चतुरस्र अर्थशास्त्री

अभय सुपेकर
सोमवार, 2 जानेवारी 2017

मुंबईत वैद्यकीय सेवा करणाऱ्या कुटुंबातील आचार्य यांनी २००१ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून फायनान्समध्ये पीएच. डी. केली. ते बॅंक ऑफ इंग्लंडचे रिसर्च फेलो होते. लंडन बिझनेस स्कूलमध्ये काम केलेले आचार्य यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये संशोधन केले आहे.

कधीतरी हास्यविनोद करताना विरल आचार्य यांनी स्वतःचा उल्लेख ‘गरिबांचा रघुराम राजन’ असा केला होता. तेच आचार्य आता रिझर्व्ह बॅंकेच्या इतिहासातील सर्वांत तरुण डेप्युटी गव्हर्नर होत आहेत.

काही महिन्यांपूर्वी गव्हर्नरपदावरून राजन दूर झाले आणि त्यांच्या जागी पतधोरण विभागातील ऊर्जित पटेल आले. त्यांच्या रिक्त जागेसाठी सरकारने जाहिरात दिली. त्यासाठी शंभरावर अर्ज आले. त्यात एक होता व्यासंगी, संशोधनाचा दांडगा अनुभव असलेले, युरोप, अमेरिकेसह भारतातील बॅंकिंग आणि वित्तसंस्थांच्या कारभाराच्या नियमनावर चिंतन करून उपाय सुचवणारे आचार्य यांचा. मुंबईतील ‘आयआयटी’मधून कॉम्प्युटर सायन्समधून बी. टेक. केलेल्या आचार्य यांना संस्थेतील कर्तृत्ववान विद्यार्थी म्हणून राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते. ही निवड त्यांनी पुढच्या वाटचालीत सार्थ करून दाखवली.

मुंबईत वैद्यकीय सेवा करणाऱ्या कुटुंबातील आचार्य यांनी २००१ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून फायनान्समध्ये पीएच. डी. केली. ते बॅंक ऑफ इंग्लंडचे रिसर्च फेलो होते. लंडन बिझनेस स्कूलमध्ये काम केलेले आचार्य यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये संशोधन केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये रघुराम राजन यांच्यासह अनेक मान्यवर अर्थवेत्त्यांसोबत बॅंकिंग आणि वित्तीय संस्थांच्या कार्यांचे नियमन, त्यांच्यावरील कर्जाचा बोजा आणि त्यातून उद्‌भवणारे प्रश्‍न आणि तोडगे, याबाबतचे निबंध प्रसिद्ध केले. युरोपीयन सिस्टमिक रिस्क बोर्ड, फायनान्शियल इंडस्ट्री रेग्युलेशन ॲथॉरिटी अशा युरोपातील संस्थांबरोबरच भारतातील ‘सेबी’, मुंबई शेअर बाजार यांच्यासह फिनान्शियल सेक्‍टर लेजिस्टेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन ऑफ इंडिया अशा संस्थांच्या समित्यांवर त्यांनी काम केले आहे. बॅंकांवरील ‘बॅड लोन’चा बोजा कमी करणे, त्यांचे नियमन आणि त्याकरिता नियामक संस्थांच्या कार्यातील सुधारणा यावर आचार्य यांनी काम केले आहे.

‘आयआयटी’मध्ये असताना क्रिकेटचे मैदान गाजवणारे आचार्य चांगले टेनिसपटू, धावपटू आणि बुद्धिबळपटू आहेत. काव्यलेखन आणि गायनात त्यांना विशेष रुची असून, त्यांचा ‘यादों के सिलसिले...’ हा अल्बम प्रकाशित झाला आहे. किशोरकुमार, एस. डी. बर्मन आणि आर. डी. बर्मन यांचे चाहते असलेल्या आचार्यांनी न्यूयॉर्कमधील बॅंडमधून ‘सूरबहार’ कार्यक्रमही सादर केला आहे. 

Web Title: Viral Acharya New Reserve Bank Deputy Governor