पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख (अभय पटवर्धन, निवृत्त कर्नल)

अभय पटवर्धन (निवृत्त कर्नल)
रविवार, 11 डिसेंबर 2016

जनरल कमर जावेद बाज्वा यांनी पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून सूत्रं स्वीकारली आहेत. पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या लष्करप्रमुखांनी त्या देशात बजावलेल्या ‘सक्रिय’ भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर बाज्वा यांची नियुक्ती महत्त्वाची आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतला तणाव सध्या कमालीचा वाढलेला असताना बाज्वा यांनी सूत्रं स्वीकारली आहेत. बाज्वा यांच्याकडे नेतृत्व आल्यामुळे, ‘भारताविरुद्ध शत्रुत्व’ हाच मूलमंत्र असणाऱ्या पाकिस्तान लष्कराकडून, भारत- पाकिस्तान सामरिक संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.

जनरल कमर जावेद बाज्वा यांनी पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून सूत्रं स्वीकारली आहेत. पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या लष्करप्रमुखांनी त्या देशात बजावलेल्या ‘सक्रिय’ भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर बाज्वा यांची नियुक्ती महत्त्वाची आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतला तणाव सध्या कमालीचा वाढलेला असताना बाज्वा यांनी सूत्रं स्वीकारली आहेत. बाज्वा यांच्याकडे नेतृत्व आल्यामुळे, ‘भारताविरुद्ध शत्रुत्व’ हाच मूलमंत्र असणाऱ्या पाकिस्तान लष्कराकडून, भारत- पाकिस्तान सामरिक संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. फक्त त्यांचा विखार जनरल राहील शरीफ यांच्यापेक्षा कमी राहील की जास्त, हे पाहणं औत्सुक्‍याचं असेल.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २७ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान लष्कराच्या प्रमुखपदी, लेफ्टनंट जनरल कमर जावेद बाज्वा यांच्या नेमणुकीची घोषणा केली. आधीचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली. नवा लष्करप्रमुख निवडताना तो केवळ गनिमी युद्धात प्रवीण असावा, की पाकिस्तानच्या मुळावर उठलेल्या जिहाद्यांशी लढा देणारा, की भारतीय लष्कराच्या आक्रमक कारवायांना निष्फळ करून त्यांना चर्चेसाठी भाग पाडणारा हवा, याबद्दल पाकिस्तानमधल्या संरक्षण मंत्रालयात बराच विचारविनिमय झाला, असं ‘डॉन’ वृत्तपत्राचं मत आहे. बाज्वा यांची ही नियुक्ती काश्‍मीर मुद्द्यावर भारत-पाकिस्तान संबंध संपण्याच्या मार्गावरच्या अतितणावपूर्ण काळात झाली आहे. गेले काही महिने हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर गोळीबार करत आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांनी जनरल बाज्वा यांना शुभेच्छा देतानाच ‘‘लष्करी धोरण चालू राहील आणि त्यात तातडीनं कोणताही बदल होणार नाही. आमचा मुख्य भर पूर्व सीमेवर राहील आणि पाकिस्तानचा पाठिंबा असलेलं लष्कर सगळी आव्हानं पार करेल,’’ असं स्पष्ट केलं. या सगळ्या घडामोडींवर पाकिस्तानच्या या लष्करप्रमुखाची माहिती बघावी लागेल.

पाकिस्तानमधल्या घाकरमंडी भागात कर्नल मोहंमद इक्‍बाल बाज्वांच्या सैनिकी घराण्यात बाज्वा यांचा जन्म झाला. ते २४ ऑक्‍टोबर १९८० रोजी पाकिस्तान मिलिटरी ॲकॅडमीमधून ‘पास आउट’ झाले. त्यानंतर ‘१६ बलुच रेजिमेंट’मध्ये कमिशन मिळून, १९८२ मध्ये सिंध रेजिमेंटमध्ये त्यांना बदली मिळाली. लहानपणापासून सैनिकी पार्श्‍वभूमी असलेले कमर बाज्वा यांनी इस्लामाबादमधल्या नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी, कॅनडातल्या टोरॅंटोमधलं कॅनेडियम फोर्सेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, कॅलिफोर्नियातल्या माँटेरे इथली नेव्हल पोस्ट ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी; तसंच अमेरिकेतही शिक्षण घेतलं आहे. आपल्या कारकिर्दीत ते पाकिस्तानमधलं स्कूल ऑफ इन्फन्ट्री, क्वेट्टातलं कमांड अँड स्टाफ कॉलेज आणि इस्लामाबादमधल्या नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीमध्ये प्रशिक्षकसुद्धा होते.
त्यांनी इन्फन्ट्री ब्रिगेडमध्ये मेजर पदावर, तसंच नंतर रावळपिंडी कोअरचे प्रमुख म्हणूनही काम केलं. ‘१६ बलुच रेजिमेंट’चे कमांडिंग ऑफिसर, पंजाबमध्ये इन्फन्ट्री ब्रिगेड कमांडर; नॉर्दन एरियाचे (एएफसीएनए) डिव्हिजनल कमांडर आणि रावळपिंडी कोअर कमांडर (टेन कोअर) म्हणूनही त्यांनी काम केलं. ब्रिगेडियरच्या पदावरच त्यांनी २००७ ते २००९ मध्ये काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत पाकिस्तानचं नेतृत्व केलं होतं. ऑगस्ट २०११ मध्ये मेजर जनरल बाज्वा यांना, बलुचिस्तानमधल्या कारवाईसाठी ‘हिलाल-ए- इम्तियाज’ (मिलिटरी) या शौर्य पुरस्कारानं गौरविण्यात आले. लष्करप्रमुख बनण्याआधी बाज्वा लष्कर मुख्यालयात प्रशिक्षण आणि मूल्यांकन विभागात महानिरीक्षक या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.

शांतिसेनेत असताना बाज्वा यांची वागणूक प्रशंसनीय, अनुकरणीय आणि उच्च दर्जाची होती. मात्र लष्करी अधिकाऱ्यांचं आंतरराष्ट्रीय सामरिक मुत्सद्देगिरी आणि देशांतर्गत सामरिक क्षेत्रांमधलं वागणं परस्परपूरक असेलच असं नाही, असं (त्यांचे तत्कालीन कमांडर) जनरल विक्रमसिंग यांचं मत आहे. माझा मुलगासुद्धा त्याच काळात त्याच ठिकाणी कॅप्टनच्या पदावर होता. अनेकदा त्याला बाज्वा यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे तोसुद्धा याचीच ‘री’ ओढतो. जनरल बाज्वा ‘टेन कोअर’चे सर्वेसर्वा होते आणि त्यांना लष्कराचं भारतविरोधी धोरण माहीत असल्यामुळं पाकिस्तान लष्कराची कायम संघर्षाची भूमिका आणि दहशतवाद्यांना गोपनीयरीत्या पाठीशी घालणं या धोरणातही काहीही बदल होणार नाही हे निश्‍चित. पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करणारं आणि भारताविरुद्ध सामरिक धाडसात मग्न असलेलं पाकिस्तानी लष्कर उत्तमरीत्या प्रशिक्षित आहे आणि त्या देशासाठी ‘प्रेरणादायी शक्ती’ आहे, हे एक आश्‍चर्यच आहे. धार्मिक मूलतत्त्ववाद त्यांचा गाभा कुरतडत असूनदेखील अंतर्गत दुफळीत सापडलेल्या पाकिस्तानला एकसंध ठेवण्याचे काम लष्कर करतं आहे; पण त्याच वेळी जिहाद्यांच्या माध्यमातून भारतावर शंभर घाव घालण्याच्या आयएसआयच्या कारवायांमध्येही ते भागीदार आहे.

आपला कार्यकाळ संपल्यावर मुदतवाढ न मिळता किंवा सत्तापालट न करता निवृत्त होणारे जनरल राहील शरीफ हे पंधरापैकी केवळ सातवे लष्करप्रमुख आहेत. पाकिस्तानच्या घटनेनुसार त्या देशाचे अध्यक्ष मियाँ मामून हसन यांनी अध्यादेशाद्वारे जनरल बाज्वा यांची नियुक्ती केली असली, तरी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची अनुमती त्यासाठी आवश्‍यक असते. सर्वांत वरिष्ठ जनरल आणि भावलपूर कोअर कमांडर, लेफ्टनंट जनरल झुबेर महमूद हयात यांना लष्करी दलांच्या प्रमुखांच्या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. नवाझ शरीफ यांनी माजी लष्करप्रमुख राहील शरीफ यांचं यावरचं मतसुद्धा ग्राह्य धरलं असणार. नवाझ शरीफ तुर्कमेनिस्तानच्या दौऱ्यावरून परत येताच करण्यात आलेल्या या नियुक्‍त्यांमुळे लष्कर आणि प्रशासन यांनी यासाठी एकमतानं आणि समन्वयानं काम केल्याचं स्पष्ट झालं आहे.

बाज्वा जाट जमातीला, पाकिस्तानमधल्या पंजाबच्या सियालकोट नौशेरा भागात ‘बहिरी ससाण्यांचा थवा’ असं म्हणतात. जनरल याह्याखान आणि अशफाक कियानी यांच्यानंतर बलुच रेजिमेंटचे ते तिसरे लष्करप्रमुख आहेत. जनरल बाज्वा लहानपणापासून सैनिकी पार्श्‍वभूमीचे असल्यामुळे जमिनीवरच्या लढाईत ते पारंगत आहेतच; पण पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी असलेल्या निकट सान्निध्यामुळे पंतप्रधानांनी मनात आणलं, तर भारत - पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेत ते कदाचित खीळ घालणार नाहीत, असाही होरा करता येतो. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरचा सामरिक आणि प्रसासकीय नागरी गुंतागुंत (सिव्हिल अँड मिलिटरी कॉप्लेक्‍सिटीज), सामरिक डावपेच (नेचर ऑफ ऑपरेशन्स) आणि जमिनी जडणघडण (ले ऑफ टेरेन) या सगळ्या गोष्टींची बाज्वा यांना कल्पना आहेच. त्यांनी बहुतांशी काश्‍मीरवर लक्ष केंद्रित केलं आहे. यंदा सप्टेंबर महिन्यापासून सीमेवर भारताकडून सुरू असलेल्या जबरदस्त भडीमारामुळे कदाचित जनरल बाज्वा संघर्षविरामासाठी तयार होतील, असादेखील होरा करण्यात येतो. अर्थात असं असलं, तरी ‘सीमेपलीकडून हल्ले न थांबल्यास बाज्वा पूर्ण क्षमतेनं हल्ला करतील,’ असं नार्दर्न एरियामध्ये कमर बाज्वा यांच्यासमवेत कार्यरत असलेल्या मोहंमद इर्फान यांचं मत आहे.

कमर जावेद बाज्वांचं नेतृत्व आल्यामुळे, ‘भारताविरुद्ध शत्रुत्व’ हाच मूलमंत्र असणाऱ्या पाकिस्तान लष्कराकडून, भारत- पाकिस्तान सामरिक संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. फक्त त्यांचा विखार जनरल राहील शरीफ यांच्यापेक्षा कमी राहील की जास्त, हे पाहणं औत्सुक्‍याचं असेल. लष्करप्रमुख पदासाठी निवड होत असताना बाज्वा यांना ते अहमदिया जमातीचे असल्यामुळे हे पद देण्यात येऊ नये, अशा अपप्रचाराला देखील सामोरं जावं लागलं. असं असलं, तरी संरक्षणतज्ज्ञांच्या मते, बाज्वा ‘जेन्युइन मिलिटरी मॅन’ असल्यामुळं, राजकारणापासून दूर राहणंच पसंत करतात. कारण जवानांबरोबर मिसळायला त्यांना आवडतं; तसंच शिष्टाचार आणि टेंभा मिरवणं यांपासून ते दूरच असतात.

आपला पदभार सांभाळताच बाज्वा यांना पाकिस्तानला भेडसावत असणाऱ्या खालील बाबींना तोंड द्यावं लागेल. अ) भारतालगतच्या पूर्व सीमेवरच्या सामरिक मोहिमा किंवा सामरिक शांतीसाठी सरकारच्या अतिस्पष्ट आदेशांची प्रतीक्षा, ब) राहील शरीफ यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन झर्ब-ए-अब्ज’मुळे उत्तर वजिरीस्तान भागातल्या सामरिक वर्चस्वाचा आवाका वाढवणं, क) ‘बहरखिलाफ’ या बलुचिस्तानमधल्या जिहादी संघटनेबाबतच्या गुप्तचर माहितीसंकलनात लक्षणीय वाढ करणं, ड) साजिद मीर या ‘जमियत अहले हाडिथ’ या संघटनेच्या प्रमुखास संरक्षण दलांमध्ये, विशेषकरून लष्करप्रमुखांच्या निवडीच्या वेळी शिया - सुन्नी वाद वाढवून धार्मिक संघर्ष निर्माण करण्यासाठी अटक करणं आणि त्या संघटनेवर बंदी घालणं, इ) चीनच्या आर्थिक महामार्गाला संरक्षण प्रदान करून चीनवर आपला दबदबा कायम ठेवणं आणि फ) लष्कर आणि प्रशासन दोघांनी एकमेकांना शिंगावर न घेता, आपापल्या क्षेत्रांमध्ये कार्यरत होऊन पाकिस्तानला अपेक्षित कामगिरी बजावणं.
जनरल कमर जावेद बाज्वा यांची भारत, अफगाणिस्तान आणि आण्विक प्रश्‍नांबाबत; पाकिस्तानच्या संरक्षण आणि परराष्ट्रधोरणांबाबत अनेक स्वमतं असतील, यात शंकाच नाही. कदाचित त्यांची कार्यशैली वेगळी असण्याची शक्‍यता आहे. पाकिस्तान संरक्षणतज्ज्ञांच्या मतानुसार, आधीच्या लष्करप्रमुखांनी नेहमीच तत्कालीन पंतप्रधानांच्या धोरणांना आव्हान दिलं, तसंच बाज्वासुद्धा ‘लष्कराचं हित’ मनात ठेवून, थोड्या दिवसांनी करतीलच. सुरवातीला बाज्वा यांची प्रतिमा वादातीत, ‘लो प्रोफाइल’च असेल- कारण त्यांना स्वतःच्या मर्जीची टीम उभी करायची आहे. त्यामध्ये राहील शरीफ यांचे निकटवर्ती असणारे, आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांच्या जागी आपला माणूस आणणं, हे त्यांचं पहिलं काम असेल. अशा सगळ्या बदलांना पाकिस्तानमध्ये अतिशय चिकित्सक दृष्टीनं पाहिलं जात असलं, तरी शेवटी भारत बाज्वा यांना कसा प्रतिसाद देतो, यावरच भारत - पाक सामरिक संबंधांचं भवितव्य अवलंबून असेल.

 

Web Title: abhay patwardhan's article in saptarang