एक होता 'कॉमेडियन' (अभिजित पानसे)

अभिजित पानसे abhijit.panse.1@gmail.com
रविवार, 12 ऑगस्ट 2018

"स्टॅंड-अप कॉमेडियन'च्या आयुष्यावरची "ह्युमरसली युवर्स' ही एक धमाल वेब सिरीज. अमित गोलानी दिग्दर्शित ही मालिका खुसखुशीत आहे. विपुल गोयल या लोकप्रिय स्टॅंड-अप कॉमेडियननं साकारलेली मुख्य व्यक्तिरेखा, नेहमीच्या कलाकारांबरोबर प्रत्यक्षातल्या काही स्टॅंड-अप कॉमेडियननी साकारलेल्या इतर भूमिका, छोट्याछोट्या प्रसंगांतून मांडलेली निरीक्षणं, खरपूस टिप्पण्या यांमुळं "ह्युमरसली युवर्स' अतिशय मनोरंजक झाली आहे. समकालीन विनोद असलेल्या या वेब सिरीजविषयी...

"स्टॅंड-अप कॉमेडियन'च्या आयुष्यावरची "ह्युमरसली युवर्स' ही एक धमाल वेब सिरीज. अमित गोलानी दिग्दर्शित ही मालिका खुसखुशीत आहे. विपुल गोयल या लोकप्रिय स्टॅंड-अप कॉमेडियननं साकारलेली मुख्य व्यक्तिरेखा, नेहमीच्या कलाकारांबरोबर प्रत्यक्षातल्या काही स्टॅंड-अप कॉमेडियननी साकारलेल्या इतर भूमिका, छोट्याछोट्या प्रसंगांतून मांडलेली निरीक्षणं, खरपूस टिप्पण्या यांमुळं "ह्युमरसली युवर्स' अतिशय मनोरंजक झाली आहे. समकालीन विनोद असलेल्या या वेब सिरीजविषयी...

हास्य हा नवरसांतला एक रस. माणसाच्या जीवनातल्या सगळ्यात महत्त्वाचा आणि हवाहवासा वाटणारा रस. हा रस आयुष्यात असला, की मग जीवन रसरशीत होऊन जातं. हास्य निर्माण होतं विनोदातून. हे विनोद निर्माण होतात आजूबाजूच्या परिस्थितीतून, मानवी व्यवहारातून, शाब्दिक देवाणघेवाणीतून, विरोधाभासातून. ज्यांच्याकडं विनोदबुद्धी असते ते आपल्या शब्दांतून, कृतीतून, तो विनोद स्पष्टपणे अधोरेखित करून लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतात आणि लोक मनमुराद आनंद घेतात. लोकांच्या चेहऱ्यावर स्मित उमटतं. असे विनोद लोकांपर्यंत पोचवणाऱ्या वाहकाला "कॉमेडीयन' म्हणतात. एकट्यानं उभं राहून लोकांना विनोदी किस्से सांगत हसवणाऱ्याला "स्टॅंड-अप कॉमेडीयन' म्हणतात. ही "स्टॅंड-अप कॉमेडी' हे काही खाण्याचं काम नाही. भारतात काही प्रसिद्ध "स्टॅंड-अप कॉमेडीयन्स' आहेत. त्यातले काही टीव्हीवर दिसतात; पण जे टीव्हीवर येऊ शकत नाहीत त्यांना इंटरनेटचा अक्षय वटवृक्ष आपला आश्रय देतो. विपुल गोयल हे असंच या क्षेत्रातलं एक खूप लोकप्रिय नाव. त्याची लोकप्रिय सिरीज आहे "ह्युमरसली युवर्स.' एक अप्रतिम खुसखुशीत वेब सिरीज. आजकाल पारंपरिक विनोद लोकांना भावत नाही. आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी, अपडेटेड विनोद, किस्से त्यातून "रिलेवंट' विनोद, वाक्‍यं लोकांना जास्त हवी असतात. टीव्हीएफ हा भारतीय वेब सिरीज विश्वातला डॉन ब्रॅडमनच. यावरचे विनोद कायम "अपडेटेड' आणि "रिलेवंट' असतात. याच टीव्हीएफनं विपुल गोयलची "ह्युमरसली युवर्स' ही एका स्टॅंड-अप कॉमेडीयनच्या आयुष्यावरची सिरीज सादर केली आहे.

विपुलनं स्वतःच्याच नावानं मुख्य व्यक्तिरेखा साकारली केली आहे. त्याच्या पत्नीची भूमिका हिंदी नाट्य क्षेत्रातली गुणी कलाकार रसिका दुग्गल हिनं केली आहे. या पाच भागांच्या मालिकेत एका स्टॅंड-अप कॉमेडीयनचं आयुष्य, त्यातल्या गंमतीजमती दाखवल्या आहेत. प्रत्येक भाग मनोरंजक झाला आहे. यातले संवाद हा सर्वोत्तम भाग. लिखाण अमित गोलानी, आनंदेश्वर द्विवेदी आणि विपुल गोयल यांनी केलंय. अमित गोलानी हा टीव्हीएफचा महत्त्वाचा कलाकार आहेच. आनंदेश्वर द्विवेदी "पर्मनंट रूममेट्‌'मधल्या लिओ या पात्रामुळं फार लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाला आहे. यावेळी या दोघांनी कॅमेऱ्यामागं काम केलंय. पहिल्या भागात अमित गोलानीनं छोटी; पण महत्त्वाची भूमिका केली आहे. तो भाग एका कलाकाराच्या मॅनेजरबद्दल आहे. इथं पहिल्याच बॉलवर "ह्युमरसली' सिरीजनं षटकार मारलाय. दुसऱ्या भागात विपुल स्वतःच स्वतःचा खोट्या नावानं मॅनेजर बनतो. आवाज बदलून फोनवर संवाद साधतो. या भागाचा शेवट मस्त आहे. तिसरा भागातल्या स्टॅंड-अप कॉमेडीचा व्हिडिओ वायरल झाला होता. स्वच्छ भारतापासून इतर अनेक गोष्टींवर खुसखुशीत अप्रतिम विनोद विपुलनं केले आहेत.

रसिका दुग्गल ही स्वतः अप्रतिम अभिनेत्री आहे. ती कोणत्याही भूमिकेत शिरू शकते. मालिकेत, घरी मांजर पाळायचं का यावरून त्या दोघांचा संवाद आणि विपुलचं त्यावरचं "स्पीच' हे मस्ट वॉच आहे. "ह्युमरसली युवर्स' या वेब सिरीजचा शेवटचा भाग अप्रतिम आहे. त्यातलं पहिलं विमानातलं दृश्‍य तर खूपच मस्त. विपुलची संपूर्ण मेहनत म्हणजे त्याचा कंटेंट त्याच्या चुकीनं इंटरनेटवर अपलोड होतो आणि त्याच्याकडं कार्यक्रमासाठी नवा "कंटेंट'च उरत नाही. दात होते तर चणे नव्हते आणि आता चणे आहेत तर दात नाहीत, अशी त्याची अवस्था होते. तेव्हा त्याचा मित्र त्याला व्हिडिओ गेमचं उदाहरण देतो. या सिरीजच्या शेवटच्या भागातला शेवटचा प्रसंग म्हणजे सिरीजचा शेवटचा प्रसंग शब्दातीत आहे. संपूर्ण सिरीजमधला सर्वोत्तम प्रसंग. जीवनाकडं आणि मृत्यूकडंही बघण्याचा दृष्टिकोन बदलवून टाकणारा हा प्रसंग.
एकूणच कुठंही काही जड उपदेश न देता एक अत्यंत हलकीफुलकी मनोरंजन करणारी, मनाला भिडणारी ही सिरीज. यात अनेक "क्‍लिशे'ही मोडण्यात आले आहेत. पारंपरिक कल्पनांना सकारात्मकरित्या छेद देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, यात पत्नी नोकरी करणारी, तर विपुल हा घर सांभाळणारा. घरी कोणती नवी वस्तू विकत आणायची असेल, तर त्याला पत्नीला पटवून द्यावं लागतं. घराचं बजेटही पत्नीच बनवते. प्रत्येकांच्या ग्रुपमध्ये, शाळेत, कॉलेजमध्ये कोणी तरी एक जण विनोद सांगणारा असतोच. तो किंवा ती कायम इतरांना हसवत असतात. असे लोक कायम सगळयांना हवेहवेसे वाटतात. स्टॅंड-अप कॉमेडीयनही हेच करतात. फक्त तो त्यांचा व्यवसाय असतो. स्टॅंड-अप करायला हिंमत तर लागतेच; पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आजूबाजूच्या गोष्टींसोबत "अपडेटेड' असणं. विपुल या बाबतीत अगदी आदर्श आहे. तो तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय आहे. त्याचा काहीसा खर्जातला आवाज त्याच्या व्यक्तिमत्त्वाला योग्यपणे सूट होतो. या सिरीजमध्ये विपुल एक सज्जन, प्रामाणिक नवरा, माणूस, मित्र दाखवलाय. सिरीज इतकी परिणामकारक झाली आहे, की सिरीजमध्ये विपुलच्या व्यक्तिरेखेचं आयुष्य हे प्रत्यक्षातल्या विपुलचंच आयुष्य वाटायला लागतं.

अमित गोलानी दिग्दर्शित ही मालिका अतिशय धमाल आहे. विपुलचे घरातले प्रसंग, अभिषेक बॅनर्जी या अभिनेत्यानं रंगवलेल्या भुशी या त्याच्या मित्राबरोबरचे प्रसंग, तन्मय भट्ट, कानन गिल, अबिश मॅथ्यू अशा प्रत्यक्षातल्या स्टॅंड-अप कॉमेडियननी साकारलेल्या व्यक्तिरेखा, छोट्या छोट्या प्रसंगांतून मांडलेली निरीक्षणं, खरपूस टिप्पण्या यांमुळे "ह्युमरसली युवर्स' अतिशय मनोरंजक झाली आहे. समकालीन विनोद, स्टॅंड-अप कॉमेडियनच्या आयुष्यातले माहीत होणारे प्रसंग असं सगळं असलेली ही वेब सिरीज चुकवायला नकोच.

Web Title: abhijeet panse write article in saptarang