गांधीवादाचे अध्यात्म

गांधीवादाचे अध्यात्म

जगात अनेक स्थित्यंतरे अव्याहतपणे होत असतात. ही स्थित्यंतरे जशी निसर्गदत्त आहेत तशीच मावननिर्मितही आहेत. १९२० ते १९४५ या तीन दशकांतील भारतीय संक्रमण काळाचा विचार केल्यास सर्वप्रथम जे नाव समोर येते ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर गांधीजींच्या सत्य, अहिंसा, असहकार, सत्याग्रह यांचा मोठा प्रभाव होता. दहा दिशांच्या पलीकडचे दिसणाऱ्या या निःस्वार्थ, निःस्पृह महात्म्याला म्हणूनच द्रष्टा म्हणणे संयुक्‍तिक ठरते. ग. त्र्यं. माडखोलकरांनी ध्येयवादी विभूतींच्या वैशिष्ट्यांची व कार्याची महती स्पष्ट केलेली आहे. ध्येयवादी व्यवहाराच्या भूमिकेवर उतरला म्हणजे तो व्यवहारालाही विशुद्ध स्वरूप दिल्याशिवाय राहत नाही. महात्मा गांधी एक ध्येयवादी महापुरुष होते. 

गांधी विचारधारा आध्यात्मिक विचारप्रणाली आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत जे सत्याग्रह केले त्यामागे आध्यात्माचे ठोस अधिष्ठान होते. आजही सत्य, अहिंसा, शांतीचे प्रतीक म्हणून ते जगभर ओळखले जातात. ईश्‍वरनिष्ठा त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग होते. ‘सत्याचे प्रयोग’मध्ये ते म्हणतात, मला निरनिराळ्या बाबतीत अनुभव आले आहेत. ईश्‍वराने वाचवले या वाक्‍याचा अर्थ मला समजू लागला आहे. पण संपूर्ण रहस्य उलगडलेले नाही. अनेक प्रसंगी ईश्‍वराने मला वाचवले आहे. स्तुती, उपासना, प्रार्थना वगैरे गोष्टी खोट्या नाहीत. यावरून त्यांची ईश्‍वरनिष्ठा अध्यात्मधारणांचाच आधुनिक अवतार होती, असे दिसून येते. महात्मा गांधींचे शांततेबद्दलचे तत्त्वज्ञान, सर्वांविषयीचा आदरभाव व त्यांच्या अहिंसेमुळे ते आजच्या द्वेष, शत्रूत्व व गैरसमजुतींनी पछाडलेल्या जगात कधी नव्हे इतके समर्पक ठरतात. गांधी विचारधारेमागे हे विश्‍व म्हणजे निसर्ग, मनुष्य प्राणिमात्र हे सर्व ईश्‍वराचा आविष्कार आहे. संत ज्ञानेश्‍वर माउलीने पसायदानात अहिंसात्मक प्रार्थना केली आहे. पसायदानातील विश्‍वबंधुत्वाच्या विश्‍वशांतीच्या विचारांशी जुळणारी सत्य अहिंसेचे महात्मा गांधींचे विचार, भगवद्‌गीतेशी नाते सांगणारे आहे. त्यांनी अंत:करणशुद्धीसाठी जे अनेक प्रयोग केले त्यात ब्रह्मचर्य, आहारशुद्धी, सत्याग्रह, त्याग, सेवावृत्ती, स्वावलंबन, अहिंसा, आत्मपरीक्षण असा कितीतरी खडतर भाग आहे. 

गांधीजी स्वत:ला सत्याचे नम्र उपासक, शोधक आणि दरिद्रीनारायणाचे सेवक मानत. त्यांच्या मते, सत्य हाच ईश्‍वर. मात्र ते सत्य वैज्ञानिक सत्याप्रमाणे केवळ बुद्धिगम नव्हे तर ते आध्यात्मिक अनुभूतीच्या स्वरूपाचे पण भौतिक जीवनावर प्रभाव गाजवणारे आहे. त्यात सत्यमय ईश्‍वराला, जीवनवास्तवाला, जीवनातील नैतिकतेला, साधनशूचिता, प्रेम, करुणा, दया, माया यांना अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांच्यादृष्टीने अध्यात्म आणि जीवन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे राष्ट्रपित्याला केवळ पुतळे, फोटो, मूर्तीमध्ये बंदिस्त न करता आपल्या दैनंदिन जीवनात आणले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com