

National Education Policy India
esakal
नेदरलॅंडमधील एक वरिष्ठ राजकारणी सांगत होते, ‘‘आमचे टोकाचे राजकीय मतभेद असले, तरी राष्ट्रीय हिताचा विषय आल्यावर सर्व पक्ष एकत्र बसून, चर्चा करून एकमताने निर्णय घेतात. यामुळे सर्वांचेच सहकार्य मिळते.’’ आपल्या देशातही हे होऊ शकते, फक्त इच्छाशक्ती हवी...
‘एज्युकॉन’च्या निमित्ताने साधारण २-३ वर्षांपूर्वी आम्ही नेदरलॅंडला गेलो होतो. तेथील शैक्षणिक पद्धत भारत सरकारने आपल्या नवीन शैक्षणिक धोरणात आणण्याचे ठरविले होते, त्याला आता आपण नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) या नावाने ओळखतो. ‘एज्युकॉन’चा उद्देशच जगात शैक्षणिक क्षेत्रांत काय काय चांगले चालले, याची आपल्या देशातील शिक्षणप्रमुख, धोरणकर्ते, कुलगुरू इत्यादींना प्रत्यक्ष पाहता यावे, अभ्यासावेसे वाटावे हा आहे. ‘सकाळ’ गेली दोन दशके ही योजना प्रत्येक वर्षी राबवत आहे.
आजच्या या विषयाची आठवण अशासाठी आली, की आम्ही विविध देशांतली लोकांना भेटतो, चर्चा करतो. नेदरलॅंडमध्ये तेथील एक वरिष्ठ पातळीवरील राजकारणीसुद्धा होते. मी नेहमी तेथील वेगळेपण, व्यवस्था, कार्यपद्धती इत्यादी गोष्टींचा ऊहापोह त्यांच्याबरोबर करत असतो. राजकीय पक्ष आणि राजकीय मतभेद यांवर त्यांनी भाष्य केले. ते ऐकून मी थक्कच झालो. ते म्हणाले, ‘‘आमचे टोकाचे राजकीय मतभेद असले, तरी राष्ट्रीय हिताचा विषय आल्यावर सर्व पक्ष एकत्र बसून, चर्चा करून एकमताने निर्णय घेतात. यामुळे सर्वांचेच सहकार्य मिळते.’’ हे ऐकून भारतीय नागरिक सुद्धा बहुधा बेशुद्धच पडेल.