एक दूसरे से करते है प्यार हम...

‘थला द ग्रेट रजनीसह मी पुन्हा जोडलो गेलो आहे, ही गोष्ट माझ्यासाठी सम्मानपूर्वक आहे. रजनी अजिबात बदललेले नाहीत.
amitabh bachchan and rajnikant
amitabh bachchan and rajnikantsakal

‘थला द ग्रेट रजनीसह मी पुन्हा जोडलो गेलो आहे, ही गोष्ट माझ्यासाठी सम्मानपूर्वक आहे. रजनी अजिबात बदललेले नाहीत. पूर्वीसारखेच सरळ साधे, विनम्र आणि डाउन टू अर्थ...’ हे उद्‍गार आहेत शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे. रजनी म्हणजे सुपरस्टार थलावर रजनीकांत. तब्बल ३३ वर्षांनी रुपेरी पडद्यावर अमिताभ व रजनीकांत ही जोडी एकत्र दिसणार आहे.

खुद्द बच्चन यांनीच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटव्दारे ही बातमी पोस्ट करत रजनीकांतसह आपला फोटो शेयर केला आहे. ते एकत्र काम करत असलेल्या चित्रपटाचं नाव आहे ‘वेट्टैयन’ (Vettaiyan) या चित्रपटाचं शूटिंगही सुरू झालं आहे.

अमिताभ - रजनीकांत यांनी एकत्र काम करायला कधी सुरुवात केली, त्यांच्यात मित्रत्वाचे संबंध कधी तयार झाले याविषयी जाणून घेण्यासाठी काही वर्ष मागं जावं लागेल... ऐंशीच्या दशकात...

१९८३ मध्ये रुपेरी पडद्यावर ‘बिग बी’ आणि रजनीकांत यांना सर्वप्रथम एकत्र आणलं ते साउथ चित्रपटांचे यशस्वी निर्माता ए. पूर्णचंद्रराव व दिग्दर्शक टी. रामाराव यांनी. चित्रपटाचं नाव होतं ''अंधा कानून''. हा ‘सत्तम ओरु इरुत्तराई’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता, त्या काळात अमिताभ बच्चन हिंदी चित्रपटसॄष्टीवर राज्य करत होते. यशाच्या शिखरावर होते.

शशी कपूर, विनोद खन्ना, संजीव कुमार, विनोद मेहरा आदी कलाकार अन्य अनेक चित्रपटांत अमिताभसह काम करत असले, तरी अमिताभ बच्चन यांचा स्टारडम या कलाकारांवर भारी पडत होता. त्यावेळी रजनीकांत सुद्धा साउथ चित्रपटसॄष्टीमध्ये सुपरस्टार म्हणून विराजमान झाले होते. पण हिंदी चित्रपटसॄष्टीत पदार्पण करताना त्यांच्यासमोर अमिताभ बच्चन नावाचं आव्हान उभं होतं.

या चित्रपटात बच्चन यांच्यापेक्षा हेमामालिनीची भूमिका मोठी होती. मात्र सर्वसामान्य चेहर्‍याच्या, सावळ्या रंगाच्या रजनीकांतनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकली. बच्चन, प्राण, हेमामालिनी, प्रेम चोप्रा, डॅनी चित्रपटात असून देखील रजनीकांत चित्रपटात ’दिसले’ होते. सूत्रांच्या माहिती आधारे अंधा कानून बनला होता तब्बल दोन कोटी रुपयांत.

आज ही रक्कम क्षुल्लक वाटत असली, तरी ऐंशीच्या दशकामध्ये ही मोठी रक्कम होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला होता आणि सर्वाधिक कमाई करणार्‍या त्या वर्षीच्या हिंदी चित्रपटांच्या यादीत अंधा कानून पाचव्या क्रमांकावर होता.

इतिहासात डोकावलं तर आपल्या लक्षात येईल, की दाक्षिणात्य चित्रपटसॄष्टीत अनेक वर्ष सुपरस्टार पद निभावलेल्या अभिनेत्यांना हिंदी चित्रपटसॄष्टीमध्ये फारसं यश मिळवता आलं नाही. जेमिनी गणेशन, शिवाजी गणेशनपासून आताच्या रामचरण, प्रभासपर्यंत याची अनेक उदाहरणं देता येतील. अपवाद फक्त कमल हासन व रजनीकांत यांचा. अर्थात त्यांनी देखील सातत्याने हिंदी चित्रपट कधीही केले नाहीत.

अंधा कानून नंतर गिरफ्तार (१९८५ ) व हम (१९९१) या चित्रपटांत पुन्हा एकदा अमिताभ व रजनीकांत यांनी एकत्र काम केलं आणि हे सिनेमे सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या तीन चित्रपटांत एकमेकांसह काम करणं दोन्ही कलाकारांना आनंद देऊन गेलं.

सुज्ञ, विचारी आणि आत्मविश्वास असलेला नट कधीही दुसऱ्या नटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत नाही. रजनीकांत व बिग बीं नी देखील एकत्र काम करताना एकमेकांवर कुरघोडी करण्याचा, समोरच्या नटापेक्षा आपण सरस आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र हे एकच कारण नव्हतं दोघांची घट्ट मैत्री होण्याचं.

अकरा चित्रपटांचं नातं ?

फार कमी रसिकांना ही गोष्ट माहिती असेल, की बच्चन व रजनीकांत यांच्यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल अकरा चित्रपटांचं नातं आहे. ‘बिग बी’ यांच्या अकरा हिट-यशस्वी चित्रपटांच्या तामिळ रिमेकचे हीरो होते रजनीकांत. याची सुरुवात झाली १९७५ पासून. त्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर दीवारचा तामिळ रिमेक बनवला गेला. त्यात बच्चन यांनी साकार केलेली विजयची व्यक्तिरेखा तामिळमध्ये रजनीकांतनी साकार केली.

१९७७ मध्ये ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटावरून तामिळ भाषेत 'शंकर सलीम और साइमन' या शीर्षकांतर्गत चित्रपट बनवण्यात आला, तेव्हा रजनीकांतनी साइमनची (म्हणजेच हिंदीतल्या अँथनीची) भूमिका केली होती. त्यानंतर ’मिस्टर भारत’ या नावानं ’त्रिशूल’चा तामिळ रिमेक बनला. त्या सिनेमात सुद्धा वडिलांचा सूड घेणार्‍या विजयची भूमिका रजनीकांतनी केली.

त्या काळामध्ये बच्चन हिंदीतील नंबर वन स्टार गणले जात होते. त्यांचे चित्रपट सातत्यानं हिट होत असल्याने तामिळ निर्माता त्या चित्रपटांचे हक्क विकत घेऊन त्याचा तामिळ रिमेक बनवत असत. हिंदीप्रमाणे तामिळ रिमेक देखील यशस्वी ठरल्यामुळं त्यात काम करणाऱ्या रजनीकांतना खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली.

प्रत्येक कलाकाराच्या कारकीर्दीला यशापयशाची झालर असते. प्रत्येक कलाकाराला या परिस्थितीशी सामना करावा लागतो. चित्रपट कारकीर्द यशस्वी सुरू असतानाच १९७९-८० च्या सुमारास रजनीकांत यांचे चित्रपट एकामागोमाग अयशस्वी होऊ लागले आणि निराश होऊन त्यांनी चित्रपट संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. अशातच एक दिवस त्यांच्याकडं एका चित्रपटाची ऑफर आली.

‘समोरून चित्रपट ऑफर होतोय तर करू या. पण हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर पडला तर मात्र चित्रपटसॄष्टीला रामराम ठोकायचा’ असा विचार करत रजनीकांतनी तो चित्रपट स्वीकारला. तो चित्रपट रिमेक होता अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचा.

‘डॉन’वर आधारित ‘बिल्ला’ या तामिळ चित्रपटात रजनीकांतनी डबल रोल केला आणि बिल्ला सुपरडुपर हिट ठरला. त्यानंतर आजपर्यंत रजनीकांतना मागे वळून बघायची गरज पडली नाही. मर्द, ''कस्मे वादे'' , ''खून पसीना'' व 'नमक हलाल' मध्ये बच्चन यांनी साकारलेल्या भूमिका तामिळमध्ये रजनीकांतनी केल्या. परंतु त्या भूमिका करताना रजनीकांतनी कधीही बच्चन यांच्या अभिनयाचं अनुकरण केलं नाही आणि बच्चन यांनी सुद्धा रजनीकांत यांच्या अभिनयाला, भूमिकांना नावं ठेवली नाहीत. उलटपक्षी या दोन्ही कलाकारांचा एकमेकांविषयीचा आदर व्दिगुणित झाला व त्याचवेळी दोघे जिवलग मित्र बनले.

वास्तविक जीवनातील तफावत

उच्चशिक्षित व साहित्याशी निगडित कायस्थ घराण्यात अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला. वडील हरिवंशराय बच्चन महान कवी तर आई तेजी बच्चन एके काळी इंग्रजी नाटकांमध्ये अभिनय करत असे. बच्चन यांनीसुद्धा पदवी संपादन केल्यानंतरच चित्रपटसॄष्टीमध्ये पदार्पण केलं. रजनीकांत मूळचे मराठी. त्यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड. त्यांच्या वडिलांचं नाव रामोजीराव तर आईचे नाव जिजाबाई गायकवाड आहे.

रजनीकांत चार वर्षांचे असताना आईचं निधन झालं. घरची परिस्थिती बेताचीच होती. घराण्याचा कलेशी संबंध नव्हता. मात्र लहानपणापासून अभिनेता बनण्याचं स्वप्न ते बघत असत. शिक्षण फारसं नसल्याकारणाने हमाली करण्यापासून बस कंडक्टर बनण्याचा प्रवास रजनीकांतना करावा लागला. बसमधील प्रवाशांना तिकिट देण्याची त्यांचा अनोखा अंदाज खूप लोकप्रिय झाला होता.

१९७५ दोघांसाठी महत्त्वाचं?

दोन्ही दिग्ग्जांच्या आयुष्यात १९७५ हे वर्ष खूप महत्त्वाचं ठरलं. याच वर्षी ‘जंजीर’व्दारे अमिताभना यश मिळालं होतं तर १९७५ मध्येच रजनीकांतनी 'अपूर्वा रागनगाल' या चित्रपटाद्वारे चित्रपट कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. स्ट्रगलच्या काळात ज्याप्रमाणे बच्चन यांनी राजेश खन्ना, माला सिन्हा, नूतन आदी स्टार्ससह सहायक कलाकाराच्या भूमिका केल्या त्याचप्रमाणे रजनीकांतनी सुरुवातीच्या काळात कमल हसन, श्रीविद्या सारख्या स्टार्ससह काम केलं. सुरुवातीच्या काळात दोघांनी नकारात्मक भूमिका केल्या.

साधर्म्य... स्ट्रगल व जिद्द

बच्चन व रजनीकांत दोघांनाही यशाची खूप वाट पाहावी लागली. यशस्वी हीरो बनण्याचा दोघांचाही प्रवास सुकर नव्हता. मित्राच्या मदतीमुळं रजनीकांतना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवता आला. मग तामिळ भाषा शिकले. परंतु योग्य संधीसाठी त्यांना वाट पाहावी लागली होती तर ११ सिनेमे फ्लॉपनंतर अमिताभना यश मिळालं होतं. अभिनय कारकीर्दीमध्ये यश मिळाल्यानंतरसुद्धा दोन्ही अभिनेत्यांना अपयशाचा सामना करावा लागला.

बच्चन यांचं साउथशी नातं

ज्याप्रमाणे रजनीकांत यांचं हिंदी चित्रपटांशी नातं राहिलं आहे, त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून बच्चन सुद्धा दाक्षिणात्य सिनेमांशी जोडले गेले आहेत. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ’अमृतधारे’ या कन्नड सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून बच्चन यांनी दाक्षिण्यात चित्रपटसॄष्टीत प्रवेश केला.

कंधार (मल्ल्यालम २०१०), मनाम (तेलुगु- पाहुणा कलाकार २०१४), सई रा नरसिम्हा रेड्डी ( तेलुगु २०१९, हा चित्रपट त्यांनी आपल्या आवाजात हिंदीमध्ये डब केला) आदी सिनेमांत त्यांनी अभिनय केला आहे. अभिनयाबरोबरच बच्चन यांनी गुलाबी (तेलगू), उल्लासम (तामिळ), युवाथुर्की (मल्ल्यालम) आदी चित्रपटांची निर्मिती केली. तर बटरफ्लाय या कन्नड सिनेमात अमिताभनी गाणे गायले आहे.

अधिक मानधन कुणाचं?

बच्चन यांनी आतापर्यंत जवळपास दोनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तर आता ज्या सिनेमात रजनीकांत, बिग बी सह काम करत आहेत, तो त्यांचा १७० वा सिनेमा आहे. शहेनशाह अमिताभ बच्चन चित्रपटात काम करण्यासाठी अधिक मानधन घेतात की रजनीकांत असा प्रश्न कायम या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या बाबतीत विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे रजनीकांत.

हो, ७३ वर्षीय रजनीकांत यांचं एका सिनेमासाठीचं मानधन आहे १२० कोटी रुपये. भारतीय अभिनेत्यांमध्ये सर्वाधिक महाग अभिनेता आहेत रजनीकांत. बच्चन प्रत्येक पिक्चरसाठी ६ कोटी रुपये घेतात. खरं म्हणजे अभिनेत्याचं वय वाढलं की त्याची मोबदला, लोकप्रियता, मागणी कमी होत जाते, परंतु रजनीकांत यांच्या बाबतीत उलट प्रकार आहे.

वाढत्या वयाबरोबर त्यांच्या चाहत्यांची संख्या व चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड्स वाढतच आहेत. जेलर या त्यांच्या सिनेमाने तब्बल ६०० कोटी रुपयांची बॉक्स ऑफिस कमाई केली आहे.

स्वभावातील साम्य

दोन्ही ग्रेट कलाकार कायमच नम्र, साधे आणि वादविवादापासून दूर राहत आले आहेत. योगायोग म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या सुनेचं नाव ऐश्वर्या आहे तर रजनीकांत यांच्या मुलीचं नाव ऐश्वर्या आहे. एक गमतीदार किस्सा सांगते. रोबोट या चित्रपटात ऐश्वर्या रायसह रोमॅंटिक सीन्स करताना रजनीकांत मनातून थोडे घाबरले होते कारण ऐश्वर्या अमिताभ यांची सून आहे. त्यांना वाटत होतं, की ते रोमॅंटिक सीन्स बघून अमिताभ आपल्याला खबरदार रजनी असं तर म्हणणार नाहीत ना? हा विचार शूटिंगच्या दरम्यान त्यांच्या मनात येत असे.

बच्चन यांचा मोलाचा सल्ला

२०१७ मध्ये ३१ डिसेंबरला रजनीकांतनी घोषणा केली होती, की २०२१ मधील तामिळनाडू विधानसभेसाठी ते निवडणूक लढवणार आहेत. त्यांची ही घोषणा ऐकल्यावर बच्चन यांनी राजकारणात प्रवेश न करण्याचा प्रेमळ सल्ला दिला होता. परंतु लवकरच त्यांना अनुभव आला, की बच्चन यांनी आपल्या अगदी योग्य सल्ला दिला होता.

त्यामुळेच १२ जुलै २०२१ या दिवशी आपला राजकीय पक्ष रजनी मक्कल मंदरम (RMM) बरखास्त करून रजनीकांतनी भविष्यात राजकारणापासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला. राजकारणाविषयीच्या सल्ल्यासोबतच अमिताभनी रजनीकांतना व्यायाम करण्याचा व व्यस्त राहण्याचा सल्ला देखील दिला.

अशी आहे या दोन दिग्गज-महान अभिनेत्यांची एकमेकांशी जिवलग-निकोप मैत्री. सर्वांना आता प्रतीक्षा आहे तो त्यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची...

(लेखिका मुक्त पत्रकार असून संगीत व चित्रपट क्षेत्राच्या जाणकार अभ्यासक असून त्यांची अभ्यासपूर्ण अशी विविध पुस्तक प्रसिद्ध झाली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com