पाचूच्या बेटाला हादरा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

जगभरातील ख्रिश्‍चन "इस्टर संडे'चा सोहळा आनंदाने साजरा करत असताना श्रीलंका बॉम्बस्फोटांनी हादरून गेली.

जगभरातील ख्रिश्‍चन "इस्टर संडे'चा सोहळा आनंदाने साजरा करत असताना श्रीलंका बॉम्बस्फोटांनी हादरून गेली. राजधानी कोलंबोतील चार प्रमुख चर्च, तसेच काही मोजक्‍याच अलिशान हॉटेलांत झालेल्या या एकूण आठ भीषण बॉम्बस्फोटांत दीडशेहून अधिक निरपराधी हकनाक प्राणास मुकल्याचे वृत्त आले आणि केवळ श्रीलंकेतीलच नव्हे, तर जगभरातील घर अन्‌ घर हळहळले. हे बॉम्बस्फोट इतके भीषण होते, की त्यामुळे एका प्राचीन चर्चचे छप्परच उडून गेले, तर अनेक मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत बघायचे दुर्भाग्य या चर्चमध्ये "इस्टर संडे'चा मास सांगणाऱ्या फादर्सच्या नशिबी आले. 

खरे तर "इस्टर संडे' हा ख्रिश्‍चनांसाठी आनंदाचा दिवस असतो. "गुड फ्रायडे'च्या दिवशी क्रुसावर चढवलेल्या येशू ख्रिस्तांचा या दिवशी पुनर्जन्म झाला, असे जगभरात मानले जाते. मात्र, हाच दिवस कोलंबोतील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांसाठी घातवार ठरला आणि त्यामुळेच दहशतवादाने हातपाय कसे पसरले आहेत, ही बाब अधोरेखित झाली. या हल्ल्याचा दिवस, स्थळ आणि व्याप्ती पाहता त्याचे नियोजन पद्धतशीररीत्या करण्यात आले असणार. ते एखाद-दुसऱ्या दिवसाचे काम नाही. त्यामुळेच गुप्तचर यंत्रणांना त्याची कुणकुण लागली नाही, हे मोठे अपयश आहे. हल्लेखोरांचे हेतू काय, कोणती संघटना-गट यामागे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी ख्रिश्‍चन समुदायाला लक्ष्य करण्यात आले, हे उघड आहे. त्यामुळे हल्लेखोर धार्मिक मूलतत्त्ववादी गट असण्याची दाट शक्‍यता आहे. पश्‍चिम आशियातील अस्वस्थतेचा काही संदर्भ आहे का, हे पाहावे लागेल. खरे तर अशा प्रकारच्या हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारण्याचा दहशतवादी संघटनांचा रिवाज आहे. मात्र, या साखळी बॉम्बस्फोटांनंतर त्याची जबाबदारी स्वीकारण्यास कोणतीही संघटना पुढे आलेली नाही. त्यामुळे त्यांचे इरादे काय असावेत, याविषयी गूढ निर्माण झाले आहे.
 
या बॉम्बस्फोटांना पार्श्‍वभूमी आहे ती श्रीलंकेत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या वांशिक संघर्षाची, तसेच तेथील स्थानिक राजकारणाची. श्रीलंकेत 2014च्या अखेरीस झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मैत्रीपाल सिरीसेना अध्यक्षपदी निवडून आले होते आणि पदरी आलेल्या पराभवामुळे महेन्द्र राजपक्षे यांच्यासारखा बडा नेता कमालीचा अस्वस्थ आहे. आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत अध्यक्षपद मिळवण्यासाठी राजपक्षे हे कमालीचे उत्सुक आहेत. या पार्श्‍वभूमीवर घडवून आणलेल्या या बॉम्बस्फोटांमुळे तेथील विद्यमान राजवट अस्थिर करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा प्रश्‍न चर्चेत आला आहे. श्रीलंकेतील वांशिक संघर्षात 2009 मध्ये "एलटीटीई'चा पराभव झाला आणि अनुपम निसर्गसौंदर्याचे लेणे लाभलेल्या या देशात शांतता नांदू लागली आणि त्याचेच पर्यवसान पर्यटन उद्योगाच्या भरभराटीत झाले. पर्यटन हा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा काश्‍मीरप्रमाणेच कणा आहे. या बॉम्बस्फोटाचा मोठा फटका या उद्योगाला बसू शकतो आणि तसे झाल्यास या पाचूच्या बेटाची अर्थव्यवस्थाही कोलमडून जाऊ शकते.
 
एकविसाव्या शतकाचा हा काळ. तो पुढे जात आहे; पण मूलतत्त्ववाद कमी होण्याऐवजी त्याचा अंधार अधिकाधिक गडद होत असताना दिसतो. हे केवळ आशिया-आफ्रिकेत नाही, तर युरोपातही घडते आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी न्यूझीलंडमध्ये ख्राईस्टचर्च येथे दोन मशिदींमध्ये शुक्रवारी मुस्लिमांच्या प्रार्थनादिनी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराने जवळपास 50 जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला आहे. सम्राट अशोकाचा पुत्र अरहत महिंदा हा ख्रिस्तपूर्व 246 मध्ये श्रीलंकेत पोचला तेव्हा श्रीलंकेचा राजा देवानमपिया तिसा याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि देशभरात हा शांततेचा प्रसार करणारा धर्म पोचला. आजमितीला या छोटेखानी देशातील 70 टक्‍के लोक बौद्ध आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या शांतताप्रिय धर्मातही काही मूलतत्त्ववादी गट तयार झाले.

"इस्टर संडे'च्या दिवशी झालेल्या या भीषण बॉम्बस्फोटांमागे "इसिस' ही संघटना असल्याचे वृत्त आधी पसरले; पण त्याला दुजोरा मिळालेला नाही. एकूण परिस्थिती पाहता वांशिक संघर्षाचा नवा वणवा पेटू नये, हे पाहिले पाहिजे. तो धोका लक्षात घेऊनच पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी जनतेला कोणत्याही अफवांवर, तसेच सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या विखारी प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. या बॉम्बस्फोटात कोलंबोतील भारतीय वकिलातीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत असून, ही वकिलात दहशतवाद्यांचे लक्ष्य असल्याची माहिती गुप्तचरांनी श्रीलंका सरकारला दहा दिवसांपूर्वी दिल्याचे कळते. एकूणच दहशतवादाच्या संकटाबाबत जराही गाफील राहणे परवडणारे नाही. बॉम्बस्फोट नेमके कोणी घडवून आणले, त्याचा तातडीने छडा लावायला हवा. दहशतवादाविरोधात जगभरातील शांतताप्रिय देशांनी एकत्र यायला हवे. जागतिक दहशतवादविरोधी लढ्याला एकसंध, परिणामकारक स्वरूप येणे किती गरजेचे आहे, याची प्रखर जाणीव यानिमित्ताने व्हायला हवी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrorist attack in Sri Lanka