सजग व्हा...सावध व्हा... (ऍड. रमा सरोदे)

ऍड. रमा सरोदे
रविवार, 20 मे 2018

आजकाल फेसबुकवर सतत "अपडेट' टाकत राहणं हे जणू फारच जिवंतपणाचं लक्षण झालं आहे!

आजकाल फेसबुकवर सतत "अपडेट' टाकत राहणं हे जणू फारच जिवंतपणाचं लक्षण झालं आहे!
आपण काय करतो, कुठं जेवतो, काय खातो, आज कोणते कपडे घातले आहेत अशा अनेक गोष्टी सातत्यानं "फेसबुक अपडेट'च्या नावाखाली जाहीर करून आपणच आपला खासगीपणा नष्ट करत असतो, सगळं काही चव्हाट्यावर मांडत असतो, याचं भान मुलींनी-महिलांनी ठेवायला हवं. अशा माहितीचा गैरवापर होऊ शकतो, हेही ध्यानात ठेवणं अत्यावश्‍यक. ओळख नसताना केवळ कुणाचा तरी फोटो आवडला म्हणून त्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं, ओळखीचं वर्तुळ अनोळखी लोकांच्या माध्यमातून वाढवत नेणं यातून आपण संकट ओढवून घेऊ शकतो, याचीही जाणीव मुलींनी-महिलांनी सतत ठेवली पाहिजे.
समाजमाध्यमांत मनमोकळेपणानं व्यक्त होण्यासाठी हा काळ जेवढा अनुकूल आहे, तेवढाच तो "सजग राहा, सावध राहा' असंही सांगत असतो. काळाचं हे सांगणं लक्षात घेणं अत्यावश्‍यक आहे!

अनेकानेक घटनांसंदर्भात काम करत असताना सायबर-छळणुकीचे, बदनामीचे वेगवेगळे पदर मला पाहायला मिळाले आहेत. उदाहरणार्थ : इंटरनेटवरून लग्न जुळवून देणाऱ्या विवाहसंस्थांवर, संकेतस्थळांवर (मॅट्रिमोनियल साईट्‌स) विश्वास ठेवून आज अनेकजणांची लग्न जुळताना आपण पाहतो. एकीकडं केवळ इंटननेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे व्यक्तीची आभासी प्रतिमाच खरी मानण्याकडं कल वाढलेला असताना काहीजण, इतरांनी आपल्याबद्दल काय विचार करावा, हे ठरवून व तसं नियोजन करून समाजमाध्यमांत स्वतःची प्रतिमा अत्यंत चलाखपणे तयार करत असतात. लग्नाच्या नावानं अशा फसव्या प्रतिमांचा वापर करण्याला आणि आर्थिक फसवणुकीला कायदेशीर आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
आणखी एक उदाहरण द्यावंसं वाटतं. एका अत्यंत मोठ्या कंपनीत कार्यरत असलेल्या आणि भरपूर पगार असलेल्या मुलाचं त्याच्याच कंपनीशेजारी असलेल्या दुसऱ्या कंपनीतल्या मुलीशी प्रेम जुळलं.

लग्नाआधीच एकमेकांचा परिपूर्ण परिचय होणं आणि लग्नाआधीच एकमेकांच्या हवाली सर्वार्थानं होणं म्हणजेच आधुनिक विचारांचं असणं असं मानण्याची आजकाल पद्धत आहे! ...तर एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या मुला-मुलीनं लग्नापूर्वीच शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नव्हे तर, मुलानं विनंती केली म्हणून त्या संबंधांचं व्हिडिओ शूटिंग करायलाही त्या मुलीनं परवानगी दिली. (एकमेकांच्या संमतीनं केलेला शरीरसंबंध हा जसा गुन्हा नसतो, तसा एकमेकांच्या संमतीनं असे संबंध ठेवताना व्हिडिओ शूटिंग करणं हासुद्धा गुन्हा नाही). मात्र, दोघांमधल्या प्रेममय संबंधांची आठवण शूटिंगद्वारा जपणं एवढ्यासाठीच ते शूटिंग करण्याची त्या मुलीनं दिलेली ती परवानगी होती. दोघांमधले ते अत्यंत खासगी क्षण त्या मुलानं इतरांना दाखवावेत किंवा ते त्यानं जाहीर करावेत, यासाठी कधीच तिनं ती परवानगी दिलेली नव्हती. मात्र, त्या दोघांचा तो तशा अवस्थेतला व्हिडिओ दोघांपुरताच खासगी न राहता तो व्हायरल होताना त्या मुलीनं जेव्हा पाहिला तेव्हा ते शूटिंग व्हायरल केला जाण्याचा तो प्रकार तिच्यासाठी केवळ धक्कादायकच नव्हता, तर तिच्यावर मोठाच मानसिक आघात करणाराही तो होता. भारतीय दंडविधानातलं "बेअब्रू करणं' किंवा "विनयभंग करणं' यापेक्षा मोठं असं कृत्य या आघातातून पुढं येतं. मुलीना व महिलांना सहन कराव्या लागणाऱ्या अशा अनेक सायबर-गुन्ह्यांच्या संदर्भात स्पष्ट आणि कडक प्रक्रिया असण्याची गरज आज अत्यंत आवश्‍यकता आहे.

मुलींविरुद्ध आणि महिलांविरुद्ध घडणाऱ्या अशा ऑनलाईन गुन्ह्यांचं प्रमाण सातत्यानं वाढत असताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं अशा गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेऊन "सायबर समिती'ची स्थापना करणं हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल आहे. अशा गुन्ह्यांच्या खटल्यांचं कामकाज वेगवान पद्धतीनं व्हावं असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र, वाढत्या सायबर-गुन्हेगारीला बळी पडणाऱ्यांचं समुपदेशन करण्याबाबतही सातत्यानं दुर्लक्ष होत आलं आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

सायबर-गुन्हे हाताळण्यासाठी काही परिणामकारक कायदेशीर बदल केले जाणंही अत्यावश्‍यक आहे.
समाजमाध्यमांद्वारे (सोशल मीडिया) मुलींची व महिलांची होणारी छळणूक, त्यांच्यावर मानसिक दडपण आणण्याचे आणि त्यांना भीती घालण्याचे प्रकार अशा अनेक बाबतींत कायद्याची प्रक्रिया बळकट करण्याऱ्या सूचना देण्यासाठी राज्य महिला आयोगानं तज्ज्ञांची समिती नेमणं ही आवश्‍यकच बाब होती.
अनेकदा मुलींचा "ऑनलाईन पाठलाग' केला जातो, त्यांच्या सतत मागावर राहिलं जातं, त्यांना सतत आक्षेपार्ह मेसेजेस पाठवले जातात. मुलींचा-महिलांचा विनयभंग करणं, तसंच त्यांच्यावर बळजबरी करणं किंवा गुन्हेगारी दबावतंत्राचा वापर करून त्यांचा विनयभंग करणं यासंदर्भात 354 व्या कलमात दिल्लीच्या "निर्भया प्रकरणा'नंतर अनेक सुधारणा करण्यात आल्या. उदाहरणार्थ, मुलींचा केवळ पाठलाग करणं हा आता 354 (ड) या कलमानुसार साधा गुन्हा समजला जातो.

मात्र, ऑनलाईन पाठलाग करणं किंवा फेसबुक, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांद्वारे एखाद्या मुलीच्या सतत मागावर राहणं असे प्रकारसुद्धा अनेकदा मुलींना त्रासदायक ठरत असतात. एखाद्या मुलानं मुलीच्या इच्छेविरुद्ध तिचा प्रत्यक्षात पाठलाग करणं याची जेवढी गंभीर दखल पोलिसांद्वारे घेतली जाऊ शकते, तेवढीच गंभीर दखल ऑनलाईन पाठलाग केला जाण्याचीही घेतली जाईलच असं नाही. कदाचित ऑनलाईन पाठलाग केला जाण्याचा किंवा कुणीतरी सतत मागावर राहिलं जाण्याचा जास्त मानसिक त्रास मुलींना होऊ शकतो. मुळात मानसिक त्रासाचं मोजमाप करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या संवेदनशीलतेचंच संवर्धन न झाल्यामुळं महिला आयोगानं अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी "सायबर समिती' नेमली, हे चांगलंच झालं.

मुलींनी मैत्रीपूर्ण वातावरणात काढू दिलेल्या फोटोंचा वापर पुढं मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी अनेकदा केला जातो. अनेकदा मुलींचे फोटो मॉर्फिंग करून, चेहरा बदलून त्यांची बदनामी करण्याचे प्रकार घडतात. एवढंच नव्हे तर, मुलींनी त्यांचं अस्तित्वच संपवून टाकावं, अशा पद्धतीनं त्यांची "व्हर्च्युअल आयडेंटिटी' तयार करून त्यांची कायमस्वरूपी बदनामी करण्याचाही प्रयत्न केला जातो. काही वेळा मुलींचे फोननंबर्स व्हायरल केले जातात. अशा सगळ्याच बाबतींत होणारी सायबर-गुन्हेगारी ही सामान्य गुन्ह्यांपेक्षा वेगळी समजून हाताळणं गरजेचं असतं.

आजकाल तर "व्हिडिओ रेप गेम'चंसुद्धा पेव फुटलं आहे. ही अशी अत्यंत भयावह पद्धतीनं सायबर-गुन्हेगारी फोफावत असताना, साधं जीवन जगण्याचं स्वप्न असलेल्या अनेक मुलींना सातत्यानं असुरक्षिततेची भावना घेऊन जगावं लागत आहे.
"पॉर्नोग्राफिक व्हिडिओ पाहणं ही जर सवय असेल तर बलात्कार करणं हे त्याचं प्रात्यक्षिक आहे,' असं एका विचारवंत-तत्त्वज्ञानं म्हटलेलं आहे. मुलींबद्दल आणि महिलांबद्दल सातत्यानं अत्यंत सैलपणे विचार करणं आणि तेच भोंगळ विचार सायबर-प्रतिमांद्वारे डोक्‍यात ठेवणं यातून विस्फोटक अशा कामुक धारणा घेऊन जगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही संख्या वाढणं धोकादायक असल्यानं या पार्श्वभूमीवर महिला आयोगाचंही काम नक्कीच वाढलं आहे.
अनेकदा जवळच्याच नातेवाइकांकडून किंवा ओळखीच्यांकडून, मित्रांकडून लैंगिक छळणूक होताना दिसते, हेही लक्षात घ्यायला हवं.

आजकाल फेसबुकवर सतत "अपडेट' टाकत राहणं हे जणू फारच "जिवंत'पणाचं लक्षण झालं आहे!
आपण काय करतो, कुठं जेवतो, काय खातो, आज कोणते कपडे घातले आहेत अशा अनेक गोष्टी सातत्यानं "फेसबुक अपडेट'च्या नावाखाली जाहीर करून आपणच आपला खासगीपणा नष्ट करत असतो, सगळं काही चव्हाट्यावर मांडत असतो, याचं भान मुलींनी-महिलांनी ठेवायला हवं. अशा माहितीचा गैरवापर होऊ शकतो, हेही ध्यानात ठेवणं अत्यावश्‍यक. ओळख नसताना केवळ कुणाचा तरी फोटो आवडला म्हणून त्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं, ओळखीचं वर्तुळ अनोळखी लोकांच्या माध्यमातून वाढवत नेणं यातून आपण संकट ओढवून घेऊ शकतो, याचीही जाणीव मुलींनी-महिलांनी सतत ठेवली पाहिजे.

समाजमाध्यमांत मनमोकळेपणानं व्यक्त होण्यासाठी हा काळ जेवढा अनुकूल आहे, तेवढाच तो "सजग राहा, सावध राहा' असंही सांगत असतो. काळाचं हे सांगणं लक्षात घेणं अत्यावश्‍यक आहे!
"गूगल सर्च'वर अवलंबून राहून माणसांची माहिती घेण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटीतून माणसं जाणून घेण्याची पद्धती सोडता कामा नये.

समाजमाध्यम हा जर आपल्या हातातला माहितीचा आणि ज्ञानाचा स्त्रोत असेल, तर त्याचा सुबुद्धपणे वापर कसा करायचा हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे, हे प्रत्येकानंच लक्षात ठेवलं तर सायबर-गुन्हेगारी फोफावणार नाही.
कितीही विकास झाला तरी पुरुषप्रधान व्यवस्थेत त्या विकासाची मोठी किंमत बऱ्याचदा महिलांनाच चुकवावी लागते. तंत्रज्ञानाचा विकास होत असतानासुद्धा महिलाच बळी ठरताना दिसतात, हे दुर्दैव आहे. याची गंभीर दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघानंसुद्धा तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून महिलांना विकासाच्या आर्थिक संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

जे समाजमाध्यम धोकादायक वाटू शकतं, तेच माध्यम तोडगा म्हणूनही वापरण्याची ताकद मुलींनी-महिलांनी मिळवली पाहिजे. ही ताकद मिळवल्यास मुलींच्या-महिलांच्या मनातली भीती विरघळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते...

Web Title: advocate rama sarode write women social media article in saptarang