नमस्ते ‘योगा’ (अभिजित पानसे)

नमस्ते ‘योगा’ (अभिजित पानसे)

‘नमस्ते बीच’ ही एक धमाल अशी वेब सिरीज आहे. योग आणि अध्यात्म या गोष्टींचा वरवर वापर करणाऱ्या आणि उगीचंच स्वतःला वेगळं समजणाऱ्या विशिष्ट वर्गावर तिरकस आणि गंमतिशीर टिप्पणी करणाऱ्या या वेब सिरीजविषयी.

दर दोन मिनिटानंतर ‘कसं असतं ना...!’ अशा वाक्‍यानं सुरवात करणं, अगदी ठराविक ‘टीव्ही सिरिअलबाज’, साचेबद्ध भाषा बोलणं, प्रेक्षकांच्या अंगावर ‘क्‍लोजअप्स’चे धाडधाड आवाज करणारे बॉम्बगोळे फेकून त्यांच्या नेत्र आणि मनाला विदीर्ण करणं, सासूचे ‘चार दिवस’च सांगून ते हजारांच्याही पलीकडं नेणं, किंवा अगदी चावूनचावून चोथा झालेल्या विषयांचं रवंथ करणं अशा या सर्व कारणांमुळं घरातल्या तरुण मंडळींसकट बुद्धिवादी, चाणाक्ष लोकांचं त्यांच्याच घरात रोज सायंकाळी सहा ते दहा या वेळेत ‘मानसिक शोषण’ होतं; पण सांगणार कुणाला, करणार काय? अशा वेळी चार तास आपापले मोबाईल काढून सोशल वेबसाइट्‌सवर रमणं असा एक पर्याय या सोशिक बुद्धिवादी मंडळीकडं असतो.

टीव्ही मालिकांच्या रुक्ष, एकसुरी रखरखीत वाळवंटाच्या गावात ‘लगान’मधल्या गावकऱ्यांप्रमाणं आम्ही मंडळी आकाशाकडं डोळे लावून होतो... आणि अचानक टीव्ही मालिकांच्या या शुष्क वाळवंटात आम्हा हेल्दी मनोरंजन आवडणाऱ्या गावकऱ्यांसाठी ‘घनन घनन घन...बदलिया बरसे..’ या गाण्यासारखा इंटरनेटरूपी, ‘युट्यूब’रूपी ‘ॲप’रूपी ‘वरुणदेव’ धावून आला.

येस्स! ‘ते आले... त्यांनी पाहिलं... (आम्हीही त्यांना पाहिलं) आणि ते जिंकलेत.. जिंकताहेत!’ या ‘लाइफ सेव्हर’ गोष्टीचं नाव म्हणजे ‘वेब सिरीज!!’
टीव्ही वा चित्रपटांत संवादाचा भाषेचा स्तर वापरताना, दृश्‍य दाखवताना सेन्सॉर बोर्डाची टांगती कात्री डोईवर सतत असते. त्यामुळं मनाप्रमाणे हवं ते (आणि प्रेक्षकानाही हवंच असतं ते) दाखवता, बघता येत नाही. त्यामुळंच कदाचित साचेबद्ध संवाद, चोथा झालेले विषय टीव्ही मालिकांमध्ये असल्यामुळं वापरत असावेत. असले संवाद चाणाक्ष प्रेक्षकांच्या अंगावर येतात, डोक्‍यात जातात; पण वेब सिरीज मात्र ‘युट्यूब’वर किंवा त्यांच्या ‘ॲप’वर असल्यामुळं तिथं सेन्सॉरची कात्री नसते, ‘प्रेक्षकशरण’ तंत्राची गरज नसते, विशिष्ट वेळेचं बंधन नसतं, प्रायोजकांचं दडपण नसतं. त्यामुळं वेब सिरीजमध्ये ताजे पदार्थ तुमच्या ताटात मोकळेपणानं वाढलेले असतात. प्रेक्षक त्याचा मनापासून आस्वाद घेतात, हे वेगळं सांगायला नकोच. आणि आजच्या इंटरनेट पिढीचं (यात तरुण- ज्येष्ठ, नवी- जुनी पिढी असा भेदभाव नाही) हे वाक्‍यच आहे ‘गूगल हमारी माता है और युट्यूब हमारा पिता!’ पाच मिनिटाच्या एपिसोडनंतर दहा मिनिटांचा ब्रेक, जाहिराती हा मनःस्ताप वेब सिरीजमध्ये नसतो. इथं सासूचे ‘चार दिवस’ चार हजार ना होता खरंच चार ते पाचच असतात. त्यामुळं थोडक्‍यात मजा होते आणि ‘अति परिचयात अवज्ञा’ टळते. बहुतेक वेब सिरीजचे जास्तीत जास्त पाच ते सात एपिसोड्‌स असतात. पण याच्याहीपेक्षा सगळ्यांत जमेची बाजू म्हणजे निरनिराळ्या, नाजूक, जड विषयांना हात घालून या सिरीज तयार केल्या जातात. हे विषय प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच हात घालतात, स्पर्श करतात. या सगळ्या कारणांमुळंच वेब सिरीजचं प्रस्थ, क्रेझ वाढतेय. भारतात हिंदी आणि आता प्रादेशिक भाषांत वेब सिरीजची निर्मिती होण्यापूर्वीच काही वर्षांपासूनच विदेशात वेब सिरीजचं प्रस्थ आणि त्याचा चाहता वर्ग तयार झालाय. अनेक प्रसिद्ध , सुपरहिट लोकप्रिय इंग्लिश वेब सिरीज भारतातही लोकप्रिय आहेत. यातल्या अनेक वेब सिरीजचे ‘सीझन्स’ काही वर्षांपासून सुरू आहेत. या सिरीज बघताना कधी वेळ जातो कळत नाही आणि कधी सीझन संपतो जाणवतही नाही. सीझन संपल्यावर मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होते, आता काय करायचं? पुढचा सीझन कधी येणार? हे ‘सीझनल फ्रूट’ पुन्हा कधी खायला मिळणार?... असे प्रश्‍न मनात तयार होतात. अर्थात काही सिरीज या ‘सीझनल’ नसतात. चार ते पाच एपिसोडस्‌मध्ये संपतात. या सिरीजही लोकप्रिय आहेत याचे म्हणजे कारण त्यांची वाट बघत बसावं लागत नाही.

‘नमस्ते बीच’
‘नमस्ते बीच’ ही अशीच एक अगदी शॉर्ट वेब सिरीज आहे. मुख्य म्हणजे या वेब सिरीजला भारतीय स्पर्श आहे. सध्या अध्यात्म ही ‘इन थिंग’ आहे. अगदी उच्चभ्रू वर्गीयांमध्ये आणि पाश्‍चिमात्य देशातही अध्यात्म आपलंसं केलं जाताना दिसतंय. ‘स्पिरिचुअली लिबरटेड’ असणं; ‘ऑरा’, ‘स्पिरीच्युॲलिटी’, ‘एनर्जी’, ‘वाइब्स’, ‘ग्रॅटिट्यूड’ असे जड शब्द वापरणं, ऋषिकेश वा हिमालयातील एखाद्या ‘योगा’ (‘योग’ नाही बरंका!) आश्रमात जाणं अशा गोष्टी एका विशिष्ट वर्गात वाढायला लागल्या आहेत. अशातच जिमपेक्षा ‘योगा’ क्‍लासला जाणे हे ‘स्पिरिचुअल’ वगैरे मानलं जाऊ लागलं आहे. या सगळ्या गोष्टींवर तिरकसपणे भाष्य करणारी ही धमाल वेब सिरीज.
‘सबिन’ ही एक अमेरिकी मुलगी लॉस अँजलिसला स्थायिक व्हायला येते. तिथं ती एका योग क्‍लासमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करते. तिथं गेल्यावर तिला वेगळंच चित्र दिसतं. त्या योग क्‍लासमध्ये फक्त ‘शो ऑफ’, ‘पब्लिसिटी’ यालाच महत्त्व असतं. तिला सुरवातीलाच तिचे इन्स्टाग्रामवर ‘फॉलोअर्स’ किती आहेत, विचारलं जातं. अरे हो! फेसबुक, ट्विटर हे हल्ली आऊटडेटेड मानलं जातं बरंका; सध्या ‘इन्स्टाग्राम’ इज ‘न्यू कूल!’

...तर आपल्या सबिनचं एकूण ‘योगा टीचर’ म्हणून काम सुरू होतं. तीसुद्धा प्रथम नवी असल्यानं अवघडते, प्रामाणिक काम करते आणि हळूहळू रुळते. तिथल्या व्यवस्थापनातल्या मुलींवर भारतीय योगा, अध्यात्माचा प्रभाव असल्यानं त्या हार्मोनियमवर ‘हरे राधे राधे...शाम’ गात असतात. आध्यात्मिक गोष्टींचं उगाच अवडंबर माजवणाऱ्या विशिष्ट वर्गातल्या व्यक्तींमध्ये जो उथळपणा असतो, तो या योगा क्‍लासमध्ये काम करणाऱ्या मुलींमध्येही असतो, त्यामुळं सतत तोंडात, ‘थॅंक्‍यू’ऐवजी ‘ग्रॅटिट्युड’ हा शब्द आणि इतर गोष्टी आल्याच. ही मुळातच संपूर्णपणे विनोदी आणि विडंबन सिरीज असल्यानं बघताना मजा येते. एक दिवस तिच्याच क्‍लासमध्ये शिकणारा विद्यार्थीच तिच्याकडून शिकून स्वतःचा ‘योगा आणि प्राणायामा’ कोचिंग क्‍लास काढतो. मनुष्य कितीही नव्या  गोष्टींमध्ये स्वतःला ‘कूल’ म्हणवत गुंतू लागला, तरीही ताण आल्यावर तो मुळात जसा आहे तेच बाहेर येतं. अध्यात्माचा बुरखा जास्त वेळ पांघरता येत नाही. अंगावरची खोळ एक दिवस पडतेच. त्याचप्रमाणे एक दिवस ती ड्रग्स घेते. सबिना परिपूर्ण नसतेच. भारतीय योग शिकवताना ती प्राणायामाच्या, शवासनाच्या ऐवजी भलतंच शिकवते; पण तिथल्या विद्यार्थीही नुसतेच ‘शोऑफ’साठी येत असल्यानं त्यांना ते आवडतं. चुकीच्या गोष्टी शिकवल्यामुळं सबिनावर दुष्परिणाम होत नाही, तर उलट त्या दिवसापासून तिचेही इन्स्टाग्रामवर ‘फॉलोअर्स’ वाढतात. तीही स्वतःचे योगा करतानाचे फोटोज ‘इन्स्टाग्राम’वर टाकते. याचसाठी केला होता अट्टाहास! तर अशी ही ‘नमस्ते बिच’ ही वेब सिरीज. तिला असलेला भारतीय स्पर्श आणि एकूणच तिरकसपणानं केलेलं छान भाष्य यांमुळं ही इंग्लिश वेब सिरीज बघण्यात मजा येते.ही सिरीज तिच्यात ‘सबिन’ची भूमिका साकारणाऱ्या समर चेसंट हिनंच लिहिली आहे. ती या भूमिकेसाठी योग्यच वाटते. या सिरीजमधली सर्वोत्तम गोष्ट म्हणजे यातील लिखाण, संवाद. अगदी मस्त विडंबन जमलंय. लेखिकेची निरीक्षणशक्ती यात दिसून येते.
या वेब सिरीजची एक वेगळी आणि माझ्यासाठी आवडती बाजू म्हणजे ही अगदी छोटी सिरीज आहे. अर्ध्या तासात संपूर्ण सिरीज बघून होते. इतर सिरीजप्रमाणे पुढील सीझन्सची वाट बघावी लागत नाही, शिवाय अगदी छोटे भाग आहेत. एक गंमतीदार, हलकीफुलकी अशी ही वेब सिरीज तुम्हीही बघा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com