यश 'वंदे भारत' मोहिमेचे

विजय नाईक
Thursday, 4 June 2020

वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत एअर इंडिया आता अमेरिका व कॅनडा येथे75उड्डाणे करणार आहे.ही उड्डाणे न्यू यॉर्क,नेवार्क,शिकागो,वॉशिंग्टन,सॅनफ्रान्सिस्को,व्हॅंकुव्हर व टोरोंटो येथून भारतीयांना परत आणणार आहे

कोरोनामुळे अनेक देशाची विमानसेवा बंद झाल्याने हजारो भारतीय परदेशात महिनो न महिने अडकून पडले. त्यांच्यापुढे असंख्य अडचणी उभ्या राहिल्या. त्या दूर करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या वंदे भारत मोहिमेने अनेकांना केवळ दिलासा दिला नाही, तर त्यांची "घरवापसी" करून त्यांना काळजीमुक्त केले आहे. त्यांच्यापैकी कुणाला कोरोनाची लागण झाली आहे काय, याचीही तपासणी करून देशात परतल्यावर त्यांना क्वारंटाईन करण्याची सोय उपलब्ध करून दिली. ही मोहीम जोमाने चालू आहे. त्याबाबत समन्वय साधण्याचे काम परराष्ट्र व नागरी उड्डाण मंत्रालय रात्रंदिवस करीत आहे, ही बाब निश्‍चितच वाखाणण्यासारखी आहे. केंद्र अनेक वर्ष मानवीयदृष्टीने निरनिराळ्या संकटांकडे पाहात आहे. माजी परराष्ट्र मंत्री कै सुषमा स्वराज यांना तर "घरवापसी मंत्री" म्हटले जायचे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने एअर इंडियाची खास विमाने पाठवून युद्धग्रस्त देशातून असंख भारतीयांना मायदेशी आणले होते. त्या घटनांवर आधारीत "एअरलिफ्ट" हा चित्रपटही निघाला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परराष्ट्र मंत्रालयानुसार, वंदे भारत मोहिमेचा 7 मे ते 16 मे हा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला. त्या दिवसात परदेशात अडकलेल्या 16,716 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले. दुसरा टप्पा 17 मे ते 13 जून असा आहे. 28 मे रोजी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण 45,216 भारतीय परतले. त्यापैकी 8069 स्थलांतरीत कामगार, 7656 विद्यार्थी व 5107 व्यावसायिक आहेत. नेपाळ व बांग्लादेशमधून सीमाप्रदेशातील नाक्‍यावरून 5000 भारतीय परतले. जगातील निरनिराळ्या भारतीय दूतावासातून झालेल्या नोंदणीनुसार 3 लाख 8 हजार 200 भारतीयांनी मायेदशी परतण्यासाठी अर्ज केले आहेत. 

दुसऱ्या टप्प्यात एअर इंडियाची 429 उड्डाणे होणार असून, त्यापैकी 60 देशातून 311 आंतरराष्ट्रीय तर 118 जोड उड्डाणे करून भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे. भारतीय नौदलानेही मोहिमेला साह्य केले आहे. श्रीलंका, इराण व मालदीव या देशातून नौदलाच्या जहाजातून भारतीय परत येतील. हे झाले जवळचे देश. परराष्ट्र मंत्रालयाने अतिदूर असलेल्या दक्षिण अमेरिका, कॅरिबियन देश, आफ्रिका व युरोपातील काही देशातील भारतीयांना साह्य केले आहे. त्या देशातून होणाऱ्या उड्डाणातून भारतीय येत आहेत. याच विमानातून त्या देशातील भारतात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मायदेशात पाठविले जात आहे. पेरू, मेक्‍सिको, बेलिझे, ग्वाटेमाला, होन्डुरास, पोर्तुगाल, नेदरलॅंड्‌समध्ये प्रतीक्षा करणारे तीनशे भारतीय परत आले. या टप्प्यात एअर इंडिया प्रमाणे खाजगी विमान कंपन्यांच्या विमानांचा समावेश मोहिमेत करण्यात आला आहे. चार्टर्ड विमानांचा वापर त्यासाठी करण्यात येत आहे. देशातील क्वारंटाईन क्षमता वाढेल, तसे जास्तीजास्त विमाने पाठविण्याचे ठरले आहे. 

हेही वाचा : कोरोनामुळे हरवली माणुसकी

देशातील सर्व राज्यातील भारतीय जगातील अनेक देशात नोकऱ्या, व्यवसाय करतात. त्यासंबंधी माहिती मिळवून कार्यवाही करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने राज्य सरकारे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, गृह मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय, एअर इंडिया, नौदल, संरक्षण मंत्रालय आदींचे साह्य घेतले असून, त्यांचा समन्वय साधण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयात अतिरिक्त सचिवाची नेमणूक केली आहे. 26 मे रोजी नागरी उड्डाण खात्याचे मंत्री हरदीप सिंग सुरी यांनी यासंदर्भात एक संयुक्त बैठक घेतली. दुसऱ्या टप्प्यात, एक लाख भारतीयांना परत आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयातील "एमईए कोविद- 19 नियंत्रण कक्ष" आठवड्याचे सातही दिवस 24 तास काम करीत असून, 28 मे, 2020 पर्यंत त्याकडे परदेशात अडकलेल्या भारतीयांचे तब्बल 22 हजार दूरध्वनी व 60 हजार इ-मेल्स संदेश आले. 

परदेशात अडकलेल्यांची परराष्ट्र मंत्रालय काळजी करीत आहे, हे उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास गोव्याचे अमितकुमार सुरेश डुब्ले यांचे उदाहरण देता येईल. 21 मे रोजी डुब्ले यांनी श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाळ बागळे यांना पत्र लिहून तब्बल दोन महिने श्रीलंकेत अडकल्याचे व गोव्यात आई अत्यवस्थ असल्याचे कळविले. ते गोव्यातील टोंका- करणझालेमची राहाणारे. भारतात लॉकडाऊन झाल्यापासून व उड्डाणे रद्द झाल्यामुळे ते अडकले. त्यांच्याकडे पर्यटकांचा काही दिवसांचाच व्हिसा होता. परतण्याचे 1 एप्रिलचे तिकिट त्यांनी काढले होते. कारण, टाळेबंदी क्रमांक 1 हा 31 मार्च पर्यंत होता. नंतर टाळेबंदीची मुतेदत वाढतच गेली. एकीकडे ते पुढच्या तारखेची तिकिटे काढत होते व दुसरीकडे टाळेबंदी वाढत होती. पण, ना विमान उड्डाण झाले ना त्यांनी तीन वेळा काढलेल्या तिकिटांचे पैसे परत मिळाले. 

हेही वाचा : स्वावलंबनाचा कानमंत्र

त्यात भर पडली ती श्रीलंकेत जारी करण्यात आलेल्या संचारबंदीची. त्यांना हॉटेलमधून बाहेर जाता येईना. पैसे संपत आले होते. श्रीलंकेच्या पर्यटनानंतर ते परतणार होते. हॉटेलमध्ये राहणे परवडणारे नव्हते. रोजचा खर्च 40 डॉलर्स होता. अखेर, त्यांनी भारतीय उच्चायुक्ताच्या कार्यालयाकडे धाव घेतली. या कार्यालयाने त्यांची व्यवस्था कमी खर्च असलेल्या ठिकाणी केली. आपली 76 वर्षांची आई अत्यवस्थ व अस्थमाची रुग्ण असून, किडनी स्टोन्सची शस्त्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी उच्चायुक्तांना कळविले. त्यासंदर्भात सारे मेडिकल रिपोर्ट त्यांच्या पत्नीने उच्चायुक्ताच्या कार्यालयाकडे पाठविले होते. डुब्ले यांचे बरेचशे नातेवाईक महाराष्ट्रात असतात. दरम्यान, खर्चासाठी पत्नीला दिलेले चेक्‍सही संपत आले होते. ""आई व कुटुंबीय घरी वाट पाहात आहेत,तेव्हा कोणत्याही परिस्थितीत"" आपल्याला भारतात पाठविण्याची विनंती त्यांनी केली होती. पत्रात त्यांनी म्हटले होते, "" आय ऍम फायनॅन्शियली अँड मेंटली एक्‍झॉस्टेड अँड नाऊ ऑन व्हर्ज ऑफ ब्रेकिंग डाऊन ."" आपल्याला ""29 मे रोजी भारतात जाणाऱ्या विमान जागा द्यावी,"" अशी याचना त्यांनी केली होती. एअर इंडियाचे पुढील विमान 13 जून ला अपेक्षित होते. 29 मेचे विमान कोलंबोहून मुंबईला जाणारे असल्याने ते डुब्ले यांना सोयीचे होते. पण 13 जूनचे विमान दिल्लीला उतरणार असल्याने सोयीचे नव्हते. 

""काही मदत होऊ शकेल काय,"" अशी विचारणा करण्यासाठी 22 मे रोजी मला गोव्यातील दै गोमंतकचे कार्यकारी संपादक अवीट बागळे यांचा दूरध्वनी आला. तोवर त्यांनी बरेच प्रयत्न करूनही काही प्रतिसाद मिळालेला नव्हता. उच्चायुक्त बागळे यांना डुब्ले यांनी पाठविलेल्या पत्राची प्रत पाठविण्यास मी सांगितले. ती आल्यावर परराष्ट्र मंत्रालयाच्या वृत्तपत्र विभागातील संचालक पवन बढे यांना मी पाठविली. बढे यांनी तत्काळ पत्राची दखल घेऊन उच्चायुक्ताच्या कार्यालयात संपर्क साधला व डुब्ले यांचे नाव 29 मे रोजी निघणाऱ्या विमानातील प्रवाशांच्या यादीत समाविष्ट करण्याची विनंती केली. त्यानुसार, डुब्ले 29 मे ला मुंबईला परतले व त्यांनी सुटकेचा निः श्‍वास सोडला. गोवा सरकारने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थेट गोव्याला जाणाऱ्या बसची व्यवस्था केल्याने ते गोव्याला परतले. तेथे त्यांना पंधरा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले,. 

या दक्षतेसाठी मंत्रालयाची प्रशंसा करावी लागेल. परदेशात भारतीय अनेक प्रकराच्या नोकऱ्या, काम करतात. परंतु, परतल्यावर त्यांना तत्काळ नोकऱ्या अथवा काम मिळण्याची शक्‍यता नाही. त्यांना काम मिळावे, या उद्देशाने त्यांचा डेटाबेस तयार करण्यात येत असून, नोकरीसाठी अर्ज करावयाचा असल्यास ""डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु डॉट एनएसडीसीइंडिया डॉट ऑर्ग स्लॅश स्वदेश"" या वेबसाईटवर तो करावा. 

वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत एअर इंडिया आता अमेरिका व कॅनडा येथे 75 उड्डाणे करणार आहे. ही उड्डाणे न्यू यॉर्क, नेवार्क,शिकागो, वॉशिंग्टन, सॅनफ्रान्सिस्को, व्हॅंकुव्हर व टोरोंटो येथून भारतीयांना परत आणणार आहे. 9 जून ते 30 जून दरम्यान ही उड्डाणे होतील. त्याचा उपयोग भारतातून तेथे जाणाऱ्या व येणाऱ्यांना होईल. सुमारे 70 हजार भारतीय निरनिराळ्या देशात कोरोनामुळे विमानसेवा रद्द झाल्याने अडकले आहेत. त्यापैकी आखाती देशात भारताबाहेर राहाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण एकूण परदेशस्थ भारतीयांच्या 70 टक्के आहे. अर्थात, उड्डाणाची सोय असली, तरी विमानाच्या तिकिटाचे पैसे ज्याला त्याला भरावे लागतात. 

यापूर्वी, 13 ते 20 ऑगस्ट 1990 दरम्यान (पर्शियन गल्फ युद्ध) एअर इंडिया व भारतीय वायू दलाने पाचशे उड्डाणे करून 1 लाख 70 हजार भारतीयांना कुवेतमधून., 2006 मध्ये लेबॅननमध्ये झालेल्या युद्धादरम्यान भारतीयांसह 2280 जणांना., 2011 मध्ये लीबियामधील नागरी युद्धात अडकलेल्या 15 हजार भारतीयांना "ऑपरेशन सेफ होम कमिंग"द्वारे, व अलीकडे चीनमधील वूहान येथे कोरोनाची लागण झाल्यावर 637 भारतीय व मालदीवमधून 7 भारतीयांना परत आणले. येमेनमधील 2015 मधील युद्धात "ऑपरेशन राहत" द्वारे येमेनची राजधानी साना येथून 4640 भारतीय व 41 परदेशी नागरीक., नेपाळमध्ये 2015 मध्ये आलेल्या भूकंपादरम्यान भारतीय वायु दलाने 5188 भारतीय व 785 परदेशी पर्यटक, व 2016 मध्ये ब्रुसेल्स (बेल्जियम) झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर 242 भारतीयांना मायदेशी आणले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran journalist vijay naik writes blog success of vandebharat mission