अज्ञात सौंदर्याचा शोधक (श्रद्धांजली)

अज्ञात सौंदर्याचा शोधक (श्रद्धांजली)

थोर भारतीय चित्रकार सय्यद हैदर रझा यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. मुळात भारतीय भूमीचा गंध बाळगणारी आंतरिक धून सदैव फुलवत राहिलेले रझासाहेब आधुनिक भारतीय चित्रकारांमधले खऱ्या अर्थाने एक श्रेष्ठ रंगयात्री होते. त्यांचे कलाशिक्षण कुठे कुठे झाले हे त्यांच्या निधन वृत्तात आले आहेच. पण त्या प्रशिक्षणाचे त्यांनी केलेले सोने अधिक महत्त्वाचे होते. ते सोने निर्माण करण्याच्या प्रारंभिक प्रेरणा त्यांना प्रो. वाल्टर लॅंगहॅमर यांच्याकडून मिळाल्या. परंतु त्या प्रेरणा आणि आंतरिक रंगधून एकवटून व्यक्त होत गेली ती रझासाहेबांच्या प्रारंभिक निसर्गचित्र निर्मितीतून. माझ्या पिढीतील अनेक निसर्ग चित्रकारांचे रझासाहेब अत्यंत लाडके आदर्श होते. आपल्यातून त्यांची इहलोक यात्रा संपताना निश्‍चितच एक पोकळी जाणवणार आहे. 


दृश्‍यसृष्टी तशी सर्वज्ञात असते. परंतु खरे सौंदर्य दृश्‍यसृष्टीमागील अवकाशीय नात्यांत दडलेले असते. रझासाहेबांसारखे थोर चित्रकार त्या अज्ञात सौंदर्याला अचूकपणे हेरत असतात. अज्ञात सौंदर्याची सांगड ज्ञात विषयाशी घालत एक आदर्श चित्र साकारत असतात. पवित्र, अस्सल आणि भारदस्त असं चित्र! असं जेव्हा असतं, त्या वेळी रझासाहेबांनी गतकाळात निसर्गचित्रे साकारली व नंतरच्या काळात सर्वज्ञात अशा भौमितिक आकारांतून आपली आंतरिक रंगधून मांडली. यात कलात्मक अंतर ते नसतंच. त्यांची एकूण चित्रनिर्मिती पाहता, त्यात अनाकलनीय विरूपीकरणाला फालतू जागा कुठंच आढळत नाही, हे विशेष वाटतं.
रझासाहेबांच्या भौमितिक आकारांच्या लावण्यनीतीतून साकारलेल्या चित्रांमधून भारतीय मातीचे रंग अधिक उजळ होऊन अभिव्यक्त होताना आढळतात. त्यात काळा, केशरी, पिवळा, लाल, निळा, हिरवा या रंगांचे भारतीयत्व जपणारं सान्निध्य खूप मोलाचं ठरतं. त्यांच्या तुलनेत रझा ज्या "प्रोग्रेसिव्ह ग्रुप‘चे सदस्य होते तो "ग्रुप‘ चार वर्षांत का गुंडाळला गेला, याचे कारणही उमजते. असो!
रझासाहेबांच्या भौमितिक आकारांच्या आधारे तयार झालेल्या चित्रांबद्दल त्यांनी "बिंदू‘, "पुरुष-प्रकृती‘, "नारी‘ या चित्रमालिका रंगवल्या. त्यांच्या अशा मालिकांच्या प्रदर्शनात त्या मालिकांविषयीचा त्यांचा मजकूरही वाचावयास मिळे. परंतु आज मागे वळून पाहताना असे वाटते, की त्या मजकुराशिवायही ती चित्रे कलात्मकदृष्ट्या अर्थवाही ठरली होती. त्यातून खास दृश्‍य अशी भाव-अभिव्यक्ती थेट पोचण्यात शब्दांची खरेच गरज होती का, असेही वाटत राहायचे. परंतु भारतासारख्या दृश्‍य साक्षरतेच्या बाबतीत मागास असलेल्या देशात संबंधित मजकूर रझासाहेबांना आवश्‍यक वाटला असावा.
ते काहीही असो; सय्यद हैदर रझासाहेब भारतीय चित्रकलेवर एक महत्त्वाचा ठसा उमटवून गेले हे निश्‍चित. हा ठसा पुढील काळात प्रेरक ठरणार तर आहेच; परंतु त्यांनीच स्थापन केलेल्या "रझा अकादमी‘तर्फे निसर्गचित्रण आणि विरूपीकरण नाकारणाऱ्या "ब‘ आंतरिक धून प्रकट करणाऱ्या चित्रनिर्मितीला वाव दिला जाईल, अशी आशा आहे. सय्यद हैदर रझासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com