भिजलेल्या वाद्यांच्या कटू आठवणी

Monsoon tragedy
Monsoon tragedysakal media

पुराचं पाणी जेव्हा ओसरलं, तेव्हा मी परत माझ्या रो-हाऊसकडे निघालो. घर अख्खं पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे समोरचं दृश्‍य भयानक होतं. माझी वाद्यं ही माझी लक्ष्मी आहे. कपाटातले कपडे खराब झालेत का, रोख पैसे भिजलेत का, याची पर्वा नव्हती; पण ज्या वाद्यांसोबत मी माझे संगीत जगतो, त्यांची अशी अवस्था पाहून मी ढसाढसा रडलो.

२६ जुलै २००५ रोजी मुंबईसह राज्यभरात पावसाने जो हाहाकार माजवला, मी आणि माझा परिवारही त्याला चुकलेला नाही. त्या दिवशीचे विदारक दृश्‍य आजही डोळ्यासमोर लख्खं आठवतं. ‘नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला’ या गाण्याने जी रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता मिळवली, त्यानंतर मुंबईत मी पहिलं घर घेतलं ते गोरेगावच्या मोतीलाल नगरात. एक रो-हाऊस. त्या वेळी माझी सर्वाधिक कामं, रेकॉर्डिंग त्याच परिसरात होत असे. सर्वाधिक स्टुडिओ अंधेरी-गोरेगावमध्ये असल्यामुळे मी पहिलं घर घेतलं ते तिथे. त्यानंतर काही वर्षांनी जवळच्या एका बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट घेतला. माझ्या सर्व रिहर्सल्स वाद्यवृंदासह आमच्या रो-हाऊसच्या घरीच होत असत.

नेहमीप्रमाणे माझ्या एका अल्बमचं टी-सीरिज कंपनीत काम सुरू होतं. २६ जुलैला माझ्या गाण्याच्या रिदमचं रेकॉर्डिंग होतं. तेव्हा आम्ही बिल्डिंगमधल्या घरी राहात होतो. मी रेकॉर्डिंगला जाण्याच्या तयारीत होतो; पण त्या दिवशी सुरू असलेला पाऊस काही थांबत नव्हता. पाऊस जरा ओसरला की जाऊ, अशा विचारात सर्व जण वाट पाहत होते; परंतु थोड्याच वेळात पावसाचं भयानक रूप पाहून तो इतक्यात थांबेल, याची कोणतीही चिन्हं दिसत नव्हती. माझा वादकांशीही संपर्क होऊ शकत नव्हता. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर दर मिनिटाला वाढत होता. माझा मोठा मुलगा हर्षद घरी होता, तर उत्कर्ष आणि आदर्श कॉलेजला गेले होते. दुपारी साधारण दीडच्या सुमारास आदर्श घरी पोहचला आणि तोपर्यंत बाहेरची परिस्थिती कळायला लागली होती.

बिल्डिंगमधला फ्लॅट उंचावर असल्यामुळे खिडकीतून खाली बघितले असता सर्व बाजूंनी पाणी भरत असल्याचं दिसत होतं. माझं जुनं घर रो-हाऊस असल्यामुळे घरात पाणी घुसणार, हे माझ्या लक्षात आलं. तोपर्यंत आदर्श-उत्कर्ष आपल्या मित्रांना घेऊन घरी पोचले होते. मी माझ्या रो-हाऊसमधल्या घरी रिहर्सल्स करत असल्यामुळे माझी बहुतांश वाद्यं तिथे असायची. माझं माझ्या वाद्यांवर जिवापाड प्रेम. पुराचं पाणी घरात शिरतंय या भीतीने आणि वाद्यांच्या काळजीने मी घराबाहेर पडलो. माझ्या दोन घरांच्या मधील चालत अंतर पंधरा मिनिटांचं आहे; परंतु बिल्डिंगखाली गुडघाभर पाणी साचलं होतं. मी चालत चालत रो-हाऊसमधल्या घराकडे निघालो. ढगफुटीचं वातावरण होतं. रो-हाऊसकडे पोहोचलो, तेव्हा घरात कमरेएवढं पाणी होतं. सुदैवाने मी बरीचशी वाद्यं उंचावर ठेवली होती.

माझ्याकडे माझीच नव्हे, तर वडील स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचीही बरीच वाद्यं होती. त्यात बरीच हार्मोनियम, तबले, ढोलक्या, काँगो आणि बोंगोसारखी दुर्मिळ वाद्ये होती. मुलांना जितकं शक्य होतं, तितकी वाद्यं त्यांनी उचलून नेण्याचा प्रयत्न केला. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी घेतलेली जुन्या बाजाची खूप मोठी हार्मोनियम माझ्याजवळ होती. ती खुल्या बाजाची असल्याने घेऊन जाणं शक्यही नव्हतं. म्हणून आम्ही ती उंच कपाटावर ठेवली. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे घेऊन घर कसं बसं बंद करून मी आणि माझी मुलं पुन्हा छातीभर पाण्यातून चालत आमच्या बिल्डिंगच्या घरी आलो. ती रात्र घरात आम्ही सगळे एकत्र राहिलो. एका छताखाली सगळे सुरक्षित आहोत, याचा आनंद होता; दुसरीकडे बाहेरचं चित्र प्रत्येक क्षणाला अधिकाधिक भयानक होत चाललं होतं.

आमच्या घराजवळ एम.व्ही. रोडवर गाई-म्हशींचे खूप गोठे आहेत. त्यातल्या काही म्हशी रस्त्यावर भरलेल्या पाण्यात तरंगत होता. दोन म्हशी बिल्डिंगच्या फाटकाजवळ तरंगत अडकल्या होत्या. पावसापासून वाचण्यासाठी गाडीत बसलेले आणि नंतर दरवाजा न उघडू शकल्याने गाडीतच अडकलेले काही लोक गुदमरून मृत्युमुखी पडले होते. ते दृश्य सुन्न करून टाकणारं होतं. घराच्या खिडकीतून हे सगळं आम्ही पाहात होतो; पण मदतीसाठी बाहेर पडणंही शक्य नव्हतं. नंतर आम्हाला काही माणसं होड्या करून पाण्यातून येताना दिसली, ते मदतीसाठी जात होते. रस्त्यावर पुरेसे लाईट नसल्याने आम्ही खिडकीतून टॉर्चने त्यांना वाट दाखवण्याचा प्रयत्न केला. मी रात्री घराचा दरवाजा उघडून पाहिला तर वरपासून खालपर्यंत सर्व जिन्यांवर शेकडो माणसं आसरा धरून बसली होती. सगळ्या फ्लॅटमधून जमेल त्या पद्धतीने खाण्या-पिण्याची, कपड्यांची, पांघरुणांची मदत केली. दोन दिवस लाईट आणि पुरेशा पिण्याच्या पाण्याशिवाय लोकांनी एकमेकांना खूप मदत केली.

४८ तासांनी जेव्हा पाणी ओसरलं, तेव्हा मी परत माझ्या रो-हाऊसकडे निघालो. घर अख्खं पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे समोरचं दृश्‍य भयानक होतं. जी वाद्यं मी कपाटांवर रचून आलो होतो, ती पूर्ण भिजली होती, फुगली होती. माझी आवडती हार्मोनियम उचलून नेऊ शकलो नव्हतो, तीदेखील भिजली होती. माझ्या वाद्यांची अवस्था पाहून मी ढसाढसा रडलो. माझी वाद्यं ही माझी लक्ष्मी आहे. कपाटातले कपडे खराब झालेत का, रोख पैसे भिजलेत का, याची पर्वा नव्हती; पण ज्या वाद्यांसोबत मी माझे संगीत जगतो, त्यांची अशी अवस्था पाहून मी खूप रडलो. त्या वेळी घरखर्चासाठी पैसे नव्हते. पावसाने जनजीवन ठप्प झालं होतं.

बँका बंद असल्याने घरात राशन-पाणी कसं भरू, या चिंतेने मी गोरेगाव स्टेशनच्या दिशेने निघालो. तिथे माझा एक सोनार मित्र आहे. त्याने पंधरा-वीस हजार रोख रक्कम दिली आणि म्हणाला ‘तुमको जो मदद चाहिए, तो कभीभी बेझिझक बताओ’. त्या पैशाने राशन घेऊन मी घरी आलो. अशी काही मोलाची, मैत्रीची माणसे जोडली गेली आहेत, की त्यांच्यामुळे वेळोवेळी झालेली मदत मी कधीच विसरू शकणार नाही. कारण घरात त्या वेळी गॅसही सुरू नव्हता. आम्ही आठवडाभर स्टोव्हवर जेवण बनवत होतो. मी दोन दिवस माझ्या मुलांना मालाडला भावापाशी ठेवले आणि स्वतः मित्रांना सोबत घेऊन खालचं घर स्वच्छ करून घेतलं. माझी वाद्यं पुन्हा दुरुस्त करण्यासाठी दिली.

ते दिवस धुक्यासारखे सरकत होते. वाद्यांची डागडुजी करणं. मी कोलकत्याहून आणलेले हार्मोनियम, वडिलांची वाद्ये मी हरिभाऊ विश्वनाथ यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं, यापैकी जी वापरता येतील ती मला पुन्हा रिपेअर करून द्या. त्यांनी खूप मोलाची मदत केली. मला आजही आठवतं, मी एवढा नावारूपाला आलेलो असतानाही घरात राशन भरायला पैसा नाही, असे ते दिवस होते. आणि त्यात मला तारून नेलं ते मी जोडलेल्या माणसांनी. त्यांचे मी मानावे तितके आभार कमी आहेत. त्यानंतर रो-हाऊसेसचा पाया उंचावण्याची सरकारकडून परवानगी मिळाली. ते घर पाडून मी पुन्हा उंच पायावर एकमजली उंच घर बांधलं. ते घर आजही उभं आहे. तिथली वाद्यंही तिथेच आहेत. मुंबई हे पैसे कमवायचं, शानशौकीचं शहर आहे, असं बाहेरून वाटत असलं, तरी संकटकाळात एकमेकांना केलेल्या मदतीच्या पायावर ते उभं आहे, याचं जिवंत उदाहरण मी पाहिलं २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीत...

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com