‘५जी’ची वर्षपूर्ती

सुमारे वर्षभरापूर्वी, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये, देशाच्या तंत्रज्ञानक्षेत्रात ‘५जी’बद्दल कमालीची उत्सुकता होती.
5g network first anniversary internet service
5g network first anniversary internet serviceSakal

सुमारे वर्षभरापूर्वी, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये, देशाच्या तंत्रज्ञानक्षेत्रात ‘५जी’बद्दल कमालीची उत्सुकता होती. हे तंत्रज्ञान भारताचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात करेल, याबद्दल तंत्रज्ञानक्षेत्रात कमालीचा विश्वास व्यक्त होत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑक्टोबर २०२२ रोजी देशातल्या ‘५जी’ सेवेचं उद्‌घाटन केलं होतं.

ही सेवा लवकरच देशभर विस्तार पावेल आणि देशाच्या प्रगतीचा वेग वाढेल असं मांडलं गेलं होतं. प्रामुख्यानं इंटरनेटसेवेचा वेग वाढेल, सेवा खंडित होण्याचं प्रमाण कमी होईल आणि एक विश्वासार्ह संवादसेवा देशभरात सगळ्यांना उपलब्ध होईल असं चित्र निर्माण झालं होतं.

लाभार्थी वाढण्याची अपेक्षा

‘जिओ’, ‘भारती एअरटेल’ या मोबाईलसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी सुरुवातीला दिल्ली, मुंबई आणि कोलकता या शहरांमध्ये ‘५जी’ सेवा सुरू केली. वर्षभराच्या टप्प्यात ही सेवा दहा हजार शहरांपर्यंत-गावांपर्यंत विस्तारली.

वर्ष संपेपर्यंत सुमारे तीन कोटी दहा लाख स्मार्टफोनधारक ‘५जी’ सेवेचा लाभ घेत असतील असा अंदाज या क्षेत्रातले संशोधक मांडतात. भारताआधी अमेरिका, ब्रिटन, दक्षिण कोरिया, चीन यांसारख्या देशांमध्ये ‘५जी’ सेवा सुरू झाली होती.

या देशांच्या तुलनेत भारतीय वापरकर्ते आठवड्याला दोन तास अधिक वेळ ‘५जी’ सेवा वापरतात, असं ‘इरिक्सन कंझ्युमर ग्लोबल लॅब ग्लोबल सर्व्हे’मध्ये म्हटलं आहे. या सेवेमुळे भारतात मोबाईलवरील अथवा स्मार्ट टीव्हीवरील व्हिडिओचा दर्जा सुधारला.

व्हिडिओ कॉलिंग आणि गेमिंग वाढलं. ऑग्युमेंटेड रिॲलिटी (एआर) हा तंत्रज्ञानाचा नवा प्रकार स्थिरावू लागला, असं निरीक्षणही अहवालात नोंदवलं गेलं. भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत ‘५जी’ सेवा एक ट्रिलियन डॉलर इतकी भर २०३५ पर्यंत घालेल आणि पुढची सहा वर्षं या सेवेचे लाभार्थी सतत वाढत राहतील, असं गेल्या वर्षभरात सांगितलं गेलं.

अर्थकारणाशी संबंध

वरवर पाहता अशा स्वरूपाच्या सेवेचा, अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या रोजच्या जगण्याचा संबंध बऱ्याचदा लागत नाही. मोबाईलच्या अथवा संगणकावरच्या इंटरनेटचा वेग वाढल्यानं खिशातल्या पैशावर काय परिणाम होणार आहे आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेत काय भर पडणार आहे, याबद्दल सर्वसामान्यपणे विचार न करण्याची प्रवृत्ती राहते.

एखादी सेवा आपल्याला मिळतेय इतकाच विचार राहतो. फार नव्हे, किंचित् जरी तपासून पाहिलं तरी, येत्या काळात ‘५जी’मुळे आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होत जाणार आहेत आणि त्यातून अर्थव्यवस्थेत कसकसे बदल होत राहणार आहेत हे समजून घेता येतं. उदाहरणार्थ : जागतिक आर्थिक मंचाची (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) जानेवारी २०२० ची श्वेतपत्रिका सांगते की, ‘५जी’ पाच प्रमुख पद्धतींनी आपल्याला लाभ देईल.

मोबाईल ब्रॉडबँड सेवेत कमालीची सुधारणा होईल, कमालीचं विश्वासू संदेशवहन/दळणवळण विनाविलंब होईल, सुरक्षितता वाढेल, यांत्रिक संवाद-दळणवळण वाढेल, आणि ऊर्जेची बचत होईल. या पाचही पद्धतींचा थेट अर्थकारणाशी संबंध आहे.

बदलत चाललेलं जग

मोबाईल ब्रॉडबँड सेवेतल्या सुधारणांचा संवाद, व्हिडिओ, गेमिंग यांच्यावर थेट परिणाम होतो. या साऱ्या प्रकारांमध्ये गुंतवणूक आणि ग्राहक दोन्ही वाढतात. ड्रोन, स्वयंचलित मोटारी, वीजपुरवठा, सुरक्षाव्यवस्था यांतल्या तंत्रज्ञानासाठी विनाविलंब, तसंच अखंडित संदेशवहन आवश्यक असतं.

उद्योगक्षेत्रातली स्वयंचलित उपकरणं, अंगावर वागवता येणारी उपकरणं (उदाहरणार्थ : स्मार्ट वॉच, ह्यूमनसारखं अत्यंत नवं उपकरण) अशा स्वरूपाचा यांत्रिक संवाद ‘५जी’मुळे वाढत राहतो. ऊर्जावापराचं जलद आकलन होऊन बचतीचे उपाय योजणं वाढतं.

एखाद्या वस्तू-सेवेचा दर्जा, उपयुक्तता लोकांना जसजशी पटत जाते तसतशी मागणी वाढते. मागणी वाढली की नावीन्यपूर्ण संकल्पना येतात, गुंतवणूक येते आणि उद्योग-सेवेचा विस्तार होऊ लागतो. रोजगाराच्या संधी वाढतात. या साऱ्या क्रिया-प्रक्रिया अर्थव्यवस्थेची गती वाढवतात.

भारत, तसंच आपण सारे गेलं वर्षभर या क्रिया-प्रक्रियेतून जात आहोत. ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर आपण पाहत असलेली एखादी वेबसिरीज असो किंवा बाजारातून विकत घेतलेलं स्मार्ट वॉच असो, यातून अर्थव्यवस्थेत उलाढाल सुरू राहत असते. प्रचंड मोठ्या आकाराचे कारखाने आणि त्यांत काम करणारे हजारो कामगार म्हणजे उद्योगप्रधान अर्थव्यवस्था, हे सूत्र मागं पडायला लागून दोन दशकं झाली आहेत.

ऑटोमोबाईल अथवा बांधकाम यांसारख्या प्रचंड आकाराच्या उद्योगांमध्येही गेल्या दोन दशकांत तंत्रज्ञानावर आधारित निर्मितीनं वेग घेतला आहे. सर्वसाधारण रोजगार हा प्रकार कमी व्हायला सुरुवात होऊन अत्यंत नेमक्या स्वरूपाच्या कौशल्यांची पूर्तता करणारे रोजगार वाढू लागले आहेत.

ही प्रक्रिया सुरू असल्यानं तीमधल्या बदलांचा, वेगाचा अंदाज येत नाही; तथापि, आणखी दहा वर्षांनी आपण जेव्हा मागं वळून पाहू तेव्हा उद्योगांचं-रोजगाराचं स्वरूप किती बदललं आहे हे जाणवणार आहे.

पुढच्या पायरीवर जाण्यासाठी...

‘डेटा हे नवं खनिज तेल आहे,’ असं रिलायन्स उद्योगसमूहाच्या अध्यक्षांनी २०१९ मध्ये म्हटलं होतं. त्याआधी तेरा वर्षं, म्हणजे २००६ मध्ये, ब्रिटिश गणितज्ज्ञ क्लाईव्ह हम्बी यांनी हे विधान सर्वप्रथम केल्याचं अनेक संदर्भ सांगतात.

खनिज तेलाची उपमा डेटाला दिली गेली; कारण, या दोहोंमधली साम्यस्थळं. खनिज तेल आहे त्या स्वरूपात उपयोगाचं नसतं. त्यावर प्रक्रिया होतात. त्यापासून उत्पादननिर्मिती होते. उपपदार्थांची निर्मिती होते. डेटा म्हणजे निव्वळ सर्वंकष माहिती. प्रक्रिया केल्याशिवाय ही माहिती उपयोगात आणता येत नसते. जितकी प्रक्रिया करू तितकी नवीन दिशा प्राप्त होते.

खनिज तेलाचा एक घटक पेट्रोलियम जेली म्हणून थंडीत अंगावर रगडता येतो. त्याची उत्पादनं विकत घेण्यासाठी ग्राहक पैसे मोजतो, तसंच डेटाचंही असतं. एखाद्या वस्तूचे अथवा सेवेचे ग्राहक कोण याची यादी उपयोगाची नसते.

ग्राहकाचं वय, शिक्षण, लिंग, उत्पन्न, खरेदीचा विशिष्ट कालावधी, केलेला खर्च असे अनेक घटक डेटावर प्रक्रिया करून मिळवता येतात, तेव्हाच उत्पादन अथवा सेवा पुढच्या पायरीवर नेण्यासाठी हा डेटा उपयोगाचा ठरतो.

पहिली धाव

‘५जी’ सेवेलाच नवं खनिज तेल मानलं जात आहे. यादृष्टीनं पाहिलं तर निव्वळ ही सेवा पुरवून कंपन्या थांबणार नाहीत. या सेवेतून अनेक उप-उत्पादनं निर्माण होत राहणार आहेत. पहिल्या वर्षी तीन कोटी भारतीय ‘५जी’चा लाभ घेत आहेत.

आणखी पाच वर्षांनी ही संख्या तीस कोटींवर जाईल यात शंका नाही. अशा परिस्थितीत ‘५जी’ म्हणजे मोबाईलवरचं वेगवान इंटरनेट इतकाच मर्यादित अर्थ नसणार आहे. मोबाईलवरून ‘५जी’ मोटारीत झेप घेईल. मोटारीतून विमानात जाईल.

मेट्रो चालवेल. कारखान्यांची सुरक्षा ताब्यात घेईल. हा बदल होण्यासाठीचं मैदान २०२३ नं तयार केलं आहे. या मैदानावर अर्थव्यवस्था दररोज नव्या सामन्याला सामोरी जाणार आहे. ‘५जी’चं पहिलं वर्ष ही येऊ घातलेल्या वेगवान युगाची फक्त पहिली धाव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com