सायकल येता ‘हाती’... (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

‘सायकल’ हातातून गेल्याने मुलायमसिंह यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. एका अर्थाने हा सत्तासंघर्ष जुने नि नवे, सरंजामी राजकारण नि आधुनिक शैलीचे राजकारण यांचाही आहे. 

उत्तर प्रदेशात गेले काही महिने ‘नेताजी’ मुलायमसिंह आणि ‘बेटाजी’ अखिलेश यादव यांच्यात सायकलीच्या चिन्हासाठी सुरू असलेल्या ‘दंगली’चा फैसला निवडणूक आयोगाने करताच, केवळ त्या राज्याच्याच नव्हे; तर देशाच्याच राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे! खरी ‘समाजवादी पार्टी’ ही अखिलेश यांचीच आहे आणि त्यामुळे त्याच गटाला ‘सायकल’ हे चिन्ह बहाल करण्याचा फैसला निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी केला आणि त्यानंतरच्या अवघ्या २४ तासांत काँग्रेस व समाजवादी पार्टी यांच्यात आघाडीचे संकेत मिळाले. अखिलेश यांनी पिताश्री मुलायम तसेच काकाश्री शिवपाल यादव यांना धोबीपछाड केले आहे. ही हार म्हणजे एका अर्थाने मुलायमसिंह यांच्या चार दशकांच्या राजकारणाची दारुण शोकांतिकाच आहे. ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री १९८९ मध्ये झाले, तेव्हा जनता दलात होते. त्यानंतर त्यांनी ‘समाजवादी पार्टी’ स्थापन केली आणि ‘सायकल’ या निशाणीच्या जोरावर ते पुढे दोन वेळा मुख्यमंत्री तसेच देशाचे संरक्षणमंत्रीही झाले. आता तीच सायकल त्यांच्या हातातून जाताच, त्यांची राजकीय कारकीर्दच संपुष्टात येते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. एका अर्थाने हा सत्तासंघर्ष जुने नि नवे, सरंजामी राजकारण नि आधुनिक शैलीचे राजकारण, ज्येष्ठ आणि तरुण यांच्यातीलही आहे. पक्षावर पकड मिळवून त्यात अखिलेश विजयी झाले, याचे कारण काळाचाही तो रेटा आहे. इतर पक्षांनाही तो ओळखावा लागणार आहे. काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी ‘विकासपुरुष’ म्हणून उदयास येत असलेल्या अखिलेश यांच्याबरोबर हातमिळवणी करण्याची घोषणा लगेचच केली, त्यामागे ही जाणीवही असू शकते. त्यामुळे आता अजितसिंह यांच्या ‘राष्ट्रीय लोकदला’लाही या ‘गटबंधना’त सामील होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. उत्तर प्रदेशातील देशाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक चौरंगी-पंचरंगी नव्हे; तर तिरंगी होणार, असे दिसत आहे.

मुलायमसिंह यांच्या या शोकांतिकेस त्यांचे पक्ष तसेच राज्यातील सत्तेवरील असलेले ‘अलोट प्रेम’ जसे कारणीभूत ठरले आहे, त्याचबरोबर बंधू शिवपाल यांच्याविषयी त्यांच्या मनात असलेली आपुलकीची नको इतकी भावनाही कारणीभूत ठरली आहे. अयोध्येतील बाबरीकांडानंतर मुलायमसिंह यांनी आपली प्रतिमा ‘मुस्लिमांचा मसीहा’ अशीच राहील, याची काळजी घेतली आणि जाती-पातींचा बुजबुजाट असलेल्या या राज्यात मुस्लिम तसेच यादव यांची मोट बांधून वर्चस्व राखले. पाच वर्षांपूर्वी बहुजन समाज पार्टीच्या ‘सुप्रीमो’ मायावतींच्या कारभाराला वैतागलेल्या जनतेने मोठ्या विश्‍वासाने ‘नेताजीं’च्या हाती एकहाती सत्ता दिली आणि मुलायमसिंह यांनीही चिरंजीवांना मुख्यमंत्री बनवले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांपुढे दिल्लीचे तख्त होते. मात्र, मोदी यांनी देशाच्या राजकारणाचा सारा पट बदलून टाकला आणि अडीच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुलायमसिंह तसेच मायावती या दोहोंनाही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतरही अखिलेश यांनी विकासाच्या मुद्‌द्‌यावरून पुन्हा एकवार पार्टी ठामपणे उभी केली. नेमकी हीच बाब मुलायमसिंह तसेच त्यांचे बंधू शिवपाल यांना सलू लागली आणि सहा-आठ महिन्यांपूर्वी यादव कुळातील ‘दंगली’ला प्रारंभ झाला. त्यात अखिलेश यांनी पिताश्रींना आपली जागा आता दाखवून दिली आहे! मात्र, खरा अटीतटीचा संघर्ष अद्याप बाकी आहे आणि तो अर्थातच लखनौच्या नवाबीसाठी आहे. ही लढत आता अखिलेश यांनाही सोपी नाही. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवर एक नजर टाकली तरी ते आता ‘ओबीसी कार्ड’ खेळू इच्छित असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय, मायावतींच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’लाही अखिलेश यांना तोंड द्यायचे आहे. त्यामुळेच ते आता काँग्रेस तसेच अजितसिंग यांचे राष्ट्रीय लोक दल यांना साथीला घेऊन, आपल्या मुस्लिम-यादव व्होट बॅंकेत ब्राह्मण आणि जाट मतदारांची भर घालू पाहत आहेत.

अर्थात, अखिलेश यांच्यापुढे आणखी अनेक प्रश्‍न आहेत. ‘सायकल’ ताब्यात आल्यानंतरही पिता-पुत्रांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. याचा अर्थ मुलायमसिंह यांनी संपूर्ण हार पत्करली, असा लावायचा की ते चिरंजीवांचा गळा शेवटच्या क्षणी आपले स्वतंत्र उमेदवार उभे करून कापणार, हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, या ‘दंगली’त कळलाव्या नारदाची भूमिका वठवणारे अमरसिंग हे निवडणूक आयोगाचा निकाल गृहीत धरून परदेशी रवाना झाल्यामुळे अखिलेश यांना जरा स्वास्थ्य लाभू शकते. तरीही भाजप विरोधातील मतविभागणी ही मायावतींची ‘बसपा’ मैदानात असल्यामुळे अटळ आहेच. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आता ‘सायकल’वर स्वार झालेले अखिलेश आणि त्यांचे ‘मेन्टॉर’ रामगोपाल यादव यापुढे नेमकी कशी रणनीती आखतात, यावर उत्तर प्रदेशचे निकाल अवलंबून आहेत. हे निकाल जसे मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर देशातील विरोधकांसाठीही. त्यात भाजपविरोधक पराभूत झाले तर मात्र मोदी आणि भाजप यांची घोडदौड कोणीही रोखू शकणार नाही.

Web Title: uttarpradesh politics