आचार्य दीपंकर श्रीज्ञान अतीश

बौद्ध धर्माचा पुन्हा प्रसार करणारे आचार्य दीपंकर श्रीज्ञान अतीश ही तिबेटमधील बौद्ध परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाची आणि पूजनीय व्यक्ती
Anand Kanitkar writes about Buddhist tradition  Acharya Deepankar Sridyan Atish
Anand Kanitkar writes about Buddhist tradition Acharya Deepankar Sridyan Atishsakal
Summary

बौद्ध धर्माचा पुन्हा प्रसार करणारे आचार्य दीपंकर श्रीज्ञान अतीश ही तिबेटमधील बौद्ध परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाची आणि पूजनीय व्यक्ती

- आनंद कानिटकर

एक हजार वर्षांपूर्वी सध्याच्या बांगलादेशाच्या प्रदेशात जन्मलेले, भारतात शिक्षण घेऊन इंडोनेशियात पुढील शिक्षणासाठी गेलेले आणि तिबेटमध्ये बौद्ध धर्माचा पुन्हा प्रसार करणारे आचार्य दीपंकर श्रीज्ञान अतीश ही तिबेटमधील बौद्ध परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाची आणि पूजनीय व्यक्ती होय.

तिबेटी परंपरेत अतीश यांचं चरित्र लिहिलं गेलं, त्यावरून त्यांच्या आयुष्याबद्दल, कार्याबद्दल माहिती मिळते. अतीश यांचा जन्म पूर्व बंगालमधील बिक्रमपूर इथं राजघराण्यात अंदाजे इसवीसन ९८० किंवा ९८२ मध्ये (हजार वर्षांपूर्वी) झाला. तेव्हा राजपुत्र चंद्रगर्भ नावानं ओळखले जाणारे अतीश लहानपणीच बौद्ध धर्मानं प्रभावित झाले होते. अतीश यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हाचं त्यांचं वय आणि त्यांनी ती दीक्षा कुठं घेतली याबद्दल तिबेटी ग्रंथांत एकमत नाही. बंगालमधून अतीश हे नालंदा इथं गेले, त्या वेळी ते अवघे अकरा-बारा वर्षांचे होते. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत बौद्ध भिक्षू होण्यासाठी दीक्षा घेता येत नसल्यानं अतीश यांना तेव्हा नालंदा विहारात दीक्षा घेता आली नाही, असं तिबेटी परंपरा सांगते.

भारतातील शिक्षण

नालंदा इथल्या आचार्यांनी राजपुत्र चंद्रगर्भ (अतीश) यांना ‘कृष्णगिरीच्या दक्षिणेला वास्तव्यास असणाऱ्या अवधूती नावाच्या बौद्ध आचार्यांकडून मार्गदर्शन घ्यावं,’ असं सुचवलं. आचार्य अवधूतींनी अतीश यांना कृष्णगिरी महाविहारात जाऊन तिथल्या वज्रयोगींकडून दीक्षा घेण्यास सांगितलं. त्यानुसार, अतीश यांनी कृष्णगिरी महाविहारातील वज्रयोगींकडून बौद्ध तंत्रमार्गाची दीक्षा घेतली. अतीश यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून ते साधारण अठराव्या वर्षापर्यंतचा काळ कृष्णगिरी विहार इथं विरक्तीत व्यतीत केला.

प्रसिद्ध संशोधक आर. सी. मजुमदार यांच्या मते, अतीश यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतलेला हा कृष्णगिरी महाविहार म्हणजे महाराष्ट्रातील बोरिवली इथं ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त असलेली कान्हेरी इथली लेणी. ‘कान्हेरी’ हा शब्द ‘कन्हगिरी’ म्हणजे ‘कृष्णगिरी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. कान्हेरी इथल्या शिलालेखांत तिथल्या पर्वतासंदर्भात ‘कृष्णगिरी’ असा उल्लेख आढळतो. कान्हेरी लेण्यात असलेल्या, पूर्व बंगालमधून (सध्याच्या बांगलादेशातून) आलेल्या गोमिल अविघ्नाकर नावाच्या दानकर्त्याच्या शिलालेखातून, त्या काळी कान्हेरीचा आणि पूर्व भारताचा संपर्क असल्याचं स्पष्ट होतं.

यानंतर, बौद्ध भिक्षू बनून पुढील मार्ग अवलंबावा, असं अतीश यांनी ठरवलं. त्यानुसार त्यांनी महासांघिक नावाच्या बौद्ध निकायाच्या ‘लोकोत्तरवादी’ या उपनिकायाची दीक्षा घेतली. या दीक्षेच्या दरम्यान स्थविर शीलरक्षित यांनी अतीश यांना ‘दीपंकर श्रीज्ञान’ हे नाव बहाल केलं. यानंतर अतीश यांनी त्रिपिटक आणि इतर बौद्ध ग्रंथांचा अभ्यास केला.

इंडोनेशियात वास्तव्य

भगवान बुद्धांप्रमाणे बोधी (म्हणजे ज्ञान) प्राप्त करावी असं, बौद्ध ग्रंथांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर, अतीश यांना वाटू लागलं; परंतु या बोधिप्राप्तीसाठी बोधिचित्त-अवस्था प्राप्त करणं आवश्यक असतं. याचं मार्गदर्शन घेण्यासाठी अतीश यांनी इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील बौद्ध विहारातील गुरूंकडे जाण्याचा निर्णय घेतला.

अतीश हे १२० भिक्षूंसह तेरा महिन्यांच्या प्रवासानंतर भारतातून इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील बौद्ध विहारात पोहोचले. अतीश यांनी पुढं बारा वर्षं इंडोनेशियात वास्तव्य केलं. या वास्तव्यादरम्यान अतीश यांनी इंडोनेशियातील गुरूंकडून महायानपरंपरेतील ज्ञान प्राप्त केलं. त्यानंतर भारतात परत आल्यानंतर अतीश यांना विक्रमशिला विद्यापीठाचं ‘प्रमुख आचार्य’पद बहाल करण्यात आलंं. भारतातील राजा राजेंद्र चोल यानं इसवीसन १०२५ मध्ये इंडोनेशियावर स्वारी केली होती, हे आपण मागील लेखात पाहिलं. काही अभ्यासकांच्या मते, इसवीसन १०२५ मध्येच आचार्य अतीश हे भारतात परत आले होते.

तिबेटमधील वास्तव्य

इसवीसनाच्या आठव्या शतकात बौद्ध तंत्रमार्गाचे प्रसिद्ध आचार्य ‘गुरू पद्मसंभव’ हे सध्याच्या पाकिस्तानातील स्वात नदीच्या खोऱ्यातील उड्डियान इथून तिबेटमध्ये आले होते. त्यांनी तिबेटमध्ये बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणावर प्रचलित केला. त्यामुळे गुरू पद्मसंभव यांचं कार्य आणि महत्त्व तिबेट, लडाख, सिक्कीम प्रदेशांतील बौद्ध परंपरेत फार मोठं आहे.

त्यानंतरच्या काळात अनेक तिबेटी भिक्षू बिहारमधील नालंदा आणि विक्रमशिला विद्यापीठात शिकण्यासाठी, भेट देण्यासाठी येत असत. त्यामुळे तिबेटी बौद्ध भिक्षू आणि भारतातील बौद्ध भिक्षू यांचा एकमेकांशी संपर्क होता.

इसवीसनाच्या अकराव्या शतकात तिबेटमधील बौद्ध धर्माला काहीशी उतरती कळा लागली होती. हे बघून अंदाजे इसवीसन १०४१ मध्ये तिबेटच्या राजानं भारतात अतीश यांच्याकडे आपला दूत पाठवून तिबेटमधील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी अतीश यांना तिबेटमध्ये येण्याची विनंती केली. साठ वर्षांच्या आचार्य अतीश यांनी ही विनंती मान्य केली व ते नेपाळमार्गे तिबेटला गेले. पुढची १३ वर्षं तिबेटमध्ये राहून आचार्य अतीश यांनी तिथं बौद्ध धर्माचा पुनःप्रसार केला. अंदाजे इसवीसन १०५४ मध्ये तिबेटमध्येच आचार्य अतीश यांचं त्र्याहत्तराव्या वर्षी निधन झालं.

भारतातील मध्ययुगीन प्रसिद्ध विद्यापीठांतील शेवटच्या काही महत्त्वाच्या बौद्ध आचार्यांमध्ये अतीश यांचं स्थान महत्त्वाचं आहेच; परंतु त्यांनी तिबेटमध्ये केलेलं बौद्ध धर्माच्या प्रसाराचं काम अद्वितीय आहे. अतीश यांच्या विद्वत्तेमुळे काही ग्रंथांत त्यांचा उल्लेख आचार्य पंडित किंवा महापंडित असादेखील केलेला आहे. तिबेटी विहारातील बुद्धमंदिरात भगवान बुद्ध, बोधिसत्त्व पद्मपाणि, तारा इत्यादी बौद्ध देवता, तसंच गुरू पद्मसंभव यांच्याबरोबरच अतीश यांची प्रतिमादेखील पूजली जाते.

साधारणपणे बाराव्या शतकात काढलेल्या एका तिबेटी चित्रामध्ये अतीश हे सिंहासनावर बसलेले दाखवले आहेत. त्यांच्या एका हातात हस्तलिखित घेतलेलं दाखवलं आहे. आता तिबेटी बौद्ध मंदिरांतील भित्तिचित्रांमध्ये अतीश अनेकदा धर्मचक्रपरिवर्तन या मुद्रेत दाखवले जातात. त्यांच्या शेजारी एक छोटेखानी तिबेटी स्तूपदेखील दाखवला जातो.

एक हजार वर्षांपूर्वी पूर्व बंगालच्या प्रदेशात (सध्याच्या बांगलादेशात) जन्मलेले अतीश यांचा, सध्याचा बांगलादेश ते पूर्व आणि पश्चिम भारत, इंडोनेशिया आणि नंतर नेपाळमार्गे तिबेटमधला प्रवास आणि तिथलं वास्तव्य...असा आयुष्याचा, शिक्षणाचा आणि कार्याचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे!

अतीश यांच्या तिबेटमधील अभूतपूर्व योगदानामुळे त्यांचं चरित्र तिबेटमध्ये लिहिलं गेलं आणि त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली; परंतु त्या वेळी आणि त्याआधीही अनेक भारतीय आशियामध्ये, आफ्रिका खंडात, अगदी युरोपमधील ग्रीसपर्यंत प्रवास करत होते, हे आपण आधीच्या लेखांतून बघितलं आहे. या सगळ्यांच्या आयुष्याबद्दल, प्रवासाबद्दल अधिक माहिती आपल्याला मिळत नाही. काही मोजक्या लोकांचा अपवाद वगळता त्यातील अनेकांची नावंही आपल्याला माहीत नाहीत. यामुळे भारत आणि इतर देशांतील शिलालेखांतून, साहित्यातून, भौतिक पुराव्यांतून आणि तिथल्या स्थानिक संस्कृतीतून दिसणारे विविध धागे जोडत, भारताच्या सांस्कृतिक संबंधांचा पट आपल्याला उभा करावा लागतो. या पार्श्वभूमीवर इंडोनेशियात आजही भारतीय संस्कृतीच्या खुणा रोजच्या जगण्यात जपणाऱ्या एका प्रदेशाबद्दल पुढील लेखातून जाणून घेऊ या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com