यती : एक चिंतन! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

यती ऊर्फ हिममानवाच्या शोधार्थ आम्ही आमचे आयुष्य घालवले. यती शोधून शोधून आमची मती गुंग झाली, पण यती मात्र दिसला नाही. नियतीची गतीच न्यारी! आम्ही सोडून तो सर्वांना अधूनमधून दिसतो. अर्थात, यती अस्तित्वातच नाही, असे ठामपणे सांगणारे लोकही आहेत. आम्ही त्यांच्यावर विश्‍वास ठेवत नाही. कारण, असे लोक प्राय: प्रवास फारसा करीत नाहीत. फार तर ‘४३ लिमिटेड’ने प्रभादेवीपर्यंत जाऊन येतात (मुंबई) किंवा कापडी पिशवी घेऊन मंडईत जातात, (पुणे) असे आमचे सूक्ष्म निरीक्षण आहे. आता यतीबद्दल थोडेसे...

यती हा एक महाकाय, अक्राळविक्राळ मानव असून त्याच्या अंगावर बोट बोट लांबीचे केस असतात. तो हिमालयात राहत असल्याने आंघोळ करीत नसावा, असे मानण्यास जागा आहे. किमान रोज तरी करीत नसावा. डोक्‍यावरून तर मुळीच करीत नसावा!! आम्हीही एकदा हिमाचल प्रदेशच्या सहलीवर गेलो असता आठ दिवस आंघोळ केली नव्हती. सहलीस येण्यापूर्वीही आठेक दिवस आमच्या अंगाला पाणी लागलेले नाही, हे ओळखून अखेर सहलीच्या आयोजकांनी स्वखर्चाने आमची (एकट्याची) रवानगी परतगृही केली. पण ते जाऊ दे. आंघोळ न करणाऱ्या अंगावर बोट बोट लांबीचे केस असणारा यती एकांडा जीव असणार, हे उघड आहे. हिमालयात सापडलेली त्याची पदचिन्हे ही एकट्याचीच आहेत, त्यासोबत अन्य पदचिन्हे नाहीत, हे कशाचे द्योतक आहे? यती हिमालयात वावरतो, कारण बर्फात पाऊलखुणा चांगल्या आणि हमखास उमटतात. ‘दिसला बर्फ, रुतव पाय, उठव शिक्‍का’ हे पोरकट वागणे त्याला शोभते काय?

आपल्यापेक्षा निम्म्या उंचीची माणसे बघून यती घाबरतो, असे दिसते. ह्यात नवे असे काही नाही. काही महाकाय प्राण्यांमध्ये असा लाजाळूपणा असतो. आमच्या ओळखीच्या एका राजकीय नेत्याच्या दारात सदैव झोपून असलेल्या ‘ग्रेट डेन’ नावाच्या श्‍वानाचेही असेच होते. परका माणूस बघून सदर महाकाय श्‍वान पलंगाखाली दडून बसत असे. पाहुणा उठून गेल्याशिवाय मुळीच बाहेर येत नसे. त्याच्या महाकायतेबद्दल अपार करुणा आमच्या मनात दाटून येई. पण तेही जाऊ दे.
यती लाजाळू असला तरी त्याच्या काही चित्रफिती आढळून आल्या आहेत. हे एक आश्‍चर्यच म्हणावे लागेल. कुणालाही न दिसलेला यती क्‍यामेरे बघून मात्र शहाजोगपणे येतो, हे आम्हाला खटकते. एक-दोन इंग्रजी चित्रपटात त्याने कामेही केल्याचे आम्ही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले आहे. यती ह्या इसमास अभिनय कशाशी खातात, हे अजिबात माहीत नाही, असे आमचे चित्रपट पाहिल्यानंतर मत झाले. अंगावर बोट बोट लांबीचे केस असलेल्या माणसाचा मुद्रभिनय कळणे अवघड होऊन बसते. त्यामुळे फार्तर आम्ही त्यास संशयाचा फायदा देऊन उत्कृष्ट अभिनयाचा एखादा पुरस्कार देऊ. त्यास आपली भाषा येत नसल्यामुळे तो मानवांस दर्शन देणे टाळत असावा, असाही आमचा कयास आहे. परंतु, हा काही फार मोठा प्रॉब्लेम नाही. त्याची भाषा बोलणारे काही भाईबंद आपल्यात आहेत. आपल्या ते लक्षात येत नाही!  
अशा ह्या यतीच्या ३२ बाय १५ इंचाच्या पाऊलखुणा भारतीय लष्कराच्या गिर्यारोहकांना हिमालयातील मकालू क्षेत्रात सांपडल्या. चपलेचा हा साइज काहीच्या काहीच असला तरी ह्या आकाराची कोल्हापुरी चप्पल आम्ही एका दुकानी दर्शनी भागात लावून ठेवलेली पाहिली आहे. ह्यावरून यती कोल्हापुरी चप्पल वापरत असावा, असा अंदाज करणे सोपे आहे!! असो.
एका अदृश्‍य यतीबद्दल इतके बोलणे अतीच झाले! यतीपेक्षा आपली युती बरी!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com