6G
6Gsakal

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

आपल्या जीवनातल्या खूप मोठ्या भागाचं डिजिटायझेशन झालं असून आता इंटरनेटशिवाय जगणं तर सोडाच एक पाऊलही पुढं टाकणं अशक्य झालं आहे.

- डॉ. दिनेश कात्रे, saptrang@esakal.com

आपल्या जीवनातल्या खूप मोठ्या भागाचं डिजिटायझेशन झालं असून आता इंटरनेटशिवाय जगणं तर सोडाच एक पाऊलही पुढं टाकणं अशक्य झालं आहे. किती उदाहरणं सांगता येतील. मुलांच्या शालेय गृहपाठापासून ते ई-पेपर पर्यंत, छोट्या-मोठ्या खरेदी-विक्रीसाठी डिजिटल पेमेंट करण्यापासून ते शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्यापर्यंत, ‘ओटीटी’वर वेब सीरिज पाहण्यापासून ते ऑनलाइन गेमिंग पर्यंत.

या सगळ्या बाबींबरोबरच व्हाॅट्सॲप व फेसबुकवर फोटो शेअर करण्यापासून ते ऑनलाइन काम किंवा व्यवसाय करण्यापर्यंत सर्व गोष्टी स्मार्ट फोन आणि इंटरनेटवर अवलंबून आहेत. कोरोना महासाथीच्या काळात दोन वर्षे संपूर्ण जगाला घरात कोंडून राहावं लागलं होतं व त्याच काळात संपूर्ण डिजिटायझेशन करण्याच्या कामाला मोठा वेग प्राप्त झाला.

त्या वेळीच कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोनॉमस वेहिकल्स, रोबोटिक्स, डिजिटल आरोग्य यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये देखील मोठ्या वेगानं संशोधन सुरू झालं. परंतु अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अतिवेगवान नेटवर्कची जोड मिळणं आवश्यक असल्यानं २०१९ पासून फाइव्ह-जी नेटवर्कच्या निर्मितीची नांदी झाली.

‘सिक्स-जी’मध्ये जपानची आघाडी

जगातील अनेक देश ‘फाइव्ह-जी’ नेटवर्क प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असतानाच, जपाननं सर्वांत गतिमान अशा ‘सिक्स-जी’ नेटवर्कचे प्रारूप यशस्वीपणानं निर्माण करून संपूर्ण जगाला अचंबित करून टाकलंय!

जपाननं प्रायोगिक पातळीवर निर्माण केलेले ‘सिक्स-जी’ नेटवर्क हे तीनशे फूट अंतरापर्यंत, प्रति सेकंदाला शंभर जीबीपीएस (GBPS) वेगानं डेटाची देवाणघेवाण करू शकतं, असं सिद्ध झालं असून, ही गती फाइव्ह जी नेटवर्कच्या वीस पटीनं जास्त आहे. त्यामुळं भविष्यामध्ये अतिशय नावीन्यपूर्ण आणि मानवी जीवनामध्ये क्रांतिकारक बदल होईल, अशा डिजिटल सुविधांची निर्मिती करता येऊ शकेल.

विशेष म्हणजे या सिक्स-जी नेटवर्कच्या निर्मितीमध्ये जपानमधील टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी संयुक्तपणे संशोधन केलं आहे. डोकोमो, एन. टी. टी. कॉर्पोरेशन, एन. ई. सी. कॉर्पोरेशन आणि फुजीत्सु या कंपन्यांचा या संशोधनात सहभाग आहे. परंतु असं हे ‘सिक्स-जी’ नेटवर्क सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी पायाभूत यंत्रणा प्रस्थापित करावी लागेल व त्यासाठी २०३० या वर्षापर्यंत वाट बघावी लागेल.

वायरलेस नेटवर्कच्या उत्क्रांतीचे टप्पे

‘सिक्स-जी’ नेटवर्कचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत करून घेणं आवश्यक आहे. वायरलेस नेटवर्क आणि त्याच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील महत्त्वाचे टप्पे हे पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी या प्रमाणे नोंदवले जातात. १९७९ मध्ये ‘ फर्स्ट-जी ’ नेटवर्क (१st Generation) जपान या देशानं सर्वांत प्रथम उपलब्ध करून दिलं होते.

‘फर्स्ट- जी’ नेटवर्क आपण फक्त बोलण्यासाठी (Voice Call) वापरू शकत होतो. त्यानंतर ‘टु-जी’ नेटवर्क आलं ज्यामध्ये बोलण्याबरोबर आपण एसएमएस आणि एमएमएस पाठवू शकत होतो. त्यानंतर उत्तरोत्तर थ्री-जी आणि फोर-जी नेटवर्कचा विकास झाल्यावर आपण व्हिडिओ कॉलिंग आणि इतर इंटरनेट सुविधांचा लाभ घेतला.

आतापर्यंत भारतामध्ये आपण जास्त प्रमाणात फोर-जी नेटवर्कचा वापर करत आलो आहोत, याचं कारण म्हणजे या फोर-जी नेटवर्कची सेवा देण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत यंत्रणा संपूर्ण देशभर उभारण्यात आली आहे. त्यामुळं आपल्याला युट्यूब विडिओ, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप या सारख्या सुविधा स्मार्ट मोबाइल फोनवर सहज वापरता येऊ शकतात. गेली काही वर्षे आपण सर्व जण त्याचा मनसोक्त लाभ देखील घेत आहोत.

हे सगळं घडत असताना २०१९ च्या सुमारास ‘फाइव्ह-जी’ नेटवर्क उदयास आलं. आधुनिक नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी संशोधन आणि सुविधांची निर्मिती करून, त्या सामान्य लोकांना उपलब्ध करून देण्यामध्ये अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया हे तीन देश नेहमीच आघाडीवर असतात. या देशांनी फाइव्ह-जी मोबाइल नेटवर्क लोकांना केव्हाच उपलब्ध करून दिलेले आहे.

चीन या देशाने आतापर्यंत ४५ टक्के लोकांना फाइव्ह-जी नेटवर्क सुविधा पुरविण्यात यश मिळविलं आहे. आपल्या देशात २०२२ मध्ये फाइव्ह-जी नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आलं असून, त्याचा जवळपास २० कोटी ग्राहक लाभ घेत आहेत.

‘एअरटेल’ आणि ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ या कंपन्यांनी फाइव्ह-जी नेटवर्कसाठी लागणाऱ्या पायाभूत यंत्रणेचं जाळं उभं केलं असून, ७३८ जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पोहोचविण्यासाठी चार लाखांहून अधिक फाइव्ह-जी बेस स्टेशन्स उभी करण्यात आली आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’च्या परिषदेमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्स-जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत पुढाकार घेईल अशी घोषणा केली.

‘सिक्स-जी’ मुळं काय होईल... ?

कोणालाही असं वाटू शकतं, की केवळ एका नेटवर्कमुळं असे काय विशेष साध्य होऊ शकेल? परंतु ‘सिक्स-जी’ सारखं वेगवान नेटवर्क असेल तरच त्यामधून डेटाची मोठ्या प्रमाणावर देवाण-घेवाण करता येऊ शकते व त्या आधारावर अनेक अत्याधुनिक व क्रांतिकारी डिजिटल सुविधा निर्माण करता येऊ शकतात व त्या सुविधा ग्राहकांपर्यंत नेता येऊ शकतात. म्हणून आता आपण सिक्स-जी नेटवर्क अस्तित्वात आल्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञान व ॲप्लिकेशन्सचा थोडक्यात आढावा घेऊ या.

औद्योगिक कारखान्यांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज (Industrial IoT) मोठ्यामोठ्या औद्योगिक कारखान्यांमध्ये सिक्स-जी चं खासगी नेटवर्क प्रथापित करता येऊ शकतं. या कारखान्यातील विविध यंत्रांमध्ये सेन्सर (Industrial IoT) बसवून सिक्स-जी नेटवर्कच्या साहाय्यानं यंत्रावर लक्ष ठेवता येऊ शकतं व त्यामध्ये बिघाड होऊ नये याची काळजी घेता येते.

तसेच भविष्यातील अत्याधुनिक कारखान्यांमध्ये रोबोट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल. तेव्हा रोबोट्सना ते कारखान्याच्या परिसरात दूर अंतरावर असले तरी या नव्या वेगवान नेटवर्कमुळं लांबूनच आदेश देता येऊ शकेल व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं शक्य होईल.

डिजिटल आरोग्यसेवा - आज ई-हेल्थ क्षेत्रामध्ये मोठी प्रगती झाली आहे. स्वाथ्य तपासणी संदर्भातील विविध IoT सेन्सर्स रुग्णांच्या शरीरावर परिधान करून ते सिक्स-जी नेटवर्कच्या साहाय्यानं जोडता येऊ शकतात व रुग्णांच्या शरीरात होणाऱ्या सूक्ष्म बदलांची नोंद सातत्यानं ठेवता येऊ शकते. अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये असंख्य वैद्यकीय उपकरणं व यंत्रं, हजारो फूट अंतरावर, विविध विभागांमध्ये पसरलेली असतात.

ही उपकरणे गरजेप्रमाणं एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवली जातात. त्यामुळं या वैद्यकीय उपकरणांना सिक्स-जी नेटवर्कच्या साहाय्यानं संगणकाला जोडून, त्यांचा ठावठिकाणा, एकाच जागी बसून घेता येऊ शकतो. तसेच सर्व उपकरणांनी गोळा केली माहिती संग्रहित करून त्याचं डिजिटल विश्लेषण करता येऊ शकते व कृत्रिम बुद्धिमत्तेची (Artificial Intelligence) मदत घेऊन रोगाचे अचूक निदान करता येऊ शकते.

तसेच टेलिमेडिसिनचा (Telemedicine) वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी असलेले डॉक्टर एकत्रितपणे सल्ला-मसलत व तसेच शस्त्रक्रिया करू शकतात. दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये या नव्या वेगवान नेटवर्कच्या साहाय्यानं वैद्यकीय सेवा पोहोचवता येऊ शकते.

ऑटोनॉमस वेहिकल्स (Autonomous Vehicles) - आंतरराष्ट्रीय पातळीवर Autonomous Vehicles म्हणजेच ‘स्वायत्त वाहनं’ किंवा ‘चालकरहित वाहनं’ यांची निर्मिती प्रगतिपथावर आहे. अशा गाड्यांमध्ये चालकाची गरजच नसते. त्यामध्ये प्रवाशांनी फक्त आपले जाण्याचं ठिकाण त्या गाडीतील यंत्रणेला सांगितलं, की ती गाडी आपोआप रास्ता शोधून त्या ठिकाणी नेऊन पोहोचवते. अशा स्वयंचलित वाहनांना या नव्या वेगवान नेटवर्कच्या द्वारे पुढं येणाऱ्या हवामान आणि वाहतुकीची माहिती देणं, तसेच दूर अंतरावरून गाडीतील प्रणालीचं नूतनीकरण करणे व गाड्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

ऑगमेंटेड आणि व्हर्चुअल रिऍलिटी (Augmented and Virtual Reality) या आधी आपण मेटा कंपनीनं निर्माण केलेल्या मेटाव्हर्स विषयी वाचलं असेलच किंवा अनुभव देखील घेतला असेल. यामध्ये आपण आपली कल्पनाशक्ती वापरून थ्रीडी विश्व निर्माण करू शकतो व त्या विश्वामध्ये एक थ्रीडी अवतार घेऊन, आपण व आपले सवंगडी खेळू शकतो, फिरू शकतो तसेच एकत्रित काम देखील करू शकतो.

ऑगमेंटेड रिऍलिटीच्या साहाय्यानं आपण एखाद्या यंत्राची जुळणी करण्यामध्ये तंत्रज्ञांना मदत करू शकतो. तसेच व्हर्चुअल रिऍलिटीच्या माध्यमातून सहयोग करून प्रॉडक्ट डिजाइन करणं किंवा शस्त्रक्रिया करण्याचं प्रशिक्षण घेणे यांसारख्या कल्पनेपलीकडच्या गोष्टी साकारण्यासाठी सिक्स-जी नेटवर्कची गरज भासते.

स्मार्ट सिटी (Smart City)

स्मार्ट सिटीच्या निर्मितीमध्ये संपूर्ण शहरात असंख्य ठिकाणी लक्षावधी सेन्सर्स आणि व्हिडिओ कॅमेरे लावण्यात येतात व त्याद्वारे सातत्याने माहिती गोळा करून, शहराचं, वाहतुकीचं, गर्दीचं, सुरक्षितता व आपत्तीचं व्यवस्थापन, निवारण व नियंत्रण करता येतं. या लक्षावधी सेन्सर्स आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांमधून मिळणारी माहिती तत्क्षणी गोळा करण्यासाठी या नव्या वेगवान अशा नेटवर्कचा मोठा उपयोग होतो.

ड्रोन तंत्रज्ञान (Drone)

ड्रोन आणि सिक्स-जी नेटवर्कचा देशाच्या सीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. येणाऱ्या काळामध्ये आधुनिक युद्धनीती (Modern Warfare) मध्ये ड्रोन तंत्रज्ञान तसेच अतिवेगवान नेटवर्क हे अविभाज्य घटक असणार आहेत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये विजय मिळविण्यासाठी रशिया चीनच्या मदतीनं फाइव्ह-जी नेटवर्क तर इराणकडून ड्रोन मिळविण्यासाठी मोठा प्रयत्न करीत आहे हे आपणास ज्ञात आहे.

या व्यतिरिक्त दुर्गम भागामध्ये जिथं शिक्षकांचा तुटवडा आहे, अशा ठिकाणी शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, तसेच करमणूक क्षेत्रामध्ये, Holographic Video Conferencing व ३६० डिग्री व्हिडिओ पाठविण्यासाठी या नव्या वेगवान नेटवर्कचे खूप फायदे आहेत. जपान, अमेरिका, साउथ कोरिया आणि चीन यांसारख्या प्रगत देशांप्रमाणे आपल्या देशानं देखील सिक्स -जी चं आव्हान स्वीकारून यशस्वीपणानं ते आत्मसात करायला हवं, कारण आता काळाची ती गरज आहे.

(लेखक हे ‘सी-डॅक’चे माजी वरिष्ठ संचालक असून त्यांनी मानव-संगणक इंटरफेस, डिजिटल प्रिजर्वेशन, एआरव्हीआर (ARVR) तसेच स्मार्ट हेरिटेज क्षेत्रात योगदान केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com