पाचव्या मजल्यावरची युवती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Building
पाचव्या मजल्यावरची युवती!

पाचव्या मजल्यावरची युवती!

- अभिषेक शेलार abhishekshelar2@gmail.com

पाचव्या मजल्यावर पोहोचताच, अमित डावीकडील, तर राहुल उजवीकडील बटणं बंद करण्यास वळले. राहुलचा घाबरलेला चेहरा आठवून अमितला हसू आवरत नव्हतं. हसत हसतच तो दिवे बंद करण्यासाठी बटणांच्या दिशेने पावलं टाकू लागला व काही वेळातच कोपऱ्यातील त्या वर्गाजवळ येऊन पोहोचला. त्या वर्गाबाहेर थोडा प्रकाश होता. अचानक त्याला हवेत गारवा जाणवला व कुबट वास येऊ लागला. एखादा प्राणी खूप दिवसांपासून मरून पडला की त्या वेळी येतो तसा तो वास येत होता.

त्या वासाकडं आणि गारव्याकडं दुर्लक्ष करत दिवे बंद करण्यासाठी तो बटणं बंद करायला लागला, त्यासाठी त्याचा हात बटणाकडं गेला आणि त्याला कोणीतरी दरवाजा ठोकत असल्याचा आवाज आला. त्याला तो त्याचा भास वाटला; परंतु नंतर तो आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला...

तो आवाज त्याच वर्गातून येत होता, ज्या वर्गाच्या बाजूला बटणं होती. वारा खूप सुसाट वाहत होता, त्यामुळेच दार वाजून तसा आवाज येत असावा असं अमितला वाटलं, म्हणून त्याने दरवाजा बाहेरच्या बाजूने घट्ट पकडून ठेवला. थोड्या वेळाने वारा शांत झाला तसा तो आवाजदेखील थांबला. अमितनेसुद्धा जास्त वेळ न दवडता पटापट मजल्यावरील बटणं बंद करून दिवे घालवले. मजल्यावर अंधार पसरला. तो राहुलला बोलावण्यास निघाला, तोच समोरून राहुलचा आवाज आला, ‘‘अमित!! अरे चल लवकर, खाली सर्वजण आपली वाट बघत असतील.’’ अंधार असल्याने अमितला समोरचं काही दिसत नव्हतं. ‘‘हो, अरे हा बघ आलोच,’’ असं म्हणत अमितने त्याच्या खिशातून मोबाईल काढला व त्याचा टॉर्च चालू करून समोरच्या दिशेला पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण समोर कोणीच नव्हतं.

‘राहुल!! अरे आवाज देऊन कुठं गायब झालास?’’ मोबाईलचा टॉर्च इतरत्र फिरवतच अमित बोलला; परंतु त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ‘‘हा सर्व काय प्रकार आहे? राहुलने मला खरंच आवाज दिला, की मलाच भास झाला? भासच असेल बहुतेक.’’ अमित स्वतःशीच बोलत होता. तो राहुलला शोधण्यास पुढे जाणार इतक्यात, मागून त्याला पुन्हा आवाज आला, ‘‘अमितssss मी इथं आहे... या वर्गात.’’ आता मात्र अमित चक्रावला, भीतीने हात-पाय गार पडायला लागले, कारण तो आवाज त्याच वर्गातून आला, जिथून अमित नुकताच दिवे बंद करून आला होता.

अमितला त्याच्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय याची जाणीव झाली होती; परंतु न राहून तो त्या वर्गाजवळ गेला आणि त्याने विचारलं, ‘‘राहुल, तू आत कसा काय गेलास? तू तर त्या बाजूला दिवे बंद करण्यासाठी गेलेलास ना?’’ परंतु आतून काहीच प्रतिसाद आला नाही.

वातावरणात एक प्रकारची गूढता निर्माण झाली होती, हवेतला गारवा वाढला होता, इतक्या थंड वातावरणातदेखील अमितला दरदरून घाम फुटला होता... तो कुबट वासदेखील आता अधिकच तीव्र झाला होता, एखाद्या सडलेल्या प्रेतासारखा.... अमितने घाबरून पुन्हा दिवे सुरू करण्याचा प्रयत्न केला; पण काय आश्चर्य... सर्व बटणं दाबूनसुद्धा एकही दिवा सुरू होत नव्हता. इतक्यात पुन्हा त्या वर्गातून कोणीतरी दार ठोकू लागलं. या वेळी ते दार आतून जोरात खेचलं जात होतं. ‘‘कोण आहे आत? राहुल, तू आहेस का आतमध्ये?’’ घाबरलेल्या आवाजातच अमित विचारत होता. तो दरवाजा पकडणार तोच मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अमितने घाबरतच मागे वळून पाहिलं आणि तो हादरलाच... मागे दुसरंतिसरं कोणी नसून राहुलच उभा होता. ‘‘अमित!! काय झालं, तू बरायस ना? इतका घाबरलेला का दिसतोयस? आणि एवढा घाम का आलाय तुला?’’ राहुल विचारू लागला.

‘अरे तू मघाशी या वर्गातून आवाज दिलेलास ना?’ घाबरलेल्या आवाजातच अमितने त्याला विचारलं. ‘वेडा आहेस का अमित तू? तुझ्यासमोर तर मी दवे बंद करायला गेलो ना? मी कसा काय असेन आणि तेसुद्धा या बंद वर्गात?’ राहुल प्रश्नार्थक नजरेनेच बोलत होता.

‘मग तू इतका वेळ कुठे होतास?’ न राहूनच अमितने विचारलं. ‘अरे मला घरून कॉल आलेला आणि इथे नेटवर्क भेटत नव्हतं म्हणून मी गच्चीवर गेलो होतो,’ राहुल सहजच बोलत होता.

राहुलचं हे उत्तर ऐकून अमितच्या छातीत चर्रर्र झालं. ‘जर तू गच्चीवर होतास, तर मग मघाशी मला अंधारातून आवाज कोणी दिला होता? आणि या वर्गातून तो आवाज आला... ओ माय गॉड, राहुल तू बरोबर बोलत होतास, या मजल्यावर कोणतीतरी वाईट शक्ती आहे. चल यार आपल्याला इथून लगेच निघायला हवं.’ अमित राहुलला समजावत होता.

अमितचं बोलणं ऐकून राहुलला कळून चुकलं की, त्याच्यासोबत काहीतरी घडलं आहे. आता दोघेही मनातून पूर्णत: हादरले होते. क्षणाचाही विलंब न करता ते तिथून निघणार, इतक्यात त्या वर्गाच्या दारावर पुन्हा आतून कोणीतरी जोरात थाप मारली आणि कानठळ्या बसतील इतक्या जोरात कर्णकर्कश किंकाळी त्यांना ऐकू आली. (क्रमशः)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :school girl
loading image
go to top