प्लॅटफॉर्म (आरती सोहोनी)

आरती सोहोनी
रविवार, 29 एप्रिल 2018

मी गावाला जायला निघालो होतो खरा; पण माझा पाय काही इथून निघत नव्हता. माझ्यासमोरून गाड्या निघून जात होत्या. माझ्या डोळ्यांसमोर घर येऊ लागलं...आशेनं वाट पाहणारा अमोघ...तो नवीन पुस्तकांची वाट बघत असणार. गिरकी घेत बोलणारी राधिका...तिचं पहिला नंबर काढायचं प्रॉमिस...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद... आणि...आणि या सगळ्यावर माझ्यामुळं पाणी पाडणार...!

मी गावाला जायला निघालो होतो खरा; पण माझा पाय काही इथून निघत नव्हता. माझ्यासमोरून गाड्या निघून जात होत्या. माझ्या डोळ्यांसमोर घर येऊ लागलं...आशेनं वाट पाहणारा अमोघ...तो नवीन पुस्तकांची वाट बघत असणार. गिरकी घेत बोलणारी राधिका...तिचं पहिला नंबर काढायचं प्रॉमिस...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद... आणि...आणि या सगळ्यावर माझ्यामुळं पाणी पाडणार...!

श्रीधरनं दारावरची बेल वाजवली. घरात कुणी आहे की नाही, असं त्याला वाटत होतं; पण दार लगेचच उघडलं गेलं. तो प्रवासानं थकला होता. "चला, आल्या आल्या दार तर उघडलं गेलं...' शुभशकुनच म्हणायचा! नाहीतर दार बंद असतं तर आजूबाजूचं आपल्याला कुणी ओळखत नाही नि मग एवढा वेळ कुठं काढला असता...?' दारात उभं राहून तो मनातल्या मनात म्हणाला आणि विचारात हरवून गेला.
""भाऊजी तुम्ही? अहो, असे उभे का दारात? या ना आत...''

वहिनीच्या हाकेनं तो भानावर आला. आत गेला. हात-पाय धुतले नि सोफ्यावर बसला.
वहिनीनं घर कसं छान लावलंन्‌ होतं. सगळं कसं जागच्या जागी.
जराशा गप्पा झाल्यावर वहिनीनं चहा नि खायला आणून दिलंन्‌.
श्रीधर सुखावला. कोकणातल्या प्रवासानं तो कंटाळला होता. कोकणात रेल्वे सुरू झाली तरी गुहागरच्या आत खेड्यात ही सोय नव्हती. अजूनही बस आणि मग रेल्वे असा द्राविडी प्राणायाम केल्याशिवाय मुंबई गाठता येत नसे!
श्रीधरनं विचारलंन्‌ ः ""वहिनी, श्रीनिवासदादा कुठाय?''
" "ह्यां'ना यायला साडेसात-आठ होऊन जातात. अहो, कोण गर्दी असते लोकलला! शिवाय "व्हीटी'हून (सीएसटी) "वेस्टर्न'ला यायचं म्हणजे गाडी बदला...कमी का व्याप आहे?'' वहिनी सांगू लागल्या. सांगता सांगताच मला म्हणाल्या ः ""तुम्ही थकला असला प्रवासानं. पडता का जरा?''
-मग मी बाहेरच दिवाणावर आडवा झालो.
पडल्या पडल्या श्रीधरची तंद्री लागली... "अमोघ हा माझ्यापेक्षा धाकटा. सहा-सात वर्षांनी लहान. त्याला खूप खूप शिकायचं आहे आणि शिरूदादा, म्हणजे मी मुंबईला गेल्यावर हे सहजशक्‍य आहे, असं त्याला वाटत होतं. राधिका त्याच्याही पेक्षा लहान. स्वतःभोवती उगाचच गिरकी घेऊन म्हणते ः "शिरूदादा, तुला नोकरी लागली की मला एक फक्कडसा ड्रेस आण. मग मीपण श्रुतीसारखी ऐट मारीन. कारण, ती मला नेहमी अगदी टेचात सांगत असते "हा ड्रेस माझ्या दादानं मुंबईहून आणलाय.' हवं तर शिरूदादा, मी पहिला नंबर काढीन....' मला राधिकाची मजा वाटते. नशीब, अमोघनं तिला थांबवलंन्‌. म्हणाला ः "अगं, ए बावळट, लोक आता अमेरिकेहून वस्तू आणतात. आधी अभ्यास कर. शिरूदादा तू मला खूप पुस्तकं आण...मला अभ्यास करून परदेशात जायचंय. हिच्यासारखं आरशासमोर शंभरदा उभं राहून हिरॉईन नाही व्हायचं मला...' "अरे ए, भांडू नका. आधी मला मुंबईत जाऊन नोकरी तर मिळू दे...'
दारावरची बेल वाजली नि मी तंद्रीतून भानावर आलो. अमित आणि अस्मिता शाळेतून आली होती. मला पाहताच दोघंही म्हणाले ः ""काका तू कधी आलास? किती मजा!''
जरा वेळानं श्रीनिवास अर्थात श्रीदादाही आला. बाबांनी मला इकडं पाठवल्याचं मी त्याला सांगितलं. सगळं ऐकून घेतल्यावर श्रीदादा म्हणाला ः ""ठीक आहे, आपण उद्या बघू या. काही ठिकाणी मी तुला नेईन. मुंबईत फिरायची आधी सवय करून घे.''
मी "हो' म्हटलं.
आमच्या बोलण्यात अमित-अस्मिता यांना स्वारस्य नव्हतं. त्यांनी मला मध्येच विचारलं ः ""काका, आजीनं काय खाऊ पाठवलाय?''
""अरे, थांबा जरा, हे काय?'' वहिनीनं दोन्ही मुलांना हलकंसं दरडावलं. ""नाही कसा? हे बघा, आजीनं काय काय पाठवलंय; पण सगळा खाऊ कोकणातला आहे बरं का...'' मी पिशवी मुलांच्या हाती देत म्हणालो ः ""हे बघा, नारळाच्या वड्या, ही साठं, काजूगर, थोडेसे आंबे...''
मुलं आनंदून गेली.
""आणि वहिनी, तुला हे कुळथाचं पीठ, कोकम आणि गरे!''
""कशाला आणलंत एवढं ओझं, भाऊजी?'' वहिनी म्हणाली.
""ते तू आईला विचार! कोकणात मेवा खूप. परसदारी झाडं, निसर्गसौंदर्यही आहे; पण पैसा? कोकणातली मोठी शहरं सोडली तरी इतर ठिकाणी पैसा जेमतेमच...'' मी वस्तुस्थिती सांगत पुढं म्हणालो ः ""मी रोज वेगवेगळ्या ठिकाणी जायचो; पण मला तिकडं हवी तशी नोकरी मिळत नव्हती. मी बॅंकेच्या परीक्षा देऊन उत्तीर्णही झालो...पण नशीब!''
हे ऐकल्यावर वहिनीच्या वागण्यात मला काहीतरी सूक्ष्म फरक जाणवू लागला. तिचीही चूक नव्हती म्हणा.
सकाळी उठून सगळं करून घराबाहेर पडण्याची गडबड. मुलांची शाळा, अभ्यास, शिकवणी...एक ना दोन. मुंबईत नोकरी करणाऱ्या बाईची कसरत प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कळणारी नसते...!
श्रीधरला मुंबईत येऊन आता दहा-बारा दिवस होऊन गेले होते...वहिनीनं शेवटी एक दिवस हळूच विचारलंच ः ""भाऊजी, तुम्ही इथं आल्याला दहा दिवस होऊन गेले. तुम्ही नक्की काय करणार आहात? काही विचार केलाय का?''
वहिनीच्या सोबतीनं दादाही म्हणाला ः ""अरे, आणखी दोन-तीन दिवस बघ...नाहीतर थोड्या दिवसांनी परत ये. कुठं कॉल आला तर किंवा चांगली ऑफर असेल तर मी तुला बोलावून घेईन.''
""पण मी तर, म्हणजे ऽऽऽ नोकरी न मिळताच कसा जाऊ?'' मी गोंधळून जाऊन विचारलं.
पण एकूण वातावरणाचा नूर पाहता मी स्वतःचीच समजूत घातली ः "अरे! मुंबईत चांगली नोकरी मिळवणं म्हणजे काय मजा आहे का? हे असं सगळ्यांचंच होतं. त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही.'
थोडक्‍यात, मी दादाच्या घरी असं बिनकामाचं राहणं साहजिकच कुणालाही नको होतं. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. तसे दादा आणि वहिनी खूप चांगले होते; पण अखेर ही मुंबई होती! मशिनसारखी वेगानं धावणारी...इथली माणसं ठरलेल्या नियमांना आणि वेळेला बांधली गेलेली...खरंच इथं जास्त दिवस कुणीच कुणाला सहन करू शकत नाही! कदाचित नोकरी लागल्यावर त्याच फेऱ्यात मीही अडकलो असतो तर एकवेळ चाललंही असतं. मी सुशिक्षित होतो. मला हे सगळं समजत होतं. पाहुणचार आनंदानं होतोय तोवरच पाहुण्यांनी गाशा गुंडाळावा, हे बरं! थोडक्‍यातच मजा असते, हे वेळीच जाणलेलं कधीही चांगलं. मलाही कुणालाच दुखवायचं नव्हतं. मग एक दिवस मीच वहिनीला म्हणालो ः ""वहिनी गं, काल दादा म्हणाला तसंच करतो मी. मी काही ठिकाणी मुलाखती देऊन ठेवल्यात, एन्ट्रन्स एक्‍झाम्सही देऊन ठेवल्यात. मात्र, तूर्तास मी जातो परत कोकणात गावी. कुठून कॉल आलाच तरी येईन परत.'' यावर वहिनी काही बोलली नाही. मात्र, तिला जे हवं तेच मी म्हणालो होतो, हे मला कळत होतं. माझ्या जाण्याला तिनं जणू मूक संमतीच दिली.
संध्याकाळी माझी बांधाबांध बघून दादा म्हणाला ः ""हे काय, निघालास? अरे, तू लगेच जावंस असं नाही काही अगदीच. राहा हवं तर थोडे दिवस नाहीतर... ''
अमित-अस्मिताही म्हणाली ः ""हे काय काका, तू जाणार?''
मला दादाचा राग नाही आला; उलट कौतुक वाटलं. मी म्हणालो ः ""कुठं काही कामाचं जुळून येत नाही अजून. कोकणात गावी गेलो तर बाबांना मदत तरी होईल. तिकडं वाडीत काही कमी कामं नसतात. शिवाय, कामाला माणसंही मिळत नाहीत तिकडं.''
***
-मी बाहेर पडलो. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आलो. तिथं बाकावर जरा टेकलो. अचानक जायचं ठरवलेलं असल्यानं तिकीट काढलेलं नव्हतंच. मिळेल त्या गाडीनं जाऊ या, असं मनात होतं. थ्रू ट्रेन्स नि लोकल्स धावत होत्या. उत्तरेकडं...दक्षिणेकडं...सगळीकडून सगळीकडं जाण्यासाठी लोक नुसते धावत होते...पळत होते...
कुणी कामधंदा करणारे, कुणी नोकरी शोधणारे, कुणी जिवाची मुंबई करायला आलेले...माझ्या मनात येऊन गेलं, कुठल्याही क्षेत्रात स्वतःची सिद्धता दाखवायची असेल तर मुंबईच गाठावी लागते!
कोणतीही गाडी आली की प्लॅटफॉर्मवर बेसुमार गर्दी होत होती...गाडी निघून गेली की गर्दी विरळ होत जात होती...काही वेळानं पुन्हा हेच चित्र...
इतक्‍यात एका गोष्टीकडं माझं लक्ष गेलं. प्रत्येक गाडी आली की हमाल त्या गाडीत जागा पकडण्यासाठी धावायचे...जागा धरून ठेवायचे...रोज हमाली करून करून हुकमी रिकामी जागा नेमकी कुठं मिळेल, हे त्यांना चांगलंच ठाऊक झालेलं असायचं. बसायला जागा मिळाल्याबद्दल संबंधित प्रवासीही त्यांच्या हातावर निदान 50 रुपये तरी ठेवून जायचा.
मी गावाला जायला निघालो होतो खरा; पण माझा पाय काही इथून निघत नव्हता. माझ्यासमोरून गाड्या निघून जात होत्या. माझ्या डोळ्यांसमोर घर येऊ लागलं...आशेनं वाट पाहणारा अमोघ...तो नवीन पुस्तकांची वाट बघत असणार. गिरकी घेत बोलणारी राधिका...तिचं पहिला नंबर काढायचं प्रॉमिस...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद...आणि...आणि या सगळ्यावर माझ्यामुळं पाणी पाडणार...! नोकरी न मिळताच मी तसाच कोकणात परतू पाहत होतो...छे, छे! मी आणखी काही दिवस इथंच राहतो. इतर हमालांसारखेच काढीन काही दिवस मी कसेबसे प्लॅटफॉर्मवर...मलाही आता ते "अनरिझर्व्हड्‌' डबे माहीत झाले आहेत!
***
ऐनवेळी येणाऱ्या गरजू प्रवाशांना मीही आता इतर हमालांप्रमाणेच जागा "पकडून' द्यायचं ठरवलं होतं! एके दिवशी मी असाच प्लॅटफॉर्मवरच्या बाकावर विचार करत बसलो होतो. तेवढ्यात एक श्रीमंत दिसत असलेला माणूस आला. मी त्याच्या अवतीभोवती वावरू लागलो. त्या माणसाला रेल्वेगाडीत जागा हवी होती, याचा मला अंदाज आला. मग एखाद्या हमालाप्रमाणेच मी सराईतपणे त्याला विचारलं ः ""साब, जगा चाहिए?''
""हॉं, भाई हॉं, जल्दी करो!'' तो माणूस म्हणाला. -मी पटकन्‌ गाडीत चढलो आणि जागा अडवली.
त्यानं माझ्या हातावर शंभराची नोट टेकवली. जागा मिळाल्याचा आनंद त्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसत होता. अर्थात मलाही साहजिकच खूप आनंद झाला...कारण, ती माझी पहिली कमाई होती. मात्र, माझा हा आनंद पाहायला माझ्याजवळ आपलं असं कुणीच नव्हतं!
मी विचार करू लागलो...हे काम मला कसं काय जमलं! कारण, असलं किंवा असल्या प्रकारचं कामं मी याआधी कधी केलंच नव्हतं. तसं काही कारणही नव्हतं. मात्र, परिस्थिती नि महत्त्वाकांक्षा माणसाला सगळं शिकवते.
आता काही हमालही माझे मित्र झाले होते. त्यांना माझा अभिमान वाटे. कारण, त्या सगळ्यांपेक्षा मी खूप शिकलेला होतो.
मला बाकावर बसून वाचताना बघून ते विचारत ः""श्रीधर, काय करतोस?''
""काही नाही रे, जाहिराती बघतोय. अर्ज करून पाहू या. नोकरी मिळतेय का ते बघू. नशीब! पण तुमच्या शुभेच्छा माझं काहीतरी भलं करतील,'' मी त्यांना म्हणायचो.
जिवाला जीव देणारे मित्र म्हणजे काय हे मला तिथं प्लॅटफॉर्मवर चांगलंच उमगू लागलं होतं. मैत्रीला जात, धर्म, वय नसतं. मैत्री हा एकच धागा भक्कम नि पुरेसा असतो. आता माझा पत्ता हाच होता ः "C/o रेल्वे स्टेशन आणि एखाद्या हमाल-मित्राचा पत्ता.' त्यातल्या त्यात कशीतरी काटकसर करून मी घरी काही पैसे पाठवत होतोच.
तिकडं आईला वाटत होतं, की मी श्रीदादाकडं आहे आणि श्रीदादा या समजुतीत होता की मी गावी कोकणात गेलोय! मी एरवीही मोबाईल अगदी कमीच वापरत होतो आणि मोबाईलवरून आमचा तसा एकमेकांशी संपर्कही होतच नव्हता...पण झाला असता तरी माझा "पत्ता' त्याला कळायची तशी काहीच शक्‍यता नव्हती.
खरं तर आता स्टेशनवरचा वडापाव खाऊन मी कंटाळून गेलो होतो. आईच्या हातची पानगी, थालिपिठं खावीशी वाटत होती. तिच्या हातच्या आमटी-भाताची किंमत मला आज कळत होती; पण या सगळ्यापेक्षा माझा निश्‍चय अधिक महत्त्वाचा होता.
रेल्वे स्टेशनजवळच मी हमाल-मित्रांच्या मदतीनं आता अगदी म्हणजे अगदी छोटीशी जागा राहण्यापुरती कशीबशी मिळवली होती. श्रीदादाला अर्थात यातलं काहीच माहीत नव्हतं.
मुंबईत एवढ्यात श्रीदादाची वगैरे भेट होऊ नये, अशी मी रोज रोज प्रार्थना करत होतो.
अशातच एक दिवस एक पत्र माझ्या हाती पडलं.
मुलाखतींच्या कार्यालयांमध्ये श्रीदादाचा जो पत्ता मी पत्रव्यवहारासाठी सुरवातीला देऊन आलो होतो, तो पत्ता दरम्यानच्या काळात रद्द करून त्याऐवजी माझ्या एका हमाल-मित्राचा पत्ता मी तिथं देऊन आलो होतो. ""श्रीधर, हे पत्रं तुझ्या नावाचं आहे,'' फ्लॅटफॉर्मवरच्या एका हमाल-मित्रानं ते माझ्या हाती दिलं. पत्रं माझंच होतं. बॅंकेत रुजू होण्याविषयीचं ते पत्रं होतं. माझा माझ्यावर विश्‍वासच बसेना. आनंद गगनात मावेना. मला अगदी राधिकासारखी गिरकी मारावीशी वाटली! आज मी प्लॅटफॉर्मवरच्या नवीन मित्रांबरोबर मनसोक्त पार्टी केली.
***
आता मी बॅंकेत नोकरीला जाऊ लागलो होतो. महिने-दोन महिने होताच, मी गावाला जायचं रिझर्व्हेशन केलं. अमोघ आणि राधिका यांच्यासाठी वस्तू घेतल्या. आता सांगायला हरकत नाही...अजून एक माणूस माझी वाट बघत असणार याची घरात कुणालाच कल्पना नसणार! अगदी कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनची माझी मैत्रीण गौरांगी ही मला जोडीदार म्हणून आवडत होती. माझ्यासारख्या मितभाषी, मध्यमवर्गीय आणि बेरोजगार मुलावर ती का फिदा होती, हे मलाच कळलं नव्हतं. मी कधीच व्यक्त करू शकलो नाही; पण ती स्वच्छपणे आपलं प्रेम व्यक्त करायची. मी म्हणायचो ः "मला नोकरी नाही, घरची जबाबदारीही आहे...' पण तिचं ठरलेलं उत्तर असे ः ""मी वाट पाहीन. मी कितीही श्रीमंत घरातली असले तरीही मला स्वतःच्या हिमतीवर पैसे मिळवणारा, स्वतःला सिद्ध करून दाखवणारा जोडीदार हवा आहे.'' मग "काहीतरी करून दाखवीनच', असं वचन मीही तिला दिलं होतं. ती डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत असेल...
मी गाडीत चढलो. आज माझं रिझर्व्हेशन होतं. इतक्‍यात एक आवाज आला ः ""साहब, जगा चाहिए? अभी पकड के देता हूँ।''
मी मागं वळून पाहिलं. मला सीट नको होती, तरीही मी म्हणालो ः ""हॉं भाई. है कोई सीट खाली?'' मी ते सीट घेतलं आणि त्या व्यक्तीच्या हातावर 50 नव्हे, तर 100 रुपये टेकवले. न जाणो हाही माझ्यासारखाच एखादा...!
गाडी कोकणच्या दिशेनं पुढं सरकली. काही मित्र मला निरोप द्यायला आले होते...मी पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मकडं डोळे भरून पाहून घेतलं... मुंबईच्या वास्तव्यात रेल्वे प्लॅटफॉर्म हीच माझी काही काळ "कर्मभूमी' होती! याच प्लॅटफॉर्मनं मला आसरा दिला होता...गाडी पुढं पुढं सरकू लागली, तसं माझं मन प्लॅटफॉर्मवर घालवलेल्या दिवसांच्या आठवणी काढण्यात मागं मागं जाऊ लागलं...माझ्यासारखे कित्येकजण मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर
आसरा घेत असतील...दिवसभराच्या दमणुकीनं रात्री प्लॅटफॉर्मच्या कुशीत शांतपणे झोपी जात असतील...
तो प्लॅटफॉर्मही किती जणांच्या आयुष्याचं भवितव्य बघत असेल!
मी मनातल्या मनात मुंबईला सलाम केला...आणि म्हणालो ः " प्रिय मुंबई, मीही हा गेलो नि हा आलोच...पुन्हा तुझ्या कुशीत विसावायला!'

Web Title: aarti sohoni write article in saptarang