जीव वाचवणारी सकारात्मकता!

accident
accidentesakal

''पंख सकारात्मकतेचे हे साप्ताहिक सदर सुरू केल्यानंतर आयुष्यात घडलेल्या अनेक सकारात्मक गोष्टी मनापुढे फेर धरायला लागल्या. किती तरी गोष्टी... अगदी ही लिहावी गोष्ट की ती लिहावी? असा प्रश्‍न तर अनेकवेळा मला पडतोय! चला, तर प्रयत्न करू या आयुष्यभराच्या सकारात्मक पोतडीतून एक अविस्मरणीय, आयुष्यभर प्रेरणा देणारी गोष्ट शेअर करण्याचा...'' - डॉ. हेमंत ओस्तवाल

ही गोष्ट आहे साधारणतः १२-१४ वर्षांपूर्वीची, वेळ दुपारच्या ४.३० ची होती. मी हॉस्पिटलमध्ये होतो. नाशिकमधील एका व्यापारी मित्राचा मोबाईलवर फोन आला. खूप रडत-रडत बोलत होता. तो घाबरलेला होता. खूप काही बोलत होता. मला एवढेच कळले, की मोठा अपघात झालेला आहे. त्यात काही जण जागेवरच गेले होते, तर दोघांना अत्यवस्थ अवस्थेत सुयश हॉस्पिटलला आणण्यात येत होते. थोड्याच वेळात अत्यंत गंभीर अवस्थेतील दोन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. आधी पूर्वसूचना असल्याने आमची टीम तयारच होती. रुग्णवाहिका कॅज्युअल्टीच्या दारात उभी राहिली. आमच्या टीमने रुग्णवाहिकेतच रुग्ण बघायला सुरवात केली. तेव्हा लक्षात आले, की दोन्ही रुग्ण जवळपास गेल्यात जमा आहेत. रक्तदाब अजिबात लागत नव्हता. नाडी अत्यंत हळू, जवळपास लागत नव्हती. रुग्णांची स्थिती अत्यंत गंभीर होती. आमच्या टीमने रुग्णवाहिकेतच वाचविण्यासाठी आवश्‍यक असलेली ‘इन्टुबेशन’ प्रक्रिया पार पाडली आणि दोन्ही रुग्णांची प्रकृती कॅज्युलिटीमध्ये स्थिर करून त्यांना अतिदक्षता विभागात भरती केले.

accident
आई-वडिलांचे संस्कार हेच देशभक्तीचं बीज

आता येथे इन्टुबेशनबद्दल समजावून घ्यावे लागेल. कुठलाही रुग्ण हा अत्यवस्थ होतो. तेव्हा त्याची स्वतःची श्‍वसनप्रक्रिया हळूहळू बंद व्हायला लागते. अशावेळी श्‍वासोच्छ्‌वास व्यवस्थित चालू राहावा म्हणून त्वरित रुग्णाच्या तोंडात एक नळी (ट्यूब) टाकतात. जेणेकरून रुग्णाचा श्‍वास थांबणार नाही. त्या ट्यूबला फुगा जोडतात आणि रुग्णाला श्‍वासोच्छ्‌वास येईपर्यंत अथवा व्हेंटिलेटरवर घेईपर्यंत तो फुगा हाताने सतत दाबत राहावा लागतो. या पद्धतीने जगभरात रोज लाखोंनी जीव वाचविले जात असतात.

दोन्ही रुग्ण पहिला आठवडा अतिगंभीर होते. दोघांचे आठ-दहा फॅक्चर्स होते. डोक्याला, छातीला खूप मार लागलेला होता. दोघेही रुग्ण दोन ते तीन महिने हॉस्पिटलमध्ये भरती होते. दोघांचे तरुण वय, इच्छाशक्ती, डॉक्टरांचे, मेडिकल, पॅरामेडिकल स्टाफचे अथक प्रयत्न त्यामुळे दोन्ही रुग्ण सुखरूप घरी गेलेत.

नाही, नाही हे शंभर टक्के खरे नाही. हे दोन्ही रुग्ण कसे वाचलेत, याचे सर्वांत महत्त्वाचे कारण मी आता सांगणार आहे. आपल्या आयुष्यात रोज काही ना काही घटना घडतच असतात. त्यातल्या काही थोड्या, थोड्या जास्त, जास्त, खूपच जास्त सकारात्मक असतात. या गोष्टी स्वीकारण्यात कोणालाही वेळ लागत नाही. किंबहुना या गोष्टी, अतिशय चांगल्या पद्धतीने, तर काही मिठाई वाटून, काही पार्टी करून, काही साग्र-संगीत, काही हजारो लोकांना बोलावून, मोठे कार्यक्रम करून आपण साजरे करत असतो. तर काही गोष्टी ठीकठाक असतात. काही संमिश्र, यांना स्वीकारण्यासाठीही फार काही अडचणी येत नाहीत. तर काहीवेळा मोठ्या अडीअडचणी देखील निर्माण होतात. कारण आपण नकारात्मक गोष्टी नकारात्मकरीत्या स्वीकारतो. यामुळे आपल्या अडचणीत अधिक वाढ होते. मात्र, त्या उलट आपण जर नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेने स्वीकारल्या तर आयुष्य खूपच सुखकर, आनंदमय होते. मला माझ्या आयुष्यातील अनुभवांनी हेच शिकविले आहे, की सकारात्मक वागल्याने मोठ-मोठ्या अडचणी (Problems) सुद्धा लवकर सुटतात. कमी नुकसान होते.

माझा हा विश्‍वास त्या दिवशी अजून दृढ झाला. ज्या दिवशी मला अपघाताची संपूर्ण माहिती मिळाली व त्याचा अंतिम परिणाम म्हणून माझ्याकडे या भयानक अपघातातून आश्चर्यकारकरीत्या नशिबाने वाचलेले दोन तरुण जीव होते. ही घटना नाशिकपासून ३०-३५ किलोमीटर अंतरावरील सिन्नरजवळील वळणावर घडली होती. ते गणपती उत्सवाचे दिवस होते. देशमुखांच्या घरी मोठा धार्मिक कार्यक्रम होता. सगळे नातेवाईक आप्तस्वकीय, सगे-सोयरे एकत्र झालेले होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दुपारी जेवणाचा कार्यक्रम पण खूप जोरात झाला. दुपारचे जेवण चार वाजेपर्यंत चालले होते. चारनंतर गर्दी कमी झाली. घरातले सख्खे नातेवाईक फक्त राहिले होते. देशमुखांना एक मुलगा आणि मुलगी होती. दोघांचेही लग्न झालेले होते. जावई चांगल्या घरचा मिळालेला होता. मुलगीदेखील चांगल्या मोठ्या घरची मिळालेली होती. सर्व उच्चशिक्षित होते. स्वतः देशमुखही उच्चशिक्षित होते. आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती.

गर्दी कमी झाल्याने आत सगळे निवांत बसले होते. अचानक बहीण-भावाचे बोलता बोलता ठरले, की चला आपण शिर्डीला जाऊन दर्शन घेऊन येऊ, फार दिवस झालेले आहेत साईबाबांच्या दर्शनाला. देशमुखांनी पण होकार दिला. गाडी दिली, ड्रायव्हर दिला आणि साडेचारच्या सुमारास मंडळी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला निघालीदेखील. बहीण- भाऊ जोडीने निघाले होते. सोबत नातू, मुलाचा मुलगा देखील होता. शिर्डी हायवे आता लागलाच होता. गावाच्या जवळ चार (कोर) मार्गिकेचा लेन होता. सर्व जण आनंदाच्या सागरात विहार करीत होते आणि पुढच्या एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. झाले असे, की त्यांची कार शिर्डीच्या दिशेने आपल्या लेनमधून रस्त्याच्या कडेने व्यवस्थित ७०-८० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने चालली होती. त्यांच्या बाजूची एक लेन, त्यानंतर रोड, डिव्हायडर व मग समोरच्या बाजूकडून येणाऱ्या दोन- लेन अशी एकंदरीत स्थिती होती. शिर्डीकडून सिन्नरकडे येणाऱ्या तिकडच्या मार्गिकेवर एक स्कॉर्पिओ अत्यंत भरधाव येत होती. या मंडळींना काही कळायच्या आतच स्कॉर्पिओच्या चालकाचा ताबा सुटला. स्कॉर्पिओने आधी डिव्हायडरला धडक दिली. वेग खूपच जास्त असल्याने गाडी हवेतून पलटी घेत सिन्नरकडून शिर्डीकडे जाणाऱ्या देशमुखांच्या कारवर जाऊन आदळली आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. देशमुखांचा मुलगा- मुलगी नातू आणि ड्रायव्हर जागेवरच गतप्राण झाले. सून आणि जावई रक्ताच्या थारोळ्यात मरणासन्न अवस्थेत गेले. स्कॉर्पिओ एका बाजूला जाऊन कलंडली, तिचे स्पिडोमीटर १४० वर लॉक झालेले. स्कॉर्पिओच्या चालकाचे वय किती होते? तर ते होते फक्त १५ वर्षे. अत्यंत कोवळा मिसरुड न फुटलेला मुलगा आणि पासिंग न झालेली स्कॉर्पिओ तो चालवत होता. हा मुलगा द्राक्षबागायतदाराचा एकुलता एक मुलगा. स्कॉर्पिओच हवी म्हणून जिद्दीला पेटलेला. ही गाडी घेण्यासाठी तो तीन दिवस जेवला नव्हता म्हणे आणि वडिलांनी नवी कोरी स्कॉर्पिओ आणून १५ वर्षांच्या मुलाकडे चालक परवाना नसतानादेखील दिली होती. काय भावात पडला तो हट्ट? असले लाड पुरविणे किती जणांचा जीव घेऊन गेला होता.

अपघातानंतर अगदी मोजून दोन-पाच मिनिटांत गाव वस्तीवरचे लोक, आप्तस्वकीय गोळा झाले. प्रचंड रडारड सुरू झाली. अपघात एवढा भीषण होता, की प्रत्यक्षदर्शी लोक धाय मोकलून रडत होते. तातडीने काही हालचाल करून गंभीर जखमी रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी काही केले पाहिजे, असे कोणासही सुचत नव्हते. या सगळ्यांत देशमुखांचे शालक जे माझे नाशिकचे व्यापारी मित्र होते ते पण होतेच. ते अपघातस्थळी पोचताच सर्वांत आधी जिवंत कोण आहे, ते त्यांनी बघितले. थोडी धुगधुगी असणाऱ्यांमध्ये देशमुखांचे जावई आणि सून होती. हे सर्व दुःख बाजूला ठेवून मित्राच्या सहकार्याने त्यांनी विद्युत वेगाने हालचाली करत रुग्णवाहिका तीन-चार मिनिटांत मिळविली. अपघात झाल्यापासून सात-आठ मिनिटांत वाऱ्याच्या वेगाने आमच्या हॉस्पिटलकडे रुग्ण घेऊन निघाले देखील होते. पोचताच मग यांच्याही अश्रूंचा बांध फुटला... आणि तसंच रडत-रडत त्यांनी मला फोन केला.

अपघात झाल्याच्या मोजून २०-२५ मिनिटांत दोन्ही रुग्ण आमच्याकडे पोचले होते. वैद्यकीय परिभाषेत सांगायचे, म्हटले तर जवळपास ‘प्लॅटिनम अवर’ मध्येच रुग्ण पोचवले होते. सर्जिकल, मेडिकल आकस्मित परिस्थितीत २० मिनिटांच्या आत हॉस्पिटलला पोचणे, म्हणजे प्लॅटिनम अवर. तर एक तासाच्या आत पोचणे म्हणजे गोल्डन हवर. अगदी खरोखरच ते दोन जीव या प्लॅटिनम अवरमध्ये पोचल्याने वाचले होते. अजून दोन ते पाच मिनिटांचा उशीर म्हणजे १०० टक्के मृत्यू या दोघांचाही नक्की होता.

accident
राजकीय खेळी मालेगावची अन् तयारी धुळ्याची

आता विचार करा. या अपघातग्रस्त जागेवर शेकडो लोक जमले होते. त्यात जवळचे नातेवाईकसुद्धा मोठ्या संख्येने होते. परंतु सर्वजण दुःखाच्या महासागरात कोसळलेले होती. हा प्रचंड मोठा नकारात्मक क्षण सगळेजण तसाच नकारात्मकरीत्या स्वीकारत होते. फक्त मुला-मुलीचा मोठा मामा याला अपवाद होता. या मामाला दुःख झाले नव्हते का? होय, त्यालाही दुःख झाले होते. प्रचंड दुःख झाले होते. कोणाचेही दुःख शब्दांनी वर्णन करण्यापलीकडे होते. तसे त्यांचेही होतेच. परंतु मोठ्या मामाने तो, आयुष्यात क्वचितच होणारा अत्यंत मोठ्या दुःखाचा आभाळाएवढा मोठा नकारात्मक क्षण अत्यंत सकारात्मकतेने स्वीकारला होता. या स्वीकारार्हतेचा चांगला परिणाम म्हणजे, वाचलेले दोन नशीबवान जीव. जीवदान देणे हे फक्त ईश्‍वराच्याच हातात आहे. परंतु आपल्या कुठल्याही बिकट प्रसंगी न डगमगता नकारात्मक क्षणांना सकारात्मकतेने स्वीकारले तर कोणाचा जीव वाचविण्यात आपण देखील निमित्तमात्र ठरू शकतो. अनेक लोकांना अशा प्रसंगांमध्ये मदत करण्याची इच्छा असते, पण अपघातानंतर पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्याच्या शक्यतेने अनेक जण पुढाकार घेत नाहीत. विशेष म्हणजे पोलिसांनीदेखील अपघाताच्या नोंदी घेण्याच्या पद्धतीमध्ये सकारात्मक बदल केले आहेत. जी व्यक्ती अपघातग्रस्तांना घेऊन हॉस्पिटलपर्यंत पोचते, त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. मात्र, ही बाब अजूनही सर्वसामान्यांपर्यंत पोचलेली नाही. आपलीच चौकशी होईल, ही भीती आजदेखील सर्वसामान्य लोकांना सतावते, जी आता सोडून द्यायला हवी. जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेणे, हेच अशा प्रसंगांमध्ये अत्यंत मोलाचे जीवरक्षक देवदूतासमान ठरू शकते, तर असे प्रसंग उद्‍भवल्यास आपणही घ्याल अशा नकारात्मक प्रसंगांमध्ये सकारात्मकरीत्या पुढाकार..?

(लेखक सुयश या प्रतिथयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com