‘कानसेनां’ची नवीन दुनिया

आदित्य कुबेर saptrang@esakal.com
Sunday, 10 January 2021

माध्यम
नुकतंच सरलेलं २०२० वर्षं  अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरलं. या वर्षात सर्वच क्षेत्रांवर व्यापक आणि दूरगामी परिणाम आणि बदल झाले. यापैकीच एक म्हणजे करमणूकक्षेत्र. करमणूकक्षेत्रानंही स्थितीवादी न राहता निर्मितीचं माध्यम बदललं आणि ओटीटीचा आधार घेतला. हे क्षेत्र ओटीटीपुरतंच मर्यादित राहिलं नाही, तर विस्तारासाठी आणखी एक व्यासपीठ त्याला मिळालं ते पॉडकास्टच्या रूपानं.

नुकतंच सरलेलं २०२० वर्षं  अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरलं. या वर्षात सर्वच क्षेत्रांवर व्यापक आणि दूरगामी परिणाम आणि बदल झाले. यापैकीच एक म्हणजे करमणूकक्षेत्र. करमणूकक्षेत्रानंही स्थितीवादी न राहता निर्मितीचं माध्यम बदललं आणि ओटीटीचा आधार घेतला. हे क्षेत्र ओटीटीपुरतंच मर्यादित राहिलं नाही, तर विस्तारासाठी आणखी एक व्यासपीठ त्याला मिळालं ते पॉडकास्टच्या रूपानं. विशेष म्हणजे, पॉडकास्टचा उगम होऊन दोन दशकं लोटली असली तरी २०२० या वर्षात त्याचं पुनरुज्जीवन झालं असं म्हणता येईल. गेल्या दहा वर्षांत पॉडकास्टमध्ये मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आहे. सध्याच्या काळात सुमारे दरमहा चार कोटी श्रोते पॉडकास्टच्या माध्यमातून विविध कलाप्रकारांचा आनंद लुटत आहेत. 

पॉडकास्टच्या दुनियेत ‘स्पोटीफाय’, ‘जिओ सावन’, ‘गाना’, ‘ॲपल पॉडकास्ट’, ‘अमेझॉन ऑडिबल’, ‘कास्टबॉक्स’ यांसह अन्य भारतीय कंपन्या श्रोत्यांची करमणूक करण्याबरोबरच माहितीदेखील प्रसारित करत आहेत. पॉडकास्टची इतक्या कमी काळात झालेली प्रगती आपल्याला काय सांगते? सध्या हे जग कसं काम करत आहे आणि भविष्यात त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? ही संस्कृती कशी वाढणार? असे प्रश्‍न उपस्थित होतात. अर्थात्‌ सर्वच ॲप्सकडे जवळपास सारखाच संगीतसंचय आहे; परंतु स्पर्धेत स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी पॉडकास्ट तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. पॉडकास्टनं श्राव्यमाध्यमाची स्वाभाविक संस्कृती टिकवून ठेवली आणि ज्याप्रमाणे अन्य संगीत-ॲप्स श्रोत्यांना समधुर गाण्यांची मेजवानी देतात, त्याप्रमामेच पॉडकास्टनंदेखील श्रवणीय संगीत उपलब्ध करून दिलं आहे. ‘स्पोटीफाय’नं गेल्या दोन वर्षांत श्रवणसंस्कृतीत नवा मार्ग चोखाळला आणि त्याचं अनुकरण अन्य कंपन्यांनी केलं. पॉडकास्टची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि श्रोत्यांना आकर्षित करण्यासाठी ‘जीओ सावन’ आणि ‘ऑडिबल’ या कंपन्यांनी नेहा धुपिया, अमिताभ बच्चन, अनुराग कश्‍यप यांसारख्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजित केले. साहजिकच श्रोत्यांची संख्या वाढत गेली. परिणामी, पॉडकास्ट-निर्मात्यांचा उत्साहही वाढत गेला आणि ते सहजपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचू लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पॉडकास्टच्या विकासाला केवळ हाच एकमेव घटक कारणीभूत ठरला असं नाही. ‘हबहॉपर’, ‘ऑडिओवाला डॉट कॉम’, ‘कूकू एफएम’, ‘आवाज’ या व्यासपीठांनीही पॉडकास्ट-संस्कृतीला मदत केली. पॉडकास्टचा विकास हा मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही झाला आणि श्रोते संगीतात गुंतून राहिले. अन्य माध्यमांच्या तुलनेत पॉडकास्टवर बातम्या, तसंच पुस्तक वाचणंदेखील सोपं आहे. 

पॉडकास्टच्या विकासात आणखी एक गोष्ट होती व ती म्हणजे सहज उपलब्धता. डेटाच्या किमतीत झालेली घसरण ही व्हिडिओ-प्रसाराला चालना देणारी ठरली. त्याचबरोबर ‘कानसेन’ही वाढले. अशा वेळी आपल्याला तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लाँग ड्राइव्हला जाताना स्ट्रिमिंग ऑडिओ ऐकण्याचा ट्रेंड वाढत गेला तो तंत्रज्ञानाच्या मदतीनंच. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होत असताना मोटारीत वापरण्यात येणारी ‘अँड्रॉईड ऑटो’ आणि ‘ॲपल कारप्ले’ यांसारखी साधनं आता सर्वसामान्य होत आहेत. पूर्वीच्या तुलनेत या साधनांचा वापर करणं खूपच सुलभ ठरत आहे. एका अंदाजानुसार, मोटारीतले २८ टक्के श्रोते आता पारंपरिक रेडिओवरून स्ट्रिमिंग ऑडिओकडे वळले आहेत. हा बदल केवळ दोन वर्षांतला आहे. यातला मोठा वाटा संगीताचा आहे. 

आजकाल सर्व काही ऐकण्यासाठी असंख्य साधनं उपलब्ध आहेत. रोजच्या बातम्या, क्रीडा, क्रिकेट, आरोग्य आणि व्यायाम, हॉरर, नाट्य, संगीत अशी भली मोठी यादी सांगता येईल. जर तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीचा आवाज ऐकायचा असेल, पॉडकास्नं स्टोरीटेलिंग-संस्कृतीलाही सुखद धक्का दिला आहे. यात भयपट, नाट्य, विनोद यांसारख्या बऱ्याच प्रकारांचा समावेश आहे. सध्या गूगलच्या सर्चबारवर पॉडकास्ट या शब्दासह कशाचंही सर्चिंग केलं तर अनेक पर्याय उपलब्ध होतात. गूगलनं मुख्य सर्चबारमध्ये पॉडकास्टचा समावेश केला आहे आणि त्याबद्दल आभार मानले पाहिजेत. त्यावर केवळ प्लेचं बटण दाबताच आपण काहीही ऐकण्यास मोकळे, तेही अगदी मोफत! 

अन्य माध्यमांच्या तुलनेत पॉडकास्ट हे महत्त्वाचं माध्यम का आहे? ते यूजर-फ्रेंडली असल्यामुळे त्याला फार वेळ द्यावा लागत नाही आणि लक्षही देण्याची गरज भासत नाही. सध्या स्क्रीनचा बोलबाला असताना पॉडकास्ट मात्र या संस्कृतीला छेद देण्याचं काम करतो.  मात्र, दर्जा आणि अनुभव यांच्याबाबतीत तडजोड केली जाते असा याचा अर्थ नाही.  

स्टोरीटेलिंगचा विचार केल्यास त्याचं श्रवण करताना श्रोता कथेत गुंग होऊन जातो. सध्याच्या काळात डेटा-उपलब्धतेमुळे व्हिडिओचं तुलनेनं अधिक आव्हान असताना पॉडकास्टनं दर्जेदार स्टोरीटेलिंगच्या रूपानं खंबीरपणे उभं राहण्याची आवश्‍यकता आहे. एखाद्या टीव्हीशोची निर्मिती करताना बराच खर्च करावा लागतो. तुलनेनं एखादा चांगल्या ऑडिओ शोला फारसा खर्च येत नाही, म्हणूनच भविष्यात मोठे ब्रँड आणि प्रायोजक हे आपल्या जाहिरातीसाठी जेव्हा परवडणाऱ्या माध्यमांचा शोध घेतील तेव्हा पॉडकास्टचा विचार होईल. हे आभासी चक्र असून साहजिकच अधिकाधिक निर्माते आणि आवाज हे जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. पुढील वर्षांपर्यंत पॉडकास्टचं क्षेत्र हे ‘जगभरात एक अब्ज डॉलरचा जाहिरात उद्योग,’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या माध्यमातून कोणत्या संधी उपलब्ध होतील असा विचार केला तर, चांगला आवाज असणाऱ्या मंडळींसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. तुम्ही हृदयाला भिडणारी कथा सांगा, सर्व व्यासपीठांचा उपयोग करा आणि श्रोत्यांची उभारणी करा... त्याचं रुपांतर चलनात आपोआप होईल! 

हे ऐका
नाट्य : डेथ, लाइज्‌ ॲड सायनाईड (स्पोटीफाय), काली आवाजे (ऑडिबल), क्या तुम ने कभी किसी से प्यार किया है? (जिओ सावन), बिझनेस वॉर्स (सर्व ठिकाणी)
न्यूज : ऑल इंडियाज् मॅटर (सर्व ठिकाणी), द सीन अँड द अनसीन (सर्व ठिकाणी)
माहिती आणि मनोरंजन : आयडीके विथ सामंथा (सर्व ठिकाणी), मेइड इन इंडिया (सर्व ठिकाणी)
आघाडीचे मराठी शो : कॉफी क्रिकेट आणि बरेच काही, बालगाथा, इन्स्पिरेशन कट्टा 

(अनुवाद : अरविंद रेणापूरकर)
(सदराचे लेखक ‘आयडियाब्रु स्टुडिओ’चे सहसंस्थापक आहेत)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aaditya Kuber Writes about podcast media