सायबर विश्‍वातील धुळवडीचे बेरंग

केशव साठये (माध्यमांचे अभ्यासक)
बुधवार, 15 मार्च 2017

समाजमाध्यमांमधून अनुभवास येत असलेली झुंडशाही हा सामाजिक स्वास्थ्याच्या आणि प्रगतीच्याही दृष्टीने काळजीचा विषय आहे. यांवर एकच एक असा उपाय नाही; तरीही अभिव्यक्तीला विवेकाचे कोंदण हवे, हे सतत मांडायला हवेच.

अलीकडे आपल्याकडचा सार्वजनिक वर्तनव्यवहार हा काळजीचा विषय बनला आहे. बेफाम विधाने करायची आणि मग ती मागे घ्यायची, हे प्रकार वाढीस लागलेले दिसतात. हे कशामुळे होत आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.

सार्वजनिक व्यासपीठांवर असो, वा समाजमाध्यमांवर; तेथे व्यक्त होताना विवेकाचा अंकुश हरवत चाललाय. कोणाचा दुष्परिणाम कोणावर होत आहे, हे सांगणे अवघड आहे. दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहेर कौर हिच्याबाबत आपण नुकताच या समाजमनाच्या असहिष्णू वृत्तीचा दुर्दैवी अनुभव घेतला आहे. समाजमाध्यम हे मुक्त व्यासपीठ आहे आणि त्याचा विधायक वापर करणारी मंडळी ही मोठ्या प्रमाणावर आहेत, हे मान्य करूनही यावर अनिर्बंध आणि सभ्यतेचे नियम झुगारून वावरणारी मंडळी फोफावताहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या किरकोळ घटनांचेही अवडंबर माजवून त्यात विखाराचे तेल ओतून ते प्रसंग अधिक ज्वालाग्रही करण्यात ते मश्‍गूल झाले आहेत.

"ट्रोलिंग' हा समाजमाध्यमांवरील साप आपले विळखे दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत असल्याचे चित्र केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभरात अनुभवास येत आहे. समाजमाध्यम हे एक मुक्त व्यासपीठ असल्यामुळे लाखो मंडळी आपली मते त्यावर मांडू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य सन्मान करणारे ठिकाण म्हणून आपण या महाजालाकडे पाहतो; पण याच वेळी आपल्या मतांना विरोध करणाऱ्या मतांशी तात्त्विकदृष्ट्या लढणे जेव्हा अशक्‍य होते, तेव्हा ही अभिव्यक्ती खालच्या पायरीच्या दिशेने प्रवास करू लागते; मग त्या व्यक्तीवर वैयक्तिक आरोप केले जातात. लाखोली वाहिली जाते. असभ्य, अश्‍लील, धमकी देणारी, प्रत्युत्तरे दिली जातात. हे केवळ एक व्यक्ती विरुद्ध दुसरी व्यक्ती या पातळीवर राहत नाही, तर झुंडीच्या झुंडी यात तुटून पडतात. हा लोंढा इतका प्रचंड असतो, की विरुद्ध मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला माघार घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. अर्थात अशा विधानांना फेसबुक-ट्‌विटर या माध्यमाने गंभीरपणे घेण्यास सुरवात केली आहे. अशा गंभीर टीकाटिप्पणी करणाऱ्या, धमकी देणाऱ्या, अश्‍लील विधाने करणाऱ्याची खाती बंद करण्याची पावलेही उचलली जात आहेत. काही बाबतीत सायबर गुन्ह्याखाली खटलेही दाखल करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. विशेषतः मुलींना आणि महिलांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. आणि त्यासाठी स्वतंत्र "इमेल आयडी' ही उपलब्ध करून दिला आहे. फोटोशॉप वापरून तयार केलेल्या अनुचित प्रतिमा, सांकेतिक चिन्ह वापरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्या, कुणाचा खासगी फोन नंबर, घरचा पत्ता त्याला त्रास देण्याच्या उद्देशाने समाजमाध्यमांवर वितरित करणे यांना कायद्याने बंदी आहे. अर्थात हे करताना उचित अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही, याची दक्षता सरकारने घेणे अपेक्षित आहे.

अर्थात एकूणच समाजमाध्यमाचा अतिप्रचंड धबधबा पाहता हे सर्व थांबवता येणे अवघड आहे; पण तरीही सायबर विश्वातील मंडळींनी या माध्यमांवरील नागरिकशास्त्राचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केला तर यावरील दूषित पर्यावरण थोडे तरी सुसह्य होईल. मुळात अशा विखारी भाषेचा अवलंब करण्याची प्रेरणा यांना कोठून मिळते, हा खरा प्रश्न आहे आणि याचे उत्तर त्यांच्या संकुचित आणि कोत्या मानसिकतेत दडलेले दिसते. विचारांची लढाई विचारांनी लढता न येणाऱ्या आणि त्यामुळे संतापून भाषेवरील, अभिव्यक्तीवरील ताबा सुटलेले हे ट्रोलर्स म्हणजे या महाजालावरील मानसिक रुग्णच होत. एकांगी विचारांनी पछाडलेल्या, एखाद्या गोष्टीला दुसरी बाजूही असते याची जाणीव नसलेल्या आपली विचारधारा ही एकमेव संस्कृती आहे, असे मानणाऱ्या महाभागांचा भरणा अधिक आहे. जागतिक स्तरावर याची वैद्यकीय विश्वाने याची दखल घेतली असून अशा प्रवृत्ती फोफावण्यात मानसिक असंतुलनही कारणीभूत असल्याचे दाखले दिले आहेत; पण हे असे का होते? एवढी चीड, संताप, असहिष्णुता का वाढीस लागते? अनेक राजकीय पक्षांचे अनुयायी, भक्त आपल्या नेत्यावर टीका झाली की समूहाने समोरच्यावर तुटून पडतात. आपल्या विचारधारेचा, प्रचार करण्याचा हक्क पक्षांना, संघटनांना नक्की आहे; पण ते करत असताना आपण देत असलेले संदेश, प्रोत्साहन सामाजिक स्वास्थ्यालाच नख लावणार नाहीत, याची काळजी घ्यायला नको का? कायदा-नियमनाबरोबरच प्रशिक्षण, व्यापक प्रबोधनाची नितांत गरज निर्माण झाली आहे.

अनेक वृत्तवाहिन्यांचे संपादक, पंतप्रधान, राजकीय पक्षाचे पुढारी, उद्योजक या टोळधाडीतून सुटले नाहीत. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प आणि हिलरीबद्दल तेथील "ट्रॉलर्स भाषा' हा संस्काराच्या अभावाचा नमुना आपण पाहिला आहेच. मेरिल स्ट्रीपच्या ट्रम्पविरोधी भाषणावर अनुराग कश्‍यप यांनी ट्‌विट केले, की आम्हाला भाषण करण्याची गरज नाही फक्त बोलणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले तरी पुरेसे आहे आणि

यावर महाजाल रुग्णांनी हल्लाबोल करत अशा मार्मिक आणि बोलक्‍या प्रतिक्रियेचा अन्वयार्थ समजून न घेताच आपले बुद्धिदारिद्य्र दाखवले. महाजालावर कार्यरत असलेल्या या टोळ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे केवळ विडंबन करत नाहीत, तर एकूणच समाजव्यवस्थेच्या घसरत चाललेल्या सांस्कृतिक अभिरुचीचे दर्शन घडवतात. या अशा टिप्पणीकडे दुर्लक्ष करणे, हा झाला तात्पुरता उपाय; पण हे चित्रच बदलायचे असेल तर सहिष्णुतेची

आद्याक्षरे आपल्याला मुळापासून गिरवावी लागतील. त्याची उदाहरणे नेते, लोकप्रतिनिधी म्हणविणाऱ्या नेत्यांनीही आपल्या सार्वजनिक आचारविचारांतून घालून द्यायला हवीत.

Web Title: trolling in cyber world