क्‍लाऊड कॉम्प्युटिंग (अच्युत गोडबोले)

achyut godbole
achyut godbole

इंटरनेटद्वारे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या बाबतीतली कुठलीही सेवा पुरवण्याच्या कल्पनेला ढोबळमानानं क्‍लाऊडची संकल्पना म्हणता येईल. ही सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अनेक मोठमोठे सर्व्हर्स विकत घेतात आणि ते नेटवर्कनं एकमेकांशी जोडतात. या सर्व्हर्सना अनेक मोठमोठ्या आणि सक्षम हार्ड डिस्क लावलेल्या असतात. या सर्व्हर्सवर आणि डिस्क्‍सवर ऑपरेटिंग सिस्टिम्स तर असतातच; पण वेगवेगळ्या युजर्सना लागणारी सॉफ्टवेअर पॅकेजेस ठेवलेली असतात. यामुळे प्रत्येक युजर कंपनीला आपले स्वतःचे सर्व्हर्स, नेटवर्क्‍स, हार्ड डिस्क्‍स, त्यावरचं सॉफ्टवेअर, त्यांच्यासाठी लागणारा मेंटेनन्सचा स्टाफ हे काहीच ठेवावं लागत नाही.

क्‍लाऊड कॉम्प्युटिंगची कल्पना तशी नवीन नाही. आपल्या आयुष्याचा ती एक भागच आहे. आपण ती रोज अनेकदा वापरतो. आपण एखादी ई-मेल बघतो किंवा यूट्युबवर व्हिडिओ बघतो किंवा गाणी ऐकतो, तसंच आपण फेसबुकवरचे फोटो बघतो तेव्हा आपण क्‍लाऊडच वापरत असतो. इंटरनेटच्या द्वारे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या बाबतीतली कुठलीही सेवा पुरवण्याच्या कल्पनेला ढोबळमानानं क्‍लाऊडची संकल्पना म्हणता येईल.

ही सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अनेक मोठमोठे सर्व्हर्स विकत घेतात आणि ते नेटवर्कनं एकमेकांशी जोडतात. या सर्व्हर्सना अनेक मोठमोठ्या आणि सक्षम हार्ड डिस्क लावलेल्या असतात. या सर्व्हर्सवर आणि डिस्क्‍सवर ऑपरेटिंग सिस्टिम्स तर असतातच; पण वेगवेगळ्या युजर्सना लागणारी सॉफ्टवेअर पॅकेजेस (उदा. एसएपी, पेरोल, ई-मेल, गेम्स, व्हिडीओज, गाणी..) ठेवलेली असतात. आता ही कंपनी अनेक युजर कंपन्यांना "क्‍लाऊडची सेवा' भाडेतत्त्वावर देऊ करते. यामुळे प्रत्येक युजर कंपनीला आपले स्वतःचे सर्व्हर्स, नेटवर्क्‍स, हार्ड डिस्क्‍स, त्यावरचं सॉफ्टवेअर, त्यांच्यासाठी लागणारा मेंटेनन्सचा स्टाफ हे काहीच ठेवावं लागत नाही. हे एवढं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विकत घेण्यापेक्षा क्‍लाऊडसाठी लागणारं भाडं स्वस्त पडतं आणि त्यामुळे त्यांच्यामागची कटकट कमी होते आणि कंपनीची जागाही वाचते.
यासाठी आपण वाचनालयाचं उदाहरण घेऊ. आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या तऱ्हेची पुस्तकं वाचायला हवी असतात; पण म्हणून प्रत्येकानं स्वतःचं स्वतंत्र असं वाचनालय निर्माण केलं तर काय होईल? यासाठी किती खोल्या, इमारती, फर्निचर, पुस्तकं लागतील? याचा खर्च किती मोठा होईल? याऐवजी सार्वजनिक वाचनालय उघडलं, तर या सगळ्यासाठी लागणारी जागा आणि खर्च कमी होतो आणि तो फक्त वाचनालयाला एकदाच करावा लागतो. मग ते वाचनालय ग्राहकाला काही पैसे आकारून पाहिजे ते पुस्तक वाचायला देतं. मग ती पुस्तकं विकत घेणं, जास्त मागणी असलेल्या किंवा दुर्मिळ पुस्तकांच्या जास्त प्रती ठेवणं, ती इमारत बांधणं, ते फर्निचर घेणं आणि ती पुस्तकं लावणं आणि या सगळ्यांची निगा राखणं आणि आपल्या ग्राहकांना लागतील ती पुस्तकं "भाड्यावर' देणं हे सगळं क्‍लाऊडप्रमाणंच इथं होत असतं. फक्त क्‍लाऊडमध्ये पुस्तकाप्रमाणं कुठलंही हार्डवेअर युजरकडे पाठवलं जात नाही, तर युजरच्या विनंतीप्रमाणं (ई-मेल पाठवायचा, गाणं ऐकायचंय...) तो तो प्रोग्रॅम (ई-मेल किंवा यूट्युब..) रन करून त्याचे रिझल्ट्‌स (ई-मेल किंवा गाणं) फक्त क्‍लाऊडवरून युजरकडे पाठवले जातात एवढंच.

गुगल, फेसबुक, यूट्युब वगैरे कंपन्याही क्‍लाऊडच वापरतात. गुगलचे जे लाखो यूजर्स आहेत, त्या प्रत्येकाचे सगळे मेल्स (पाठवलेले, बाहेरून आलेले..) हे या क्‍लाऊडवरच ठेवलेले असतात. फेसबुकसुद्धा आपल्या कोट्यावधी युजर्सची सगळी संभाषणं, फोटोज, व्हिडिओज आणि इतर सगळ्या गोष्टी क्‍लाऊडवरच ठेवत असतं. फेसबुकचे तर 227 कोटी युजर्स आहेत. या सगळ्यांसाठी किती सर्व्हर्स आणि डिस्क्‍स्‌ लागतील? यामुळे प्रत्यक्ष गुगलला किंवा फेसबुकला आपल्या कंपाऊंडमध्ये मोठमोठे महागडे सर्व्हर्स किंवा डिस्क्‍स्‌ ठेवाव्या लागत नाहीत. तसंच इतर अनेक युजर्सचं होतं. थोडक्‍यात हे प्रश्‍न आता त्यांचे न राहता "दुसऱ्या कोणाचे' तरी होतात. यावरूनच "क्‍लाऊड' हा शब्द निघाला.

क्‍लाऊडचे दोन भाग असतात. एक फ्रंटएंड आणि दुसरा म्हणजे बॅकएंड. इंटरनेट एक्‍सप्लोरर्ससारखी प्रॉडक्‍टस्‌ फ्रंटएंडमध्ये मोडतात. बॅकएंडमध्ये ई-मेल, यूट्युब, एसएपी... यांच्यासारखी वेगवेगळी ऍप्लिकेशन्स रन होत असतात. इंटरनेट एक्‍सप्लोरर्सप्रमाणं वेगवेगळ्या अप्लिकेशन्सचंही आपल्याला करता येतं. उदाहरणार्थ, आपल्याला एसएपीचा प्रोग्रॅम क्‍लाऊडवर चालवायचा असेल, तर एसएपीचा प्रोग्रॅम आणि त्यासाठी लागणारा डेटाबेस आपल्याला क्‍लाऊडवर लागेल आणि तिथं एंटर होण्यासाठी आपल्याला एक फ्रंटएंड इंटरफेस आपल्या पीसीवर ठेवावा लागेल. या फ्रंटएंडच्या माध्यमातून आपल्याला पाहिजेत त्या क्वेरीज किंवा नवीन झालेली ट्रान्झॅक्‍शन्स क्‍लाऊडला पाठवली जातील आणि क्‍लाऊडच्या बॅकएंडवर ती प्रोसेस केली जातील. बॅकएंडमध्ये अनेक सर्व्हर्स आणि त्यांची नेटवर्क्‍स असतात. डेटाबेस साठवण्यासाठी अनेक हार्ड डिस्क ड्राईव्ह्ज या सर्व्हर्सना जोडलेले असतात. हे सगळं मॅनेज करण्याकरता क्‍लाऊड कॉम्प्युटिंगच्या बॅकएंडला वेगळं सॉफ्टवेअर लागतं. या सगळ्या गोष्टी मॉनिटर करण्यासाठी बॅकएंडमध्ये सेंट्रल सर्व्हरही लागतो. हा सर्व्हर या संपूर्ण क्‍लाऊडमधले सर्व्हर्स, नेटवर्क्‍स आणि डेटाबेसेस अशी विविध गोष्टींवर लक्ष ठेवण्याचं काम करतो. या सर्व्हर्सपैकी कुठली चालू आहेत किंवा बंद आहेत, एका सर्व्हरपासून दुसऱ्या सर्व्हरकडे नेटवर्कमधून जाताना त्यातले कुठले सर्व्हर्स टाळायचे, क्‍लाऊडमध्ये असलेल्या वेगवेगळ्या नेटवर्क्‍समध्ये मार्ग कसा काढायचा किंवा निवडायचा म्हणजेच राऊटिंग कसं करायचं, एका सर्व्हरवर जास्त लोड किंवा तो डाऊन असेल तर दुसऱ्या सर्व्हरकडे कसं जायचं, एखादं डेटाबेस युनिट डाऊन असेल, तर दुसऱ्या डेटाबेसच्या युनिटकडे चटकन जाता यावं यासाठी डेटाबेसच्या कॉपीज कशा ठेवायच्या (रिडन्डंसी) या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी तो सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटर लागतो. त्याची रचना आणि त्यांच्यावरचं सॉफ्टवेअर गुंतागुंतीचं असलं तरी तो तयार केला तर नेटवर्कवर येणारा लोड बॅलन्स करण्यासाठी, कुणावर किती लोड येतोय ते बघणं अशा अनेक गोष्टी तो करू शकतो.

क्‍लाऊड कॉम्प्युटिंग सुरू होण्याअगोदर कंपनीच्या कॉम्युटर्सच्या संदर्भातल्या गोष्टी कशा मॅनेज व्हायच्या? तर कंपनीला जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एक वेगळा कॉम्प्युटर घ्यावा लागायचा; त्याबरोबर वर्ड प्रोसेसिंग, ऑपरेटिंग सिस्टिम सॉफ्टवेअर असे कॉम्प्युटरला लागणारे सगळे सॉफ्टवेअर प्रॉडक्‍टस्‌ त्यांना घ्यावे लागायची. तसंच त्या कॉम्प्युटर्सचं नेटवर्कही तयार करावं लागायचं. त्यामुळे कंपनीत सर्व्हर्सची भर पडायची. मग त्यांचं हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेन करण्यासाठी आणि प्रोग्रॅमिंग करण्यासाठी स्टाफ लागायचा. या सगळ्याला जागा तर भरपूर लागायचीच; पण खूप वेळही लागायचा आणि सॉफ्टवेअर लायसन्सेस आणि हार्डवेअर मोफत मिळत नसल्यामुळे खर्चही खूप व्हायचा. कुठल्याही मोठ्या कंपनीत प्रत्येक विभागासाठी एक मोठा कॉम्प्युटर घ्यावाच लागतो. उदाहरणार्थ, पर्चेसिंगसाठी एक, प्रॉडक्‍शनसाठी एक किंवा अकौंट्‌ससाठी एक वगैरे. या प्रत्येक कॉम्प्युटरवर ते ते ऍप्लिकेशन (उदाहरणार्थ, पर्चेसिंग, प्रॉडक्‍शन, अकौंटिंग) हे काम करायचं. तसंच त्या ऍप्लिकेशनसाठी लागणारा सगळा डेटा त्या कॉम्प्युटरला जोडलेल्या डिस्कवर ठेवलेला असायचा. त्या खात्यातल्या प्रत्येकाला दिलेल्या पर्सनल कॉम्प्युटरच्याद्वारे मग सगळे लोक ते ऍप्लिकेशन वापरायचे आणि त्यासाठी लागणारा डेटाही त्यांना दिलेल्या परवान्यांप्रमाणं ऍक्‍सेस करायचे.

त्यानंतर डेटा सेंटरची कल्पना पुढं आली. डेटा सेंटरमध्ये कंपनी आपल्याच कंपाऊंडमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये एक मोठं डेटा सेंटर उभं करते आणि त्यात त्या कंपनीच्या सगळ्या खात्यांना लागणारे सगळे मोठे कॉम्प्युटर्स; तसंच त्यांच्यावर चालणारी ऍप्लिकेशन्स आणि डिस्क्‍स्‌ एकत्र ठेवायला लागते. आता प्रत्येक युजरकडे फक्त एक पीसी असायचा आणि हे सगळे पीसीज त्या डेटा सेंटरच्या कॉम्प्युटर्सना जोडलेले असायचे. यामुळे कॉम्प्युटर्सची आणि सॉफ्टवेअर्सची खरेदी, त्यांचं मेन्टेनन्स, त्यासाठी लागणारी जागा वगैरेंचा खर्च कमी झाला; पण डेटा सेंटरमध्ये हे सगळे कॉम्प्युटर्स, नेटवर्क्‍स आणि सॉफ्टवेअर या गोष्टी कंपनीच्या कंपाऊडमध्येच होत्या. या डेटा सेंटर्समुळे खर्च किंचितसा कमी झाला असला तरीही तो पाहिजे तेवढा कमी झाला नव्हता. त्यासाठी जागाही वाया जायचीच. या उणिवा "क्‍लाऊड'च्या संकल्पनेनं भरून काढल्या. आज संशोधक क्‍लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करताहेत. कारण हवामानाचा अंदाज, कॉस्मॉलॉजी, जेनेटिक प्रोग्रॅमिंग अशा अनेक सायंटिफिक ऍप्लिकेशन्ससाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आकडेमोड करावी लागते आणि त्यासाठी खूप मोठा डेटा लागतो. हा डेटा प्रत्येक कॉम्प्युटरवर ठेवता येत नाही आणि त्यासाठी मोठमोठे कॉम्प्युटर्स घ्यायला परवडत नाही. क्‍लाऊड कॉम्प्युटिंगमध्ये अमाप डेटा स्टोरेज आणि प्रोसेसिंग पॉवर असते. त्यामुळे मोठमोठ्या आकडेमोडी आता क्‍लाऊड कॉम्प्युटिंगमुळे शक्‍य व्हायला लागल्या आहेत.
मात्र, हे सगळं असताना क्‍लाऊड कॉम्प्युटिंगमध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी मात्र कटाक्षानं घ्यावी लागते. ती म्हणजे सिक्‍युरिटी आणि प्रायव्हसी. आपल्या एकाच कॉम्प्युटरमधल्या माहितीची आपण पूर्वी काळजी करायचो; पण क्‍लाऊडमधून आपली माहिती चोरीला गेली तर काय होईल? आपण क्‍लाऊडमधल्या ज्या कॉम्प्युटरवर आपली माहिती ठेवलीय तो कॉम्प्युटर बंद पडला तर काय होईल? अनेक कंपन्यांची माहिती या क्‍लाऊडवर असते आणि ही माहिती जर एकमेकांत मिसळली तर काय होईल? खरंतर क्‍लाऊड कॉम्प्युटिंग मॅनेज करणारी कंपनी ही काळजी घेतेच. कारण त्यांचा व्यवसायच त्यावर अवलंबून असतो; पण तरीही आपल्या माहितीची सुरक्षितता आपण दुसऱ्याच्या हातात देतोय अशी काहीशी भीती लोकांच्या मनात असते. दुसरी भीती असते ती प्रायव्हसीची. खरं तर प्रत्येकाला एक पासवर्ड दिलेला असतो आणि तो पासवर्ड योग्य आहे याची खात्री झाल्याशिवाय आपली माहिती आपल्यासमोर येत नाही. मात्र, माझा पासवर्ड कुणाला मिळाला तर माझ्या क्‍लाऊडवरच्या प्रोग्रॅम्सचा किंवा माहितीचा कुणीही गैरवापर करू शकेल ही भीती कायम डोक्‍यात असते. पूर्वी आपल्याच कॉम्प्युटरवरून आपले प्रोग्रॅम्स वापरताना ही भीती नव्हती. एका उदाहरणानं हे स्पष्ट होईल ः माझा कॉम्प्युटर मी माझ्या ऑफिसमध्ये ठेवलेला असतो, तेव्हा त्यावरची माहिती चोरायला कुणाला तरी प्रत्यक्ष कंपनीची सिक्‍युरिटी (वॉचमन इत्यादी) तोडून माझ्या कॉम्प्युटरपर्यंत यावं लागेल आणि त्यानंतरही त्याला माझा पासवर्ड माहीत असेल तरच माझी माहिती चोरता येईल. मात्र, जीमेलचं तसं नाही. समजा माझा पासवर्ड कुणाला कळला, तर कोणीही, कुठूनही माझे मेल (म्हणजेच जीमेल डेटा) वाचू शकेल. क्‍लाऊडचं तसंच असतं. म्हणून यासाठी जास्त खबरदारी आणि दक्षता घ्यावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com