कसा झाला असावा हडबीच्या शेंडीवरचा अपघात...

Rock Climbing
Rock Climbingesakal
Updated on

सुरक्षेचे सर्वाधिक मापदंड जिथे पाळली जातात. अतिशय उच्च तंत्रज्ञानाने उपकरणे बनवली जातात व ती शास्त्रीय पद्धतीने तपासली जातात असा गिर्यारोहणाचा खेळ हा खरे तर अपघात प्रवण जगतात सर्वाधिक सुरक्षित मानला जातो. हा खेळ किती सुरक्षित आहे तर, तुम्ही रस्ता ओलांडताना जेवढे असुरक्षित असतात किंवा रस्त्यावर वाहन चालवताना जेवढी अपघाताची शक्यता असते त्याच्या कितीतरी पट कमी शक्यता ही गिर्यारोहणाच्या खेळात असते असे उपहासाने किंवा विश्वासाने बोलले जाते. काल अजिंठा सातमाळा डोंगर रांगेतील 'शुभेच्छूक अंगठ्याच्या आकारामुळे', प्रसिद्ध असलेल्या हडबीच्या शेंडीच्या सुळक्यार झालेल्या अपघाताच्या निमीत्ताने गिर्यारोहणातली सुरक्षा हा विषय पुन्हा चर्चेचा मुद्दा बनला आहे.

शेवटी जित्या जागत्या लोकांच्या जीवाचा प्रश्न असतो. इथे प्रत्येक जण हौसेसाठी किंवा अत्युच्च साहसाला गवसणी घालण्यासाठी आलेला असतो. तुम्ही जर सहभागी म्हणून आला असाल तर तुमच्या सर्वोत्तम सुरक्षेची हमी ही असायला हवी. तुम्ही जर तांत्रिक चमुतले असाल किंवा तांत्रिक नेते तर चुक होता कामा नये, कारण सगळ्यांचा जीव तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतो. हडबीच्या शेंडीवर झालेला अपघात हा खिळा निखळून झाल्यामुळे झाल्याची प्राथमिक् माहिती मिळाली. हडबीची शेंडी खुप ठिसूळ आहे, असे तिच्यावर आरोहण करणारी मंडळी नेहमी सांगते. कालचा अपघात हा दगड निखळल्याने झाला असे ठामपणे सांगता येत नाही. इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या त्या सुळके आरोहण मोहिमेत एकुण १८ जण सहभागी होते. या सुळक्यावर बोल्टींग करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यावर मोहिम नेणार्‍यांना नव्याने बोल्ट मारण्याचे श्रम पडत नाहीत. तसा हा मध्यम ते सोप्या श्रेणीतला सुळका म्हणून ओळखला जातो. दुपारीच सर्वजण शिखरावर दाखल झाले व त्यांनी त्याचा आनंद साजरा केला. सर्व सहभागींना सुरक्षा दोर देत खालच्या भागात सुरक्षित टप्प्यावर उतरविण्यात आले. आता दोघे जण उतरण्याचे बाकी होते.

Rock Climbing
सोनेरी स्वप्नं : पाच कोटी जळाले

अनिल वाघ आणि मयूर म्हस्के हे सख्खे मामा भाचे. हे दोघे शंभर एक फुट बाकी असताना अचानक कोसळले. इतक्या उंचीवरून पडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. काही कळण्याच्या आत या घडामोडी घडल्या. पडणार्‍या गिर्यारोहकास पकडण्याच्या प्रयत्नात एक जण जखमी झाला. मनमाड रूग्णालयात त्यांचे शव आणण्यात आले तेव्हा अंतर्गत जखमा जाणवत होत्या. एक तर दोघे एकाच दोरावरून समांतर आवरोहण करत होते. सद्या याचे प्रचलन आहे. एक तर शेवटचा आरोहक जेव्हा शिल्लक राहतो, तेव्हा उतरताना तो एकटा असल्याने तणावात येऊ शकतो, त्याचा विश्वास डळमळीत होऊ शकतो यासाठी दोघे जण दोर कडीतून खाली सोडतात आणि एक एक टोक आवरोहण कडीतून ओवून एकाच वेळी उतरतात. हे तंत्र अवलंबताना तो सरावातून चांगले घोटले गेले असावे. काही वेळा समन्वय चुकला व एक आरोहक खालच्या बाजुस राहिला तर एकाच दोरावर भार येऊ शकतो. त्यात तर नियंत्रण सुटले तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या अर्थी सहभागींनी खिळा निखळल्याचे सांगितले, त्यावरून असे दिसते की, त्यांनी ज्या खिळ्यातून दोर ब्राम्ही लिपीतल्या ग अक्षरा सारखा किंवा इंग्रजीतल्या यू अक्षरा सारखा ओवून घेतला होता. या पद्धतीने डोंगर चढणारी मंडळी उतरते त्याला यू करून उतरले असे म्हणतात. ज्या कडीतून हा दोर यू केला आहे ती कडी पुरेशी सुरक्षित होती का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सह्याद्रीतल्या आरोहण जगतात अनेक ठिकाणी खडकात ठोकलेल्या जुन्या कड्यांचा वापर केला जातो. हा खेळा प्रसरणात्मक असतो, खडकात ठोकला की त्याचे दातरे उलट्या बाजूने प्रसरण पावतात व खडकावर पकड घेतात. हे खिळे अनेक वर्षे वापली जाऊ शकतात, असे असले तरी गिर्यारोहक पर्यायी सुरक्षेचा विचार करूनच अशा जुनाट बोल्टचा वापर करतात, म्हणजे समजा तो खिळा गंजल्यामुळे निखळला तर आणखी किमान एक किंवा दोन खिळ्यांतून त्यांचा दोर ओवलेला असतो. ही त्रिस्तरीय सुरक्षा योजना अवलंबणे आदर्शवत पद्धत. दोर यू करून उतरताना ही संधी नसते, त्यामुळे ज्या कडीतून तुम्ही आवरोहण करणार असाल तिची मजबूती तपासून बघण्याची आवश्यकता असते. यासाठी गिर्यारोहक सुरज मालूसरे यांनी त्यांच्या अलंग किल्ल्यावरील प्रसंगाची माहिती दिली, काही वर्षांपूर्वी तो शेवटचा आरोहक म्हणून उतरत होता, त्याने वरच्या भागात एक प्रसरणात्मक कडी ठोकली, परंतू ती व्यवस्थित ठोकल्या गेली नव्हती, त्यामुळे त्याने त्यातून दोर ओवून तो खाली सोडला व तिन जणांना त्यावर भार देऊन दोर खेचायला सांगितला.

आता कडीने दिड दोनशे किलोहून अधिकचा भार झेलला होता. त्यामुळे त्याने तपासणी करून त्या कडीतून दोर ओवला. दुसरे टोक अर्थात सुरक्षा दोर पुरवणार्‍या गड्याच्या नियंत्रणात असते, त्यामुळे डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच गिर्यारोहक सरकन खाली आलेला असतो. हडबीच्या शेंडीवर अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या मामा भाच्यांनी जी कडी दोर ओवण्यासाठी वापरली ती जर दहा पंधरा वर्षे जुनी असेल तर खालच्या टप्प्यात दोघांच्या वजनाचा भार पडून ती बाहेर निघून येण्याची भरपूर शक्यता शिल्लक राहते. सुरज मालूसरे यांनी या शक्यतेला दुजोरा दिला. आता वापरात असलेले नव्या पद्धतीचे रासायनिक बोल्ट अतिशय सुरक्षित आहेत. महाराष्ट्रात सुरक्षित गिर्यारोहण पुढाकार (स्की) या संस्थेने अनेक ठिकाणी रासायनिक पद्धतीने अनेक लोकप्रिय गिर्यारोहण मार्गांवर 'स्कीचे बोल्ट' या नावाने प्रसिद्ध असलेले खिळे बसवले आहेत. या प्रत्येक खिळ्याला स्वतंत्र क्रमांक दिले आहेत. त्यांचे आयुर्मान सरासरी चाळीस वर्षे असल्याची मान्यता आहे. याशिवाय नव्या पद्धतीचे प्रसरणात्मक खिळे खासे सुरक्षित आहेत. शेवटचा आरोहक उतरतो तेव्हा तो एकाच खिळ्यावर विसंबून असतो. तो खिळा हा मजबूतच असायला हवा. थोडी शंका वाटली तर पर्यायी खिळा मारलेला बरा. हडबीची शेंडी अगदीच सरळ उभी असल्याने अशा ठिकाणी जुन्या खिळ्यांवर दोन जणांचा भार जर यदाकदाचित दिला गेला असेल तर ते योग्य नाही. शेवटी या खेळात सर्वोत्तम सुरक्षा साधने वापली जातात किंवा ती वापरण्यावर भर दिला जातो तद्वताच सुरक्षित तंत्र हेही तितकेच महत्वाचे ठरते.

Rock Climbing
जीव वाचवणारी सकारात्मकता!

नव्या पिढीने या बारकाव्यांचा जरूर विचार करावा. स्वत:च्या हिमतीवर गिर्यारोहणाच्या मोहिमा आयोजित करताना ज्येष्ठ आणि अनुभवी गिर्यारोहकांच्या संपर्कात सतत रहावे व त्यांनी तुम्ही वापरत असलेल्या तंत्राबद्दल व उपकरणांबद्दल माहिती देत जावी. उपकरणाची नियमीत देखभाल व त्याच्यांवर कोणत्या वेळेस किती भार दिला याचाही लेखाजोखा नियमीत लिहीत जावा. निर्धारीत भारमान पार झाल्यावर अशी उपकरणे ही पूर्णपणे निष्काशित करावी ती पुन्हा वापरू नये. विशेष करून दोर हा किती वेळ वापरायचा आहे व त्यावर किती भार द्यायचा आहे याचे परिमाण नामांकित उत्पादक देतात ती पडताळणी नियमीत करणे आवश्यक आहे.

जीव असेल तर जग या उक्तीस अनुसरून प्रत्येकाची सर्वोच्च सुरक्षा हाच या खेळाचा गाभा आहे. यात केवळ माणूसच नव्हे तर तुम्ही ज्या डोंगरावर आरोहण करता त्या डोंगराची सुरक्षा त्याची काळजी तितकीच महत्वाची. याच अंगाने गिर्यारोहक डोंगरांची सर्वाधिक काळजी घेताना दिसतात.

लेखक - प्रशांत परदेशी, गिर्यारोहक वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्था, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com