ताल, लयीत पाउले चालती...

गायन, वादन आणि नृत्य या त्रयींच्या समुच्चयाला संगीत असे म्हणतात, या शास्त्रकारांनी केलेल्या संगीताच्या व्याख्येत ‘वारकरी संगीत परंपरा’ तंतोतंत बसते.
Warkari
WarkariSakal
Summary

गायन, वादन आणि नृत्य या त्रयींच्या समुच्चयाला संगीत असे म्हणतात, या शास्त्रकारांनी केलेल्या संगीताच्या व्याख्येत ‘वारकरी संगीत परंपरा’ तंतोतंत बसते.

गायन, वादन आणि नृत्य या त्रयींच्या समुच्चयाला संगीत असे म्हणतात, या शास्त्रकारांनी केलेल्या संगीताच्या व्याख्येत ‘वारकरी संगीत परंपरा’ तंतोतंत बसते. कुठलाही संप्रदाय वाढायचा असेल तर, त्याला स्वत:चे संगीत आणि साहित्य लागते, या दोन्हीही गोष्टी वारकरी संप्रदायाला लाभलेल्या आहेत.

पालखी सोहळ्याचे आज विराट स्वरूप झाले आहे. त्यातील एक नियम अबाधित आहे, तो म्हणजे सोहळ्याचे कुणालाही निमंत्रण नसते, स्वयंप्रेरणेने लाखो वारकरी ठरलेल्या वेळी एकत्र येतात आणि सोहळ्याच्या कालावधीत निरपेक्ष भजनानंद घेतात. देहू, आळंदी, पैठण, त्र्यंबकेश्वर, सासवड, शेगाव इत्यादी ठिकाणाहून पालख्या पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात. ही वाटचाल करताना वारकरी जे भजन गातात त्याला‘ ‘वाटचालीचे भजन’ असे म्हणतात. यात त्यांना देवाच्या भेटीची आस लागलेली असते, आणि देवाला भेटल्यावर काय मागावे?

भेटी लागी जीवा लागलीसे आस | किंवा गात जागा गात जागा | प्रेम मागा विठ्ठला ||

अशा आशयाचे अभंग वाटचालीत गाता गाता ,पंढरपूर जसे जवळ येते,तसे वारकरी देवाच्या भेटीसाठी अतुर होतात.

तुका म्हणे धावा | आहे पंढरी विसावा ||

अशी त्यांच्या मनाची अवस्था होते. गायनाच्या रंगात वारकरी एवढे रंगून जातात, की त्यांची मैलोन् मैल होणारी वाटचाल सुकर होते. शिण भाग दूर होतो आणि केवळ आत्मिक आनंदात ते तरंगत असतात. किंबहुना संगीतामुळे वारीला पूर्णत्व येते.

टाळ, मृदंग आणि वीणा या वाद्यांच्या साह्याने संगीताचा आनंद लुटतात. त्यांचे ताल ठरलेले असतात. धुमाळी, भजनी ठेका, केरवा आणि कांही पारंपरिक ठेके असतात. वारकरी ताला स्वरात आनंदविभोर होऊन फुगड्या, पाऊल आणि रिंगण खेळतात. गायन,वादन आणि नृत्य या त्रयींच्या समुच्चयाला संगीत असे म्हणतात, या शास्त्रकारांनी केलेल्या संगीताच्या व्याख्येत " वारकरी संगीत परंपरा "तंतोतंत बसते. कुठलाही संप्रदाय वाढायचा असेल तर, त्याला स्वत:चे संगीत आणि साहित्य लागते, या दोन्ही ही गोष्टी वारकरी संप्रदायाला लाभलेल्या आहेत, त्यामुळे संप्रदाय वाढतच रहाणार आहे. हा पालखी सोहळा दशमीला पंढरीत पोचतो आणि आषाढी एकादशीनंतर पोर्णिमेचा काला झाल्यावरच वारी पूर्ण होते. तद्नंतर वारकरी आपापल्या गावी परततात.

भक्त आपल्या भावना आपल्या आराध्य दैवतावर लादून भक्ती करतात. उदाहरणार्थ देवाला झोपेतून उठवण्यासाठी ‘काकडारती’. त्याचबरोबर गाथा भजन, जागर, संगीत भजन, भारूड असे वारकरी संगीताचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. कीर्तन हाही एक संगीताचा प्रकारच आहे. कीर्तनात चाली गायल्या जातात त्यांना ‘फडाच्या चाली’ असे म्हणतात. वारकरी संगीत परंपरेचा आत्मा म्हणजे या फडाच्या चाली. जागरातही या चाली गातात. बंकटस्वामी महाराज ‘जागर’ प्रकार गाण्यात प्रवीण होते. त्यांचा जागर ऐकण्यासाठी हजारो श्रोते जमत असत. त्या चाली आजही वारकरी संप्रदायात ‘स्वामींच्या चाली’ म्हणून प्रसिद्ध आहेत. वारकरी संगीत परंपरा सात्विक असून, देवाचिये चाडे आळवावे देवा। हा निरपेक्ष भाव सादरीकरणात असतो. हे सर्व प्रकार सादर करण्यापूर्वी ‘पंचपदी’ सादर करावी लागते. पंचपदी सर्वत्र घ्यावीच लागते.

वारकरी संगीत परंपरेतील गायक, वादक, कीर्तनकार या सर्वांसाठी आचारसंहिता असते. या परंपरेतील साधकाने अभक्ष भक्षण, अपेयपान करू नये वगैरे. याचा हेतू असा असतो, की साधकाला मोक्षप्राप्ती, हे ध्येय साध्य व्हावे. कारण, ही संगीत परंपरा संतांनी परमेश्वराच्या उपासनेसाठी निर्माण केली असल्याने संगीतातून केवळ मनोरंजन, व्यवसाय अपेक्षित नसून,आपल्याला दुर्लभ असा मनुष्यजन्म प्राप्त झाल्यामुळे, या देहानेच मनुष्याला देवप्राप्ती करून घेता येते आणि त्यासाठी आचार - विचार संपन्न जीवनाला येथे महत्त्व आहे. अशी ही माणसाला देवत्व प्राप्त करून देणारी संगीत परंपरा आहे.

तेव्हा आपल्या देशात प्रत्येक प्रांताला संगीत परंपरा आहे. जसे राजस्थानी संगीत, बंगाली संगीत, पंजाबी संगीत, तसे महाराष्ट्राच्या मराठी मातीचे वारकरी संगीत आहे. म्हणूनच वारकरी संगीत ही महाराष्ट्राने देशाला दिलेली सांस्कृतिक देणगी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com