अपार संघर्षातून अभूतपूर्व स्वरवैभवाकडे...

रियाजात चुकूनही खंड नाही, तालीम केल्याशिवाय गाणे नाही आणि एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही ‘बन चुके’ ही भावना नाही, ही त्रिसूत्री लतादीदींनी हयातभर जपली.
Lata Mangeshkar and Shanta Shelake
Lata Mangeshkar and Shanta ShelakeSakal
Summary

रियाजात चुकूनही खंड नाही, तालीम केल्याशिवाय गाणे नाही आणि एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही ‘बन चुके’ ही भावना नाही, ही त्रिसूत्री लतादीदींनी हयातभर जपली.

रियाजात चुकूनही खंड नाही, तालीम केल्याशिवाय गाणे नाही आणि एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही ‘बन चुके’ ही भावना नाही, ही त्रिसूत्री लतादीदींनी हयातभर जपली. कष्टाला पर्याय नाही, हे त्यांनी अजाण वयातच ओळखलं होतं. म्हणूनच सगळे मानसन्मान, जगभरात दिगंत कीर्ती आणि न भूतो न भविष्यती असा दिग्गज मंडळींचा लाभलेला सहवास या अभूतपूर्व वैभवातही लतादीदींचे पाय जमिनीवरच राहिले...

मास्टर दीनानाथांच्या अकाली निधनानंतर उदरनिर्वाहासाठी आणि पर्यायाने ‘थोरली’ या नात्याने संपूर्ण कुटुंब लता मंगेशकर यांच्यावरच अवलंबून होतं. सिनेमात काम करण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. मास्टर विनायकांचाच काय तो आधार. त्या वेळचा एक हृदयद्रावक प्रसंग संगीतकार दत्ता डावजेकरांकडून ऐकायला मिळाला होता.

विनायकांच्या प्रफुल्ल चित्र संस्थेतर्फे निर्माण होणाऱ्या ‘गजाभाऊ’ या चित्रपटात लता शांतानामक एका दुर्दैवी मुलीची भूमिका करत होत्या. त्यात सावत्र आई या मुलीचा छळ करते. उपाशी पोटी, विहिरीच्या रहाटावरून पाणी काढून भरलेला हंडा कमरेवर घेऊन चालताना ती परमेश्वराकडे धाव सख्या गिरिधारी... हे गाणं म्हणते असा प्रसंग होता. डावजेकरांनी त्या सिच्युएशननुसार चाल तयार केली. विनायकांना ती पसंत पडली. गीतकार स. अ. शुक्ल यांनी गाणे लिहूनही दिले. स्टुडिओत गाण्याचं ध्वनिमुद्रण सकाळी नऊ वाजता सुरू झालं. लता नेहमीसारख्याच समरसून गायल्या; पण विनायकांना ते गाणं आवडलं नाही. स्वतः डावजेकरही लतांच्या गायकीवर बेहद्द खूष झाले; पण विनायकांना ते गाणे विशिष्ट भावनेतून यायला हवे होते आणि तेच जमत नव्हते. संध्याकाळचे चार वाजायला आले. दिवसभर गायल्यामुळे चौदा पंधरा वर्षांच्या दीदी पार दमून गेल्या. त्यांच्या अंगात त्राणही उरले नव्हते. अखेर विनायकांना कल्पना सुचली. त्यांनी चक्क भरलेला पाण्याचा हंडा दीदींच्या कमरेवर ठेवला आणि गायचे फर्मान सोडले. त्या ओझ्याने व्याकुळ होत लतादीदींनी रडत रडत गायला सुरुवात केली आणि विनायकरावांना नेमका इफेक्ट मिळाला. त्यांनी दीदींना जवळ घेऊन शाबासकी दिली आणि आपल्या गाण्याने सर्वांना प्रसन्न केलं, याचं अपूर्व समाधान लतादीदींच्या चेहऱ्यावर पसरलं. दस्तुरखुद्द डावजेकरांनासुद्धा ही आठवण सांगताना भरून आलं होतं.

हिंदी चित्रपटसृष्टीतही चाळीसच्या दशकातील एकापेक्षा एक दिग्गज गायिकांशी तगडी स्पर्धा करून लतादीदींनी आपले नाणे खणखणीत वाजवले खरे; पण इथंही त्यांच्यामागचे शुक्लकाष्ठ संपले नव्हतेच. मुळात आपण चांगलं गातो आणि मोठे कोणीतरी होणार, हा विचारही कधी त्यांच्या मनाला शिवला नव्हता. काम करायचं आणि पैसे मिळवायचे, हा एकच ध्यास. देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं. मालाडच्या बॉम्बे टॉकीजचा ‘मजबूर’ सेटवर गेलेला. संगीत होतं गुलाम हैदर यांचं. या चित्रसंस्थेचे एक भागीदार आणि अभिनेता जॉय मुखर्जींचे वडील शशधर मुखर्जी यांना लतांबद्दल काय आकस होता कळत नाही. ‘या मुलीचा आवाज खूपच पातळ आहे. हिला गाणे जमणार नाही,’ अशी मुक्ताफळे ते उधळत; पण गुलाम हैदर मात्र लतांवर ठाम राहिले. विश्वास बसणार नाही, पण ‘मजबूर’मधले ‘दिल मेरा तोडा...’ हे दर्दभरे सोलो त्यांनी लताकडून मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील बाकड्यावर बसून वदवून घेतले होते. ‘मजबूर’ची गाणी गाजली. सिनेमानेही चांगला व्यवसाय केला; पण मुखर्जीसाहेबांची कळी शेवटपर्यंत खुलली नाहीच. लतांच्या मनात मात्र ही खंत होती; मग चाळीसचं दशक संपून पन्नासच्या दशकाची वाटचाल सुरू झाली. बॉम्बे टॉकीजचं विभाजन होऊन मुखर्जींनी स्वतःच्या फिल्मिस्तानची निर्मिती केली. बावन्न साली कंपनीचा ‘अनारकली’ सेटवर गेला. संगीतकार होते सी. रामचंद्र. तिथंही मुखर्जींनी त्यांना लतांऐवजी गीता दत्त यांना गायिका म्हणून घ्या, असा हट्ट धरला. सी. रामचंद्र यांनी मुखर्जींना रोखठोक सुनावलं, ‘‘अनारकली’ची गाणी लता गाणार नसेल, तर सिनेमा सोडतो.’’ अखेर मुखर्जींनी परवानगी दिली. लतांच्या कानावर ही गोष्ट आली होतीच. त्यांनीही चंग बांधला आणि अजरामर ठरलेल्या ‘ये जिंदगी उसी की है...’चा जन्म झाला. त्यातल्या लतादीदींच्या आर्त सुरातल्या ‘अलविदा...’ने मुखर्जींनाही पाझर फुटला.

संगीतकार नौशाद यांच्याकडे लता मंगेशकर यांनी सर्वप्रथम गाणं गायलं ते ‘चाँदनी रात’साठी. गायक जी. एम. दुर्राणींसमवेत म्हटलेल्या त्या द्वंद्वगीताचे शब्द होते, हाय छोरे की जात बड़ी बेवफा... परळच्या कारदार स्टुडिओत गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. दिवस पावसाळ्याचे. त्या काळात स्टुडिओसुद्धा लांब लांब अंतरावर असत. त्यात मुंबईचा पाऊस. नौशाद आणि दुर्राणी लतादीदींची वाट पाहात थांबलेले. तशात दुर्राणी मोठे गायक. कोण कुठली लता आपल्याबरोबर गाणार म्हणून काहीसे नाराजच होते. तेवढ्यात एक काळीसावळी किडकिडीत मुलगी हातातली छत्री सावरत चक्क भिजून चिंब अवस्थेत त्यांच्या दालनात दाखल झाली. उशीर झाल्याने अपराधी भाव, बडा गायक गाणार म्हणून आलेलं दडपण आणि आपलं गाणं व्यवस्थित पार पडेल ना, याची काळजी. नौशाद यांनी दीदींना धीर दिला आणि पुढच्या काही मिनिटांतच त्या मस्तपैकी गायल्या. गाण्याचा टेक ओके झाला तरी त्या संभ्रमातच. नौशाद यांनी खूष होऊन लतादीदींच्या हातावर साठ रुपये ठेवले. तेव्हा त्या एवढ्या आनंदून गेल्या की नौशाद आणि दुर्राणी बघतच राहिले. आपली भिजलेली अवस्था, तुटकी छत्री याचे काही म्हणून दीदींना भान नव्हते. याचं एकच कारण होतं. लतादीदींनी नंतरच्या काळात लाखो रुपये कमावले खरे; पण त्या प्रतिकूल काळात त्यांच्यासाठी ती रक्कम लाखाच्याच घरात होती.

हिंदी-मराठी चित्रसृष्टीत लतादीदींची हळूहळू घोडदौड सुरू असतानाच त्यांनी मराठी नाट्यजगतातही मुशाफिरी केल्याचं फारसं कुणाला ठाऊक नसेल; पण तो मुद्दा इथे सांगण्याचा हेतू एवढाच की स्वतःला मिळत असताना, त्याचा काही भाग इतरांनाही देण्याचं औदार्य हवं. दादरच्या प्लाझा थिएटरजवळ भांडारेंचं श्रीनंद थिएटर होतं. गडकऱ्यांचं ‘भावबंधन’ नव्या तरुण पिढीने करावं म्हणून चिंतामणराव कोल्हटकरांनी स्वतः तो प्रयोग बसवला. त्यात लतादीदींनी लतिकेची भूमिका आणि त्यातही नाट्यगीते अप्रतिमरीत्या गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. तोच प्रयोग परळच्या दामोदर हॉलमध्येही सादर करण्यात आला; पण यातून मिळणारे पैसे दीदींनी गरजू कलावंतासाठी सढळ हस्ते खर्च केले. दीनानाथांचं स्मारक उभारण्यासाठी मंगेशकर भावंडांनी ‘वेड्याचा बाजार’ या नाटकाचे काही प्रयोग केले खरे. पण त्यातून ‘पुरेसा’ निधीच उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र त्याबद्दल दीदींनी कधीही, कसलीही तक्रार व्यक्त केल्याचं ऐकिवात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com