राजधानी दिल्ली : मराठी ‘संकटमोचक’ चर्चेत

चंडीगडमध्ये कॉँग्रेस आणि आम आदमी पार्टीकडे बहुमत असूनही कट कारस्थान करत भाजपचा महापौर होणे, हा प्रकार लोकशाही आणि आदर्श निवडणूक आचारसंहितेला चिरडणारा आहे.
Samrat Chaudhary and Vinod Tawde
Samrat Chaudhary and Vinod Tawdesakal

- विकास झाडे

चंडीगडच्या महापौरपदाची निवडणूक असो वा बिहारची सत्ता पुन्हा काबीज करण्याच्या विषय असो, याची सूत्रे सांभाळली ती विनोद तावडे यांनी. राष्ट्रीय राजकारणात मोदी-शहांना अपेक्षित असलेला ‘मराठा नेता’ म्हणून विनोद तावडे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

चंडीगडमध्ये कॉँग्रेस आणि आम आदमी पार्टीकडे बहुमत असूनही कट कारस्थान करत भाजपचा महापौर होणे, हा प्रकार लोकशाही आणि आदर्श निवडणूक आचारसंहितेला चिरडणारा आहे. साध्या महापौरपदाची निवडणूकही पारदर्शकपणे होऊ दिली जात नाही, तर लोकसभेत काय होईल, असेही विचारले जाऊ लागले आहे. याबाबत विरोधकांकडूनच नव्हे तर विवेकवादी मतदारांकडून मते व्यक्त व्हायला लागली आहेत.

परंतु जेव्हा पक्षनिष्ठा सर्वोच्चस्थानी असते तेव्हा काय चांगले अन् काय वाईट हा विषय त्या राजकारण्याच्या दृष्टीने गौण ठरतो. काल- परवाची चंडीगडची महापौरपदाची निवडणूक असो वा बिहारची सत्ता पुन्हा काबीज करण्याच्या विषय असो, याची सर्व सूत्रे सांभाळली ती विनोद तावडे यांनी त्याच भूमिकेतून.

त्यात त्यांनी इमानेइतबारे काम केले आणि राष्ट्रीय राजकारणात मोदी-शहांना अपेक्षित असलेला ‘मराठा नेता’ हे स्थान मिळविण्याचा प्रयत्न ते करीत असल्याचे दिसून आले. पक्षाला अपेक्षित यश मिळवून दिल्यावरही तावडे त्याचे श्रेय स्वत:कडे घेत नाहीत. ही बाब भविष्यातील राजकारणबदलाचे चिन्ह आहे.

पाच वर्षांपूर्वी विधानसभेचे तिकीट न मिळाल्यानंतर राजकारणात अंग चोरून वावरणारे आणि शांतपणे खदखद व्यक्त करणारे तावडे हे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस, सोबतच आधी हरयाना आणि आता बिहारचे प्रभारी आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडचे समन्वयक म्हणून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्ष त्यांच्यावर विश्‍वास टाकतो आहे.

या निमित्ताने पुन्हा एकदा दिल्लीतील महाराष्ट्राचे स्थान हा विषय चर्चेत आला आहे. दिल्लीचे महाराष्ट्राला नेहमीच आकर्षण असते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी उत्तरेच्या मोहिमा काढत दिल्लीचे तख्त काबीज केले. महाराष्ट्राचे दिल्लीच्या राजकारणातील महत्त्व अठराव्या शतकात इतके मोठे होते, की दिल्लीचा बादशाहा कोण होणार? हे शिंदे-होळकर ठरवत असत, असे म्हटले जाते.

यावरूनच ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही कविकल्पना पुढे आली. आजही दिल्लीचे तख्त काबीज करण्याचे मराठी माणसाचे स्वप्न असते. इतिहासत पानिपतच्या लढाईत मराठा साम्राज्याची वाताहात झाली आणि महाराष्ट्राचा दिल्लीवरचा दबदबा कमी झाला. स्वातंत्र्यानंतर तर दिल्ली महाराष्ट्रावर अन्याय करते, अशी एक भावना तयार झाली.

ब्रिटिश राजवटीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनलेले सी. डी. देशमुख नंतर १९५०मध्ये केंद्रीय अर्थमंत्री बनले आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेवर मोठा प्रभाव टाकला. मुंबई गुजरातला जोडण्याच्या प्रस्तावाविरोधात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची बाजू घेतली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. संयुक्त महाराष्ट्राचा ‘मंगलकलश’ घेऊन येणारे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातच नव्हे, तर दिल्लीच्या राजकारणातही एक मोठे नाव होते.

ते काही काळ भारताचे उपपंतप्रधान तर झालेच; पण भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. प्रतिभाताई पाटील या भारताच्या राष्ट्रपती झाल्या, हा मराठी माणसाचा दिल्लीच्या राजकारणातील एक सर्वोच्च बिंदू मानला जातो. नंतर काही काळ दिल्लीतील मराठी धुरीणांचा प्रभाव उत्तरोत्तर ओसरत गेला.

पुढे शरद पवार यांनी संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री अशी झेप घेतली असली तरी पंतप्रधानपदाने त्यांना हुलकावणी दिली. असे असले तरी शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात आजही स्वत:चा दबदबा ठेवून आहेत. शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे यांनीही दिल्ली दरबारात आपल्या वकुबानुसार कामगिरी केली. भाजपचा उदय झाल्यानंतर महाराष्ट्रातून केंद्रीय स्तरावर झपाट्याने पुढे आलेले नाव म्हणजे स्व. प्रमोद महाजन यांचे.

किंबहुना अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार बनण्यात त्यांच्या मुत्सद्दी खेळींचा मोठा वाटा होता. दिल्लीतील सूत्रे मुंबईतून हलू लागावीत, एवढा दबदबा त्यांनी अल्पावधीत निर्माण केला होता. भावी पंतप्रधान असे त्यांच्याबद्दल म्हटले जायचे; पण त्यांची दुर्दैवी हत्या झाली. विलासराव देशमुख हे एक महत्त्वाचे नाव. महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री होते. त्यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवले.

पण आजारपणामुळे दिल्लीच्या राजकारणात त्यांना खास दबदबा निर्माण करता आला नाही. प्रारंभी लातूरमधील निवडणुकीत आणि त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीतही त्यांचा अल्पमताने पराभव झाला, तेव्हा ते म्हणाले होते, ‘मी संपलेलो नाही, हे माझ्या राजकीय आयुष्याचे मध्यंतर आहे’. पुढे विलासराव मुख्यमंत्री झाले. २०१९मध्ये विनोद तावडे यांचे तिकीट कापले गेले. तेव्हा त्यांची राजकीय कारकीर्द संपली असे सर्वांना वाटले.

त्यावेळी तावडेंनी सुरेश भटांची एक गाजलेली कविता सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केली. ‘विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही....’ या कवितेमुळे राज्यातील बलदंड नेत्यावर आरोप व्हायला लागले. पुढे तावडेंनी दिल्लीमध्ये हळूहळू आपले स्थान निर्माण केले. मराठी माणूस दिल्लीत रमत नाही, त्याचा एक पाय नेहमी महाराष्ट्रात अडकलेला असतो. तावडे काही वेगळे घडवितात का, हे पाहायचे.

नितीन गडकरी यांचे दिल्लीतील राजकीय वजन कमी होण्याच्या चर्चा सुरू असताना प्रसिद्धीच्या झोतात न राहता तावडे यांनी मोदी सरकारचे ‘संकटमोचक’ म्हणून बिहारमध्ये जी भूमिका बजावली. त्यामुळे दिल्लीत त्यांचे वजन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बिहारमधील भाजपच्या खेळीमुळे ‘इंडिया’ आघाडीला जो हादरा बसला त्यातून ती कशी आणि कधी सावरेल याचे भाकीत आता वर्तवता येणे अवघड आहे. अलीकडेच तावडेंनी ''नितीशकुमार डोकं फिरलेला मुख्यमंत्री'' अशी टीका केली होती. भाजपसोबत सरकार बनवल्यानंतर नितीशकुमार यांचे डोके आता स्थिर असल्याची कबुली तावडे देतात आहे.

पेटेन उद्या नव्याने...

विनोद तावडे हे रा.स्व. संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत घडले. भारतीय जनता पार्टीचे ते बृहन्मुंबई विभागाचे निवडून आलेले सर्वात तरुण अध्यक्ष होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. २०१९मध्ये तिकीट कापल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तावडेंना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून संधी दिली आणि तावडे यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला.

हरियानाचे प्रभारी म्हणून त्यांचे कार्यही भाजपचे स्थान टिकवण्यात उपयुक्त ठरले. भूपेंद्र यादव हे केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यावर रिक्त झालेले बिहारचे प्रभारीपद त्यांच्याकडे आले. त्यांनी या संधीचा मुत्सद्दीपणा दाखवत फायदा करून घेतला असे दिसते. महाराष्ट्राचे दिल्लीच्या राजकारणात स्थान काय, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. पक्ष कोणताही असो, मराठी माणसाला केंद्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभवायला मिळणे आणि त्याने राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी प्रभाव टाकणे, याची आवश्यकता आहे. हे कोणी नाकारणार नाही.

उसनवारी केलेले इतर पक्षातील नेतृत्व महाराष्ट्र भाजपवर लादण्यापेक्षा त्यांच्याच राशीतले आणि मुशीतले विनोद तावडे पसंतीचे ठरू शकतात. दुसऱ्या बाजूला प्रकाश जावडेकरांची मंत्रिमंडळातील मराठी जागा बराच काळ रिक्त आहे. आता आगामी काळात तावडे आपली जागा कुठे निर्माण करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष राहील.

(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली येथील ‘ब्युरो’चे प्रमुख आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com