जावे त्याच्या वंशा (अभिजित पानसे)

abhijeet panse
abhijeet panse

पलीकडच्या बाजूचं गवत नेहमीच हिरवं दिसतं. अनेक पुरुषांनाही स्त्रियांना जास्त सवलती मिळतात वगैरे वाटत असतं. "मेन्स वर्ल्ड' ही वेब सिरीज याच एकांगी विचारांना छेद देते. पुरुषप्रधान संस्कृतीवर खरा झोत टाकणाऱ्या या सिरीजविषयी...

पलीकडील बाजूचं गवत नेहमीच हिरवं दिसतं. ही आपली सर्वसामान्य मानसिकता आहे; पण "जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे.' व्यक्तीला, जनसमूहाला, समाजाला, किंवा स्त्री आणि पुरुष यांनाही स्वतःचं आयुष्य, प्राप्त परिस्थितीबद्दल कधीतरी वैषम्य वाटतंच. इतरांचं आयुष्य सोपं असतं असं वाटतं, त्याबद्दल असूया वाटते आणि कधी तरी हा विचार मनात येतोच, की जर ही स्थिती, हा समाज, हे जग आहे त्यापेक्षा वेगळं असतं तर, मी त्यांच्या जागी असतो वा असते तर..

हे जग पुरुषप्रधान आहे, इथं पुरुषाचं वर्चस्व असतं. स्त्रीची पिळवणूक होते. एकट्या स्त्रीला जगण्यात नेहमी अडचणी येतात. मात्र, तरीही अनेक पुरुषांना वाटतं, की स्त्रियांना जास्त सवलती मिळतात, त्यांना जास्त मदत, पाठिंबा मिळतो. सर्व जबाबदारी पुरुषांनाच घ्यावी लागते वगैरे वगैरे.... पण "जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे!' संबंधित व्यक्ती, वा समूहाच्या बुटांमध्ये स्वतः पाय टाकून बघितल्याशिवाय त्या त्या व्यक्ती, व्यक्ती समूहाच्या अडचणी, जाबाबदारी, व्यथा समजू शकत नाही. पलीकडचं गवत नेहमीच हिरवं दिसतं; पण जर पलीकडं जाऊन ते गवत खरंच "हिरवं'आहे का बघता आलं तर? तेव्हा कदाचित सत्य समजू शकेल.... आणि ते कळल्यावर तरी आपली मानसिकता बदलेल का? वाय फिल्म्सची "मेन्स वर्ल्ड' ही वेब सिरीज जबरदस्त प्रभावशाली भाष्य करते.

ही वेब सिरीज उच्च दर्जाची आहे. विनोदी आवरण आहे; पण खोल विचार आहे. विचार करायला लावणारी आहे. किरण नावाचा एक तरुण मुलगा स्त्रियांना मिळणाऱ्या सवलती, कामाच्या जागी त्यांना मिळणारी मदत वगैरेबाबतचे एकांकी विचार, पूर्वग्रहदूषित दृष्टीमुळं त्रस्त असतो. एक दिवस तो दारूच्या नशेत देवाला प्रार्थना करतो ः "हे जग, यातल्या परंपरा, पद्धती, विचारप्रक्रिया पूर्णपणे उलट होऊ दे. त्याच्यानुसार स्त्रियांना मिळणारी खास वागणूक बदलून हे जग स्त्रीप्रधान व्हावं आणि पुरुषांना खास वेगळी वागणूक मिळावी.' किरणची मागणी पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी तो उठतो, तर हळूहळू त्याच्या लक्षात येत जातं, की त्याची मागणी, प्रार्थना मान्य झाली आहे. "लडका है अपने औकात मे रहो!', "आजसे तुम्हारा काम वाम सब बंद, बाहर घुमना बंद! अब बस तुम्हारी शादी होगी.. और वो भी मै जिस लडकी के साथ बोलुंगी उसीसे..' वगैरे वाक्‍यांचा भडीमार किरणवर होऊ लागतो. बसमध्ये "फक्त पुरुषांसाठी' जागा आरक्षित असतात. "मेन्स युनिव्हर्सिटी' दिसते. मॅक्‍डोनाल्डच्या जागी "मॅक्‍डोना' होते. हे सगळं झाल्यावर किरणला या जगाचेही तोटे, पुरुषांचे आणि स्त्रियांचे प्रश्न, अडचणी कळू लागतात. त्याला आता हे जग नकोसं वाटू लागतं.

शेवटी एकदा रात्री उशिरा एकट्या "पुरुषाला' पाहून विनयभंग करणाऱ्या समाजकंटक मुली त्याला त्रास देतात, पोलिसांतही त्याला दाद मिळत नाही. तेव्हा त्या एकट्या पुरुषाला एक "जेंटलवूमन' वाचवते. तेव्हा किरण तिला सांगतो, की या सर्व प्रकाराला तोच जबाबदार आहे. हे दृश्‍य आणि त्या मुलीचे संवाद खूप अप्रतिम आहेत. ती "जेंटलवूमन' किरणला जग आधीसारखं व्हावं म्हणून पुन्हा प्रार्थना करायला सांगते आणि तो प्रार्थना करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो. त्याला जाणवतं, की तो एका स्वप्नातून जागा झालाय. या सिरीजचा जो शेवट केलाय तो अप्रतिम. पूर्णपैकी पूर्ण गुण जातात ते लेखकाला आणि दिग्दर्शक विक्रम गुप्ताला. या शेवटामुळं ही वेब सिरीज एक उच्च दर्जा गाठते. हिंदीमध्ये खूप चांगल्या वेब सिरीज तयार होताहेत. "मेन्स वर्ल्ड' ही त्यातल्या सर्वोत्तमपैकी एक.

युनायटेड नेशन्सनं "सुटेबल डेवलपमेंट' हे ध्येय समोर ठेवून "ग्लोबल गोल्स' या संकल्पनेचा पुरस्कार केला आहे. यात त्यांचे पाच गोल्स आहेत. त्यातला एक म्हणजे लैंगिक भेदभाव दूर करून स्त्री-पुरुषांना समसमान वागणूक आणि संधी उपलब्ध करून देणं हा. यशराज फिल्म्सनं या गोलला पाठिंबा दर्शवत "ग्लोबल गोल्स' या संस्थेसोबत मिळून चार भागांच्या "मेन्स वर्ल्ड' या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. वाय फिल्म्सची सिरीज असल्यानं यातलं कास्टिंग चांगलं आहेच. गौरव पांडे या अभिनेत्याची प्रमुख भूमिका आहे आणि त्यानं आपल्या भूमिकेला संपूर्ण न्याय दिला आहे. शिवाय यात परिणिती चोप्रा, कल्की कोचलिन, भूमी पेडणेकर, रिया चक्रवर्ती या प्रसिद्ध अभिनेत्रींनीही काम केलंय. त्यामुळंही या सीरिजचा दर्जा वधारला आहे.

या प्रकारच्या विषयावर इंग्लिश, मराठी, हिंदी चित्रपट आले आहेतच; पण इतका तरल भाव दर्शवणारी, खोल प्रभाव पाडणारी विचार करायला लावणारी, प्रसंगी अंगावर शहारे आणणारी कलाकृती हीच प्रथम असावी. आहेच. वरवर विनोदी आवरण असलेली; पण मुळीच उथळ नसलेली ही कलाकृती आहे. कुठलेही उपदेश ना देता नेमक्‍या गोष्टीवर भाष्य करणारी, मनोरंजन करत मनाला अस्वस्थ करणारी ही कलाकृती. सामाजिक संदेश देतानाही एकसुरी, शब्दबंबाळ नसलेली ही नेट सिरीज. स्त्रियांच्या अडचणीचं, भावविश्वाचं, व्यथेचं तंतोतंत दर्शन आणि अनुभव करून देणारी ही कलाकृती "मस्ट वॉच' आहे.

"ये दुनिया हम औरतों की होकर भी हमारी नही है! बाप की बापता सबको दिखायी देती है लेकीन मॉं की ममता किसीको नही. इमोशनल हो जाये तो सब कहते है "बाप की कसम' कहते है- "मॉं की कसम' कोई नही कहता! "फादर इंडिया' सुपर हिट हुई लेकीन "मदर इंडिया' कभी फिल्म बनही नही सकती...' हे संवाद बदलेल्या स्त्रीप्रधान जगातल्या एका स्त्री पात्राचे आहेत. यातून आपल्या मुळातच एकंदर मानसिकतेवर लेखकानं तिरकस प्रकाश टाकला आहे. अत्यंत गांभीर्यानं या सिरीजची निर्मिती केली गेली आहे, हे प्रत्येक नेटिसोड बघताना जाणवतं. चारही भाग अप्रतिम जमले आहेत. "व्हॉट इफ वुमेन ट्रीटेड मेन द वे मेन ट्रीट वुमेन' अशी टॅगलाईन असलेली "मेन्स वर्ल्ड' ही वेब सिरीज समस्त स्त्री-पुरुषांनी नक्कीच बघावी अशी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com