हिमस्खलनाचा धडा

नितांतसुंदर हिमालयात वसलेले ‘द्रौपदी का दांडा’ हे उत्तराखंडमधील हिमशिखर दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अनेकांसाठी काळरात्र ठरले.
Avalanche
Avalanchesaka
Summary

नितांतसुंदर हिमालयात वसलेले ‘द्रौपदी का दांडा’ हे उत्तराखंडमधील हिमशिखर दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अनेकांसाठी काळरात्र ठरले.

उत्तराखंड येथील ‘द्रौपदी का दांडा’ या शिखरावर गिर्यारोहक चढाई करत असताना मोठा हिमप्रपात झाला. उत्तरकाशी येथील ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग’च्या प्रगत अभ्यासक्रमाचे ३४ प्रशिक्षणार्थी व दोन प्रशिक्षक शिखरमाथ्यावर चढाई करत होते. यांपैकी २६ जण मृत्युमुखी पडले आहेत;तर तिघे बेपत्ता आहेत. या भीषण दुर्घटनेचा आढावा...एका गिर्यारोहकाच्या नजरेतून.

नितांतसुंदर हिमालयात वसलेले ‘द्रौपदी का दांडा’ हे उत्तराखंडमधील हिमशिखर दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अनेकांसाठी काळरात्र ठरले. गिर्यारोहणाचे प्रशिक्षणार्थी अन् प्रशिक्षक हे निसर्गाच्या रौद्र रूपात सापडले. शिखर चढाई करत असताना पायाखालचा हिमकडाच थेट कोसळल्याने ३४ जण थेट खालच्या भागांतील हिमभेगांत अडकले. यापैकी २६ जणांचा मृत्यू झाला तर तिघांचा अजूनही शोध घेणे चालू आहे. यासाठी सैन्यदल, हवाई दल, आपत्ती निवारण दल यांचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नेमकं काय घडलं?

‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग’ (एनआयएम) ही जगातील विख्यात व आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थां. तेथे विविध अभ्यासक्रम वर्षभर राबविण्यात येतात. यांत बेसिक माउंटनियरिंग कोर्स व प्रगत गिर्यारोहण प्रशिक्षण विशेष प्रसिद्ध आहेत. येथे प्रवेशासाठी तब्बल दोन वर्षे सध्या प्रतीक्षा करावी लागत आहे. हे अभ्यासक्रम प्रामुख्याने सप्टेंबर- ऑक्टोबर तसेच मार्च ते मे या कालावधीत होतात. या काळात हिमालयातील वातावरण अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांसाठी अनुकूल मानले जाते. यापैकी ‘ॲडव्हान्स माउंटनियरिंग कोर्स’चे प्रशिक्षण सुरू असताना ही दुर्घटना घडली. ‘द्रौपदी का दांडा’ या पाच हजार ६०० मीटर उंच शिखरावर प्रशिक्षणार्थींना चढाई करावयाची होती.

यासाठी ४४ प्रशिक्षणार्थींपैकी ३४ जण ॲडव्हान्स बेस कॅम्पला दाखल झाले होते. ते सर्व शारीरिकदृष्ट्या कणखर व अनुभवी होते. त्यांच्या सोबतीला निष्णात प्रशिक्षक होते. ठरल्याप्रमाणे चार ऑक्टोबरला पहाटे चार वाजता या ३४ जणांनी ॲडव्हान्स बेस कॅम्प सोडला व शिखरमाथ्याकडे कूच केली. चार तासांनंतर, शिखरमाथा दृष्टिक्षेपात असताना अचानक मोठा आवाज झाला. हे प्रशिक्षणार्थी ज्या पर्वतीय कड्यावरून आगेकूच करत होते, तो कडाच खाली कोसळला. काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले. हिमप्रपाताच्या कचाट्यात सापडलेले गिर्यारोहक थेट खालच्या हिमभेगांमध्ये जाऊन अडकले. काही जण शिखरमाथ्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, ते यांतून बचावले. त्यांच्या खालच्या भागात हिमप्रपात झाला होता. त्यांना काही कळेपर्यंत तर अनेकांनी जीव गमावला होता. मात्र, नेमका अंदाज कुणालाच येत नव्हता.

काळजाचा ठोका चुकला

जे बचावले होते, त्यांनी लगेच मदतकार्य सुरु केले व शक्य तेवढ्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला. काही तासांतच एनडीआऱएफ, लष्कर व हवाई दलाची मदत ‘द्रौपदी का दांडा’पर्यंत पोहोचली. मात्र, निसर्ग रुसलेलाच होता. दुपारी पुन्हा दोननंतर हवामान बिघडले व शोधकार्यात अडथळे येऊ लागले. अशी काही घटना घडली की ती अगदी वाऱ्यापेक्षाही अधिक वेगाने जगभर पसरते. लोक हळहळ व्यक्त करतात, रोष व्यक्त करतात. कधी राजकीय व्यवस्थेला, कधी प्रशासकीय व्यवस्थेला, कधी निसर्गाला, कधी आयोजकाला तर कधी संकटात सापडलेल्या व्यक्तीला दोषी ठरवून मोकळे होतात. पुन्हा एखादी नवी घटना घडली कि त्याकडे वळतात, जुने विसरतात अन पुन्हा त्याच प्रश्नांच्या, हतबलतेच्या चक्रांत अडकून जातात. ‘द्रौपदी का दांडा’ येथे घडलेल्या घटनेचेही असेच होईल. मात्र, गिर्यारोहक म्हणून, हिमालयाशी नातं असणारा व्यक्ती म्हणून माझ्यासाठी ही घटना नक्कीच धक्कादायक आहे.

मी १९८७मध्ये ‘एनआयएम’ मधूनच प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. गेल्या अनेक वर्षांत NIM असेल वा इतर गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था माझा या ना त्या कारणाने संबंध जोडला गेलेला आहे.सततच्या मोहिमांमुळे हिमालय हे दुसरे घरच बनले आहे. त्यामुळेच बातमी एकून धक्का बसला आणि दुःखही झाले. आपले ‘डोंगरबंधू’ यांत अडकल्याची चिंता होती. सोबतीला या शिबिराला महाराष्ट्रातून चार पुरुष व दोन महिला गिर्यारोहक सहभागी झाल्या होत्या. यातील एक आमच्या संस्थेतील, म्हणजेच ‘गिरिप्रेमी’मधील होती. त्यामुळे माझ्या काळजाचा ठोका चुकला. असे हिमप्रपात काय करू शकतात, ‘याची याची देही याची डोळा’ झलक मी व माझ्या संघाने २०१२ च्या एव्हरेस्टच्या मोहिमेत अनुभवली होती.

पावडर स्नो (भुसभुशीत हिम) वादळात आम्ही अडकल्याने बचावलो होतो. येथे परिस्थितीच वेगळी होती. गिर्यारोहकांच्या पायाखालील कडाच कोसळला होता. त्यामुळे आघात मोठा ठरला. यात चूक कोणाची होती, असं सांगता येणार नाही. हिमालय हा भुसभुशीत प्रकारातला आहे. आपल्या सह्याद्रीसारखा कातळ खडक तेथे नाही. त्यामुळे भूस्खलन व हिमवादळे हे नेहमीचेच. मात्र, अशा घटना या आधी ठराविक क्षेत्रात, ठराविक मोसमांत होत असत. गेल्या काही काळात मात्र बेसुमार पाऊस, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वितळणारा हिम, एकूणच मानवाचा हिमालयात वाढलेला वावर व सोयीसुविधांच्या निर्मितीसाठी केलेले अनेक मानवनिर्मित बदल यांमुळे हिमालयातील ‘इको सिस्टिम’ वर मोठा परिणाम झाला आहे.त्यातून हिमप्रपात वाढले आहेत, असा प्राथमिक निष्कर्ष काढता येईल.

नुकतेच काही आठवड्यांपूर्वी ‘माउंट मानसलू’ या अष्टहजारी शिखरांपैकी एक असलेल्या व तुलनेने सर्वात सुरक्षित शिखर अशी ओळख असलेल्या शिखराच्या कॅम्प तीनजवळ व पुन्हा बेस कॅम्पजवळ आलेला हिमप्रपात विचार करायला लावणारा आहे. अशी जोखीम गिर्यारोहणात कायम असणार आहे. त्यामुळे यांतून गिर्यारोहण किंवा गिर्यारोहण प्रशिक्षण इतक्या उंचीवर किंवा अशा अवघड ठिकाणी नकोच, असे निष्कर्ष काढता मुळीच कामा नये. ‘एनआयएम’सारखी संस्था प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक व नियोजनबद्ध करते. ५८ वर्षांचा तगडा अनुभव त्यांच्याकडे आहे.

दरवर्षी हजारो प्रशिक्षणार्थी येथे प्रशिक्षण घेतात. त्यामुळे कुठे व कसे प्रशिक्षण द्यायचे, यात ते एक्स्पर्ट आहेत. ‘द्रौपदी का दांडा’ हे ठिकाणही विचारपूर्वक व पाहणी करूनच निवडले गेले होते. प्रशिक्षणार्थी गिर्यारोहकांच्या क्षमतांचा विचार करूनच या शिखराची निवड केलेली होती. यावेळी त्यांच्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली एवढंच. या सर्वांतून आपण एक बोध घेऊ शकतो, तो म्हणजे निसर्गापुढे आपण अगदी खुजे आहोत. त्याच्यापुढे आपले काही चालत नाही. त्याला जेवढी इजा पोहोचवाल, त्याच्या कित्येक पटीने जास्त नुकसान आपलेच होईल. गिर्यारोहक असो साहसप्रेमी असो वा सामान्य नागरिक; सर्वांनी निसर्गापुढे नतमस्तक होऊन पुढे चालत राहिले अन् निसर्गाच्या संवर्धनासाठी कार्य करत राहिले तर नक्कीच येणाऱ्या दशकांत चित्र वेगळे असेल.

(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक, गिरिप्रेमी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com