देवरायांची "वारसास्थळे' व्हावीत (अतिथी संपादकीय)

विलास बर्डेकर (अध्यक्ष, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ)
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

महाराष्ट्राव्यतिरिक्त आपल्या देशात अन्यत्र स्थानिक लोकांनी अशाप्रकारे देवांच्या नावानेच जंगलाचे जतन केल्याचे आढळून येते. आशिया खंडातील अन्य देशांमध्येही देवरायांचे जतन करण्याची स्थानिक लोकांची परंपरा मोठी आहे.
महाराष्ट्रात साधारणपणे चार हजारांच्या आसपास देवराया आहेत. त्यातही पश्‍चिम घाटामध्ये त्या सर्वाधिक आहेत

जंगलाचा खरा रक्षणकर्ता कोण, या एका प्रश्‍नाची अनेक सापेक्ष उत्तरे हल्ली मिळतात. मात्र, वनसंहार रोखण्यासाठी "देवराई'ची संकल्पना पूर्वीपासून अस्तित्वात आहे. देवाच्या नावाने राखून ठेवलेला जंगलातील काही भाग म्हणजे "देवराई.' त्या राईतील वनसंपदेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या त्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक समुदायावर होती. आज ती अधिक व्यापक झाली आहे; कारण माणसाने जंगल संपत्तीचा ऱ्हास करण्याचा जणू विडा उचलल्याप्रमाणे वृक्षराजींवर कुऱ्हाड चालवली आहे. देवाचा कोप होईल म्हणून देवराईचे रक्षण केले पाहिजे, ही भाबडी समजूत आज मागे पडत आहे. त्यामुळे देवराया धोक्‍यात आल्या आहेत. वास्तविक, राई हे जैविक विविधता संवर्धनाचे एक आगळेवेगळे उदाहरण आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त आपल्या देशात अन्यत्र स्थानिक लोकांनी अशाप्रकारे देवांच्या नावानेच जंगलाचे जतन केल्याचे आढळून येते. आशिया खंडातील अन्य देशांमध्येही देवरायांचे जतन करण्याची स्थानिक लोकांची परंपरा मोठी आहे.
महाराष्ट्रात साधारणपणे चार हजारांच्या आसपास देवराया आहेत. त्यातही पश्‍चिम घाटामध्ये त्या सर्वाधिक आहेत. त्यातील काही वन विभागाच्या, तर काही देवराया ग्रामपंचायतींच्या क्षेत्रावर आहेत. प्रत्येक देवरायांशी निगडित अशा वेगवेगळ्या दंतकथा, श्रद्धा आणि काल्पनिक कथा आहेत. एकूण जंगल क्षेत्राचा विचार करता, देवरायांचे क्षेत्र फार कमी असते, पण या छोट्या क्षेत्रात अनेक प्रकारची जैवविविधता आढळते. त्यात प्रदेशनिष्ठ झाडे-झुडपे, वेली, वनस्पती, काही दुर्मिळ वनौषधी आणि वन्यप्राणी आढळून येतात. स्थानिक हवामान आणि परिसरातील पर्जन्यमानावर तेथील वनस्पतींचे प्रकार किंवा वन्यप्राण्यांचे अस्तित्व अवलंबून असते. एका अर्थाने, देवराई म्हणजे स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्ती, दुर्मिळ वनौषधी-वनस्पती आणि वन्यप्राण्यांचा ठेवा होय. धोक्‍यात आलेल्या वनस्पती आणि प्राण्यांचे जतन आपल्याकडील देवरायांमध्ये होत असल्याचे दिसून येते. दुर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांची; तसेच वनस्पतींची आश्रयस्थाने देवराईत असतात. जैवविविधता आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी त्या महत्त्वपूर्ण आहेतच, परंतु त्यामुळे जल आणि मृदसंधारणसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते.

पुरातन काळामध्ये वैद्यकीय सुविधा आणि लोकसंख्या कमी प्रमाणात असल्याने वैद्यकीय इलाजासाठी देवरायांवरच अवलंबून राहावे लागत असे. त्यांचे पावित्र्य, धार्मिक विश्‍वास आणि तेथील निषिद्ध गोष्टी यामुळे तेथील प्राणी, वनस्पतींच्या शाश्‍वत विकासाचा विचार आपसूकच होत असे. साहजिकच देवरायांचे संवर्धन आपोआप होत असे.

आपल्या पूर्वजांनी अत्यंत जिव्हाळ्याने जतन केलेल्या निसर्गसंपन्न देवरायांवर तथाकथित प्रगती किंवा विकासाचे सावट आले आहे. शाश्‍वत विकासाच्या नावाखाली अमर्याद जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. धार्मिक श्रद्धा बाजूला ठेवून देवरायांचे जैविक विविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व ध्यानात घेणे गरजेचे आहे. धोक्‍यात आलेल्या आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या देवरायांचे संरक्षण करणे, हे स्थानिक लोकांप्रमाणेच सर्वांचेच कर्तव्य आहे. स्थानिक जनता, स्वयंसेवी संस्था, वन विभाग आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या सहकार्याने देवरायांचे संरक्षण आणि जतन केले जाऊ शकते.

"जैविक विविधता कायदा 2002'च्या तरतुदीनुसार राज्यामधील जैविक विविधतेने संपृक्त असलेल्या स्थानांना जैविक विविधता वारसास्थळ घोषित करता येणे शक्‍य आहे. देवराया या वारसास्थळ म्हणून घोषित केल्यास त्यांचे रक्षण होण्यास मदत होईल. स्थानिक लोकांमध्ये असलेला धार्मिक विश्‍वास, देवाचा कोप अशा समजुती कालानुरूप नष्ट व्हाव्यात. पण केवळ देवराईच नव्हे, तर आपल्या गावाभोवतालची वृक्षराजी, जैवविविधता राखण्यासाठी लोकांमध्ये निकोप शहाणपण वाढीस लागणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी शासकीय, संघटनात्मक आणि पर्यावरणतज्ज्ञांच्या पातळीवर समग्र विचार व्हायला हवा. जंगलावर निर्दय घाव घालणारे वृक्षतस्कर शोधून त्यांचा बीमोड करणे गरजेचे आहे. माणसाच्या निरामय जगण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण महत्त्वाचे आहे, ही जाणीव ठसवली पाहिजे. देवाचे भय किंवा कायद्याची भीती अशा जरबेपेक्षा माणूस हा निसर्गाचाच भाग आहे, याची जाणीव करून देणे अगत्याचे आहे. माणूस आणि निसर्ग परस्परपूरक आहेत, हे शहाणपण वाढीस लागण्यासाठी सर्वांच्याच हातभाराची गरज आहे, यात शंका नाही.

Web Title: vilas bardekar writes about deorai