ग्रामसभेच्या ‘गावा’ जावे!

ग्रामसभा म्हणजे केवळ तक्रारींचा पाऊस नाही तर तळमळीने बोलणाऱ्यांचे सक्रिय व्यासपीठ असाच काहीसा संदेश मिळाला!
Yashendra Kshirsagar about gram panchayat politics youth old people
Yashendra Kshirsagar about gram panchayat politics youth old people sakal
Summary

ग्रामसभा म्हणजे केवळ तक्रारींचा पाऊस नाही तर तळमळीने बोलणाऱ्यांचे सक्रिय व्यासपीठ असाच काहीसा संदेश मिळाला!

ए का बाजूला हक्कांसाठी आक्रमक झालेले जागरूक आजोबा तर दुसऱ्या बाजूला ग्रामविकासासाठी तळमळीने बोलणारे तरुण आणि त्याचवेळी ‘कधी राग कधी अनुराग’ अशी भूमिकेतून वातावरणात समतोल राखणारे नेते असा विविधरंगी अनुभव नुकताच एका ग्रामसभेत घेतला!

ग्रामसभा म्हणजे केवळ तक्रारींचा पाऊस नाही तर तळमळीने बोलणाऱ्यांचे सक्रिय व्यासपीठ असाच काहीसा संदेश मिळाला! गटविकास अधिकाऱ्यांनी एका ग्रामसभेसाठी संपर्क अधिकारी म्हणून माझी निवड प्रजासत्ताकदिनी केली.

सकाळी साडेनऊची ग्रामसभा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे सव्वाअकराला सुरू झाली. दोन तास चालली. विधायक, सकारात्मक चर्चेबरोबरच जबरदस्त खडाजंगीही अनुभवली. मी सुद्धा काही काळ ग्रामसेवक होतो. तथापि इतकी जबरदस्त ग्रामसभा कधी अनुभवली नव्हती.

एक आजोबा आक्रमकपणे बोलत होते. ग्रामपंचायत अधिनियमाचे भले मोठे पुस्तकच त्यांनी आणले होते. पान क्रमांकसह अधिनियम सांगत होते. कौतुक वाटले. परंतु नियम आणि प्रशासकीय अडचणींबाबतीत ऐकूनच घेत नव्हते.

नंतर ते शांत झाले. ग्रामसभा संपल्यानंतर त्यांच्या घराजवळचे गटार त्यांनी मला आग्रहाने नेऊन दाखवले. ग्रामसभा सुरू असताना त्यांच्या या प्रश्नावर, ‘प्रक्रिया चालू आहे. निधी मिळाल्याबरोबर आपले काम करण्यात येईल’, असे सांगण्यात आले.

तीन-चार तरुण मुले शाळा, रस्ते याबद्दल तळमळीने बोलत होती. त्यांचे काही मुद्दे चुकत होते. परंतु ते ऐकून घेत होते, हे महत्त्वाचे! ‘तालमीचे लाईटचे बिल कोण देणार’ अशी विचारणा कुस्तीगीर वस्तादांनी केली. त्यांची इच्छा होती की, ग्रामपंचायतीनेच बिल द्यावे. एक ग्रामपंचायत सदस्य म्हणाले, ‘‘मी लाईटचे बिल भरतो.

पुढची बॉडी येईल, त्या बाबतीत मी काही सांगू शकणार नाही. परंतु सध्या मी भरतो.’’ मला त्यांच्या दातृत्वाचे कौतुक वाटले. बिलाचे प्रश्‍न मांडणारे गृहस्थ नंतर शांत झाले. लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून एखाद्या समस्येवर तोडगा काढावा हे नवलच होते.

घरकुलाबाबतचा विषय निघाल्यावर ग्रामस्थांमधील गैरसमज स्पष्ट झाले. ‘त्याला घरकुल मिळाले, मग मला का नाही?’ अशी तक्रारवजा शंका मांडणारेही कमी नव्हते. जाणीवपूर्वक काहींना घरकुल देत नाही का?

असा त्यांचा प्रश्न होता. तथापि, प्राधान्यक्रम असतात. एकदा निवड झाल्यावर जसे उद्दिष्ट येईल तसे घरकुल दिले जाते. ग्रामपंचायत अथवा ग्रामसेवक त्यात आडकाठी आणत नाहीत, असे सांगितले. तालुक्याचे उद्दिष्ट आणि मंजूर घरकुले यांची संख्या सांगितली. घरकुलासाठी त्वेषाने बोलणारा मुलगा शांत झाला.

तो म्हणाला, ‘आता मी घर बांधणे सुरू केले आहे. मला घर नको.’ त्यानंतर त्याचे खास अभिनंदन करण्यासाठी मी ग्रामसभेत टाळ्या वाजवायला सांगितल्या. वातावरणही निवळले. गावातील एक महिला परदेशात उच्चपदस्थ आहेत. त्यांनीही गावासाठी केवळ वैचारिक नव्हे तर सक्रिय कष्ट घेतले आहेत, हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले.

या ‘आधुनिक सावित्री’बाबत अभिमान वाटला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ओळी मनात घोळवत असतानाच ग्रामीण भागातील विविध रंग मी ‘याची देही याची डोळा’ अनुभवले. त्यातील काही रंग तत्कालीक, काही शाश्वत होते. तथापि प्रशासकीय नियम, अडचणी याबाबत थोडीफार अनभिज्ञता जाणवली.

ग्रामविकासात राजकारण बाजूला ठेवण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. प्राथमिक शाळा, रस्ते, गटार, अंगणवाडी इमारत अशा गोष्टींबाबत नागरिकांमध्ये आत्मीयता जाणवली. अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, शिक्षकांची लक्षणीय उपस्थिती ग्रामसभेत होती. ग्रामसभेचा विविधरंगी मोरपिसारा मनात फुलला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com