अफगाणिस्तानातील प्राचीन हिंदू-मूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Idol

प्राचीन अफगाणिस्तानात सर्वत्र बौद्ध धर्माचे अनुयायी होते असं नव्हे, तर अफगाणिस्तानमध्ये इराणमधून आलेल्यांकडून सूर्यपूजन, अग्निपूजन होत असे, तसंच इराणी, ग्रीक आणि भारतीय देवी-देवतांचे पूजनदेखील होत असे.

अफगाणिस्तानातील प्राचीन हिंदू-मूर्ती

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

अफगाणिस्तानात इसवीसनपूर्व पाचवं शतक ते इसवीसनाचं दहावं शतक या पंधराशे वर्षांत इराणी राजे, अलेक्झांडरच्या स्वारीमुळे आलेले ग्रीक राजे, नंतर उत्तरेकडून मध्य आशियातून आलेले शक, कुशाण, हूण, तसंच तुर्कीशाही, हिंदुशाही या घराण्यांतील राजे अशा वेगवेगळ्या राजवटींनी-राजांनी राज्य केलं. या विविध घराण्यांच्या राजवटींमुळे, विशेषतः पूर्व आणि उत्तर अफगाणिस्तानात, विविध संस्कृतींचा मिलाफ झालेला दिसून येतो.

प्राचीन अफगाणिस्तानात सर्वत्र बौद्ध धर्माचे अनुयायी होते असं नव्हे, तर अफगाणिस्तानमध्ये इराणमधून आलेल्यांकडून सूर्यपूजन, अग्निपूजन होत असे, तसंच इराणी, ग्रीक आणि भारतीय देवी-देवतांचे पूजनदेखील होत असे. अफगाणिस्तानात सापडलेल्या काही हिंदू-मूर्तींवरून इथले राजे किंवा त्यांचे सरदार शिव, विष्णू, दुर्गा, गणेश यांच्या मूर्तींची पूजा करत होते असं लक्षात येतं.

उत्तर पाकिस्तानातील गांधार-प्रदेशात अंदाजे दोन हजार वर्षांपूर्वीपासून कार्तिकेय, शिव, विष्णू इत्यादी देवतांच्या मूर्ती सापडतात, हे आपण मागील एका लेखात बघितलं आहे. मात्र, अफगाणिस्तानात आतापर्यत सापडलेल्या हिंदू देवतांच्या मूर्तींचा कालखंड इसवीसनाच्या पाचव्या/सहाव्या शतकाच्या (म्हणजे पंधराशे वर्षांपूर्वीच्या) मागं जात नाही.

इसवीसनाच्या पहिल्या ते चौथ्या शतकात काबूल, जलालाबादच्या परिसरात कुशाण राजांचं राज्य होतं. या कुशाण राजांच्या नाण्यांवर ग्रीक, इराणी, भारतीय देवता दाखवलेल्या आहेत. यात शिव, कार्तिकेय यांच्या प्रतिमाही आहेत.

इसवीसनाच्या चौथ्या ते सातव्या शतकात इथं हूणांच्या विविध टोळ्यांचं राज्य होतं. या हूणांच्या खिंगल नावाच्या राजानं महाविनायकाची प्रतिमा उभारली होती आणि त्यावर एक शिलालेखही कोरला होता. यानंतर अंदाजे इसवीसनाच्या नवव्या आणि दहाव्या शतकात पूर्व अफगाणिस्तानात आणि उत्तर पाकिस्तानात तुर्कीशाही आणि हिंदुशाही या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या दोन घराण्यांची सत्ता होती. यातील हिंदुशाही घराण्यातील राजे हे शैव होते असं त्यांच्या काही शिलालेखांवरून लक्षात येतं.

अफगाणिस्तानात सापडलेल्या हूण, तुर्कीशाही आणि हिंदुशाही राजवटींच्या काळातील काही हिंदू मूर्तींबद्दल जाणून घेऊ या.

शैव-मूर्ती

अफगाणिस्तानात काही संगमरवरी शिवमूर्ती सापडलेल्या आहेत. काही खंडित मूर्तींमध्ये कपाळावर तिसरा डोळा दाखवलेला आहे. त्यावरून ही शिवमूर्ती असावी असा अंदाज लावता येऊ शकतो. उमेसहित महेश्वराची एक मूर्तीदेखील अफगाणिस्तानात सापडली आहे. त्यावरून केवळ शिवच नव्हे तर, उमा-महेश्वर या रूपातदेखील शंकराची उपासना या प्रदेशात होत होती हे लक्षात येतं.

अफगाणिस्तानात काही शिवलिंगंदेखील सापडली आहेत. या शिवलिंगांवर शिवाचं मुख दाखवलेलं असल्यानं त्याला ‘एकमुखी लिंग’ असंही म्हणतात. या शिवाच्या चेहरेपट्टीवर काश्मीरमधील कलाशैलीचा प्रभाव आहे, तर या शिवाच्या मस्तकावरच्या जटा इराणी शिल्पशैलीप्रमाणे हवेत उडताना दाखवलेल्या आहेत. त्यामुळे पूर्वेकडील काश्मीर आणि पश्चिमेकडून आलेल्या इराणी शैलींचा प्रभाव या शिल्पावर दिसून येतो. अफगाणिस्तानातील ही संगमरवरी शिवमूर्ती आणि शिवलिंग साधारणतः इसवीसनाचं सातवं शतक ते नववं शतक या काळात घडवलं असावं.

अफगाणिस्तानात महिषासुरमर्दिनीच्या काही संगमरवरी खंडित मूर्तीदेखील सापडल्या आहेत. रेड्याच्या शरीरातून बाहेर येणाऱ्या महिषासुराला देवी त्रिशूळानं आणि तलवारीनं मारत असल्याचं या मूर्तींमध्ये दाखवण्यात आलं आहे. याशिवाय, काही खंडित मूर्तींमध्ये कपाळावर मध्यभागी तिसरा डोळा दाखवण्यात आलेला आहे, त्यामुळे या खंडित मूर्ती शिवपत्नी पार्वती हिच्या असाव्यात यात शंका नाही. या मूर्तीदेखील इसवीसन सातवं ते नववं शतक या काळातील असाव्यात.

गणेश-मूर्ती

एकोणिसाव्या शतकात अफगाणिस्तानातील गार्देज इथं एक प्राचीन गणेशमूर्ती सापडली होती. या मूर्तीच्या पादपीठावरील संस्कृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिलेल्या शिलालेखात राजा शाही खिंगल यानं ही महाविनायकाची मूर्ती स्थापन केल्याचा उल्लेख आहे. हा खिंगल राजा म्हणजे हेप्थालित टोळीतील हूण राजा खिंगल असावा, असं संशोधक मानतात. या हूणांच्या टोळीत इसवीसनाच्या पाचव्या शतकात आणि इसवीसनाच्या सातव्या शतकात असे खिंगल नावाचे दोन राजे राज्य करत होते. या दोन राजांपैकीच एकानं या गार्देज इथं सापडलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली असावी.

या गणेशमूर्तीच्या खांद्यांच्या आणि दंडांच्या पीळदार स्नायूंवरून त्यावरील अफगाणिस्तानातील ग्रीक शिल्पशैलीचा प्रभाव लक्षात येतो. या गणेशमूर्तीचा अर्धमुकुट मस्तकाच्या मागील बाजूस लांब फितीनं बांधलेला आहे. गणेशमूर्तीत खांद्यावर या फिती कोरलेल्या दिसून येतात. इराणमधील तत्कालीन ससानियन कुळातील राजे असा फितीनं बांधलेला मुकुट परिधान करायचे. त्या इराणी शैलीतून आलेला हा प्रभाव आहे. स्थानिक ग्रीकशैलीचा आणि इराणी शिल्पशैलीचा प्रभाव असलेली ही गणेशप्रतिमा पूर्व अफगाणिस्तानात संस्कृत भाषेतील शिलालेख कोरून एका हूण राजानं स्थापन केलेली होती, ही बाबदेखील महत्त्वाची ठरते.

या महाविनायकाच्या मूर्तीशिवाय गार्देज इथं एक संगमरवरी शिवलिंग आणि महिषासुरमर्दिनीची खंडित मूर्तीदेखील सापडली होती. म्हणजे गार्देज इथं शैवमंदिर किंवा शैवमंदिरांचा समूह असावा असा अंदाज लावता येऊ शकतो. या शैवमूर्तींखेरीज अफगाणिस्तानात विष्णूच्या काही मोजक्याच खंडित मूर्तीदेखील सापडल्या आहेत.

हिंदुशाही घराण्याचा शेवट

इसवीसनाच्या दहाव्या शतकाच्या शेवटी सुबुक्तगिन या गझनीच्या सुलतानानं हिंदुशाही घराण्यातील राजा जयपाल याला हरवून काबूल आणि जलालाबाद यांच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकला. त्यामुळे, जयपाल राजा - सध्याचा जो उत्तर पाकिस्तानचा प्रदेश आहे - तिथं त्या काळी राज्य करू लागला. इसवीसन १००१ च्या दरम्यान सुबुक्तगिनचा मुलगा महमूद (गझनीचा महमूद) यानं राजा जयपाल याला हरवून बंदी बनवलं. या घटनेनं हिंदुशाही घराण्याची गांधारमधील सत्ता खिळखिळी झाली.

गझनीच्या महमुदानं नंतर अगदी सोमनाथ, ग्वाल्हेर, कनौज, मथुरा या ठिकाणी हल्ले केले. उत्तर भारतात त्यानं राज्य स्थापन केलं नाही; पण सध्याच्या पाकिस्तानातील लाहोरच्या भागात त्यानं आपलं राज्य वाढवलं. फिरिश्ता या इराणी इतिहासकारानं वर्णन केल्यानुसार, गझनीच्या महमुदानं सोमनाथाच्या मंदिरातील मूर्ती आणि तिथलं सोनं लूट म्हणून नेलं होतं.

ब्रह्मा या देवतेची जवळजवळ एक मीटर उंचीची मूर्ती अफगाणिस्तानातील गझनी इथल्या राजवाड्यात उत्खननादरम्यान सापडली होती. (ब्रह्मा या देवतेच्या अनेक मूर्ती भारतात सापडल्या आहेत). कदाचित ही मूर्ती भारतात तयार झालेली असावी आणि लूट म्हणून गझनीला नेण्यात आली असावी. गझनी येथे सापडलेली ही मूर्ती आठ भागात तुटलेली होती. या मूर्तीचा चेहरा ज्या पद्धतीनं झिजून खराब झाला होता, त्यावरून या मूर्तीचा वापर पाय ठेवण्यासाठी केला गेला असावा, असा गझनी इथं उत्खनन केलेल्या युरोपीय संशोधकांचा अंदाज आहे.

अंदाजे इसवीसन १०२१ च्या दरम्यान हिंदुशाही राजांचं राज्य संपुष्टात आलं आणि अफगाणिस्तानात इस्लामी राजवट सुरू झाली. नंतरच्या काळात अफगाणिस्तानातील इतर रहिवाशांचं धर्मांतर केलं जाऊन त्यांना मुसलमान करण्यात आलं.

अर्थात्, आधुनिक काळात बांधलेले काही गुरुद्वारा, हिंदू-मंदिरं काबूलमध्ये आजही आहेत; परंतु अफगाणिस्तानातील बौद्ध-अवशेषांसमोर तिथं सापडलेला प्राचीन हिंदू-मूर्तींचा वारसा काहीसा झाकोळून गेला आहे. अफगाणिस्तानातील बौद्ध-स्तूप आकारानं मोठे असल्यानं ते लांबूनही दृष्टीस पडतात, ओळखू येतात. त्यामुळे या भागातील पुरातत्त्वीय उत्खननं ही प्रामुख्यानं बौद्ध-स्थळांवर झाली आहेत.

काही अपवाद वगळता अफगाणिस्तानातील हिंदू-देवतांच्या मूर्ती या अचानक सापडलेल्या आहेत किंवा काबूलमध्ये आणल्यावर माहीत झालेल्या आहेत. हिंदू-देवतांच्या काही प्राचीन मूर्ती काबूलमधील बाजारात विक्रीस ठेवलेल्यादेखील आढळून आल्या होत्या. त्यातील काही मूर्ती काबूलच्या संग्रहालयात आणण्यात आल्या, तर काही मूर्ती नंतर खासगी संग्रहांत समाविष्ट झाल्या असाव्यात.

या मूर्ती काबूलच्या आसपासच्या प्रदेशात नक्की कुठं सापडल्या आहेत याची माहिती नसल्यानं तिथं पुरातत्त्‍वीय उत्खनन करून मंदिरांचे अवशेष शोधणं शक्य होत नाही. असं असलं तरी पूर्व अफगाणिस्तानातील या गणेश, विष्णू, दुर्गा, शिव यांच्या मूर्ती आणि शिवलिंग यांवरून आपल्याला प्राचीन काळातील तिथल्या हिंदू धार्मिक स्थळांचा किमान अंदाज येऊ शकतो.

(सदराचे लेखक हे सांस्कृतिक वारसा-अभ्यासक आहेत.)

Web Title: Anand Kanitkar Writes Ancient Hindu Idols In Afghanistan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Afghanistansaptarang
go to top