वाघिणीचं दूध ! (आनंद घैसास)

anand ghaisas's article in saptarang
anand ghaisas's article in saptarang

वाघिणीचं दूध...आत्मसात करण्यास, प्राप्त करण्यास अतिशय कठीण असलेल्या गोष्टीसाठी हा वाक्‌प्रचार वापरला जातो. कारण, वाघिणीचं दूध मिळवणं ही खरोखरच अशक्‍यप्राय अशीच बाब असते. मनुष्यप्राण्यासाठी ही बाब अवघड आणि आवश्‍यकता नसलेलीही; पण वाघिणीच्या बछड्यांसाठी ती जीवनावश्‍यकच; मात्र या बछड्यांनाही हे दूध मिळविण्यासाठी जवळपास चार-पाच दिवस झगडावं लागतं! या वाघिणीच्या दुधाची काही वैशिष्ट्यं असतात. गाढवीण, हत्तीण, सील इत्यादी प्राण्यांचंही दूध त्यातल्या घटकांच्या दृष्टीनं वैशिष्ट्यपूर्ण असतं. कोणकोणती वैशिष्ट्यं असतात या दुधामध्ये?

‘वाघिणीचं दूध प्यावं लागतं...असं शूरवीर होण्यासाठी !’ पराक्रमी माणसाबद्दल असं नेहमीच म्हटलं जातं. एका पुराणातल्या गोष्टीत तर म्हणे एका राजकन्येनं ‘पण’ लावला होता, की जो कुणी वाघिणीचं दूध घेऊन येईल, त्याच्याशी मी लग्न करीन. अनेक राजकुमारांनी जंगलं पालथी घातली; पण वाघिणीचं दूध काही कुणाला मिळवता आलं नाही. खरंच एवढं कठीण आहे का वाघिणीचं दूध मिळवणं? हां, म्हणजे वाघिणीला नुकतीच पिलं झाली असली पाहिजेत... त्या पिलांना ती दूध पाजत असताना एखाद्या पिलाला बाजूला करून आपल्याला तिचं दूध काढून घेता आलं पाहिजे... बाप रे ! हे काय गाईचं वासरू बाजूला करण्याएवढं सोप्पं आहे?

गाईला चार आचळ असतात. लोंबणारे. गाय उभी असताना, ती वासराला पाजत असताना वासराला हलकेच बाजूला करून तिचं दूध काढता येतं. वाघिणीबाबत मात्र तसं नाही. वाघिणीला चारपेक्षा जास्त आचळ असतात; पण ती तिच्या बछड्यांना उभ्यानं पाजत नाही, झोपून पाजत असते. बछडे तिच्या अंगावर चढून दूध पीत असतात. बरं, वाघिणीचे आचळही लोंबते नसतात, तर फारच छोटे असतात. वाघिणीच्या केसाळ त्वचेत ते जवळपास लपूनच गेलेले असतात.

नुकत्याच जन्मलेल्या बछड्याला वाघीण कधीच काही मदत करत नाही. तिच्या केसाळ अंगामधून ही दूध मिळण्याची जागा बछड्याला स्वतःची स्वतःच शोधावी लागते. कधी कधी त्यासाठी त्याला चार-पाच तासांइतकाही वेळ लागतो! काही बछडे तर या कालावधीत आपला जीवच गमवतात. बछड्यानं हे छोटंसं आचळ पंजांत पकडून ते चोखायला सुरवात केली, की त्यातून दूध यायला सुरवात होते; पण त्यातही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की वाघाचे बछडे जन्माला येताना त्यांचे डोळे बंद असतात. ते उघडायलाच पाच-सहा दिवस जातात. तोपर्यंत बछडे अंधच असतात. त्यामुळं प्रत्येक वेळी त्यांना अंदाजानंच दूध पिण्याची जागा शोधावी लागते. तेही चार-पाच दिवस! कित्येक वेळा आईची शेपटी किंवा कानाची पाळी, नाकाचा भागच त्यांना आचळासारखा वाटतो आणि ते तिथंच चोखत बसतात. मग दूध काही मिळत नाही. बछडे चक्क उपाशी राहतात! यामुळं होतं असं, की जन्माला आलेल्या तीन-चार बछड्यांपैकी एखाद्‌दुसरंच जिवंत राहतं! बछड्यांना जन्म देतानाच वाघिणीनं त्यांना जपण्यासाठी अशी जागा निवडलेली असते, की त्यांच्यावर कुणी हल्ला करू नये. कारण कित्येकदा या दुबळ्या आणि अंध पिलांना वाघच, म्हणजे त्यांचा बापच, खाऊन टाकतो. त्यामुळं वाघीण आपल्या बछड्यांना अशा खुबीनं लपवून ठेवते, की ते आणि ती स्वतःही या स्तनपानाच्या दिवसांत कुणाच्या दृष्टीसच पडू नयेत. यात अडचण अशी, की सुमारे दोन-तीन आठवड्यांच्या या कालावधीत तिला बछड्यांना सोडून त्या गुप्त जागेतून बाहेरही पडता येत नाही. शिकार करता येत नाही. तीही उपाशीच राहते ! साधारणतः १०-१५ दिवसांनी डोळे उघडलेल्या बछड्यांना वाघीण जेव्हा शिकार करायला शिकवते, तेव्हा ते बाहेर येतात आणि मग त्यांना इतर काहीतरी खायला मिळतं. कारण बाप वाघोबा काही त्यानं केलेली शिकार वाघिणीला आणून वगैरे देण्याचा प्रश्‍नच नसतो. शिवाय, वाघ हा प्राणी शाकाहारी अजिबातच नाही. पानं, गवत किंवा फळं खायला...

प्रसवलेल्या, जन्माला आलेल्या चार-पाच बछड्यांपैकी एक बछडं कुपोषणानं मरण्याची तर नेहमीच वेळ येते. कारण त्यातल्या त्यात दणकट, मस्तीखोर आणि बलवान बछड्यालाच जास्त दूध पाजण्यात वाघीण आई मदत करते. कित्येकदा तर ती इतर बछड्यांना हुसकावूनही लावते... मात्र त्या पिलांनाही ती इतर कुणापासूनही जपण्यासाठी एकसारखीच काळजी घेते. त्यांच्या जवळ येण्याचा जो कुणी प्रयत्न करील, त्याचा ती फडशाच पाडते. या सगळ्या कारणांमुळं वाघिणीचं दूध मिळणं खरंच कठीण! वाघिणीचे स्तन हे काही गाई-म्हशींच्या कासेसारखे दुधाची साठवण होऊ शकेल इतके मोठे नसतात. गाई-म्हशींच्या तुलनेत एका दिवसभरात वाघिणीला येणारं दूधही फारच कमी असतं. शिवाय, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते गाईच्या दुधाएवढं सकसही नसतं! किंवा त्यातल्या अन्नघटकांचं प्रमाण वेगळंच असतं, असं म्हणावं लागेल. हे सगळं जरी असलं, तरी वाघिणीचं दूध आपल्याला, म्हणजे माणसाला, प्यायला चालतं की नाही हेसुद्धा पाहिले पाहिजे ना? आपण गाईचं, म्हशीचं, कधी शेळीचं, तर कधी वाळवंटातल्या उंटाचंही प्रसंगी दूध पितो. खरंतर पिलं झाली, की सगळ्याच सस्तन प्राण्यांच्या माद्यांना दूध येत असतं; पण कुणी आपल्या घरातल्याच, चोरून दूध पिणाऱ्या मांजरीचं दूध काढून पिण्याचा उद्योग केलेला ऐकिवात नाही! हेच काय पण माकड, श्‍वान, डुक्कर, हत्ती, गेंडा, ससा, हरिण, अस्वल या प्राण्यांच्या माद्यांचं दूध माणसानं पिण्यासाठी वापरल्याचं कधी ऐकलं आहे काय? का बरं हे दूध मनुष्यप्राणी वापरत नसावा? स्तनांमधून दूध तयार होणं आणि त्यातून नवजात पिलांचा सांभाळ आणि वाढ हे सस्तन प्राण्यांचं वैशिष्ट्य; पण प्रत्येक प्राण्याच्या पिलांच्या गरजेनुसार या दुधाचे रासायनिक घटक आणि त्यातलं त्यांचं प्रमाण हे वेगवेगळं असतं, असं दिसून आलं आहे. माणसाच्या दुधातले मुख्य घटक म्हणजे प्रथिनं, नत्रयुक्त पदार्थ, स्निग्धाम्लं, कर्बोदकं, खनिजं, काही संप्रेरकं, काही प्रतिजैविक घटक आणि पाणी. हे एक मिश्रण नसून, त्याचं स्वरूप एखाद्या कलिली द्रावणासारखं (कोलायडल) असतं. अर्थात, दुधातल्या पाण्यात काही विरघळलेले पदार्थ, कर्बोदकं, संप्रेरकं इत्यादी जसे असतात, तसेच न विरघळलेले; पण सगळीकडं समप्रमाणात तरंगत असणारे आणि एकमेकांशी विविध घटकांमुळे बांधले गेलेले (इमल्सिफाइड) कणही असतात. आईच्या दुधात काय काय असतं, ते पाहिलं की त्याला ‘पूर्णान्न’ का म्हणतात ते समजून येतं. आईला किंवा सस्तन प्राण्यांच्या मादीला मूल जन्माला येण्याआधी काही दिवस आणि मूल जन्माला आल्यानंतर काही दिवस जे दूध येतं त्यात आणि मुलाच्या जन्मानंतर साधारणतः १० दिवसांनंतर जे दूध येतं, त्यात थोडा फरक असतो. जन्मानंतर लगेच जे दूध येतं, त्याला ‘चीक’ (कोलोस्ट्रम) असं म्हटलं जातं. हा चीक थोडासा पिवळसर आणि दुधापेक्षा थोडा दाटही असतो. (गाई-म्हशींच्या चिकाचा ‘खरवस’ हा खाद्यपदार्थ सर्वश्रुत आहे). पिलात किंवा नवजात बालकात दुसरे कोणतेही पदार्थ पचवायच्या क्षमता निर्माण होण्याआधी लागणारी जी रसायनं आणि पोषक द्रव्यं आवश्‍यक असतात ती चिकामध्ये आढळतात. पचन संस्थेलाच नव्हे तर इतरही पेशींच्या, उतींच्या वाढीसाठी लागणारी संप्रेरकं त्यात असतात; तसंच लहान बाळाच्या आतड्यांची हालचाल होऊन त्याला शौचास साफ होईल असे सारकपदार्थही त्यात असतात, प्रतिजैविकंही (अँटीबॉडी) असतात. ती रोगप्रतिकार करण्यासाठी उपयोगी पडतात. याशिवाय काही प्रत्यक्ष रोगप्रतिकार करणारे ‘इम्युनोग्लोब्युलिन’ पदार्थही (लॅक्‍टोफेरिन, लायसोझाइम, लॅक्‍टोपॅरॅक्‍सिडेझ, इम्युनोग्लोब्युलिन एजीएम) असतात, तसंच जीवनसत्त्व अ, ब, ब ६, क, ड, ई आणि के, थायमिन, नियासिन, बायोटिन, रिबोफ्लेविन आणि फोलेट्‌स असे शारीरिक आणि चेतातंतूंच्या वाढीस पोषक असणारे पदार्थही मुबलक प्रमाणात असतात. या पहिल्या दहा दिवसांतल्या दुधात प्रथिनांचं आणि स्निग्धाम्लांचं प्रमाण थोडं कमी असतं; पण ते नंतर वाढत जातं.

माणसाच्या, म्हणजे आईच्या दुधात सर्वसाधारणपणे साडेचार टक्के स्निग्धाम्लं, यात काही संपृक्त तर काही असंपृक्त स्निग्धाम्लं आणि थोड्या प्रमाणात कोलॅस्टेरॉल असतं. प्रथिनांचं प्रमाण फक्त एक ते सव्वा टक्का असतं. त्यात साधारणतः आठ प्रकारची प्रथिनं असतात. साडेसात टक्के कर्बोदकं म्हणजे शर्करा असतात. यात लॅक्‍टोज ही मुख्य शर्करा असते. तिचं विभाजन होऊन ग्लुकोज आणि गॅलॅक्‍टोज अशा दोन शर्करांमध्ये रूपांतर होते. २५ टक्के नत्रयुक्त पदार्थ (पिष्ठमय पदार्थ) असतात. ज्यात युरिया, युरिक आम्ल, क्रिएटिन, क्रिएटिनाईन, अमिनो आम्लं, त्याचबरोबर न्युक्‍लिओटाइड्‌स असतात. बाळाला योग्य प्रकारे भूक लागावी आणि त्यानं गरजेपेक्षा जास्तही जेवू नये, यावर नियंत्रण ठेवणारी संप्रेरकं असतात. हाडांच्या पेशी, स्नायूंच्या पेशी यांची वाढ होण्यासाठी उद्युक्त करणारी संप्रेरकं, यासोबतच ज्यांना ‘न्यूरोट्रान्स्मिटर्स’ म्हणतात ती झोप आणणारी, उत्साहवर्धन करणारी संप्रेरकं, ज्यांची नावंदेखील खूप गमतीची आहेत. उदाहरणार्थ ः आनंद देणाऱ्या संप्रेरकाला ‘आनंदामाईड’ असंच म्हणतात...! असो. अशी एकूण दहा प्रकारची संप्रेरकं दुधात असतात, तर विविध खनिजं आणि त्यांचे क्षार, यात कॅल्शिअम, फॉस्फरस, सोडिअम, पोटॅशिअम आणि क्‍लोरिन हे मुख्य घटक. ही एकूण खनिजं फारच कमी प्रमाणात म्हणजे सुमारे दोन दशांश टक्के एवढी असतात. याशिवाय आईकडून तिच्या शरीरातल्या काही रोगप्रतिकारक पेशी, आपल्याला उपयुक्त ठरणारे काही सूक्ष्म जीवही दुधात असतात; तसंच ट्यूमरच्या वाढीला प्रतिबंध करणारी काही खास ‘ओलेईक आम्ला’सारखी रसायनंही आईच्या दुधात पहिले १० महिने असतात, असं आढळून आलं आहे. मूल जन्माला आल्यावर पहिल्या दहा मिनिटांतच आईचा स्तन ते चोखू शकतं. ही समज सगळ्यांना उपजतच असते. ‘स्तनपान हे वर्षभर तरी सुरू ठेवावंच,’ असं आता जागतिक स्वास्थ्य परिषदेचं म्हणणं आहे. दात येऊन इतर पदार्थही त्याच सुमाराला मुलं खायला लागतात. त्यानंतर स्तनपान हळूहळू कमी करावं. अगदी दीड वर्षापर्यंतच नव्हे, तर दोन वर्षंही बाळाला अंगावर पाजलं तरी ते चांगलंच, असं अनेक डॉक्‍टरांचं आता म्हणणं आहे. मात्र एक गंमत म्हणजे, असं मनुष्यप्राण्याचं दूध जरी आपण पूर्णान्न मानलं, तरी हे दूध सगळ्यात सकस असतं असं म्हणता येत नाही ! सगळ्यात जास्त सकस दूध ठरतं, ते चक्क समुद्रात माशासारख्या राहणाऱ्या सील या प्राण्याचं. माणसाच्या दुधात ‘स्निग्ध’ पदार्थांचं प्रमाण सुमारे साडेचार ते पाच टक्के असतं. हे तर प्राण्यांच्या दुधाच्या स्निग्धांशाच्या तुलनेत फारच कमी भरतं; पण आपल्या दुधात लॅक्‍टोज शर्करेचं प्रमाण सुमारे ५.४ ते ७ टक्के असल्यानं ते अधिक गोड ठरतं! पण माणसापेक्षाही गोडीच्या बाबतीत गाढविणीचं दूध अधिक गोड ठरतं ! कारण त्यातही ५.८ ते ७.४ टक्के लॅक्‍टोज शर्करा असते. शिवाय गाढविणीच्या दुधात लायसोझाइमचं आणि लॅक्‍टोफेरिनचं (ही प्रतिजैविके आहेत) प्रमाणही जास्त असल्यानं बाळाच्या पोटात होणारा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी, तो थोपविण्यासाठी काही ठिकाणी गाढविणीचं दूध औषधासारखं वापरलं जातं. या दुधापासून किण्वनक्रियेनं (विरजण लावून) ‘कौमिस’ म्हणून तयार केलेलं पेय- जे आपल्याकडच्या लस्सीसारखंच असतं- ते मध्य आशिया आणि इजिप्तमध्ये ‘४० रोगांवरचा रामबाण उपाय’ म्हणून रूढ आहे हे विशेष! या ‘कौमिस’च्या बर्फीसारख्या वड्याही (श्रीखंडवड्यांसारख्या) केल्या जातात. त्याही इजिप्त, मध्य आशिया आणि रशियातसुद्धा प्रसिद्ध आहेत; पण गाढविणीचे कुणी दुधासाठी गोठे बांधलेले आपण भारतात पाहिलेले नाहीत. इटलीमध्ये मात्र असा गाढविणीच्या दुधासाठी बांधलेला एकमेव मोठा गोठा- गाढवांची डेअरी - आहे. त्यात ८०० माद्या आहेत. याचं कारणही वेगळं आहे. त्वचेचं तारुण्य राखण्यासाठी, सुरकुत्या घालविण्यासाठी आजही गाढविणीच्या दुधाचा, त्यातून तयार केलेल्या क्रीमचा प्रसाधनात वापर होतो. त्यालाही परंपरा आहे. कारण इजिप्तची क्‍लिओपात्रा ही सम्राज्ञी तिचे सौंदर्य राखण्यासाठी गाढविणीच्या दुधानं स्नान करत असे! असो. एक मात्र खरं की दुधातल्या घटकांचं प्रमाण पाहिलं तर गाढविणीचं दूध हे मनुष्यप्राण्याच्या दुधाच्या जवळचं ठरतं...

‘फणाधारी सील’ या समुद्रात राहणाऱ्या; पण सस्तन असणाऱ्या प्राण्याचं दूध मात्र सगळ्यात सकस ठरतं, ते त्यात असणाऱ्या ६१ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या स्निग्धांशामुळं. या सीलच्या माद्या फक्त चार ते सात दिवस आपल्या पिलांना स्तनपान देतात. त्यांच्या दुधानं या पिलांचं वजन दर दिवशी सुमारे चार किलो वाढतं ! तर राखाडी रंगाच्या सील माद्यांच्या दुधात सुमारे ५३ टक्के स्निग्धांश असतो. या माद्या त्यांच्या पिलांना सुमारे तीन आठवडे पाजतात. या काळात पिलांची फारच भराभर वाढ होते, असं दिसून आलं आहे. १४ किलो वजनाचं पिलू तीन आठवड्यांत २८ किलोंचं बनतं ! अर्थात त्याचं वजन दुप्पट होतं ! शिवाय स्निग्धाम्लाचा, चरबीचा पिलांच्या कातडीखाली एक थरच तयार होतो. या थरामुळं बर्फाळ प्रदेशात आणि अतिशीत पाण्यापासून या पिलांचं रक्षण होतं. निळ्या रंगाचा नील-देवमासा हा जगातला आकारानं सगळ्यात मोठा प्राणी. याला मासा जरी म्हटलं जात असलं, तरी तो एक सस्तन प्राणी आहे. याच्या दुधातही ३० ते ५० टक्के स्निग्धांश असतो. देवमासे सुमारे सहा महिने पिलांना स्तनपान देतात. या काळात दर दिवशी पिलं सर्वांगांनी (लांबी, रुंदी, उंची) सुमारे दीड इंचानं (३.८ सेंटिमीटर) वाढतात. ते फक्त दुधावरच या सहा महिन्यांत पोसले जात असतात. देवमाशाच्या मादीच्या स्तनाचा आकारच दीड मीटर लांब, ६५ सेंटिमीटर खोली असलेला आणि वीस सेंटिमीटर रुंदी असणारा असतो. या स्तनात एका दिवसात सुमारे ११३ किलो (२५० पौंड) दूध तयार होतं ! वजनानं मोठा असणारा दुसरा प्राणी म्हणजे हत्ती; पण याच्या दुधात मात्र १५ ते १७ टक्केच स्निग्धांश असतो. शिवाय पिष्ठमय पदार्थही कमी असल्यानं हत्तीचं दूध पातळ तर असतंच; शिवाय त्याला एक प्रकारचा विचित्र वासही येतो. हत्तीच्या दुधात शर्करेचं, लॅक्‍टोजचं प्रमाण फक्त साडेतीन टक्के असते; तसंच त्यातल्या इतर काही घटकांमुळं ते चवीला कडवटही असतं.

‘हत्तीचं दूध एकदा तोंडाला लावलं, तर परत कधी तुम्ही दूधच पिणार नाही’ अशी केरळमध्ये एक उपरोधिक म्हण आहे. ती या सगळ्या कारणांमुळंच. वाघिणीच्याच नव्हे तर सिंह, बिबटे, जग्वार किंवा आपल्या घरातल्या मनीमाऊचं दूधही ११ टक्के स्निग्धांश असलेले, हत्तीच्या दुधासारखंच ३.४ टक्के लॅक्‍टोज असणारं, अर्थात कडवट असतं. ११ टक्के प्रथिनं; पण २५ टक्के इतर स्थायू पदार्थ असणारं हे दूध थोडं घट्ट असतं. मात्र या दुधात खनिजांची आणि क्षारांची कमतरता असते; त्यामुळंच ते आपल्याला पिण्यालायक ठरत नाही. गायी, म्हशी, शेळ्या यांच्या दुधातल्या घटकांचं प्रमाण आपल्या, म्हणजे माणसाच्या मादीच्या, दुधाच्या जवळपास सारखंच असतं. त्यातलं शर्करेचं प्रमाणही सुमारे सात टक्के असतं. गाय आणि शेळीच्या दुधातला स्निग्धांश आपल्यासारखा असतो, तर म्हशी आणि जर्सी किंवा होलस्टेन फ्रेशियन गाईंच्या दुधात तो जास्त असतो. शिवाय गायी-म्हशींकडून सरासरी २२ लिटर दूध एका दिवसात मिळत असतं. सध्यातरी जगात दुधाचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं आणि दुभत्या गुरांचीही सर्वाधिक संख्या भारतातच आहे, हे अभिमानानं सांगितलं पाहिजे. ध्रुवीय अस्वलाच्या दुधातही ३१ टक्के स्निग्धांश असतो, तर हिमालयातल्या ‘याक’चं दूध - त्यात काही प्रमाणात रक्त मिसळल्यानं - पहिले काही दिवस गुलाबी वाटतं, त्यामुळं ‘याक मादीचं दूध गुलाबी असतं,’ असा एक गैरसमज आहे; पण गुलाबी हा काही त्या दुधाचा कायमचा रंग नसतो. काही दिवसांनी ते पांढरंच दिसू लागतं. मात्र पाणघोड्याच्या दुधात दोन प्रकारची आम्लं अधिक प्रमाणात असतात. त्यातल्या एकाचा रंग लाल, तर दुसऱ्याचा रंग केशरी असतो. त्यामुळं पाणघोड्याचं दूध कायमच चक्क गुलाबी रंगाचं असतं. शिंगरू झाल्या झाल्या घोडीला येणारा चीक निळसर दिसतो. नंतर चार-पाच दिवसांनी तो फिकट होत जातो. त्यानंतरचं दूध फिकट पांढरं असतं. गंमत म्हणजे, गेंडा या गबदुल-धिप्पाड प्राण्याच्या दुधात मात्र सगळ्यात कमी म्हणजे फक्त दोन दशांश (०.०२) टक्के इतकाच स्निग्धांश असतो. गेंड्याचं दूध अगदीच पाणीदार असतं. असो. दूध किती सकस आहे, त्याची चव काय, ते किती प्रमाणात तयार होतं, यासोबतच त्या प्राण्याकडून ते आपल्याला सहजी मिळेल काय, - कारण, ते खरंतर आपण बळकावूनच घेत असतो- हे पाहावे लागतं. याशिवाय ते आपल्याला पचेल काय हाही प्रश्‍न आहेच. साधं म्हशीचं निरसं, कच्चं दूधही कित्येकांना नीट पचत नाही... ते तापवून, साय काढून प्यावं लागतं. लहान मुलांसाठी म्हणूनच गाईचं, तेही देशी गाईचं, दूध चांगलं हेच खरं. ...तेव्हा वाघिणीच्या दुधाचा नाद सोडलेलाच बरा! कारण, ते पिऊन आपल्याला शूरवीर तर होता येणार नाहीच; पण नीट पोषणही मिळणार नाही त्या दुधातून दोस्तांनो! ...तर चला आता, एक चहा होऊन जाऊ द्या...चांगला ‘फुलक्रीम’ देशी म्हशीच्या दुधातला...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com