पिलू मोदी ते नरेंद्र मोदी

श्रीमंत माने
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

अनेक गैरव्यवहार उजेडात येत असतानाही स्वच्छ राहिलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना उद्देशून परवा राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, "बाथरूम में रेनकोट पहनके नहाना कोई डॉक्‍टरसाहबसे ही सिखे', अशी टिप्पणी केली अन्‌ जणू राजकीय "भूकंप' झाला. "एक्‍स पीएम की इतनी बेइज्जती', असे विचारत मोदींच्या विरोधकांना डॉ. सिंग यांच्या प्रेमाचे उमाळे दाटून आले. मोदी उद्धट आहेत, त्यांना संसदीय परंपरा माहिती नाहीत, हे वारंवार सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या कॉंग्रेसला आणखी एक संधी मिळाली. पण, मोदींचं प्रत्येक वाक्‍य, टिप्पणी गंभीरपणे घ्यायला हवीच का, किंवा एकूणच भारतीय पुढाऱ्यांमध्ये विनोदबुद्धीचा दुष्काळ पडलाय का, हे "सोशल मीडिया'वरचे प्रश्‍न क्षीण असले, तरी तर्कशुद्ध नक्‍कीच आहेत.

विनोद विनोदाच्याच अंगाने स्वीकारणारे, व्यंग्यचित्रांना दाद देणारे पुढारी दुर्मिळ झालेत. महात्मा गांधी मिश्‍कील होते. पंचा नेसून ते इंग्लंडच्या राजाच्या भेटीसाठी बंकिगहॅम राजवाड्यात गेले. पत्रकारांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले, "राजा इतका मोठा आहे, की त्याच्याकडे आम्हा दोघांसाठी पुरेसे कपडे नक्‍कीच असतील.' गांधींची आणखीही अनेक उदाहरणे आहेत. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी हे मात्र तुलनेने रूक्ष होते. उलट त्यांनाच बोचऱ्या विनोदांचा; राजकीय चिमट्यांचा सामना करावा लागला. गुजरातमधल्या गोध्राचे तेव्हाचे खासदार व स्वतंत्र पक्षाचे एक संस्थापक पिलू मोदी अणुस्फोट घडवून आणल्याबद्दल इंदिरा गांधींचं अभिनंदन करताना म्हणाले, "इतकी मोठी कामगिरी करणारे शास्त्रज्ञ थोरच आहेत; पण जरा आपले टेलिफोन का लागत नाहीत, हे सांगितलं तर मेहेरबानी होईल.'

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उमद्या स्वभावाचे होते. ठाकरी भाषेत एकेकाला ठोकून काढतानाच ते त्यांच्यावरील विनोदाचा आनंद घ्यायचे. बाळासाहेबांचे व्यंग्यचित्र ज्यांच्या चरित्रात समाविष्ट झाले ते ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल विनोदाचा आधार घेऊन विरोधकांची पार चंपी करण्यासाठीच प्रसिद्धीस पावले. हुजूर पक्षाच्या चर्चिल यांनी प्रतिस्पर्धी मजूर पक्षाचे माजी पंतप्रधान क्‍लेमेंट ऍटली यांची "शीप इन शीप्स क्‍लोदिंग' म्हणजे "मेंढ्याच्या वेशात मेंढाच' अशी पुरती अब्रू काढली होती. स्टॅनले बाल्डविन यांच्या आजाराबद्दल, "ते आजारी पडू नयेत अशी सदिच्छा आहे; पण मुळात ते जगलेच नसते तर अधिक बरे झाले असते,' अशी बोचरी टीका केली. रामसे मॅक्‍डोनाल्ड यांच्यावर टीका करताना चर्चिल म्हणाले होते, "मला सर्कशीचं खूप आकर्षण आहे. आई-वडील सर्कस पाहायलाही घेऊन जायचे; पण "बोनलेस वंडर' पाहण्याचं राहूनच गेलं होतं.'

नरेंद्र मोदींसारखेच राजीव गांधीही खूप परदेश दौरे करायचे अन्‌ आता जसं विरोधक मोदींवर तुटून पडतात, तसंच तेव्हाही करायचे. तेलुगू देसम पक्षाचे तेव्हाचे खासदार पी. उपेंद्र यांनी एकदा विदेश दौऱ्यावरून परतलेल्या राजीव गांधींचं, नवी दिल्लीत दुर्मिळ आगमनाबद्दल स्वागत केलं होतं. तत्पूर्वी, 1970 मध्ये तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री कर्णसिंह यांच्याविरुद्ध कनिष्ठ डॉक्‍टरांचा संप "आस्ते कदम' हाताळल्याबद्दल दिल्लीत "कर्ण की कुंभकर्ण', अशा मार्मिक टीकेचे फलक झळकले होते. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांच्या 2007 मध्ये प्रकाशित "द एलिफंट, द टायगर अँड द सेलफोन' पुस्तकात असे अनेक किस्से लिहून ठेवले आहेत. "रेनकोट'च्या निमित्ताने अनेकांकडून त्या किश्‍शांची उजळणी झाली.

अट्टिला द हेन
भारत ज्यांच्या जोखडातून स्वतंत्र झाला व ज्यांच्याकडून लोकशाही स्वीकारली त्या इंग्लंडमध्ये संसदेतली टीका विनोदानं घेण्याची परंपरा मोठी आहे. तिथल्या प्रत्येक पंतप्रधानांचं म्हणून एक टोपणनाव होतंच किंवा आहे. त्यांचा तसा जाहीर उल्लेख केल्यानं अवमान वगैरे अजिबात होत नाही. पोलादी महिला म्हणून नावारूपाला आलेल्या मार्गारेट थॅचर यांना क्‍लेमेंट फ्रूड यांनी "अट्टिला द हेन' (कोंबडी) संबोधलं व तेच त्यांचं टोपणनाव पडलं. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याला हादरे देणारा युरेशियातील भटक्‍या हूण आक्रमकांचा लढवय्या सेनानी अट्टिला हा इतिहासात "अट्टिला द हूण' म्हणून प्रसिद्ध आहे. भारतावरही हुणांनी राज्य केलं. अट्टिलाचं थॅचर यांना उद्देशून झालं तसं विडंबन आज झालं असतं, तर तमाम स्त्रीवादी मंडळींनी आकाशपाताळ एक केलं असतं.

Web Title: we the social: pilu modi to narendra modi