'पृथ्वीराज' की पोती का बेटा!

श्रीमंत माने shrimant.mane@esakal.com
सोमवार, 26 डिसेंबर 2016

वुई द सोशल

वुई द सोशल

आपल्याकडे नवजात बाळाचा नामकरण विधी साधारणपणे बाराव्या दिवशी होतो. त्याला बारसे म्हणतात. बॉलिवूडमधल्या मंडळींना इतकी प्रतीक्षा शक्‍य नसावी. म्हणूनच मागच्या पिढीतले थोर क्रिकेटपटू नबाब मन्सूर अली खान पतौडी व अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा अभिनेता चिरंजीव सैफ अली खान आणि भारतीय सिनेसृष्टीचे "द ग्रेट शोमॅन' राज कपूरची नात, रणधीरची मुलगी करिना कपूर-खान या दांपत्याला गेल्या मंगळवारी सकाळी मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी इस्पितळात पुत्रप्राप्ती झाली व अवघ्या तासाभरात बाळाचे नाव तैमूर ठेवण्यात आले. लगेच संस्कृतीरक्षकांची फौज खडबडून जागी झाली. सोशल मीडियातून दोघांवर तुफान टीका सुरू झाली. "सैफिनांच्या मुलाचे व पाकिस्तानच्या क्षेपणास्त्राचे नावही तैमूर आणि दोहोंचा हेतू हिंदूंचे निर्दालन' किंवा "टागोर ते तैमूर ही किती घसरण?' अशा शब्दांत विखारी टीका केली गेली.

खरेतर तैमूर या अरबी शब्दाचा अर्थ लोखंड किंवा लोह असा आहे. लोखंडासारख्या मजबूत व्यक्‍तीला जणू ते नाव शोभते. करिनाच्या मते, अलीकडच्या काळात सैफ इतिहासाचे वाचन करीत होता. त्यातूनच तैमूर हे नाव सुचले असावे. चोहोबाजूंनी होणाऱ्या टीकेवर सैफ-करिनाने कसलीही प्रतिक्रिया व्यक्‍त केली नाही. तथापि, ऋषी कपूर हे पुतणीच्या मदतीला धावून आले. "मुलाचे नाव ठेवणे हा आईबापाचा अधिकार. तुमच्या मुलाचे तर नाव त्यांनी ठेवले नाही ना?', अशी संतप्त विचारणा करीत "ट्‌विटर'वर त्यांनी अक्षरश: शिव्या हासडल्या. सोबतच "अलेक्‍झांडर किंवा सिकंदर हे काही संत नव्हते', असे ऐकवायलाही कमी केले नाही. सोशल मीडियावरही करिना व सैफची बाजू घेणारे अनेकजण पुढे आले. त्यांच्याकडून पुराणातील दुर्योधन, परशुराम, तसेच स्टॅलिन, लिओपोल्ड वगैरे नावांचा हवाला देण्यात आला.

या निमित्ताने इतिहासाच्या पुस्तकांना अनेकांचा हात लागला. तैमूर हा चौदाव्या शतकाच्या अखेरीस भारतावर, खास करून काश्‍मीर व दिल्लीवर स्वारी करणारा, भयंकर नरसंहार घडविणारा, लूट करणारा तुर्क-मंगोल वंशातला पर्शियन आक्रमक. भारतातील मोगल साम्राज्याचा प्रारंभ त्यातून झाला, असे मानले जाते. अर्थात त्याने केवळ हिंदूंनाच लक्ष्य केले असे अजिबात नाही. भारतावरील स्वारीनंतर त्याने हेरात, अलेप्पो, दमास्कस, बगदाद ही सीरिया, इराकमधील शहरेही अशीच लुटली. युद्धादरम्यान जखमी झाल्याने तो एका पायाने लंगडत चालायचा. म्हणून इतिहासात तो तैमूर लंगडा किंवा तैमूरलंग म्हणून ओळखला जातो. भारतीयांमध्ये त्याची हीच प्रतिमा अधिक ठळक आहे.

यादरम्यान, "नावात काय ठेवलंय', या शेक्‍सपिअरच्या प्रसिद्ध विधानाची आठवण करून देत उमटलेल्या काही प्रतिक्रिया लक्षवेधी आहेत. एकाने म्हटले, ""पिछले 27 साल से मेरा नाम तैमूर अली खान है और मैने किसी देश पर हमला नही किया. अपने पडोसी परभी नही.'' दुसऱ्याने चिमटा काढला - ""शुक्र है करिना और सैफने अपने बच्चे का नाम कन्हैया नही रखा; वरना भक्‍तों की जान पर बन आती!'' "व्हॉटस्‌ऍप'वर आलेली एक पोस्ट विलक्षण होती - ""मेरा देश भी अजीब अनिश्‍चितता का है, यहॉं "पृथ्वीराज' की पोती बेटे का नाम "तैमूर' रखती है''

फूल आणि तलवार...
तैमूरवरून अनेकांनी अनेक नावांचे मूळ अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. "फेसबुक'वाल्या मार्क झकेरबर्गच्या मुलीचे नाव मॅक्‍स. अर्थातच महान. "मायक्रोसॉफ्ट'च्या बिल गेट्‌सना दोन मुली व एक मुलगा. त्यापैकी जेनिफर म्हणजे सफेद जादूगारीण, फीबी म्हणचे चमक; ग्रीक संस्कृतीत चंद्रमाचे नाव. मुलगा रोरी गेट्‌सचे नाव आयरिश-स्कॉटिश. त्याचा अर्थ लाल बादशाह किंवा रेड किंग. "ऍपल'वाल्या स्टिव्ह जॉब्जच्या मुली - लीसा म्हणजे देवाची शपथ. ईव्ह म्हणजे आयुष्य. एरिनचा अर्थ शांती, तर रीडचा अर्थ लाल केसाची व्यक्‍ती. "विप्रो'चे अझीम प्रेमजी यांना दोन मुले, रिशाद व तारिक. योग्य रस्ता दाखविणारा किंवा त्यावर चालणारा आणि पहाटेचा तारा, हे त्यांचे अनुक्रमे अर्थ. "एचसीएल'चे शिव नाडर यांच्या मुलीचे नाव रोशनी. म्हणजे प्रकाश. महत्त्वाचे म्हणजे, तैमूरची आई करिना या नावाचा अर्थ आहे एखादे अश्राप फूल, तर वडील सैफ म्हणजे तलवार!

Web Title: we the social by shrimant mane