ऑस्कर, विवाद आणि बरंच काही!

जगभरातील चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजला जाणारा आणि कमालीची प्रतिष्ठा लाभलेला ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला; पण नेहमीप्रमाणे अनेक प्रश्न मागे ठेवून गेला. यंदाच्या सोहळ्यातही अनेक छोटे-मोठे वाद-विवाद, मतभेद, निराशा, रुसवे-फुगवे अन् काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टीदेखील पाहायला मिळाल्या.
96th Oscars controversy and more Oppenheimer received 13 nominations 11 nominations for Poor Things and 8 nominations for Barbie
96th Oscars controversy and more Oppenheimer received 13 nominations 11 nominations for Poor Things and 8 nominations for BarbieSakal

- गिरीश वानखेडे

जगभरातील चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजला जाणारा आणि कमालीची प्रतिष्ठा लाभलेला ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला; पण नेहमीप्रमाणे अनेक प्रश्न मागे ठेवून गेला. यंदाच्या सोहळ्यातही अनेक छोटे-मोठे वाद-विवाद, मतभेद, निराशा, रुसवे-फुगवे अन् काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टीदेखील पाहायला मिळाल्या.

संपूर्ण जगात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची ९६ वी आवृत्ती अमेरिकेतल्या लॉस एंजिलिस शहरातील हॉलीवूडमध्ये नुकतीच पार पडली. चित्रपटांशी संबंधित २३ विभागांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांना त्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

डिसेंबर २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा त्यासाठी विचार करण्यात आला. सोहळ्याचे यजमानपद विनोदी अभिनेता जिमी किमल यांच्याकडे होते. निर्मिती केली होती राज कपूर, केटी मुलन आणि मॉली मेकनर्नी यांनी.

यंदाच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या आणि समीक्षकांना भावलेल्या ‘ओपनहायमर’ चित्रपटाला सर्वाधिक १३ नामांकने मिळाली होती. ‘पुअर थिंग्ज’ला ११ आणि ‘बार्बी’ला ८ नामांकने.

आॅस्कर पुरस्कारांसाठी २३ श्रेणींचा विचार केला जातो. सर्वोत्तम चित्रपटासाठीच्या एकमेव श्रेणीत नऊ ते दहा नामांकने दिली जातात. इतर सर्व श्रेणींमध्ये केवळ पाच नामांकने दिली जातात. यंदा सर्वोत्तम चित्रपटाच्या श्रेणीमध्ये दहा चित्रपटांना नामांकन मिळाले होते. या श्रेणीत चित्रपटाच्या निर्मात्याला पुरस्कार दिला जातो.

यंदा मात्र पुरस्कारांची नामांकने जाहीर होताच विवादाला सुरुवात झाली. कारण, यंदाच्या वर्षी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या ‘बार्बी’ चित्रपटाच्या मुख्य नायिकेला नामांकन मिळाले नव्हते. मात्र, चित्रपटातील तिचा सहकलाकार रायन गॉजलिंगचे नाव नामांकनाच्या यादीत होते.

‘बार्बी’ची पटकथा लेखिका आणि दिग्दर्शिका ग्रेटा गेरविगही नामांकनापासून वंचित राहिली. ‘ओपनहायमर’ने विविध श्रेणींत सर्वात जास्त सात ऑस्कर पुरस्कार पटकावले. दिग्गज चित्रपट दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग यांच्या चित्रपटाला तेराव्यांदा सर्वोत्कृष्ट श्रेणीत नामांकन मिळाले. मार्टिन स्कॉर्सेसीच्या चित्रपटाला दहाव्यांदा नामांकन मिळाले. मार्टिनने यापूर्वी ‘द डिपार्टेड’ चित्रपटासाठी एकदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे.

सर्वोत्कृष्ट श्रेणीत ज्यांना नामांकन मिळते त्यामध्ये दरवर्षी किमान एका महिला दिग्दर्शिकेच्या चित्रपटाचा समावेश असतो. यंदाही ग्रेटा गेरविग दिग्दर्शित ‘बार्बी’ चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत होता. यापूर्वी ‘पास्ट लाईफ’साठी सिलियन साँग आणि ‘ॲनाटोमी ऑफ फॉल’साठी जस्टिन ट्रीएसारख्या महिला दिग्दर्शकांना नामांकन मिळाले होते.

आणखी एक मजेशीर बाब म्हणजे, यंदाच्या पुरस्कारांमध्ये पहिल्यांदाच ‘गॉडझिला मायनस वन’ चित्रपटाला नामांकन मिळाले आणि पुरस्कारही मिळाला. सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘ओपनहायमर’साठी क्रिस्टोफर नोलान यांना मिळाला. त्यांनी ज्याप्रमाणे उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती केली होती त्यावरून तो त्यांना नक्कीच मिळणार, असे गृहीत धरले जात होते.

क्रिस्टोफरसमोर मार्टिन्स स्कॉर्सेसी, जस्टिन ट्रीए, जॉनेथन ग्लाझेर, योरगोस लॅंथीमोस इत्यादी दिग्गज दिग्दर्शकांचे आव्हान होते. अशीच परिस्थिती होती सर्वोत्तम अभिनेत्यासाठीच्या पुरस्काराची. ‘ओपनहायमर’मधील भूमिकेसाठी सिलियन मर्फी यांनी तो जिंकला असला तरी त्याच्यासमोर ब्रेडली कूपर, जेफ्री राईट,

कोलमन दोमिंगो आणि पॉल गिमॅटी यांचे कडवे आव्हान होते. सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार ‘किलर ऑफ द फ्लॉवर मून’ चित्रपटातील भूमिकेसाठी लिली ग्लॅडस्टोनला मिळेल असा सर्वांचा कयास होता; पण ‘पुअर थिंग्ज’ चित्रपटातील भूमिकेसाठी एमा ग्लॅडस्टोन हिने त्यावर नाव कोरले. ‘पुअर थिंग्ज’च्या निमित्ताने एमाने दुसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कार पटकावला. यापूर्वी तिने ‘लाला लँड’साठी ऑस्करला आपली दखल घ्यायला लावली होती.

सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार रॉबर्ट डाऊनी जुनियर याला ‘ओपनहायमर’मधील भूमिकेसाठी मिळाला. रॉबर्टने प्रथमच ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. रॉबर्ट डी नीरोला मागे टाकत रॉबर्ट डाऊनी जुनियरला पुरस्कार मिळणे सर्वांनाच चकित करणारे होते. सर्वोत्कृष्ट सहनायिकेच्या पुरस्काराच्या वेळीही तेच झाले.

सर्वांना पूर्णपणे खात्री होती, की ‘बार्बी’तील भूमिकेसाठी अमेरिका फेरेरा हिला पुरस्कार मिळेल. मात्र, ‘द फोल्डओव्हर्स’तील भूमिकेसाठी दाविन जॉय रँडॉल्फ हिने त्यावर आपले नाव कोरले आणि त्याचीच चर्चा रंगली.

यंदा सर्वोत्कृष्ट माहितीपट श्रेणीमध्ये नामांकन मिळालेल्या एका माहितीपटाचा भारताशी संबंध होता. मूळ भारतीय निशा पाहूजा जी आता कॅनडामध्ये स्थायिक झाली आहे, तिच्या ‘टू किल अ टायगर’ माहितीपटाला नामांकन मिळाले होते; पण बाजी मारली ‘ट्वेन्टी डेज इन मॉरिओपॉल’ माहितीपटाने.

त्यात सध्या सुरू असलेल्या युद्धात होरपळणाऱ्या युक्रेनच्या एका शहरात पहिल्या वीस दिवसांत घडलेल्या बदलाचे चित्रण करण्यात आले होते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी पहिल्यांदाच दिग्दर्शन करणारे माहितीपटाचे दिग्दर्शक मस्त्यस्लाव्ह चेरनोव्ह आणि रेनी अरनसनरॅथ व्यासपीठावर उपस्थित होते.

ऑस्करच्या व्यासपीठावरून त्यांनी युक्रेनच्या परिस्थितीबाबत जगातील मंडळींना अवगत केले. बेस्ट ओरिजनल स्कोअर पुरस्कारही ‘ओपनहायमर’कडेच गेला. सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार ‘पुअर थिंग्ज’ने मिळवला. सर्वोत्कृष्ट ‘व्हिज्युअल इफेक्ट्स’चा पुरस्कार ‘गॉडझिला मायनस वन’ चित्रपटाला मिळाला.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी चित्रपटाची टीम व्यासपीठावर आली तेव्हा त्यातील प्रत्येकाने आपल्या हातात छोटा गॉडझिला आणला होता. पुरस्कार सोहळ्याचा सूत्रधार जिमी किमल याने पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञ चमूला व्यासपीठावर आमंत्रित केले होते आणि असे पहिल्यांदाच घडले होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर जपानी कलाकारांनी जेव्हा आभार व्यक्त करणारे भाषण केले तेव्हा सर्वांना कळून चुकले, की आता व्हिज्युअल इफेक्ट्सच्या क्षेत्रात जपान्यांचा दबदबा कायम राहणार आहे.

पुरस्कार सोहळ्यात बिली एलिशने सादर केलेला कलाविष्कार खूपच खास ठरला. पुरस्कार सोहळ्याची आणखी एक अनोखी बात म्हणजे चित्रपटसृष्टीत काम करणारे स्टंटमॅन यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर आलेल्या एमिली ब्लंट आणि रायन गॉजलिंग यांनी उपस्थितांना विनोदी चिमटे काढले.

‘बार्बी’ला नामांकन मिळाले; परंतु त्या चित्रपटाच्या नायिकेचा पुरस्कारासाठी विचार केला गेला नाही. त्याप्रमाणेच ‘किलर्स ऑफ द फ्लावर मून’मधील भूमिकेसाठी लिओनार्दो द कॅप्रिओचे नामांकनदेखील डावलण्यात आले. लघुचित्रपट श्रेणीत वेस ॲण्डरसनच्या ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ला पुरस्कार मिळाला; पण तो पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नव्हता. पेड्रो अल्माडोर यांच्या ‘ह्यूमन व्हॉइस’ चित्रपटाला मात्र पुरस्कार मिळाला नाही.

यंदा पुरस्कार सोहळ्यात एक नवीन प्रथा पाळण्यात आली. विजेत्यांना गौरवण्यासाठी त्याच श्रेणीतील पूर्वीच्या पाच पुरस्कार विजेत्यांना मंचावर बोलावण्यात आले होते. सोहळ्यात घडलेली सर्वात खेदजनक घटना म्हणजे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरलेला रॉबर्ट डाऊनी ज्युनियर जेव्हा व्यासपीठावर आला तेव्हा त्याने पाच विजेत्यांपैकी आशियाई सहाय्यक अभिनेता पुरस्कार विजेत्या के यू क्वानकडून ट्राॅफी स्वीकारली.

मात्र त्यानंतर त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपला मोर्चा त्याने टीम रॉबिन्स आणि सॅम रॉकवेल यांच्याकडे वळवला. पुरस्कारासाठी त्यांचे आभार मानले. एमा स्टोन जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आली तेव्हा तिनेदेखील आशियाई अभिनेत्री मायकल एव्ह (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स)कडे दुर्लक्ष करत जेनिफर लॉरेन्स आणि सॅली फिल्ड यांच्याकडे धाव घेतली.

त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली, की पाश्चात्त्य कलाकार नेहमीच आशियाई कलाकारांकडे तुच्छ नजरेने पाहतात. त्या घटना आशियाई नागरिकांना अजिबात आवडल्या नाहीत. हॉलीवूडमध्ये पाश्चात्त्यांप्रमाणे आशियाई मंडळींचे योगदानही खूप मोठे आहे. व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये जपानने आपली क्षमता सिद्ध केली आहे, तर दक्षिण कोरियाचे चित्रपट हॉलीवूडला टक्कर देणारे आहेत. चिनी, भारतीय आणि हाँगकाँगमधील अभिनेत्यांनी हॉलीवूडमध्ये

आपले विशेष स्थान निर्माण करण्यात यश मिळवले आहे. असे असतानाही जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आशियाई कलाकारांकडे दुर्लक्ष करण्याच्या घटना घडतात तेव्हा ते खरोखरच निंदनीय आहे.

कलात्मक कलाकृती नक्कीच दावेदार

यंदाच्या वर्षी मल्याळम भाषेतील ‘२०१८’ला सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एन्ट्री होती. मात्र तो शॉर्टलिस्टदेखील होऊ शकला नाही. आजवर ‘लगान’ वगळता इतर कोणताही चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम पाचमध्ये पोहोचू शकलेला नाही. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जे काही खास निकष आहेत त्यांची पूर्तता आपले चित्रपट करत नाहीत. त्यामुळे शर्यतीत ते मागे पडतात.

भानू अथय्या, ए. आर. रहमान, रसूल पकुट्टी इत्यादींदेखील विविध श्रेणींत ऑस्कर जिंकलेला आहे. आपल्या गुनित मोंगाने दोन वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकून भारतीयांचे कर्तृत्व सिद्धदेखील केले आहे. आपण ‘आरआरआर’साठी गोल्डन ग्लोबदेखील जिंकला आहे. तसे पाहता भारतीय चित्रपट अष्टपैलू असतात.

संगीत तर भारतीय चित्रपटांचे खास वैशिष्ट्य. म्हणून आपल्या चित्रपटांना आॅस्कर पुरस्कार मिळाला तरच ते श्रेष्ठ ठरतील, असे मात्र मानायची गरज नाही. आपले मसाला चित्रपट जर पुरस्कारांशी शर्यत करू शकत नसतील तर आपल्याकडच्या कलात्मक कलाकृती नक्कीच त्यासाठी दावेदार ठरू शकतात.

(लेखक प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com