
राधाकृष्ण विखे पाटील
महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, साहित्य, जीवनशैली यामध्ये किती तरी बदल सातत्याने होत असले, तरी प्रवरा परिसराने काही गोष्टी कायम ठेवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे - सहकार आणि त्यामुळेच सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री कै. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त साहित्य व कलागौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या केल्या जाणाऱ्या सन्मानाची परंपराही अबाधित आहे. सहकार चळवळीने ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलला. वाडवडिलांनी बीजारोपण केलेल्या सहकारवृक्षाची फळे तिसरी-चौथी पिढी आता चाखत आहे. पंचक्रोशीतल्या सर्वसामान्य माणसांना, शेतकऱ्यांना बरोबर घेऊन विठ्ठलरावांनी हे बीज लावले. त्यातून लक्षावधी कुटुंबांचे आयुष्य बदलून गेले.