मी अजूनही उभा आहे

जगप्रसिद्ध महान गायक-संगीतकार एल्टन जॉन यांनी ८ जुलैला स्वीडनमधल्या स्टॉकहोम शहरात आपली अखेरची कॉन्सर्ट साजरी केली.
Singer Musician Elton John
Singer Musician Elton Johnsakal

- अमोल परचुरे, mailto:amolparchure@gmail.com

जगप्रसिद्ध महान गायक-संगीतकार एल्टन जॉन यांनी ८ जुलैला स्वीडनमधल्या स्टॉकहोम शहरात आपली अखेरची कॉन्सर्ट साजरी केली. यापुढे आता एल्टन जॉन म्युझिक टूर करणार नाहीत. तसं त्यांनी पूर्वीच जाहीर केलं होतं. तरीही जगभरातल्या वृत्तपत्रांत ही बातमी छापून आली. १९७० मध्ये त्यांनी सर्वप्रथम वर्ल्ड टूर केली होती. तेव्हापासून ८० हून जास्त देशांमध्ये ते ४ हजारपेक्षा जास्त लाईव्ह शोमध्ये त्यांनी आपलं गाणं सादर केलं आहे.

२०१८ मध्ये या ‘फेअरवेल यल्लो ब्रिक टूर’ची सुरुवात झाली. कोविड काळात या टूरला विराम घ्यावा लागला आणि ८ जुलै २०२३ पर्यंत ३३० शोज करून समारोप झाला. स्टॉकहोममधील शोमध्ये आपल्या फॅन्सचे आभार मानताना एल्टन जॉन स्वाभाविकच काहीसे भावुक झाले. १९७० मध्ये त्यांनी सर्वप्रथम वर्ल्ड टूर केली होती.

तेव्हापासून ८० हून जास्त देशांमध्ये ते ४ हजारपेक्षा जास्त लाईव्ह शोमध्ये त्यांनी आपलं गाणं सादर केलं आहे. ‘चाहत्यांचं प्रेम मला आयुष्यभरासाठी पुरणारं आहे. त्यांच्यासाठी मी कदाचित लवकरच एखादं गाणं घेऊन येईन’ असं आश्वासन त्यांनी जगभरातील चाहत्यांना दिलं आहे.

तो १९६९ चा काळ होता. ‘बीटल्स’ बँडने आपलं शेवटचं गाणं रेकॉर्ड केलं. ‘आफ्टर लव्हिंग यू’सारख्या गाण्यांमधून वाजणारी ‘एल्विस प्रिस्ले’ची गिटार जगाला थिरकायला लावत होती. ‘रोलिंग स्टोन’ बँडची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती आणि अशा काळात एल्टन जॉन नावाचा तारा उदयाला आला. जगभरातले गायक गिटारच्या तारा छेडत गाण्यांमधून आपला आक्रोश व्यक्त करत होते, तेव्हा एल्टन जॉन यांनी पियानो आणि रॉक एन रोल यांची जोडी जमवली आणि जगाला अक्षरशः वेड लावलं.

१९४७ मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या एल्टन जॉनचं मूळ नाव रेजिनाल्ड केनेथ ड्वाइट. घरची परिस्थिती बेताची होती; पण घरात संगीत नांदत होतं. आई-वडिलांनी जमवलेल्या रेकॉर्डचे स्वर त्याच्या कानावर पडत होते. तिथूनच त्याच्या संगीतवेडाची सुरुवात झाली. अवघा चार वर्षांचा असताना तो आजीच्या घरी पियानोवर एका फ्रेंच संगीतकाराची धून वाजवत होता.

सात वर्षांचा असताना पियानो वादनाचं शास्त्रशुद्ध शिक्षण सुरू झालं आणि अकराव्या वर्षी लंडनच्या ‘रॉयल ॲकेडमी ऑफ म्युझिक’ची स्कॉलरशिप मिळाली. तिथे त्याने पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं; पण त्याला स्वतःची संगीतरचना निर्माण करण्याचे वेध लागले होते. त्यापायी तो शेवटच्या परीक्षा न देता बाहेर पडला.

पंधरा वर्षांचा असताना त्याला एका स्थानिक पबमध्ये पियानिस्ट म्हणून नोकरी मिळाली. काही मित्रांना सोबत घेऊन त्याने ‘ब्ल्यूसोलॉजी’ नावाचा बँड बनवला आणि लंडनभर वेगवेगळ्या क्लबमध्ये परफॉर्म करायला सुरुवात केली. याच काळात त्याने ‘एल्टन जॉन’ हे नाव धारण केलं. बँडमधील सॅक्सोफोन वादक एल्टन डीन आणि गायक जॉन बॉल्डरी यांच्या नावातून ‘एल्टन जॉन’ हे नाव तयार झालं.

‘नावात बदल झाल्यावर माझा जणू पुनर्जन्मच झाला’ असं एल्टन जॉन यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. लहानपणापासून ज्या कडक शिस्तीच्या वातावरणात ते वाढले ते सगळं मागे ठेवून त्यांनी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. केस रंगीत झाले, वेशभूषा बदलली... एवढंच नाही, तर चित्रविचित्र सनग्लासेसची नवीन फॅशन आणली. (आता तर ‘गुची’ या कंपनीने एल्टन जॉन कलेक्शन बाजारात आणलं आहे.)

१९६६ मध्ये एका ऑडिशनदरम्यान बर्नी तौपिन आणि एल्टन जॉन यांची भेट झाली. याच भेटीतून पुढे जागतिक संगीत क्षेत्रात इतिहास घडला. या दोघांनी तो इतिहास घडवला. पहिली दोन वर्षे बर्नी आणि एल्टन हे इतर गायकांसाठी गाणी लिहीत होते; पण मग एल्टन जॉन यांनी ठरवलं, की आता सोलो गायक म्हणून जगासमोर यायचं. बर्नी आणि एल्टन यांनी मिळून गाणं लिहायचं... एल्टन यांनी संगीत द्यायचं आणि गायचं... हा सिलसिला पन्नास वर्षं उलटली तरी सुरूच राहिला. या दोघांच्या मैत्रीत कधीही, कोणत्याही कारणामुळे दुरावा आला नाही. हेवेदावे निर्माण झाले नाहीत.

१९६९ मध्ये ‘एम्प्टी स्काय’ हा पहिला अल्बम प्रकाशित झाला. पॉप आणि रॉक शैलीत उत्कट तरल प्रेमगीतं ऐकून रसिकांच्या उड्या पडल्या. पाठोपाठ आलेल्या ‘युअर साँग’ या अल्बमने एल्टन जॉन हे नाव गाजायला लागलं. संगीताच्या दुनियेत जीनिअस सुपरस्टार जन्माला आला होता. १९७० ते १९७४ या चार वर्षांत एल्टन जॉन यांचे नऊ अल्बम आले आणि प्रत्येक अल्बमला इंग्लंड आणि अमेरिका दोन्ही ‘टॉप-१०’मध्ये नेहमीच वरचं स्थान मिळत होतं.

‘गुडबाय यलो ब्रिक रोड’ या पुढच्या अल्बममध्ये एक गाणं होतं, ‘कॅण्डल इन द विंड’. हे गाणं म्हणजे मेर्लिन मन्रोला वाहिलेली श्रद्धांजली होती. १९९७ मध्ये बर्नी तौपिन यांनी या गाण्याचे शब्द बदलले आणि एल्टन जॉन यांनी या गाण्यातून आपल्या प्रिय मैत्रिणीला श्रद्धांजली वाहिली. ती मैत्रीण म्हणजे लेडी डायना!

एकामागून एक अल्बम सुपरहिट होत होते. चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम सुरू झालं. स्टेज परफॉर्मन्स जगभरात सुरू होते. शीतयुद्ध काळात रशियात जाऊनही त्यांनी कॉन्सर्ट गाजवल्या. चाहत्यांची गर्दी आणि प्रेम वाढत होतं; पण याच काळात एल्टन जॉन यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच खळबळ सुरू होती. दारू आणि ड्रग्सच्या ते आहारी गेले होते. सुदैवाने लवकरच त्यांनी उपचार सुरू केले आणि व्यसनांमधून बाहेर पडले.

या कठीण काळात त्यांनी जे सोसलं त्याची जाणीव ठेवत पुढे इतर कलाकारांना व्यसनातून बाहेर काढण्याचं मिशनच हातात घेतलं. याच काळात आपण समलैंगिक असल्याची जाहीर कबुली दिली. समलैंगिक चळवळीला पाठबळही दिलं. प्रसंगी समलैंगिकविरोधी सरकारी धोरणांना खुलं आव्हानही दिलं. बिनधास्तपणा हा केवळ आपल्या गेटअपमध्येच नाही, तर आपल्या विचारांमध्येही आहे, हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं.

समलैंगिक व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर एड्सची लागण होते आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी १९९२ मध्ये ‘एल्टन जॉन एड्स फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि एड्सग्रस्तांना उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली. नुकत्याच झालेल्या ‘फेअरवेल टूर’मध्ये एल्टन जॉन यांनी तब्बल ९३ कोटी डॉलर्स इतकं रेकॉर्डब्रेक उत्पन्न मिळवलं. त्यातले चार कोटी डॉलर्स एल्टन जॉन यांनी ‘एड्स फाऊंडेशन’ला दिले.

‘ट्विटर’सारख्या समाजमाध्यमांमधून चुकीची माहिती पसरवून समाजात दुही माजवण्याचा प्रकार वाढतोय हे कारण देत त्यांनी आपलं ‘ट्विटर’ अकाऊंटही बंद केलं. भारतात एल्टन जॉन यांची एकमेव कॉन्सर्ट झाली ती २००२ मध्ये. बंगलोरमध्ये झालेल्या त्या कॉन्सर्टमध्ये एल्टन जॉन यांनी वीस हजारांच्या गर्दीला ‘हॅप्पी दीपावली’ म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या.

१९७० पासून आजपर्यंत एल्टन जॉन यांच्या ३० कोटींहून अधिक रेकॉर्डसची विक्री झाली आहे. दोन वेळा ऑस्कर ट्रॉफी पटकावली. ‘लायन किंग’ चित्रपटातील ‘कॅन यू फील द लव्ह’ आणि ‘रॉकेट मॅन’मधील ‘लव्ह मी अगेन’ या गाण्यांसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. तब्बल सहा वेळा त्यांचा ग्रॅमी पुरस्कारानं सन्मान झाला.

‘आयडा’ या ब्रॉडवे म्युझिकलसाठी मानाचा ‘टोनी’ अवॉर्डही त्यांना मिळाला आहे. फेअरवेल टूरसाठी आता त्यांना ‘एमी’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. जर त्यांना एमी पुरस्कार मिळाला तर ते इम्मी, ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी या प्रतिष्ठेच्या चारही पुरस्कारांवर आपलं नाव कोरणारे पंधरावे लीजंड ठरू शकतात.

२०१९ मध्ये एल्टन जॉन यांचा जीवनपट ‘रॉकेट मॅन’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर आला. ‘रॉकेट मॅन’ या नावाचं गाणं एल्टन जॉन यांनी १९७४ मध्ये गायलं होतं, जे आजही तितकंच लोकप्रिय आहे. एल्टन जॉन या नावाला जे ग्लॅमरस वलय आहे, ते भेदून एल्टन जॉनच्या आयुष्यातले चढ-उतार नेमकेपणाने मांडणारा असा हा चित्रपट आहे. एल्टन जॉन हे गूढ नेमकं काय आहे ते जाणून घ्यायचं असेल, तर हा चित्रपट नक्की बघावा असा आहे.

लेडी गागा, एड शीरन अशा आजच्या काळातल्या विविध भाषिक लोकप्रिय गायकांवर ज्याचा प्रभाव दिसून येतो, तो एल्टन जॉन आता ७६ वर्षांचा आहे. आता त्याला कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. रंगीबेरंगी आयुष्य तो आतापर्यंत जगलाय... कधी आपली वेदना तर कधी आपला आनंद तो गाण्यातून मांडत राहिला. रॉक आणि पॉपच्या गदारोळात तो लंडनमध्ये शिकलेलं पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत विसरला नाही.

आपला मित्र आणि गीतकार बर्नीच्या साथीने शब्द-शब्द जपून वापरले. मोठ्या नजाकतीने चाली लावत त्या शब्दांना आपल्या आवाजात सजवलं. बीटल्स आणि एल्विस प्रिस्लेनंतर रॉक आणि पॉप नव्याने रुजवण्याचं मोठं काम एल्टन जॉनच्या गाण्यांनी वर्षानुवर्षं सातत्याने केलं. कोल्डप्लेसारखा आघाडीचा बँड असेल किंवा अडेलसारखी आघाडीची गायिका, सगळे आज एल्टन जॉनचं ऋण मान्य करतात.

एल्टन जॉनचं एक गाणं आहे, प्रेमभंग झालेला तरुण प्रेयसीला सांगतोय, ‘य एम स्टील स्टँडिंग... ’ (मी मी अजूनही उभा आहे)... आज तेच गाणं वेगळ्या अर्थाने एल्टनबाबतीत लागू पडतंय. ‘म्युझिक टूर’ करणार नसलो तरी ‘मी अजूनही उभा आहे’... माझ्यातलं संगीत संपलेलं नाही. मी एखाद्या समारंभात परफॉर्म करेन. पुन्हा पियानोसमोर बसेन. कदाचित एखाद्या नवीन पिढीतील गायकाबरोबर ‘कोलॅब’ करेन किंवा मग स्वतःचंच जुनं गाणं पुन्हा एकदा रेकॉर्ड करेन... आणि एल्टन जॉनचे चाहते त्याचीच तर वाट बघत आहेत...

(लेखक सध्या चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com