विवेकाची वेसण हवी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

‘जलिकट्टू’वरील न्यायालयाच्या बंदीच्या विरोधात तमिळनाडूतील अस्मिताबाजी उफाळून आली आहे. बंदीसमर्थक आणि विरोधकांच्या संघर्षात हरवितो आहे तो विवेक

तमिळनाडूत सध्या भावना, अस्मिताबाजी आणि संकुचित राजकारणाचा वारू मोकाट सुटला आहे आणि त्याला आवर घालण्याचे कौशल्य वा ताकद कुणाकडे आहे, असे सध्या तरी दिसत नाही. याचे कारण त्यांना मिळालेला विषयच तसा ‘तगडा’ आहे. प्रथेनुसार शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या ‘जलिकट्टू’ या क्रीडाप्रकारावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने हा तमिळनाडूच्या अस्मितेवर, सांस्कृतिक स्वातंत्र्यावरच घाला आहे, असा पवित्रा घेऊन सत्ताधारी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि विरोधी द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोन्ही प्रबळ प्रादेशिक पक्ष पुढे सरसावले आहेत. तमीळ अस्मिता या मुद्‌द्‌यावर दोघांचाही दावा असल्याने त्यांनी आकाशपाताळ एक केले नसते तरच नवल; परंतु इतर पक्षीयही बंदीच्या विरोधातील आंदोलनात सामील झाले आहेत. केवळ राजकारणीच नव्हे तर शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, कामगार संघटना, वाहतूकदार, चित्रपट अभिनेते, खेळाडू असे सगळेच या पारंपरिक खेळावरील बंदीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. संपूर्ण राज्याचे व्यवहार ठप्प करणारे ‘बंद’, मोर्चे आणि निदर्शने यांनाही ऊत आला आहे. न्यायालयाने बंदी घातली असली म्हणून काय झाले, केंद्र सरकारने वटहुकूम काढून या खेळाला परवानगी द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. या राज्याच्या सार्वजनिक जीवनातील अस्मिताबाजीला यानिमित्ताने कमालीची धार आली आहे आणि हा खेळ प्रथेनुसार पार पडेपर्यंत ती कमी होण्याची चिन्हेही नाहीत. परंतु, यातून उद्‌भवलेल्या प्रश्‍नांचा या निमित्ताने विचार करायला हवा, याचे कारण अशा प्रकारचे संघर्ष इतरही ठिकाणी उद्‌भवू शकतात. वटहुकूम काढून न्यायालयीन निर्णयांना वळसा घालण्याची पद्धत पडली तर त्यातून न्यायसंस्थेचे अवमूल्यन होण्याचा धोका आहे. त्यामुळेच या बाबतीत खरी गरज आहे ती संयम आणि विवेकाची. पण या सर्व प्रकरणात त्याचाच अभाव जाणवत आहे.
पोंगल या उत्सवाच्या काळात ‘जलिकट्टू’ हा खेळ खेळला जातो. त्यात धष्टपुष्ट अशा मोकाट धावणाऱ्या बैलाला आवरण्याचा प्रयत्न केला जातो. ज्याला हे जमेल त्याला वधू वरतात, असे मानले जाते, तसे उल्लेखही तमीळ साहित्यात सापडतात. या अत्यंत धोकादायक खेळात जीव गमावला जाण्याचा धोकाही असतो. बैल जखमी होण्याचे प्रमाण बरेच असते. पण या खेळाविषयी प्रचंड क्रेझ तमिळनाडूत आहे. अशा रीतीने लोकजीवनात एखादी गोष्ट खोल रुजलेली असली की बंदीचा बुलडोझर फिरवू ती गाडून टाकता येत नाही किंवा मुळापासून उखडता येत नाही. अशा खेळांमधील ज्या अनिष्ट बाबी असतील त्या दूर करण्यासाठी लोकमताची मशागत करावी लागते. बदलांना वातावरण अनुकूल करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करावा लागतो. या खेळाचा विचार केला, तर प्राण्यांविषयीचे क्रौर्य या मुद्‌द्‌याबरोबरच पौरुषाबद्दलच्या जुन्या, पठडीबद्ध कल्पना, परपीडनात मनोरंजन करून घेण्याची वृत्ती अशा अनेक आक्षेपार्ह बाबी आहेत. आधुनिक मूल्यांनी संस्कारित झालेले मन त्या स्वीकारू शकत नाही हे खरेच; परंतु, त्याविषयी सातत्याने प्रबोधन करण्याला पर्याय नसतो. या प्रयत्नांना चालना देण्यासाठी न्यायालयीन निर्णय किंवा सरकारी आदेश यांची मदत होऊ शकते;मात्र केवळ त्यावर विसंबून राहणे कितपत उचित, याचाही विचार कधीतरी करायला हवा. इतके जटिल नि व्यामिश्र प्रश्‍न केवळ जनहित याचिकेच्या अस्त्राने चुटकीसरशी सोडविता येतील, अशी धारणा बाळगणे चूक आहे. प्राणिमित्र आणि तत्सम स्वयंसेवी संस्था हा सारासार विचार करीत नाहीत. त्यातून ‘जलिकट्टू’वरून पेटला तशा वादाचे प्रश्‍न उभे राहतात आणि मग त्या शेकोटीतून सगळे सार्वजनिक जीवनच वेठीला धरले जाते. सध्या तमिळनाडूत नेमके तेच चालले आहे. प्राप्त परिस्थितीत वटहुकूम काढून हा पेच मिटविला जाईलही; परंतु जोपर्यंत विचारांपेक्षा विकार प्रभावी ठरत आहेत, तोपर्यंत असे संघर्ष पुन्हापुन्हा उद्‌भवत राहणार.

Web Title: tamilnadu politics