इतिहास जुलमी ईस्ट इंडिया कंपनीचा...

William Dalrymple
William Dalrymple

विल्यम डेलरिम्पल यांना ‘द अनार्की’ या नव्या पुस्तकाचे लेखन पूर्ण करण्यास सहा वर्षे लागली. यातील पहिले वर्ष त्यांनी केवळ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी घालवला, दुसऱ्या वर्षी या विषयावर संशोधन केले, तिसऱ्या वर्षी जमा झालेल्या संदर्भांचे भाषांतर केले व त्यानंतरच्या महिन्यांत लिखाण पूर्ण केले. ‘द लास्ट मुघल’ या पुस्तकाचा उत्तरार्ध असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशक ब्लुम्सबेरी आहेत. ‘मी एप्रिल महिन्यात माझा मित्र उदय कुलकर्णी याच्यासमवेत महाराष्ट्रात आलो. मी वडगाव मावळ आणि तळेगाव दाभाडे युद्धस्थळांना भेटी दिल्या. येथे मराठा सैन्याने १७७९ ते १७८० दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला होता. याच दरम्यान टिपू सुलतानने ब्रिटिशांना पोलिलूर येथील लढाईमध्ये धूळ चारली होती. मात्र, मराठे किंवा टिपू सुलतानाला त्यांनी मिळविलेल्या यशाचा अंदाज नव्हता. त्यांना मुंबई आणि मद्रासवर ताबा मिळवून ईस्ट इंडिया कंपनीला भारताबाहेर घालविणे शक्‍य होते. मात्र, त्यांचा आत्मविश्‍वास कमी पडला. त्यांच्या गोंधळलेल्या अवस्थेमुळे ईस्ट इंडिया कंपनीला पुन्हा आपली मुळे घट्ट करणे शक्‍य झाले,’ असे डेलरिम्पल यांनी स्पष्ट केले.

भारतीय लोक ब्रिटिश सत्तेबद्दलचा अभ्यास क्रमिक पुस्तकांमध्ये करतात. मात्र, ईस्ट इंडिया कंपनीच्या क्रूर आणि निर्दयी वागणुकीबद्दल आत्तापर्यंत कोणालाच माहिती नव्हते. स्कॉटिश लेखकांनी प्रथम ईस्ट इंडिया शेअर बाजारात नोंद असलेली कंपनी होती आणि त्यांचे सर्व व्यवहार फायदा कमावण्यासाठी होत, यावर प्रकाश टाकला. कंपनीने फायदा कमावण्यासाठी काही भारतीयांबरोबर भागीदारी केली. यात सुरवातीला मारवाडी शेठ होते व नंतरच्या काळात बनारस, कोलकता, पाटणा येथील हिंदू बॅंकर्सबरोबर त्यांचे संबंध होते. विशेष म्हणजे, ‘लूट’ हा त्यांनी त्यांच्या डिक्‍शनरीमध्ये समाविष्ट केलेला पहिला हिंदुस्थानी शब्द होता! अशी माहिती डेलरिम्पल देतात.

भूतकाळाबद्दल लिहिताना...
‘द अनार्की’ या पुस्तकाबद्दल बोलताना डेलरिम्पल सांगतात, ‘त्या काळात काय घडले, याची माहिती घेऊन इतिहासाबद्दल लिहिणे सोपे असते. आपल्याला हे माहिती आहे की, ईस्ट इंडिया कंपनी विजयी झाली व मुघल सत्ताधीश शाह आलम याचा पराभव झाला. मात्र, यादरम्यान अँग्लो-मराठा युद्ध, टिपू सुलतानाची विजयी घोडदौड, अशा काही विलक्षण घटनाही घडल्या होत्या. हे दोन्ही विजय भाडोत्री फ्रेंच सैन्याच्या मदतीने मिळविले गेले. ईस्ट इंडिया कंपनीच्या आधुनिक सैन्याविरुद्ध भारतीयांना मुकाबला करायचा होता. त्याच्या जोडीला शिंदे व होळकरांमध्ये अंतर्गत युद्धही सुरू होते. नाना फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले. नाना अफाट व्यक्तिमत्त्व होते व त्यांची युद्धनीतीही जबरदस्त होती. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. आपण या इतिहासाबद्दल लिहिले पाहिजे आणि ते करताना ते कोणत्या परिस्थितीत व काळात घडले, हेही समजून घेतले पाहिजे.’ पुस्तके व चित्रपटांच्या माध्यमातून ब्रिटिश राजवट लोकांच्या कायमची स्मरणात आहे. मात्र, ते ईस्ट इंडिया कंपनीचे खरे चित्र नाही. श्‍याम बेनेगल यांच्या ‘जुनून’या एकमेव चित्रपटामध्ये कंपनीबद्दलचे खरे चित्रण आले आहे,’ असे डेलरिम्पल सांगतात. ‘या पुस्तकासाठी लेखकाला गुलाम हुसेन खान यांच्या चार खंडांतील पुस्तकाचीही मदत झाली आहे. त्याचबरोबर फकीर खैरउद्दीन या विस्थापित उमरावाच्या लिखाणाचाही वापर डेलरिम्पल यांनी केला. खैरउद्दीन यांनी पाटणा, अलाहाबादमध्ये त्या काळी घडलेल्या घटनांचा विस्तृत वृत्तांत लिहून ठेवला आहे. ‘मी माझ्या ईस्ट इंडिया कंपनीवरील संशोधनासाठी दिल्लीतील नॅशनल अर्काइव्हज ऑफ इंडिया आणि लंडनमधील ब्रिटिश लायब्ररीचा आधार घेतला. नॅशनल अर्काइव्हजमध्ये प्लासीच्या लढाईची इत्थंभूत माहिती मिळते,’ असे डेलरिम्पल अभिमानाने सांगतात.

 ब्रिटिश राजवट आणि ईस्ट इंडिया कंपनी या दोघांनी भारतीयांना एकसारखेच जर्जर करून सोडले, असा अनेकांचा समज होता. डेलरिम्पल यांच्या मते, या दोन भिन्न गोष्टी आहेत. ‘यापैकी कोणाची राजवट चांगली किंवा वाईट होती, हे मला माहीत नाही. ईस्ट इंडिया कंपनी भारतीय बॅंकर्सच्या मदतीने सत्ता उपभोगत होती. सामाजिक व सांस्कृतिक पातळीवर ते लोकांमध्ये मिसळले होते. ते नवाबांप्रमाणे राहत. या सगळा लूट आणि फायदा कमावण्याचा मामला होता आणि भारतीयांनी त्यासाठी मदतच केली. ब्रिटिश राजवट मात्र यापेक्षा वेगळी होती. ते किमान सामाजिक सुधारणा आणण्यासाठी उच्चस्वरात बोलत असत. त्यांनी देशाला अनोखी स्थापत्यकला दिली, शाळा आणि कॉलेज सुरू केले. मात्र, ब्रिटिश राजवट वर्णद्वेषी होती. ‘कुत्रे आणि भारतीयांना प्रवेश नाही’ असे फलक ते लावत. त्यामुळे दोन्ही राजवटींमध्ये राहणे भारतीयांसाठी क्‍लेशकारक होते,’ असा दावा डेलरिम्पल करतात.

‘द लास्ट मुघल’नंतर रितेपणा जाणवत होता. ‘द अनार्की’च्या लिखाणानंतर मात्र मला तसे वाटले नाही. पुढील महिन्यातच माझे ‘द फरगॉटन मास्टर’ हे पुस्तक प्रकाशित होते आहे. हे पुस्तक मुघल सत्ताधीशांच्या दरबारातील चित्रकारांबद्दल आहे. या चित्रकारांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांची पोर्टेट चितारली होती. मी व मोहंजोदरो ते गुरग्रामपर्यंतच्या २१ शहरांबद्दलचा इतिहास व संस्कृतीबद्दल माहिती देणारे पुस्तकही लिहितो आहे,’ अशी माहिती डेलरिम्पल यांनी भविष्यातील पुस्तकांबद्दल बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com