प्रकाशाकडे नेणाऱ्या वाटाड्याचा अस्त !

‘डेक्कन’वरील बेडेकरांच्या दगडी भक्कम किल्ल्यात १९८० मध्ये सुधीर (बेडेकर) शी माझी पहिली भेट दत्ता (देसाई)बरोबर झाली आणि माझा-आमचा जीवनप्रवास एका वेगळ्याच वळणाने सुरू झाला.
Sudhir Bedekar
Sudhir BedekarSakal
Summary

‘डेक्कन’वरील बेडेकरांच्या दगडी भक्कम किल्ल्यात १९८० मध्ये सुधीर (बेडेकर) शी माझी पहिली भेट दत्ता (देसाई)बरोबर झाली आणि माझा-आमचा जीवनप्रवास एका वेगळ्याच वळणाने सुरू झाला.

मार्क्सवादी विचारवंत आणि ‘मागोवा’, ‘तात्पर्य’ या नियतकालिकांचे संपादक सुधीर बेडेकर यांचे नुकतेच निधन झाले. वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होत असे. त्या आठवणींना दिलेला उजाळा.

‘डेक्कन’वरील बेडेकरांच्या दगडी भक्कम किल्ल्यात १९८० मध्ये सुधीर (बेडेकर) शी माझी पहिली भेट दत्ता (देसाई)बरोबर झाली आणि माझा-आमचा जीवनप्रवास एका वेगळ्याच वळणाने सुरू झाला. सुधीरबरोबर वैयक्तिक व अभ्यासवर्गांत झालेल्या संवादांच्या आधारे मनाला छळणाऱ्या अनेक प्रश्नांचा विचार कसा करायचा ते कळत गेले. जीवन साधेपणाने जगतानाही त्यातील उत्फुल्लता टिकविता येते आणि मार्क्सवाद म्हणजे केवळ पठडीबाज वर्गसंघर्ष नव्हे, हे कळले. साहित्य-संगीत व विचार, इतिहासाचे भान, वैज्ञानिक विचारपद्धती या सगळ्यांचा एक ‘बर्ड व्ह्यू’ मिळाला. जीवन अनेक अंगाने फुलत गेले आणि आजही ‘निशासक्त की सूर्य गर्जने’च्या सादाचा लागलेला षड्ज सुधीर अस्ताला गेल्यावरही कानात घुमतो! याचे एकमेव कारण सुधीर बेडेकर यांच्याशी सातत्याने हिरिरीने घातलेले वैचारिक राजकीय-सांस्कृतिक प्रेमळ वाद-कम-गप्पा! त्याचबरोबर प्रत्यक्ष जनसमुहांबरोबर केलेली व्यापक अशी राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक बांधणी व त्यासाठीचा कम्युनिस्ट पक्षांतर्गत केलेला झगडा हेही होत राहिले. तत्त्वाला तिलांजली न देता भारतीय संदर्भात मार्क्सवादी विचार करण्याच्या गरजेविषयी आम्ही संवाद करत राहिलो. असंघटित क्षेत्रात काम करताना व पुढे त्यांच्या आर्थिक लढ्यासोबतच आरोग्य-शिक्षण हक्काची लढाई जोडत राहिले. हा सारा प्रवास सुधीरच्या व दत्ताबरोबरच्या व्यापक संवाद प्रक्रियेतून होत गेला, असं मला वाटतं.

म. फुले-अण्णा भाऊंच्या साहित्यापासून ते दया पवार-नामदेव ढसाळांच्या सिंहगर्जनेपर्यंतच्या साहित्याची ओळख सुधीर संपादित करीत असलेल्या ‘मागोवा’ व ‘तात्पर्य’ मासिकांमुळे वृद्धिंगत झाली. अन्य समकालीन दलित साहित्य, वसंत आबाजी डहाके, हरिशंकर परसाई अशा साहित्याशीही परिचय वाढत गेला आणि त्यामुळे वर्गासोबतच जातीअंताच्या लढ्याचे भान येत गेले. रशियन क्रांतीचे गारूड होतेच. रशियन साहित्याचे त्यानिमित्ताने खूप वाचन झाले. क्रांतीनंतर स्टॅलिनने काही योग्य पावले उचलली होती; पण वेगळा विचार मांडणाऱ्यांचा त्याने ज्या पद्धतीने नरसंहार केला, त्याबद्दल सुधीर जी टीका करीत असे, त्यातून आमचा योग्य दृष्टिकोन तयार झाला. लेनिन फार काळ जगला नाही, अन्यथा वेगळेच घडले असते, याची सल सुधीरच्या मनात होती. लेनिन यांच्याविषयी तो भरभरून बोलायचा. थोडक्यात काय तर मार्क्सवादाकडे किंवा एकूणच विज्ञानाकडे सुद्धा समीक्षात्मक पाहायला हवे. खरे तर विज्ञानातच आणि मार्क्सवादात ती ताकद आहे, ते सतत बदलत असते ही शिकवण त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना तो देत राहिला.

केरळ शास्त्र साहित्य परिषदेबाबत (‘केएसएसपी’) सुधीर आपुलकीने बोलायचा. डाव्यांनी केलेला एक वेगळा प्रयोग होता तो. डाव्यांनी सायलेंट व्हॅली वाचविण्यासाठी प्रसंगी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्याही विरोधात घेतलेली भूमिका याचं कौतुक त्याला होतं. एकूणच विज्ञान चळवळ व ‘केएसएसपी’च्या आस्थेमुळे डॉ. एम. पी. परमेश्र्वरन यांनी ‘भारत ज्ञान विज्ञान समिती’च्या स्थापनेबाबत सुधीर-दत्ता-अजित अभ्यंकर, कुमार शिराळकर यांच्याबरोबर चर्चा केली. एकीकडे त्यानेच दिलेल्या शिकवणीतून आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्याही मर्यादा समाजशास्त्राच्या निकषांवरच तपासून पाहायला हव्यात हे कळत गेले. मात्र याविषयी जेव्हा त्याच तत्त्वांचा जेव्हा ठोस, व्यावहारिक गोष्टीत आम्ही रूपांतर किंवा अंमल करत असू तेव्हा त्यावर वाद व्हायचे.

सुधीरचे जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे विविध गटांतील वैचारिक फरक तो नेमकेपणाने स्पष्ट करायचा. समाजवाद्यांमधील विविध विचारधारा, आंबेडकर विचारांच्या आधारे काम करणारे विविध गट असोत किंवा डांगे-रणदिवे वाद व म्हणून सीपीआय-सीपीएम् यांच्या भूमिकांमधील फरक यांचे बारकावे तो सांगायचा. वाचायला उद्युक्त करायचा. डोळे झाकून कोणतीही गोष्ट स्वीकारू नका, असे तो सांगत असे. एवढेच नाही तर कोणाचीही व्यक्तिपूजा त्याला अमान्य होती. ही समतेची शिकवण देतानाही आणि वयाने, विचाराने प्रगल्भ असूनही आमच्याबरोबर मित्र याच पातळीवर राहिला तो त्यामुळेच. स्वतःच्या जीवनातील साधेपणा, डिक्लास होणे (उदा. कम्युनिस्टांनी आपल्‍या जमिनी रयतेला वाटल्‍या.) याविषयी देखील सुधीरसह सर्व ग्रुपशी झालेल्या चर्चांमधून आम्ही अधिकाधिक सजग होत गेलो. मात्र जातीचा संदर्भ काढून टाकण्यासाठी नावात बदल करण्याचा मुद्द्याबाबत माझी भूमिका सुधीरला का पटली नाही, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. केवळ भूमिगत काम करताना असे बदल करावेत, अशी त्याची भूमिका होती. रोजच्या जीवनातल्या सांस्कृतिकतेकडे कानाडोळा करणं मला पटलं नाही. अर्थातच या साऱ्यांबरोबर वाद घालताना आमची मैत्री कधी आड आली नाही. सुधीर-चित्रासह सर्व मित्र-मैत्रिणींशी आमच्या कुटुंबासारखे जवळचे नाते तयार होत गेले. या साऱ्यांच्या सहवासातून महाराष्ट्रातील आणि देशभरातील कार्यकर्त्यांशी नाळ जुळली, निरपेक्षपणे विचार करण्याची सवय लागली. त्या चर्चा, ते वाद आम्हाला समृद्ध करून गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com