भोंदुगिरीचे जागतिकीकरण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swami Nityananda  self-proclaimed absconding suspected criminal India

एका अर्थाने हे भोंदुगिरीचे जागतिकीकरण समाजाच्या डोळ्यात अंजन घालते.

भोंदुगिरीचे जागतिकीकरण!

देशात भोंदुगिरीच्या विविध प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या नित्यानंद बाबाने परदेशात जावून तेथील एका बेटाला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याचा खटाटोप केला. एका अर्थाने हे भोंदुगिरीचे जागतिकीकरण समाजाच्या डोळ्यात अंजन घालते.

स्वामी नित्यानंद हा स्वयंघोषित बाबा भारताचा फरार संशयित गुन्हेगार आहे. या स्वयंघोषित बाबावर लहान मुलींना पळवून नेण्याचा आणि डांबून ठेवण्याचा आरोप झाला आणि त्या निमित्ताने गुन्हा दाखल झाल्यावर हा बाबा देश सोडून पळून गेला.

गेल्या दोन वर्षांत या बाबाविषयी काही अचाट बातम्या माध्यमांमधून येत राहिल्या. जसे की, त्याने वेस्ट विंडीजमधील त्रिनीदाद देशाच्या शेजारी एक बेट खरेदी केले आहे आणि त्या बेटावरच ‘कैलास’ नावाचे ‘राष्ट्र’ देखील घोषित केले आहे!

गेल्या आठवड्यात या भोंदूबाबाने आणि त्याच्या विजयप्रिया या सहकारी महिलेने त्यांच्या देशाला संयुक्त राष्ट्रांनी आणि अमेरिकेने मान्यता दिली असे जाहीर करत काही कागदपत्रे आणि छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली.

त्यानिमित्ताने हा बाबा परत चर्चेत आला आहे. पुढे तपासात असे लक्षात आले की, अमेरिकेतील नेवार्क शहराने कैलास शहराच्या सोबत, कोणतीही चौकशी न करता एक सामंजस्य करार केला होता आणि त्याचा गैरफायदा घेऊन आपल्याला अमेरिकेने मान्यता दिल्याचा दावा हा भोंदुबाबा करत होता!

सत्य लक्षात आल्यावर नेवार्क शहराने हा करार रद्द केला; तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्याला मान्यता दिली असल्याचा त्यांचा दावादेखील खोटा असल्याचे समोर आले. या निमित्ताने अशा स्वरुपाची भोंदुगिरी ही केवळ आपल्या देशापुरती मर्यादित नसून त्याला असलेले आंतरराष्ट्रीय संदर्भदेखील अधोरेखित झाले. एका अर्थाने भोंदुगिरीचे जागतिकीकरण कसे होते, याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आपल्याला या निमित्ताने दिसून आले.

चमत्काराचे दावे

नित्यानंदबाबाचे सर्वच अजब म्हणावे असे आहे. त्याचे व्हिडिओ पाहून सुज्ञ माणसाने हसावे की रडावे हा प्रश्न सहजच पडू शकतो. एका प्रसिद्ध व्हिडिओमध्ये तो भक्तांना सांगतो, ‘‘आज आपल्या पृथ्वीवर सूर्य अर्धा तास उशिरा उगवला ना, तो केवळ माझ्या सांगण्याने उशिरा उगवला आहे!’’

मला जरा उशीर झाल्याने मीच सूर्याला सांगितले, ‘‘सूर्या तू जरा अर्धा तास उशिरा उगव आणि सूर्याने माझे ऐकले.’’ हे वाचून आपल्याला वाटेल, की हे विधान नित्यानंदबाबाने विनोदाने केले आहे का? प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. तो हे विधान हसत हसत करतो, पण विधानातील आशयाच्या विषयी तो अत्यंत गंभीर असतो.

केवळ तोच नाही तर त्याच्या प्रवचनाला समोर जमलेले हजारो भक्त देखील अत्यंत गांभीर्याने या विधानावर बाबांचा जयजयकार करतात! या पुढचे आश्चर्य म्हणजे, हे भक्त कोणी ‘गरीब बिचारी कुणीही हाका’ अशी ग्रामीण अशिक्षित जनता नसते; तर उत्तम इंग्लिश बोलणारे, उच्चशिक्षित आणि खात्यापित्या घरातील लोक असतात.

ही सर्व प्रवचने व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध असून, ‘मी असे म्हटलोच नव्हतो’ असा नित्यानंद स्वामीचाही अजिबात दावा नाही. उलट पोलिसी ससेमिरा मागे लागल्यावर देखील आपल्या संदेशात ते आपल्या क्षमतांचा पुनरुच्चार करतो.

एखाद्या विनोदी नाटक अथवा चित्रपटाला शोभावे असे हे कथानक नसून हे सर्व आपल्या आजूबाजूला घडणारे वास्तव आहे हे स्वीकारणे कितीही अवघड वाटत असले तरी सत्य आहे, हे आपल्याला स्वीकारावेच लागते.

गेल्या दहा वर्षांमध्ये या नित्यानंद स्वामीवर पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत. तमिळनाडूमधील एका प्रसिद्ध मंदिरात प्रसादात गुंगीची औषधे घालत असल्याच्या संशयावरून त्या मंदिराच्या विश्वस्तांनी त्याला निलंबित केले होते.

बंगळूरमधील आश्रमात स्रियांचे शोषण झाल्याची केस देखील त्याच्यावर आहे. गुजरातमधील त्याच्या आश्रमाची जागा सरकारनेच त्याला दिली आहे. त्याविषयी न्यायालयात सुनावणी चालू आहे.

त्याच्यावरील अनेक गुन्ह्यांचा पोलिस तपास चालू आहे आणि टोकाचा विरोधाभास असा की, दुसऱ्या बाजूला नित्यानंद स्वामीची शिष्यमंडळी वाढतच आहेत. हे केवळ नित्यानंद स्वामीबाबत घडत नसून आज तुरुंगात असलेल्या आसाराम, रामपाल, रामरहीम या बाबा लोकांच्याबाबतीतदेखील घडताना दिसून येते.

विचार करण्याची थोडीही क्षमता शिल्लक असलेल्या कोणत्याही व्यक्तीची मती गुंग व्हावी, असे हे दाहक सामाजिक वास्तव आहे. आपल्या देशाच्या समाजमनाला काही तरी भयंकर अंतर्गत विसंगतीने ग्रासले असल्याचे हे लक्षण आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत असत त्याप्रमाणे, ‘‘या देशाने विज्ञानाची सृष्टी घेतली, पण विज्ञानाची दृष्टी घेतलेली नाही.’’ विज्ञानाचे फायदे म्हणून येणाऱ्या टीव्ही, मोबाईल, गाड्या, इंटरनेट, सोशल मीडिया अशा सर्व गोष्टी आपण समाज म्हणून मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या. त्याचे वापरकर्ते झालो. परंतु ‘विज्ञानाची दृष्टी’ म्हणजे चिकित्सक मनोवृत्ती घ्यायला मात्र आपण विसरलो.

चिंताजनक छुपी मान्यता

आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करून त्यामधून शोधक विचाराच्या माध्यमातून निष्कर्ष काढणे हे मानव जातीला इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळे काढणारे लक्षण आपण विसरून गेलो की काय? असा प्रश्न यामुळे मनात निर्माण होतो.

आपल्या देशातील शिक्षणव्यवस्थादेखील मुलांच्या मानसिकतेतील चिकित्सक भावनेला पाठबळ देण्यापेक्षा, ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ शिकवण्यातच धन्यता मानतात. स्वाभाविकच आहे की या व्यवस्थेमधून शिकून बाहेर पडणारे तथाकथित उच्चशिक्षित देखील भूलथापांना सहज बळी पडतात.

या पलीकडे देखील एक गंभीर गोष्ट म्हणजे पोलिस यंत्रणा, न्यायालय आणि समाजमन यांच्याकडून या भोंदू बाबांना मिळणारी छुपी मान्यता. नित्यानंद स्वामीचे उदाहरण या बाबतीत पुरेसे बोलके आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये या बाबाने आपल्या पोलिस, न्यायालय आणि समाज व्यवस्थेला आपण भोंदू बाबा असल्याचे अनेक पुरावे आपल्या कृतीतूनच दिले होते.

त्यापैकी कोणत्याही बाबीवर या यंत्रणांनी कठोर पावले उचलली नाहीत. जागे होण्यासाठी जणू काही अधिक गंभीर काहीतरी घडण्याची वाट बघत आपण सुस्त पडून होतो. श्रद्धेच्या नावावर चाललेला हा काळाबाजार आपण का खपवून घेतो, हा एक जटील प्रश्नच आहे?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) प्रयत्नाने महाराष्ट्रात संमत झालेला भोंदुगिरी विरोधातील जादूटोणा विरोधी कायदा देश पातळीवर लागू होण्यासाठी प्रयत्न करणे हेदेखील महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

गेल्या दहा वर्षांत या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात एक हजारपेक्षा अधिक छोट्या-मोठ्या भोंदुबाबांना तुरुंगाची हवा खावी लागलेली आहे. याच कायद्यामुळे बागेश्वर धामसारख्या स्वयंघोषित बाबाला शेजारील मध्य प्रदेशमध्ये पळून जावे लागले.

भोंदुबाबांचे जागतिकीकरण झपाट्याने होत असताना त्यांच्या प्रवृत्तीला बळी न पडणारी नवी पिढी घडवण्याचे आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्याला आपण किती प्रामाणिकपणे भिडणार यावरून आपण राज्यघटनेनुसार चालणाऱ्या भारतात राहणार की नित्यानंदाच्या भासमान कैलास देशात ते ठरणार आहे.