विनोद खन्नाः अभिनेता ते नेता...

vinod khanna
vinod khanna

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे रुग्णालयामधील अशक्तपणाचे छायाचित्र 6 एप्रिल रोजी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आणि चाहत्यांना हृदयात धस्स झाले. कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळविलेले विनोद खन्ना यांचे रुग्णालयातील छायाचित्र पाहून अनेकजण कळवळले... त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून अनेकांनी प्रार्थनाही केल्या. पण... अखरे त्यांनी आज (गुरुवार) शेवटचा श्वास घेतला. चित्रपटसृष्टीसह राजकरणात आपला ठसा उमटविणारे खन्ना यांच्याविषयी थोडक्यात...

विनोद खन्ना यांचा जन्म पाकिस्तानमधला...
सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पेशावरमध्ये उद्योगपतीच्या घरात 6 ऑक्टोबर 1946 रोजी विनोद खन्ना यांचा जन्म झाला. त्यांना तीन बहिणी व एक भाऊ. विनोद खन्ना यांच्या जन्मानंतर काही दिवसातच भारतामध्ये (मुंबईत) त्यांचे कुटुंब दाखल झाले. मुंबईतील सेंट मॅरी स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण व सेंट झेव्हिअर्स हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. सन 1957 साली कुटुंबाने दिल्लीला स्थलांतर केले. दिल्लीमधील पब्लिक स्कूलमध्येही त्यांचे शिक्षण झाले. सन 1960 मध्ये कुटुंब पुन्हा मुंबईत स्थलांतर झाले. 

विनोद खन्ना यांना शिक्षणासाठी नाशिकमधील देवळालीच्या बार्न्स स्कूलमध्ये पाठवण्यात आले होते. शिक्षण सुरू असताना ‘सोलवा साल’, मुघल-ए-आझम हे चित्रपट पाहून ते चित्रपटसृष्टीकडे आकर्षित झाले होते. मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर 1968 साली मन का मीत या चित्रपटातून बॉलिवडूमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका निभावली आणि चर्चेत आले आणि अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले.

विनोद खन्ना यांचे दोन विवाह...
विनोद खन्ना यांचे दोन विवाह झाले होते. 1971 साली गीतांजली यांच्याशी विवाह केला. अभिनेता अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना ही त्यांच्या पहिल्या पत्नीची मुले आहेत. 1975 साली विनोद खन्ना ओशो यांचे अनुयायी झाले आणि ते पाच वर्षांसाठी रजनीशपुरम या ठिकाणी गेले. पाच वर्षांसाठी कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर त्यांचा गीतांजली यांच्याशी घटस्फोट झाला. 1990 साली त्यांनी कविता यांच्याशी दुसरा विवाह केला. साक्षी आणि श्रद्धा या त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुली आहेत.

45 वर्षांत 141 चित्रपटांमध्ये भूमिका...
अभिनेते विनोद खन्ना यांनी 1968 मध्ये 'मन का मीत' या चित्रपटात भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पन केले. 'मेरे अपने', 'कुर्बानी', 'पूरब और पश्‍चिम', 'रेशमा और शेरा', 'हाथ की सफाई', 'हेरा फेरी', 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या. अभिनेता शाहरुख खान व वरुण धवन यांच्यासोबत 'दिलवाले' या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाने आजारी होते. 1968 ते 2013 या 45 वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत त्यांनी एकूण 141 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 
 
प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच चित्रपटसृष्टीला रामराम...
मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, मुकद्दर का सिंकदर, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, अमर अकबर अँन्थनी, राजपूत, कुरबानी, कुदरत, दयावान, कारनामा, सुर्या, जुर्म या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 1968 मध्ये पदार्पणातच त्यांना नायकाची भूमिका मिळाली नाही. सुरुवातीला सहाय्यक अभिनेता, खलनायक अशा भूमिका त्यांनी केल्या. मेरा गाव, मेरा देशमधील त्यांनी खलनायकाची भूमिका विशेष गाजली. अचानकमधील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्यांना दाद दिली. 1982 साली प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांनी अचानक चित्रपटसृष्टीला रामराम करण्याचा निर्णय घेऊन अनेकांना धक्का दिला. गुरु ओशो रजनीश यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अध्यात्माचे धडे गिरवले. पुन्हा पाचवर्षांनी कमबॅक करताना इन्साफ आणि सत्यमेव जयते हे दोन हिट चित्रपट दिले. 

राजकारणात आजमावले नशीब...
चित्रपटसृष्टीत नाव, पैसा व प्रसिद्धी मिळविल्यानंतर अनेकजण दुसरा पर्याय म्हणून राजकारणात नशीब आजमण्याचा प्रयत्न करतात. विनोद खन्ना यांनीसुद्धा राजकारणात जाऊन समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला. सन 1997 साली त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकीटावर पंजाबमधील गुरदासपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात जनतेने त्यांना निवडून दिले आणि ते खासदार झाले. मतदारांच्या प्रेमामुळे 1999, 2004 लोकसभा निवडणुकीतही गुरदासपूरमधून ते विजयी झाले. मात्र, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पुढे 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या निवडणुकीत पुन्हा गुरदासपूरमधून निवडून ते लोकसभेवर गेले. 1999 ते 2004 या काळात अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रात मंत्रीपदही भूषवले. जुलै 2002 मध्ये त्यांना सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री बनवण्यात आले होते. पुढे सहा महिन्यांनी त्यांची परराष्ट्र राज्यमंत्री या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली. 

बॉलिवूड इतकेच राजकारणातही ते यशस्वी ठरले. राजकारणातील विनोद खन्ना हे बॉलिवूडप्रमाणे राजकरणातही यशस्वी होत असताना अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. थोडक्यात, मतदारांचा, चाहत्यांचा विश्वास त्यांनी जिंकला. आज आपल्यामधून ते निघून गेले असले तरी त्यांच्या चित्रपटातील अथवा राजकरणातील आठवणी कायम रहातील.

विनोद खन्ना यांना मिळालेले पुरस्कार
हाथ की सफाई चित्रपटासाठी 1975 साली सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार
1977 साली हेरा फेरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून नामांकन
1979 साली मुकद्दर का सिकंदर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून नामांकन
1981 साली कुर्बानी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरव.
1999 साली जीवनगौरव पुरस्कार.
2001 साली कलाकार जीवनगौरव पुरस्कार.
2005 साली स्टारडस्ट रोल मॉडेल ऑफ द ईयर पुरस्कार.
2007 साली झी सिने जीवनगौरव पुरस्कार.

विनोद खन्ना फ्लॅशबॅक-
1) विनोद खन्ना यांचा 6 ऑक्टोबर 1946 रोजी पेशावरमध्ये (पाकिस्तान) जन्म झाला. त्यांचे वडिल टेक्सटाईल, केमिकलचे व्यवसायिक होते. 
2) फाळणीनंतर विनोद खन्नांचं कुटुंब पाकिस्तानातून मुंबईत येऊन वसलं. 
3) विनोद खन्ना लहानपणी खूप लाजरे होते. लहान असताना शिक्षिकेने जबरदस्तीने त्यांना नाटकात भाग घेण्यास भाग पाडले. पुढे त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. 
4) आपल्या मुलाने चित्रपटात काम करावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा नव्हती. विनोद खन्ना यांना दोन वर्षांचा वेळ दिला. या दोन वर्षात त्यांनी यशस्वी होऊन दाखविले.
5) विनोद खन्ना यांना सुनील दत्त यांनी 'मन का मीत' (1968) चित्रपटातून पहिला ब्रेक दिला. विनोद खन्ना यांना खलनायकाची भूमिका देण्यात आली होती. विशेष म्हणजे सुनील दत्त यांनी आपल्या भावाला अभिनेता म्हणून पुढे आणण्यासाठी हा चित्रपट तयार केला होता. परंतु, विनोद खन्ना यांना मोठी संधी मिळाली आणि त्याचे सोने केले.
6) विनोद खन्ना यांनी त्यावेळचे सुपरस्टार अमिताभ बच्चन, राजेश खन्ना व सुनील दत्त यांच्यासोबत विविध चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. अमिताभ बच्चन व विनोद खन्ना यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. हेराफेरी, खून पसीना, अमर अकबर अॅन्थनी, मुकद्दर का सिकंदर सारख्या चित्रपटात दोघांची जुगलबंदी पाहायला मिळाली.
7) विनोद खन्ना यशाच्या शिखरावर असताना 1982 मध्ये ओशोंच्या सानिध्यात आले आणि चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले. या निर्णयाचा अनेकांना धक्काही बसला शिवाय कुटुंबापासूनही दुरावले. ओशोंच्या आश्रमात त्यांनी माळी ते भांडी धुण्यापासून सर्व कामे केली.
8) विनोद खन्ना यांच्या ओशोमध्ये अचानक जाण्यामुळे पत्नी गितांजली यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अभिनेता अक्षय खन्ना व राहुल खन्ना ही त्यांची मुले.
9) विनोद खन्ना ओशोमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी 1990 मध्ये कविता यांच्यासोबत विवाह केला. साक्षी आणि श्रद्धा या दोन मुली.
10) विनोद खन्ना यांनी फक्त अभिनेता नाही तर निर्माता आणि राजकारणी म्हणूनही यशस्वी ठरले.
11) चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारही मिळाले.
12) राजकारणात प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे ते खासदार राहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com