अग्निदिव्यातून नवजीवन! (आनंद घैसास)

अग्निदिव्यातून नवजीवन! (आनंद घैसास)

कॅलिफोर्निया आणि नेवाडाच्या सीमारेषांवर असणाऱ्या ‘योसेमिते नॅशनल पार्क’मध्ये ‘कोस्टल रेडवूड’ आणि ‘जायंट सिकोइया’ असे दुर्मिळ वृक्ष आहेत. हे दोन्ही प्रकारचे वृक्ष सर्वाधिक आयुष्यमान असणारेही आहेत. त्यांचं संवर्धन करण्यासाठी ‘पृष्ठीय आगी’ (सरफेस फायर्स) लावण्याचे प्रयोग सुरू आहेत. एक प्रकारच्या ‘अग्निदिव्या’तून त्यांना नेऊन नवजीवन देण्याचा हा प्रयत्न. या प्रयोगामागच्या वैज्ञानिक तत्त्वांचा वेध.

जगातल्या नैसर्गिक सौंदर्याचं एक ठिकाण म्हणजे कॅलिफोर्निया आणि नेवाडाच्या सीमारेषांवर असणारे ‘योसेमिते नॅशनल पार्क’. हिमाच्छादित शिखरं, सुंदर धबधबे, त्यातून तयार झालेल्या खळखळणाऱ्या नद्या, विविध वृक्षराजीनं नटलेला हा परिसर. जगातले सर्वांत महाकाय आणि सर्वात उंच वृक्षही याच परिसरात आहेत, हे कळल्यावर आणि मी सध्या जिथं राहत आहे, तिथून फक्त चार तासांच्या (कारनं गेलं तर) अंतरावर आहे, हे समजल्यावर तर मला तिथं जाऊन ते पाहण्याचा मोह कसा काय आवरणार?

इथं सापडणारे, असणारे ‘कोस्टल रेडवूड’ आणि ‘जायंट सिकोइया’ हे वृक्ष जगात सर्वत्र आढळत नाहीत. रेडवूड सर्वांत उंच, तर सिकोइया सर्वात महाकाय समजला जातो. महाकाय ठरवताना त्याचा आकार म्हणजे त्या वृक्षाची एकूण उंची, खोडाचा घेर, त्यात एकूण किती घनफूट लाकूड निघेल, याचं मापन करून हे सारं ठरवण्यात येतं. हे दोन्ही प्रकारचे वृक्ष पुराणपुरुष म्हणावे असे सर्वाधिक आयुष्यमान असणारेही आहेत. अमेरिकेत सध्या फक्त कॅलिफोर्नियाच्या उत्तरेच्या वॉशिंग्टन, ओरेगॉनपासून ते दक्षिणेकडं अमेझॉनपर्यंतच्या पर्वतराजीत पश्‍चिम उतारावर पाच ते सात हजार फूट उंचीवर हे वृक्ष आढळतात. एके काळी उत्तर अमेरिकेत सर्वत्र आढळणारे हे वृक्ष आता जेमतेम ७७ ठिकाणांवर मर्यादित जागेत गटागटानं, जणू एका एका वाटिकेत टिकून राहिलेले दिसतात. आता फक्त ३५ हजार एकर एवढाच भूभाग या प्रकारच्या वृक्षांनी व्यापलेला आहे. तेही या सिआरा नेवाडा पर्वतराजीच्या एकमेव प्रदेशात. या वृक्षांना आता संरक्षण देण्यात आलं आहे आणि लाकडासाठी होणाऱ्या त्यांच्या कत्तली आता थांबवण्यात आल्या असल्या, तरी हे जुने-पुराणे वृक्ष आता बदलत्या हवामानात (वाढत चाललेल्या उष्म्यात आणि या प्रदेशातल्या दुष्काळप्रवण परिस्थितीत) अजून किती काळ तग धरून राहतील, याचा नेम नाही.

जगातला सर्वात उंच रेडवूड सध्या ‘हायपेरिअन’ नावाचा वृक्ष आहे. त्याची नुकतीच मोजली गेलेली उंची ३८०.०९ फूट आहे. वृक्षांची उंची किती यात वर्षागणिक फरक होत असतो. फांद्यांची वाढ किंवा घट, शेंड्याची वाढती उंची, वारा-पावसानं होणारी पडझड या साऱ्यांचा परिणाम तर होत असतोच; पण इतर झाडांची होणारी झटपट वाढही कमाल उंचीवाल्या झाडाला ठेंगणी ठरवते, तेही काही महिन्यांच्या फरकानं. २५ ऑगस्ट २००६ला निसर्गप्रेमी क्रिस अटकिन्स आणि मायकेल टेलर या जोडीला त्यांच्या जंगलातल्या फेरफटक्‍यात असं लक्षात आलं, की ‘हायपेरिअन’ हे झाड तर इतरांपेक्षा उंच दिसत आहे. मग मोजमापं झाली. गेल्या वर्षी घेतलेल्या मोजमापातही याची उंची ३७९.९ भरली. त्यामुळं या रेडवूड प्रकारच्या झाडाला जगातल्या सर्वात उंच झाडाचा मान मिळाला.

महाकाय सिकोइया (जाएंट सिकोइया) या वृक्ष प्रकारात सर्वात महाकाय ठरतो तो ‘योसेमिते नॅशनल पार्क’च्या अंतर्गतच येणाऱ्या ‘टुलारे काऊंटी’ या भागातल्या ‘जनरल शेरमन’ नावाचा वृक्ष. इतिहासात यापेक्षा महाकाय अशा फक्त एका वृक्षाची नोंद आढळते, ती त्रिनिदादशेजारच्या भागातल्या ‘क्रेनेल क्रिक जाएंट’ या वृक्षाची. १८७९मध्ये टुलारे काऊंटीच्या परिसरात फेरफटका मारताना, जेम्स वुलवर्टन या अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये लेफ्टनंट असलेल्या एका निसर्गप्रेमी लष्करी अधिकाऱ्याला या वृक्षाचा शोध लागला. तो ज्या अधिकाऱ्याच्या हाताखाली तो काम करत होता, त्याचं म्हणजे जनरल विल्यम टी. शेरमन यांचं नाव त्यानं या वृक्षाला दिलं. पुढं १९३१मध्ये जेव्हा नीट मोजमापे घेतली गेली, तेव्हा तो जगातला सर्वांत महाकाय वृक्ष असल्याचं लक्षात आलं. एवढंच नव्हे, तर महाकाय वृक्षांच्या बाबतीत त्यांच्या लाकडाचं एकूण आकारमान घनफळात मोजण्याचं आणि त्यावरून वृक्षांची महत्तमता ठरवण्याचं मानक तेव्हापासून सुरू झालं. जानेवारी २००६ला या झाडाची (त्याआधीच्या सर्व छायाचित्रांत प्रकर्षानं दिसणारी) इंग्रजी ‘एल’ आकाराची फांदी वादळात तुटून पडली...या फांदीचंच आकारमान २ मीटर (६.५ फूट) व्यास आणि ३० मीटर (९६ फूट) लांबीचं होतं. ही फांदीच एका मोठ्या वृक्षासमान होती! पण गंमत अशी, की ही पडझड त्या वृक्षाच्या दृष्टिकोनातून भल्यासाठीच झाली, असं पर्यावरणतज्ज्ञ मानतात. कारण ती फांदी तुटण्यानं वृक्षाचं संतुलन वाढलं! असो. तर या वृक्षाची उंची ८३.८ मीटर (२७४.९ फूट), पायथ्याशी बुंध्याचा व्यास ११.१ मीटर (३६.५ फूट). याची पहिली फांदी पायापासून १३० फूट उंचीवर सुरू होते. तिचाही व्यास ६.५ फुटांचा आहे. शेरमनचा माथा डेरेदार १०६.५ फूट व्यासाचा आहे, तर एकूण अंदाजे वजन ११ लाख २१ हजार २८० किलो (सुमारे १,१२१ टन) आहे. गंमत म्हणजे उंचीत हा ‘हायपेरियन’पेक्षा जसा कमी उंचीचा आहे, तसाच त्याचा बुंध्यापाशीचा घेरही जगातल्या इतर दोन वृक्षांपेक्षा (‘सेनेटर’ या ‘बाल्ड सायप्रस’ जातीच्या आणि जानेवारी २०१२मध्ये एका गर्दुल्या तरुणीनं लावलेल्या आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या सर्वात मोठा बुंधा असलेल्या वृक्षापेक्षा, आणि सध्या सर्वात वयोवृद्ध मानल्या जाणाऱ्या ‘सागोल’ नावाच्या दक्षिण आफ्रिकेतल्या लिम्पोपो परगण्यातल्या गोरखचिंचेच्या वृक्षापेक्षा) कमी भरतो. मात्र, याचं एकूण लाकडाचं घनफळ मात्र जास्त भरतं. हा सर्वांत वयोवृद्ध नसला, तरी आपल्या दृष्टीनं पुराणपुरुषच. कारण याचं सध्याचं अंदाजे वय दोन हजार वर्षं आहे, त्यात शंभरएक वर्षं कमी-अधिक असू शकतात; पण म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मकाळचाच की हा वृक्ष!...असो.

मनात असलं, तरी हे दोनही वृक्ष काही आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाले नाहीत. कारणं दोन. आम्ही गेलो त्या काळात या भागातले काही रस्ते भूस्खलनामुळे बंद होते. त्यामुळं या नॅशनल पार्कचा जो भाग जायला जवळ आणि ‘खुला’ मिळाला, तिथं आम्ही गेलो. या भागाला ‘टोलुम्न ग्रूव्ह’ असे नाव आहे. यातल्या वृक्षांचा शोध प्रथम १८३३मध्ये ‘व्हाईट मॅन’ना लागला अशी नोंद आहे. एका छोट्या वाटिकेएवढ्या भागात, इतर पाइन आणि फर जातीच्या झाडांमध्ये ही महाकाय झाडं दृष्टीस पडताच, ‘अरे बापरे’ असे शब्द तोंडून बाहेर पडतातच. इतक्‍या प्रचंड आकाराचे हे वृक्ष आहेत. या वृक्षांचं वयही सुमारे दीड हजार वर्षांचं आहे. यात ‘कॅलिफोर्निया’ नावानं गाजलेला; पण आता फक्त बुंधा शिल्लक राहिलेला एक वृक्ष आहे. त्याच्या खोडाला खिंडार पाडून त्यातून एक छोटी जुनी मोटारगाडी जाईल, असा बोगदा तयार करण्यात आला होता. आता त्या बोगद्यासोबत तो बुंधाच फक्त शिल्लक आहे. याच वाटिकेत एक जुना मोठा वृक्षही जवळच आडवा पडलेला आहे (याचं अंदाजे आयुष्य तीन हजार वर्षांपूर्वीचं आहे), त्याच्या त्या आडव्या पडलेल्या बुंध्यातून, मुळाकडच्या बाजूनं एक माणूस सरळ खाली न वाकता आत चालत जाऊ शकतो. तो पन्नास पाऊलं दूरवर त्या वृक्षाच्या फांदीच्या जागी तुटलेल्या तुकड्याशी बाहेर पडतो. टोलुम्न ग्रूव्हच्या या भेटीत अर्थातच मी बरेच फोटो काढले. कारण मात्र फक्त कौतुक नव्हतं, तर दोन-चार चांगल्या मोठ्या वृक्षांच्या सोबतच तुकडे झालेली, जळलेली, आडवी पडलेली झाडं; पडलेल्या झाडांवर जागोजागी शैवाल आणि नेचे वाढलेलं, भूछत्रं वाढलेली असा प्रकार दिसला. कोणी तरी मुद्दाम नासधूस तर नाही ना केलेली, असाही मनात विचार डोकावला. एका ठिकाणी तर कमरेएवढ्या उंचीवर कोणीतरी कापून टाकलेलं, पूर्ण मोठं खोड, कोळसा झालेलं आढळलं. एक झाड तर संपूर्णपणे कोणी तरी खरवडून काढलेलं होतं. त्याचा पांढरा अंतर्भाग उघडा पडलेला आणि वरची तांबडी कवचदार साल पायथ्याशी कपचा-कपचा होऊन पडलेली दिसली. हे नक्कीच नैसर्गिक नव्हतं. उत्कृष्ट लाकडासाठी आपल्याकडं असं साल काढून झाड वाळू द्यायचे, मग पायथ्याशी निखारे टाकून बुंधा कमकुवत करायचा, म्हणजे झाड आपोआप उन्मळून पडतं. कुऱ्हाडीनं तोडायचे, कापायचे कष्ट नाहीत. अखंड वासे मिळायला हे नेहमीचं आहे, असं मनात आलं; पण हे तर राष्ट्रीय अभयारण्य आहे. इथं असं कोण करणार? आपल्याकडं ‘गावकरी’, ‘आदिवासी’ अशा नावांखाली लाकूड व्यावसायिकच असे अवैध धंदे करण्यास काही जणांना हाताशी धरतात, किंवा कधीकधी तर चक्क वनरक्षकच जंगली लाकूड अवैधरित्या विकत असतात, असं आपल्याला ते पकडल्याच्या बातम्या आल्यावर कळतं; पण असं इथंही अमेरिकेतही होत असेल? असा प्रश्न साहजिकच मनात आला. मन थोडं उद्विग्न झालं. हा काय प्रकार आहे याचा माग घ्यायचा मग प्रयत्न केला, तर हा प्रकार वृक्षांचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी मुद्दाम करण्यात आला आहे, ‘पृष्ठीय आगी लावण्याचे’ (सरफेस फायर्स) आता आदेशच आहेत, अशी वेगळीच माहिती समोर आली.

या भागातले हे अतिप्राचीन वृक्ष, त्यांचा निसर्गाशी इतकी वर्षं चाललेला जो संघर्ष असेल तो नक्कीच त्यांच्या एकूण वाढीत कुठं ना कुठं ग्रथित झालेला असणार. त्याचाच मागोवा एका गटानं घेतला. या झाडांवर कोणत्या काळात किती, कसे आघात झाले आदींबाबत त्यांनी पद्धतशीर निरीक्षणं नोंदवली. विशेषत: या झाडांची मुख्य हानी होत असेल, तर ती वणव्यांमुळं, दुष्काळाच्या काळात होणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळं. ही परिस्थिती या झाडांनी कशी सहन केली असावी? त्याचं उत्तर सिकोइया झाडाच्या सालीत सापडतं. ती चांगली मजबूत असते. सर्वसाधारण कीड, बुरशी आणि फंगसला ती समर्थपणे प्रतिकार करते. कारण त्यात मोठ्या प्रमाणात टरपेन्स आणि टॅनिन असतं. जंगली प्राणीही या झाडाच्या वाट्याला फारसे जात नाहीत. नाही म्हणायला काही चराऊ प्राणी याची रोपं लहान असताना त्याची पानं खातात; पण त्यानं फारसे नुकसान झालेलं दिसत नाही. मात्र, एक गोष्ट लक्षात आली, की या झाडांच्या उंचीचा संबंध धुक्‍याशी जास्त आहे. डोंगरउतारावर आणि वाळवंटी प्रदेशाच्या विरुद्ध दिशेला पश्‍चिम उतारावर ही झाडे असली, तरी यांची मुळं खोलवर न जाणारी, पसरट आहेत. त्यामुळं त्यांना लागणारं एकूण वर्षातलं तीस टक्के पाणी ते धुक्‍यातून ग्रहण करतात. त्यासाठी त्यांची खोडावरची सालही हे पाणी शोषण्यास उपयोगी ठरते. पानांमध्येही पाणी शोषून घेण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी विशेष अनुकूलन झालेलं दिसतं. थॉमस स्वेटनाम या संशोधकाच्या नेतृत्वाखाली निरीक्षणं घेणाऱ्या या गटाने ‘आगींचे या वृक्षावर झालेले परिणाम’ या संशोधनासाठी एकूण तीन हजार हेक्‍टर परिसरातल्या  ५२ वयोवृद्ध वृक्षांची निरीक्षणं घेतली. त्यात त्यांच्या खोडातल्या वाढीतून तयार होणाऱ्या कड्यांचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. यात जिवंत वृक्षांचं जसं निरीक्षण होतं, तसंच पडझड झालेल्या झाडांच्या अंतरंगाचंही निरीक्षण करण्यात आलं. या परिसरात या वृक्षांचे काही जीवाश्‍म अवशेषही मिळाले आहेत, जे तर ज्युरॅसिक म्हणजे महाकाय डायनासोरांच्या काळातले आहेत. या निरीक्षणांमधून जणू तीन हजार वर्षांपूर्वीपासूनचा या वृक्षांचा जीवनपटच समोर आला. ज्यात वेळोवेळी लागलेल्या वणव्यांचे परिणाम त्या-त्या काळातल्या वाढीच्या कड्यांवर दिसून आले. म्हणजे काही ठिकाणी चक्क कड्यांमध्ये काजळी, राखेचे अवशेष होते. मात्र, एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली, ती म्हणजे या आगींमुळं एक झाडाची आधीच कणखर असलेली साल त्या उष्णतेनं अधिकच आगीला विरोध करणारी बनत गेली- त्यामुळं झाडांचे संरक्षणच वाढलं. आगीनंतरच्या वर्षात झाडाची वाढ अधिक जोमानं झाल्याचं आढळून आलं. तसंच या आगीमुळं आसपासची कमकुवत झाडं कदाचित आपोआपच कमी झाली असावी. त्याचाही ‘जगण्याच्या स्पर्धेत’ इतरांच्या तुलनेत या वृक्षांना फायदा झाला असावा.

काही काळ प्रचंड थंड कोरडं वातावरण, हिमवर्षाव आणि धुक्‍याच्या परिसरात, अर्धं वर्ष मात्र कोरडा दुष्काळ असतो. तेव्हा जमिनीतून मिळणारं पाणी कमीच. पाणी टिकवण्याच्या धडपडीत शुष्क सालींमधली बीजं रुजण्यास आसपासच्या आगीतून तयार झालेली राखच नवीन रोपं अंकुरण्यास मदत करणारी ठरते. तसंच जमिनीलगत या आगीमुळं तयार होणारी सेंद्रीय मातीच फक्त आडव्या जमिनीलगत पसरणाऱ्या मुळांना उपयुक्त ठरते. आगीच्या धगीमुळं फळातून बिया फुटून बाहेर पडायलाही मदत होते ते वेगळंच.

१८५०नंतर या परिसरात माणसांचा वावर वाढला. त्या दरम्यान या वृक्षांची मोठी कत्तल झाली, ती विशेषत: सॅनफ्रॅंसिस्को आणि आसपासच्या शहरांतल्या इमारतींच्या बांधकामाच्या लाकडांसाठी. मात्र, या परिसराला अभयारण्य घोषित करण्यात आलं, तेव्हापासून या परिसरात झाडांना आगीपासून वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. कारण सॅनफ्रॅंसिस्को शहरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना घडून गेली होती. त्यामुळं सुमारे ऐंशी वर्षांत या परिसरात एकही आग लागू दिली गेली नाही. मात्र परिणाम चांगले होण्याऐवजी वाईटच दिसू लागले. जमिनीवरचं, लगतचे सेंद्रीय आवरण पाचोळा साफ करण्यातून नाहीसं झालं. झाडांची मुळं उघडी पडली. नवीन रोपंच न आल्यानं हिरवाईच नाही, तर या सिकोइया प्रकारची झाडंच नव्यानं येणं बंद झालं. त्यात यांचं मोठे टणक कणखर लाकडी कोरीवकामासारखं दिसणारं ‘शंकू’ आकाराचं फळ पर्यटक ‘आठवण’ म्हणून उचलून घेऊन जाणं तर नित्याचं झालं होतं. अर्थात त्यातून कुठंही याची रोपे तयार झाली का? तर तेही नाही... एकूणच दर वर्षी फक्त असणाऱ्या वृक्षांपैकी काहींची पडझड होत राहिली, नवी उगवलीच नाहीत.
यावर उपाय म्हणून आता या परिसरात ‘पृष्ठीय आगी’ मुद्दाम लावण्यात येणं इसवीसन १९८०पासून नियमित सुरू झालं आहे, तेही तज्ज्ञांच्या देखरेखीखाली. अर्थात त्यावरही हे योग्य की अयोग्य अशी उलटसुलट चर्चा होत होती, म्हणून खरं तर हा शोधप्रकल्प हाती घेण्यात आला. तो  २००९मध्येच प्रसिद्धही झाला आहे. त्या अनुषंगानंच आता वाटचाल चालू आहे, त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. या वर्षी एकूण सिकोइया झाडांच्या संख्येत निश्‍चित वाढ दिसत आहे. तर रेडवूडमध्ये वाढीचा वार्षिक उच्चांक यंदा दिसून आला आहे. अर्थात हे भराभर वाढणारं झाड असलं, तरी त्यांची रोपं अजून झुडुपं स्वरूपातच आहेत.

या दोन्ही प्रकारच्या झाडांची अजून तरी कोणी मुद्दाम लागवड केली आहे, असं काही दिसून आलेलं नाही. खरं तर रेडवूडचे लाकूड अनेक दृष्टींनी व्यावसायिक बाबतीत उत्कृष्ट ठरतं. तेव्हा त्या दृष्टीनंही आता प्रयत्न होत आहेत. अशा या पुराणवृक्षांना जतन करायचे निदान आता प्रयत्न वाढीस लागले आहेत, हेही नसे थोडके...तेही मोठ्या अग्निदिव्यातून त्यांना नेऊन...
या संदर्भातील अधिक माहिती : https://www.nps.gov/yose/learn/nature/sequoia-research.htm, आणि http://www.livescience.com/३९४६१-sequoias-redwood-trees.html  या वेबसाइटवर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com