडा घातला. भारतीय म्हटल्यावर विचारले, "तू खिळे मारलेल्या पाटावर बसून प्राणायाम करतोस का?' सांगितले, "प्राणायाम करतो, पण जमिनीवर बसून, अन्‌ तुमचं काय चाललंय?' ते म्हणाले, "नव्याने वाढलेल्या रेनडिअरांना डाग देतोय, बाकीच्यांचे डाग तपासतोय आणि सगळ्यांना अँटिबायोटिक चारतोय. आमच्या माहितीचे सगळे गायी, बकऱ्या पाळणारे जनावरांना अँटिबायोटिक चारतात. त्यामुळे त्यांची वाढ जास्त झपाट्याने होते. आम्हीही अलीकडे सुरू केलंय.'

दुसऱ्या महायुद्धात सैनिकांवर उपचार करण्यासाठी पेनिसिलीन या अँटिबायोटिकचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. लवकरच हे वैद्यकशास्त्राचे सर्वांत प्रभावी अस्त्र म्हणून प्रस्थापित झाले; त्याचे औद्योगिक उत्पादन जोरात सुरू झाले. अँटिबायोटिक्‍सचा खप वाढवणे उत्पादकांना लाभदायक आहे आणि त्या रेट्यातून अँटिबायोटिक्‍सचा अवाजवी वापर फोफावला आहे. अनेकदा रुग्णांना निष्कारण अँटिबायोटिक्‍स दिले जातात; अनेक रुग्ण स्वतःहूनच अँटिबायोटिक्‍स घेतात. पण याहून मोठी समस्या आहे पशुपालनात अँटिबायोटिक्‍सचा भरमसाठ वापर. अमेरिकेत हा एकूण खपाच्या 80 टक्‍क्‍यांवर येऊन ठेपला आहे. शिवाय निर्मिती प्रक्रियेतील प्रदूषणातून अँटिबायोटिक्‍स पर्यावरणात पसरतात. या सगळ्यांतून आज निरुपद्रवी, तसेच आपल्याला रोगग्रस्त करणारे बॅक्‍टेरिया जिकडे तिकडे अँटिबायोटिक्‍सना सामोरे जाताहेत. सर्वसामान्य बॅक्‍टेरिया अँटिबायोटिक्‍सना बळी पडतात, पण म्युटेशन अथवा जनुकांतल्या आपोआप बदलांतून अँटिबायोटिक्‍स प्रतिरोधक्षमता निर्माण होऊ शकते. अँटिबायोटिक्‍सना तोंड देताना प्रतिरोधक बॅक्‍टेरिया जास्त समर्थपणे जगतात आणि त्यांची संतती पसरू लागते.

हे खास धोकादायक आहे, कारण बॅक्‍टेरियांच्या अनुवंशिकतेच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रणालीमुळे वेगवेगळ्या जातींच्या बॅक्‍टेरियांमध्ये जनुकांची देवाण-घेवाण सातत्याने चालू असते. आपल्यासारख्या प्राण्यांत प्रत्येक पेशीत अनेक रंगसूत्रे, क्रोमोसोम्स, असतात व वेगवेगळे गुणधर्म ठरवणारे जनुक विशिष्ट रंगसूत्रावर विवक्षित स्थानी ठिय्या देऊन असतात. आपले जनुकसंच पूर्वजांकडून आपल्याकडे येतात आणि ते पुढे आपल्या वंशजांकडे पोचवले जातात. पण बॅक्‍टेरियांच्या चंचल विश्वात असे काहीही स्थिर नसते. त्यांच्या पेशींत एका सलग रंगसूत्रासोबत प्लाझमिड नावाचे छोटे छोटे वर्तुळाकार अतिशय चुळबुळे जनुकधारी खंड असतात. ते एका बॅक्‍टेरियातून दुसऱ्या, अनेकदा अगदी वेगळ्या जातींच्या बॅक्‍टेरियांत उड्या मारत राहतात. जेव्हा अँटिबायोटिक्‍ससारखे आव्हान बॅक्‍टेरियांच्या समोर येते, तेव्हा तर अँटिबायोटिक्‍स प्रतिरोधक्षम जनुकवाहक प्लाझमिड आणखीच उत्तेजित होऊन भराभर फैलावत राहतात. नवनव्या अँटिबायोटिक्‍सविरुद्ध अशी प्रतिरोधक्षमता निर्माण होते व ती निरुपद्रवी बॅक्‍टेरियांकडून रोगजंतूंत फैलावू लागते. अशा नानाविध अँटिबायोटिक्‍सना न जुमानणाऱ्या रोगजंतूंना नाव ठेवले आहे "सुपरबग'. आज अशी प्रतिरोधक्षमता इतक्‍या प्रचंड प्रमाणावर पसरते आहे, की तज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे आजमितीस अँटिबायोटिक्‍सवर मात केलेल्या बॅक्‍टेरियांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कर्करोगाच्या आठ टक्के, तर डायरियाच्या पन्नास टक्के इथवर पोचले आहे; आणि लवकरच अँटिबायोटिक्‍स प्रतिरोधक्षमता हे मृत्यूचे अव्वल कारण ठरण्याची दाट शक्‍यता आहे.

आज जगात अतोनात वाढलेले दळणवळण व व्यापार हे सुपरबग्सच्या फैलावाला हातभार लावताहेत आणि आंतरराष्ट्रीय वाटाघाटींत एक नवाच मंत्र कानी पडतोय : यमाजीच्या दारी जमले रंक आणि राव ।

सुपरबग पछाडी सर्वां, नाही भेदभाव ।।

हवामानबदलाप्रमाणेच या धोक्‍याचाही फटका सर्वांना, सर्व जगभर बसणार आहे आणि म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय संघटना, उद्योगधंदे भारतातल्या औषध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादकडे चिंताग्रस्त नजरेने पाहू लागले आहेत. नॉर्वे, स्वीडन जागतिक पातळीवर औषध उत्पादनात, तसेच पर्यावरण संरक्षणात आघाडीवर आहेत आणि त्यातील अनेकांचे हैदराबादमधील उद्यमांशी वेगवेगळ्या पद्धतीचे लागेबांधे आहेत. कांही वर्षांपूर्वी जैवतंत्रज्ञान विभागाच्या पुण्यातील संशोधन संस्थेतल्या व स्वीडनमधल्या काही शास्त्रज्ञांनी हैदराबादमधील व स्वीडनमधील औषध उत्पादनांतील प्रदूषण व्यवस्थापनाचा व त्यातून उद्भवलेल्या बॅक्‍टेरियांच्या अँटिबायोटिक्‍स प्रतिरोधक्षमतेचा तौलनिक अभ्यास करून दाखवले होते, की स्वीडनमध्ये अधिक औषध उत्पादन असूनही ही समस्या नाही, पण हैदराबादेत ती उफाळते आहे. तिथे निष्काळजीपणामुळे कारखान्यांच्या उत्सर्गावरच्या प्रक्रियेच्या टाक्‍यांतले प्रतिरोधक्षम बॅक्‍टेरिया भूजलात, विहिरींत, शेतजमिनीत आणि तिथे पिकलेल्या अन्नातून, पिण्याच्या पाण्यातून माणसांच्या पोटात पोचताहेत. ते स्वतः उपद्रवी नसले तरी भूजलातून नदीत पोचून तिथल्या डायरिया, काविळीसारख्या रोगजंतूंच्या किंवा रोगग्रस्त माणसांच्या देहांतल्या नानाविध रोगजंतूंच्या सान्निध्यात त्यांची प्रतिरोधशक्ती तऱ्हतऱ्हेच्या रोगजंतूंत फैलावण्याची दाट शक्‍यता आहे. "नॉर्डिया' या युरोपीय बॅंकेने या विषयाचे मूल्यांकन करणारा एक अहवाल प्रसिद्ध करत "युरोपातील संबंधित कंपन्यांनी हैदराबादमधून अंग काढून घेण्याचा विचार करण्याची वेळ आली आहे,' असे नुकतेच सुचवले आहे. उघडच आहे की निसर्गाची बेछूट नासाडी करत राहण्याचे आपले धोरण खास शहाणपणाचे नाही!

नॉर्वेमधील सामी मंडळी वन्य रेनडिअरांना पकडून त्यांना अँटिबायोटिक्‍स चारतात.

Web Title: superbug